26 November 2020

News Flash

भेट आणि प्राप्तिकर

पैसे, सोने, दागिने, वस्तू, स्थावर मालमत्ता वगरे स्वरूपात भेट स्वकियांकडून मिळणे भाग्याचेच..

|| प्रवीण देशपांडे

पैसे, सोने, दागिने, वस्तू, स्थावर मालमत्ता वगरे स्वरूपात भेट स्वकियांकडून मिळणे भाग्याचेच.. पण यावर तुम्हाला कर तर भरावा लागणार नाही ना?

भेट स्वीकारणे आपल्याला सर्वानाच आवडते. माणूस कितीही श्रीमंत असला तरी दुसऱ्याकडून मिळालेली भेट ही त्याच्यासाठी अमूल्यच असते. आपला सांस्कृतिक वारसा जपताना भेट देण्याचे आणि भेट घेण्याचे अनेक प्रसंग येतात. दसरा, दिवाळी वगरे सण किंवा लग्न, वाढदिवस, जन्म, परदेशवारी, घर खरेदी या प्रसंगांनासुद्धा भेट देण्याची प्रथा आहे. या भेटी पसे, सोने, दागिने, वस्तू, स्थावर मालमत्ता वगरे स्वरूपात असतात. या भेटी करपात्र आहेत का? यावर आपल्याला कर भरावा लागेल का? त्या विवरणपत्रात दाखवाव्या लागतात का? असे अनेक प्रश्न आपल्या मनात येतात. कोणत्या भेटी करपात्र आहेत, कोणत्या करमुक्त आहेत हे समजून घेणे गरजेचे आहे.

प्राप्तिकर कायद्यात ‘भेट’ किंवा ‘गिफ्ट’ अशी संज्ञा नाही. रक्कम किंवा मालमत्ता कोणत्याही मोबदल्याशिवाय किंवा कमी मोबदल्यात मिळाली असेल तर ती ‘भेट’ किंवा ‘गिफ्ट’ म्हणूनच समजली जाते. प्राप्तिकर कायद्याप्रमाणे या भेटीचे वर्गीकरण खालीलप्रमाणे :

१.      कोणत्याही मोबदल्याशिवाय मिळालेली रक्कम

२.      कोणत्याही मोबदल्याशिवाय मिळालेली ठरावीक जंगम मालमत्ता

३.      वाजवी बाजारभाव मूल्यापेक्षा कमी भावात खरेदी केलेली ठरावीक जंगम मालमत्ता

४.      कोणत्याही मोबदल्याशिवाय मिळालेली स्थावर मालमत्ता

५.      मुद्रांक शुल्काप्रमाणे असलेल्या मूल्यापेक्षा कमी भावात खरेदी केलेली स्थावर मालमत्ता

वर नमूद केलेले व्यवहार करदात्याने केले असले तर करदात्याला त्यावर कर भरावा लागू शकतो. वरील प्रत्येक बाबतीत कर आकारणी कशी केली जाते हे थोडक्यात पाहू या.

१. कोणत्याही मोबदल्याशिवाय मिळालेली रक्कम :

आपल्याला कोणतीही रक्कम रोखीने, चेकने, बँक ट्रान्स्फर किंवा ड्राफ्टने कोणत्याही मोबदल्याशिवाय मिळालेली असेल तर ती करपात्र असते. त्याला काही अपवाद म्हणजे :

  • एका वर्षांत मिळालेली एकूण रक्कम ५०,००० रुपयांपेक्षा कमी आहे : करदात्याला एका वर्षांत एका किंवा जास्त व्यक्तींकडून भेट म्हणून मिळालेली एकूण रक्कम ५०,००० रुपयांपेक्षा कमी असेल तर ती संपूर्ण रक्कम करमुक्त असेल आणि भेट म्हणून मिळालेली एकूण रक्कम ५०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल तर संपूर्ण रक्कम करपात्र असेल. उदा. करदात्याला त्याच्या ‘अ’ या मित्राकडून ३०,००० रुपये आणि ‘ब’ या मित्राकडून २१,००० रुपये भेट म्हणून मिळाले तर दोहोंचे मि़ळून संपूर्ण ५१,००० रुपये करपात्र उत्पन्नात गणले जातील. कारण वर्षांतील एकूण भेट ५०,००० रुपयांपेक्षा जास्त आहे. समजा ‘ब’ या मित्राकडून त्याला १९,००० रुपये भेट मिळाले असते तर दोहोंची एकूण भेट ४९,००० रुपये झाली असती आणि ही संपूर्ण रक्कम करमुक्त ठरली असती.

ठरावीक नातेवाईकांकडून मिळालेली रक्कम असेल तर : जर एखादी भेट ठरावीक नातेवाईकांकडून मिळालेली असेल तर ती करमुक्त असते. या रकमेला कोणतीही मर्यादा नाही. ठरावीक नातेवाईकांमध्ये ज्या नात्यांचा समावेश होतो अशी काही महत्त्वाची नाती : –

वरील नातेवाईकांच्या व्यतिरिक्त व्यक्तींकडून मिळालेल्या भेटी करपात्र असतील. मात्र त्या भेटींसाठी वर दर्शविलेली ५०,००० रुपयांची मर्यादा ओलांडली नसेल तर भेटी करमुक्त असतील.

