22 November 2019

News Flash

आयएफए की आरआयए?

काळानुरूप यात बदल झाले तरी अपार्टमेंटवासियांचे ‘स्पिरीट’ मात्र तेच.

|| वसंत कुलकर्णी

कोणत्याही सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक, अथवा कसल्याही ‘इक’ अगर ‘इय’ प्रत्ययान्त चळवळीपासून दूर राहायचे नाही हा बटाटय़ाच्या चाळीचा निर्धार सर्वश्रुत होत. थोरांच्या जयंत्या, मयंत्या, सर्वधर्मियांचे उत्सव, संस्कार, निषेध, अभिनंदनाचे ठराव, असे सर्व चाळीच्या पातळीवरून करण्याचा शिरस्ता बटाटय़ाच्या चाळीत अनेक वर्षे सुरू होता. अण्णा पावश्यांकडे म्युनिसिपालिटी विभाग, सार्वजनिक वाढदिवस समारंभ तर लखूअण्णा आगटय़ांकडे ‘श्राद्ध विभाग’ अशी कामाची विभागणी चाळकऱ्यांनी केली होती. अण्णा पावशे कायम सूतिकागृहांच्या संपर्कात तर लखूअण्णा सोनापुराशी ‘ऑन लाईन’ असायचे. पावश्यांनी घुगऱ्या घातल्या की आगटय़ांनी िपड टाकलेच.

काळानुरूप यात बदल झाले तरी अपार्टमेंटवासियांचे ‘स्पिरीट’ मात्र तेच. चाळीत असलेल्या शा चापाशीच्या सध्याच्या पिढीचा प्रतिनिधी देवांग चापसी हा ‘अपार्टमेंट’मध्ये आल्यापासून आर्थिक उत्पादनाच्या वितरणाच्या व्यवसायात आहे. पारंपारिक धंद्यात ‘दम’ राहिला नसल्याचे त्याचे मत आहे. एका मोठय़ा दलाली पेढीची त्याने फ्रँचाइझी घेतली आहे. या व्यतिरिक्त म्युच्युअल फंडाच्या योजना ते विकतात. झालेच तर आयुर्वमिा, सर्वसाधारण विमा, कंपन्यांचे एफडी ही सर्व उत्पादने ग्राहकांना एका छताखाली मिळण्याची सोय यांच्याकडे उपलब्ध आहे. ‘आगस्टीन फर्ताडो टेलर्स अँड आऊटफिटर्स’ हा जसा अख्या चाळीचा टेलर तसा देवांग चापसी चाळकऱ्यांच्या हल्लीच्या पिढीचा वित्तीय उत्पादनासाठी विक्रेता आहे. परंतु ‘सेबी’ने ‘आरआयए’ (सल्लागार) मॉडेल उपलब्ध करून दिल्यापासून ‘आरआयए’ की ‘आयएफए’ (विक्रेता) या द्विधावस्थेत सापडलेले बटाटा अपार्टमेंटवासिय या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात होते. बटाटा अपार्टमेंटमध्ये सर्वसाधारणपणे देवांग चापसी किंवा ध्रुव पावशे आर्थिक सल्लागाराची भूमिका बजावत आहेत. दोघेही आर्थिक उत्पादनांचे वितरक त्यामुळे खरोखरच वेगळ्या आर्थिक सल्लागाराची गरज आहे का, याबाबतीत अपार्टमेंटवासिय गोंधळलेले आहेत. बटाटा अपार्टमेंटवासियांचा व्हॉटस्अप ग्रुप असून, त्यावर स्वत:साठी आर्थिक सल्लागार निवडतांना नेमकी काय काळजी घेणे गरजेचे असते या संबंधी चर्चा  सुरू होती. कालच्या भारत पाकिस्तान सामन्यादरम्यान व्यस्त असलेल्या एका व्हॉटस्अप ग्रुप सदस्याचा मोबाईल हाती लागला. व्हॉटस्अप ग्रुपवरील संभाषणाचे ट्रान्सस्क्रिप्टमध्ये अर्थसाक्षरते विषयीचे हे बहुमोल विचार आम्ही हे विचार आपल्याभेटीला आणत आहोत.

