|| अजय वाळिंबे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयजी पेट्रोकेमिकल्स लिमिटेड (बीएसई कोड – ५००१९९)                  

आय जी पेट्रोकेमिकल्स ही Phthalic Anhydride (पॅन) या कमॉडिटी केमिकलचे उत्पादन करणारी भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे. ‘पॅन’ या बहुपयोगी रसायनाचा वापर प्लास्टिक, पीव्हीसी, रंग, बांधकाम, वाहतूक, इ. महत्त्वाच्या व्यवसायांत होतो. २५ वर्षांपूर्वी म्हणजे, १९९२ मध्ये धानुका समूहाने लूर्गी जीएमबीएच या जर्मन कंपनीच्या तांत्रिक साहाय्याने महाराष्ट्रातील तळोजा येथे प्रकल्प उभारून आय जी पेट्रोकेमिकल्सची सुरुवात केली. या प्रकल्पांत कंपनीचे तीन कारखाने असून प्रकल्पासाठी लागणारी ऊर्जादेखील तेथूनच निर्मित होते. कंपनीच्या उत्पादनांची वाढती मागणी लक्षात घेऊन कंपनीने विस्तारीकरण प्रकल्प राबविला आहे. गेल्या वर्षी म्हैसूर पेट्रोकेमिकल्स कंपनी ताब्यात घेतल्यानंतर कंपनीने स्वत:च्या प्रकल्पाची उत्पादन क्षमतादेखील ५३,००० टनांनी वाढविली असून, २०२० पर्यंत उत्पादन क्षमता २२८,२५० टनांवर जाईल. सध्या पूर्ण क्षमतेने उत्पादन करणाऱ्या आय जी पेट्रोकेमिकल्सचा उत्पादन खर्च तुलनेने कमी असून त्याला अनुभवी व्यवस्थापनाची जोड मिळाली आहे. गेली अनेक वर्षे सातत्याने उत्तम कामगिरी करून दाखवणाऱ्या आय जी पेट्रोकेमिकल्सने जून २०१८ अखेर समाप्त पहिल्या तिमाहीसाठीदेखील आकर्षक निकाल जाहीर केले आहेत. कंपनीच्या उलाढालीत १८.६ टक्क्यांनी वाढ होऊन ती ३२६.३२ कोटींवरून ३५२.३८ कोटींवर गेली आहे. तर नक्त नफा ३९.१० कोटींवरून ४०.२३ कोटींवर गेला आहे. गेल्या पाच वर्षांत कंपनीने कर्जाची परतफेड करून डेट इक्विटी गुणोत्तर जवळपास नगण्यावर आणले आहे. कंपनीची उत्पादने बहुपयोगी असून त्यांना विविध क्षेत्रांतून आगामी काळातदेखील वाढती मागणी राहील अशी अपेक्षा आहे. विस्तारीकरणाचे सकारात्मक परिणाम लवकरच दिसू लागतील. अत्यल्प कर्ज असलेली आणि १.९ अशी ‘हाय बीटा’ असलेली आय जी पेट्रोकेमिकल्स म्हणूनच खरेदीसाठी आकर्षक वाटते. सध्या ४७५ च्या आसपास असलेला हा शेअर तुम्हाला वर्षभरातच चांगला परतावा देऊ  शकेल.

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ig petrochemicals ltd bse code
First published on: 27-08-2018 at 00:06 IST