  • लग्नात मिळालेली रक्कम : फक्त स्वत:च्या लग्नाच्या निमित्ताने मिळालेल्या भेटी/अहेर करमुक्त आहेत. लग्नाव्यतिरिक्त समारंभांमध्ये म्हणजे वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस वगरेच्या निमित्ताने मिळालेल्या भेटी करमुक्त नाहीत.
  • इच्छापत्र (विल) किंवा वारसाहक्काने मिळालेली रक्कम, स्थानिक प्रशासनाकडून मिळालेली रक्कम, नोंदणीकृत धर्मादाय ट्रस्ट किंवा संस्थेकडून मिळालेली रक्कम, देणाऱ्याच्या मृत्यूनंतर मिळालेली रक्कम यावर करदात्याला कर भरावा लागत नाही.

२. कोणत्याही मोबदल्याशिवाय मिळालेली ठरावीक जंगम मालमत्ता :

या मालमत्तेमध्ये शेअर्स, दागिने, चित्र, पेंटिंग्ज, शिल्प, सोने-चांदी या भांडवली संपत्तीचा समावेश होतो. अशी मालमत्ता मोबदल्याशिवाय करदात्याला एकाकडून किंवा एकापेक्षा जास्त व्यक्तींकडून मिळाली आणि त्याचे एकूण वाजवी बाजार मूल्य ५०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल तर या मूल्याएवढी रक्कम करपात्र असेल. जर मोबदल्याशिवाय मिळालेल्या अशा मालमत्तेचे मूल्य ५०,००० रुपयांपेक्षा कमी असेल तर त्यावर कर भरावा लागणार नाही. उदा. करदात्याला त्याच्या मित्राने ७५,००० रुपयाचे (वाजवी बाजार मूल्याप्रमाणे) सोन्याचे दागिने भेट दिले तर, करदात्याच्या उत्पन्नात ७५,००० रुपये (५०,००० रुपयांपेक्षा जास्त असल्यामुळे) गणावे लागतील. जर हे दागिने ४५,००० रुपयांचे असते तर करदात्याला (५०,००० रुपयांपेक्षा कमी असल्यामुळे) त्यावर कर भरावा लागला नसता. या शिवाय या मालमत्तेव्यतिरिक्त वस्तू भेट दिल्यास ती भेट करपात्र ठरत नाही. उदा. करदात्याला त्याच्या मित्राने एक ८०,००० रुपयांचा मोबाइल फोन भेट म्हणून दिला, मोबाइल फोन ही ‘ठरावीक मालमत्ता’ नसल्यामुळे करदात्याला त्यावर कर भरावा लागणार नाही. वरील (१) मध्ये नमूद करण्यात आलेले अपवाद म्हणजेच ठरावीक मालमत्ता ठरावीक नातेवाईकांकडून मिळाली असल्यास किंवा लग्नात मिळालेली ठरावीक मालमत्तेची भेट, वारसाहक्काने किंवा इच्छापत्राद्वारे मिळालेली मालमत्ता यासाठीसुद्धा लागू आहेत.

३. वाजवी बाजारभावापेक्षा कमी भावात खरेदी केलेली ठरावीक जंगम मालमत्ता:

ठरावीक मालमत्तेचे वाजवी बाजार मूल्य आणि प्रत्यक्ष खरेदी किंमत यामधील फरक ५०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल तर या फरकाएवढी रक्कम करपात्र असेल. उदा. करदात्याने एका व्यक्तीकडून २,५०,००० रुपयांचे (वाजवी बाजार मूल्य) दागिने १,७५,००० रुपयांना खरेदी केल्यास यामधील फरकाएवढी म्हणजेच ७५,००० रुपये रक्कम करदात्याला करपात्र आहे. हेच दागिने २,०५,००० रुपयांना खरेदी केले असल्यास दोहोंमधील फरक ४५,००० म्हणजेच ५०,००० रुपयांपेक्षा कमी असल्यामुळे ही रक्कम करपात्र असणार नाही. हा नियम फक्त ठरावीक मालमत्तेसाठीच लागू होतो. उदा. करदात्याने ३,००,००० रुपये वाजवी बाजार मूल्य असलेली कार एक लाख रुपयांना खरेदी केल्यास या दोहोंमधील फरक ५०,००० रुपयांपेक्षा जास्त असला तरी करदात्याला यावर कर भरावा लागणार नाही. कारण कार ही मालमत्ता ‘ठरावीक मालमत्ता’ नाही.