बर्वे- ‘आरआयए’ काय किंवा ‘आरएफए’ काय आपण मिळालेल्या फीवर किंवा आपण विकत घेतलेल्या आर्थिक उत्पादनांच्या कमिशनवर जगत असलो तरी दोघांच्या कामात मूलभूत फरक आहे आणि आपण तो फरक समजावून घेणे आवश्यक आहे. त्याच बरोबर मिळणाऱ्या मोबदल्याच्या स्त्रोताबद्दल माहिती मिळणे गरजेचे आहे.

ध्रुव पावशे – म्युच्युअल फंड वितरकांनी गुंतवणुकीबाबत सल्ला देणे योग्य नव्हे, त्यांनी तुमच्यासमोर विविध आर्थिक उत्पादनांचे पर्याय ठेवावे. तुम्ही तुमची गरज ओळखून योग्य त्या पर्यायाची निवड करावी असे ‘सेबी’ला अपेक्षित आहे. गुंतवणूकदारांनी यापकी एका किंवा अधिक पर्यायाची निवड केल्यास त्याबदल्यात त्यांना संबंधित कंपन्यांकडून कमिशन मिळते. यामुळे बहुतांश वेळा आयएफएकडून ग्राहकाची खरी गरज काय आहे, हे पाहण्यापेक्षा आपल्याजवळ असलेल्या आर्थिक उत्पादनांपकी कोणते उत्पादन हा घेऊ शकेल याकडेच त्याचे लक्ष असते.

नाडकर्णी – आरआयए ग्राहकाची नेमकी गरज काय आहे, हे जाणून घेऊन त्यांची आर्थिक उद्दिष्टे कोणती, त्यांची जोखीम स्वीकारण्याची क्षमता काय हे लक्षात घेऊन त्यानुसार गुंतवणूक कुठे आणि कशी करायची याचा सल्ला देतात. एखाद वेळेस जर आर्थिक सल्लागाराकडे ग्राहकाच्या गरजेनुसार आवश्यक असे आर्थिक उत्पादन नसेल तर ते सरळ तो व्यवहार थांबवणे पसंत करतात. पण अनावश्यक उत्पादनाची विक्री करत नाहीत. पण हा सल्ला देण्यासाठी आर्थिक सल्लागात फी आकारतात.

ध्रुव पावशे- योग्य आर्थिक नियोजनासाठी संबंधित ग्राहकाच्या आर्थिक बाबीसोबत त्यांच्या जीवनशैली, ग्राहकाच्या आकांक्षा, उत्पन्न, खर्च, अल्पकालीन आणि दीर्घकालीन उद्दिष्टे, मालमत्ता, देणी, करदायित्व आदींबाबतची माहिती जाणून घेण्यात त्याला स्वारस्य असायला हवे. अधिक माहिती मिळविण्यासाठी मी फेसबुकचा आधार घेतो. ग्राहकाला भेटण्याआधी त्याच्या बद्दलची सर्वसमावेशक माहिती गोळा करणे हे एक यशस्वी नियोजनकाराला आवश्यक गोष्ट असते. फेसबुक, ट्विटर यावरून ग्राहकाने न दिलेली माहिती मिळविता येते. नियोजन यशस्वी होण्यासाठी हे गरजेचे असते. ही गरज भागविण्यासाठी ग्राहकाशी जितक्या गप्पा माराव्या तितक्या कमीच असतात. मी वित्तीय नियोजनासाठी आर्थिक उत्पादनाधारित सल्ला देण्याऐवजी ग्राहकाच्या गरजा जाणून त्यानुसार सल्ला त्या व्यक्तीला मी देतो.

नाडकर्णी- तू देत नाहीस हे आम्हाला माहित आहे पण चापाशीचे काय? आर्थिक उत्पादनांचा वितरकाचा तुमच्या गरजांपेक्षाही मोबदल्याच्या लालसेपोटी त्याच्याकडून उत्पादने विकत घेण्यावर अधिक भर असतो. पण, आर्थिक सल्लागार मात्र तुमच्या गरजा ओळखून त्यानुसार पर्याय सुचवितो.

