आयडीएफसी क्रेडिट अपॉर्च्युनिटी फंड

सेबीच्या आदेशाने म्युच्युअल फंडांचे वर्गीकरण झाल्यामुळे आधीच्या तुलनेत फंडाच्या प्रकारात वाढ झाली आहे. निश्चित उत्पन्न गुंतवणूक करताना दोन गोष्टींचा विचार केला जातो. रोख्याची मुदत (डय़ुरेशन) आणि पत (क्रेडिट). रिझव्‍‌र्ह बँकेच्या पत धोरण समितीच्या बैठकीनंतर प्रसिद्ध झालेल्या निवेदनानुसार, भविष्यातील व्याज दर निश्चिती ही महागाईचा दर, पर्जन्यमान, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाचे भाव यासारख्या वेगवेगळ्या आकडेवारीवर विसंबून घेतले जाणार असल्याने येत्या वर्षभरात व्याज दर कपात संभवत नसल्याचे अनुमान रोखे विश्लेषकांनी काढले आहेत. व्याजदर आणि रोख्यांच्या किमती यांचे नाते व्यस्त असल्याने सध्या रोख्यांच्या किमती कमालीच्या घसरल्या आहेत. रोख्यांच्या किमती घसरल्याने साधारण वर्षभरापूर्वी केलेल्या गुंतवणुकीवर मिळणारा परतावा बँकांच्या मुदत ठेवींवरील व्याजदरापेक्षा कमी झालेला आहे. या पाश्र्वभूमीवर धोका पत्करून बँक मुदत ठेवींपेक्षा थोडा अधिक परतावा मिळवू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदरांसाठी क्रेडिट अपॉर्च्युनिटी फंड हा एक पर्याय उपलब्ध आहे.

क्रेडिट अपॉर्च्युनिटी फंड या फंड प्रकारात एखाद्या रोख्याची पत वरच्या दर्जाची नसल्याने रोख्याची बाजारातील किंमत कमी असते. निधी व्यवस्थापक पत आणि गुंतवणुकीवरील परतावा यांचा विचार करून ‘ट्रिपल ए’ पत असलेल्या रोख्यांच्या परताव्या पेक्षा किती अधिक परतावा आहे हे जाणून अशा प्रकारच्या रोख्यांत गुंतवणूक करतात. कमी पत असलेले रोखे रोकड सुलभ नसतात. या गुंतवणुका ‘बाय अ‍ॅण्ड होल्ड’ प्रकारच्या म्हणजे रोख्याच्या मुदतपूर्तीपर्यंत ठेवायच्या असतात. डायनॅमिक बॉण्ड फंडातील गुंतवणुकीवरील परताव्यापेक्षा १ ते १.२५ टक्के अधिक परतावा क्रेडिट अपॉर्च्युनिटी फंड देतात. हा अधिकच परतावा परतावा कमी दर्जाची पत असलेल्या रोख्यांत गुंतवणूक केल्या बद्दल मिळत असतो. केंद्र सरकारचे रोखे सर्वात सुरक्षित तर कमी पत असलेले रोखे सर्वात धोकादायक समजले जातात. सध्या म्युच्युअल फंड उद्योग एका संक्रमणातून जात आहे ताज्या उपलब्ध माहिती नुसार क्रेडिट अपॉर्च्युनिटी फंड गटात २५ फंड आहेत. या फंडापैकी आयडीएफसी हे फंड घराणे आणि रोखे गुंतवणुकीचे प्रमुख सुयश चौधरी यांची ओळख एक नेमस्त निधी व्यवस्थापक अशी आहे. या विरुद्ध ‘टेम्पलटन’चे संतोष कामथ यांची ओळख आक्रमक निधी व्यवस्थापक अशी आहे. हाच नेमस्तपणा या फंडाची या सदरासाठी निवड करताना कारण ठरला. क्रेडिट अपॉर्च्युनिटी फंड प्रकारात सर्वात अधिक परतावा देणाऱ्या फंडाच्या तुलनेत या फंडाने गुंतवणूक केलेल्या रोख्यांची पत आणि परतावा यांचा विचार करता परताव्याच्या दुसऱ्या स्थानी असलेल्या आयडीएफसी क्रेडिट अपॉर्च्युनिटी फंडाचा गुंतवणुकीसाठी विचार केला.

उपलब्ध ताज्या आकडेवारीनुसार या फंडाची मालमत्ता १२०६ कोटी असून फंडाच्या गुंतवणुकीचा तपशील उपलब्ध ताज्या आकडेवारीनुसार सोबतच्या कोष्टकात दिला आहे. ज्याप्रमाणे समभाग गुंतवणुकीत लार्जकॅप ते सेक्टरल फंड अशी जोखीम परताव्याची विस्तृत मालिका आहे त्याच प्रमाणे निश्चित उत्पन देणाऱ्या फंदात लिक्विड फंड ते क्रेडिट अपॉर्च्युनिटी फंड अशी जोखीम आणि परताव्याची मालिका आहे क्रेडिट अपॉर्च्युनिटी फंड हे जोखमीच्या पट्टिकेवर गुंतवणुकीतील सर्वात अधिक जोखीम असलेले फंड असतात. गुंतवणूकदाराच्या जोखीम प्रकारानुसार एकूण गुंतवणुकीच्या ठरावीक रक्कम क्रेडिट अपॉर्च्युनिटी फंडात गुंतविली तर गुंतवणुकीतील निश्चित उत्पन्न देणाऱ्या गुंतवणुकीचा परताव्याचा दर वाढविता येतो. अनेकदा शेअर बाजारातील गुंतवणुका नको म्हणणारे पुण्यातील एखाद्या बांधकाम व्यावसायिकाकडे मुदत ठेव करतात. या गुंतवणुकीत ‘क्रेडिट आणि लिक्विडिटी’ संबंधित जोखीम घेत असतात. अशास्त्रीय जोखीम घेण्यापेक्षा कॉर्पोरेट एफडी आणि मुदत ठेवींच्या इतका परतावा परंतु शास्त्रीय पद्धतीने घेतलेली जोखीम नक्कीच परताव्याचा दर वाढवू शकेल. कॉर्पोरेट एफडीच्या बाहेर न आलेल्या गुंतवणूकदारांना रोकड सुलभता देणाऱ्या या फंडात गुंतवणूक करून कधी तरी ‘असेही एकदा व्हावे’ म्हणत विचार करावा.

– वसंत माधव कुळकर्णी

shreeyachebaba@gmail.com

(अस्वीकृती: लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. स्तंभातील आकडेवारी व माहिती ही उपलब्ध स्रोतांपासून घेतली आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)