ध्रुव पावशे- ग्राहकाच्या गरजेनुसार तटस्थ सल्ला देण्याची शक्यता अधिक असते असे तुला वाटत असेल तर फारच कमी ‘आरआयए’ असा तटस्थ सल्ला देतात. अनेकदा गुंतवणुकीतले धोके आणि परतावा यासंदर्भात चर्चा करीत नाहीत. आर्थिक सल्लागार निवडतानाचा एक महत्त्वाचा निकष म्हणजे गुंतवणुकीतील संभाव्य धोके आणि त्या गुंतवणुकीतून मिळणारा परतावा यासंदर्भात तुमच्याशी चर्चा करण्याची त्याची तयारी असायला हवी. सध्याच्या डेट फंडात सुरूअसलेल्या गोंधळामुळे या गुंतवणुकीतील धोके चव्हाटय़ावर आले आहेत. एखाद्या उत्पादनाने आपल्या ग्राहकांना भूतकाळात कसा अव्वल परतावा दिला, म्हणून त्या उत्पादनाची भलावण एक चांगला आर्थिक सल्लागार कधीच करीत नाही. गुंतवणुकीवरील परताव्याविषयी तुम्हाला योग्य कल्पनेबरोबर गुंतवणुकीत अल्पकालीन आणि दीर्घकालीन धोक्यांची जाणीव करून देईल.

बर्वे- सुचविलेले विशिष्ट आर्थिक उत्पादन तुमच्या गरजेची पूर्तता करेल किंवा कसे, त्या उत्पादनातील धोका तुमच्या ‘रिस्क टॉलरन्स लिमिट’मध्ये आहे काय याची काळजी घेणारा विक्रेता असेल तर सोन्याहून पिवळे, पण दोन्ही फंडात सात टक्क्यांदरम्यान रिटर्न्‍स आहेत म्हणून एखाद्या शॉर्टटर्म डेट फंडाऐवजी आर्ब्रिटाज फंड विकणारा विक्रेता टाळलेलाच बरा. जर तुमची खरोखर तटस्थपणे सल्ला मिळावा अशी धारणा असेल तर एखाद्याची आर्थिक सल्लागार म्हणून निवड करणे योग्य आहे. निवड करतांना मी केवळ सल्ला मागण्यासाठी आलो आहे हे सांगायला कमीपणा वाटायला नको. तुमची दायीत्वे आणि तुमच्या मालमत्ता यांचा विचार करून ‘कर्जफेड आधी करा, आधी गुंतवणूक नको’ इतका तटस्थपणा विक्रेता दाखवू शकेल काय?

ध्रुव पावशे- आर्थिक उत्पादने विक्रेत्यांचे दोन प्रकार आहेत – एक म्हणजे वैयक्तिक आर्थिक सल्लागार (आयएफए), जो आपल्या वित्तीय गरजांची पूर्तता न करता येणाऱ्या ग्राहकांना व्यावसायिक पद्धतीने पण वैयक्तिक पातळीवर समुपदेशन करतो आणि दुसऱ्या प्रकारात बँकेसारख्या संस्थात्मक पातळीवर ज्या आर्थिक सल्ला देणाऱ्या संस्थेचा कर्मचारी जो ग्राहकांना वित्तीय उत्पादने खरेदी करण्यास उद्युक्त करतो. अनेकदा एखाद्या व्यक्तीपेक्षा संस्थामक पातळीवरच्या कर्मचाऱ्यांना एखाद्या व्यक्तीची पसंती असते. तुम्ही कोणाबारोबर विश्वासाने संवाद करू शकता त्यावर कोणत्या प्रकारच्या सल्लागाराची निवड करावी हे ठरते.  सध्या आर्थिक सल्लागार व आर्थिक उत्पादनांचा वितरक यांच्यातील सीमारेषा पुसट झाली आहे. दोघांनासुद्धा आज आपापला व्यवसाय करायला वाव आहे. सल्लागार असो किंवा विक्रेता योग्य आर्थिक नियोजनासाठी यापकी एकाची निवड करायला हवी हे नक्की.

shreeyachebaba@gmail.com

First Published on June 17, 2019 12:04 am

Web Title: ifa ria
Just Now!
X