४. कोणत्याही मोबदल्याशिवाय मिळालेली स्थावर मालमत्ता :

ही मालमत्ता जमीन, इमारत किंवा दोन्हीच्या स्वरूपात असेल आणि मुद्रांक शुल्काप्रमाणे असलेले मूल्य ५०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल तर या मूल्याएवढी रक्कम करपात्र असेल. जर मोबदल्याशिवाय मिळालेल्या स्थावर मालमत्तेचे मुद्रांक शुल्काप्रमाणे मूल्य ५०,००० रुपयांपेक्षा कमी असेल तर त्यावर कर भरावा लागणार नाही. उदा. करदात्याला त्याच्या मित्राकडून एक सदनिका वाढदिवसाच्या दिवशी भेट दिली त्याची त्या सदनिकेचे मुद्रांक शुल्काप्रमाणे मूल्य ४ लाख रुपये आहे. करदात्याला ४ लाख रुपये त्याच्या करपात्र उत्पन्नात दाखवावे लागतील. स्थावर मालमत्ताचे स्थान भारताबाहेर असले तरी वरील तरतुदी लागू होतात. वरील (१) मध्ये नमूद करण्यात आलेले अपवाद म्हणजेच स्थावर मालमत्ता ठरावीक नातेवाईकांकडून मिळाली असल्यास किंवा लग्नात मिळालेली स्थावर मालमत्तेची भेट, वारसाहक्काने किंवा इच्छापत्राद्वारे मिळालेली मालमत्ता यासाठी सुद्धा लागू आहेत.

५. मुद्रांक शुल्काप्रमाणे असलेल्या मूल्यापेक्षा कमी भावात खरेदी केलेली स्थावर मालमत्ता :

नुसती मोबदल्याशिवाय मिळालेली मालमत्ताच करपात्र नाही तर मुद्रांक शुल्काप्रमाणे असलेल्या मूल्यापेक्षा कमी भावात खरेदी केलेल्या मालमत्तेच्या बाबतीत या दोन्ही रकमेतील फरका एवढी रक्कम करपात्र गणली जाते. ही मालमत्ता जमीन, इमारत किंवा दोन्हीच्या स्वरूपात असेल आणि मुद्रांक शुल्काप्रमाणे असलेले मूल्य आणि प्रत्यक्ष खरेदी किंमत या मधील फरक ५०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल आणि हा फरक मोबदल्याच्या पाच टक्क्य़ांपेक्षा जास्त असेल तर या फरकाएवढी रक्कम करपात्र असेल. जर प्रत्यक्ष मोबदला आणि मुद्रांक शुल्काप्रमाणे मूल्य यामधील फरक ५०,००० रुपयांपेक्षा कमी असेल आणि हा फरक मोबदल्याच्या पाच टक्क्य़ांपेक्षा कमी असेल तर त्यावर कर भरावा लागणार नाही. उदा. करदात्याने एक घर ३५ लाख रुपये मोबदला देऊन खरेदी केले, मुद्रांक शुल्कानुसार त्या घराचे मूल्य ३८ लाख रपये आहे. मुद्रांक शुल्काप्रमाणे मूल्य मोबदल्यापेक्षा जास्त आहे, हा फरक ३ लाख रुपये म्हणजेच ५०,००० रुपयांपेक्षा जास्त आहे आणि मोबदल्याच्या पाच टक्क्य़ांपेक्षा (१,७५,००० रुपये) जास्त असल्यामुळे करदात्याला ३ लाख रुपयांवर कर भरावा लागेल. हे घर ३७,६०,००० रुपयांना खरेदी केले असते तर फरक (४०,००० रुपये) हा पाच टक्क्य़ांपेक्षा कमी असल्यामुळे करदात्याला कर भरावा लागला नसता. करदात्याने ही मालमत्ता ठरावीक नातेवाईकांकडून खरेदी केली असल्यास फरकाची रक्कम करपात्र झाली नसती.

करदात्याने आपले करनियोजन करताना, घर, दागिने खरेदी करताना वरील तरतुदी विचारात घेतल्या पाहिजेत. ठरावीक नातेवाईकांना दिलेल्या भेटी जरी करमुक्त असल्या तरी प्राप्तिकर कायद्याच्या इतर तरतुदींचासुद्धा विचार केला पाहिजे. उदा. पतीने पत्नीला काही रक्कम, स्थावर मालमत्ता भेट म्हणून दिली तर अशी रक्कम भेट स्वीकारणाऱ्याला करपात्र नाही. परंतु अशा भेटींमुळे उत्पन्न क्लिबगच्या तरतुदी लागू होतात याची माहिती करदात्याला असणे गरजेचे आहे, अशी माहिती नसल्यास नियोजन नीट होणार नाही.

भेट स्वीकारताना त्याची नोंद करून ठेवणे गरजेचे आहे. करपात्र भेटी करदात्याला इतर उत्पन्नात दाखवाव्या लागतात. विवरणपत्र भरताना हे उत्पन्न न विसरता विचारात घेऊन त्यावर योग्य तो कर भरून व्याज आणि दंडापासून सुटका करून घ्यावी.

लेखक सनदी लेखाकार आणि कर सल्लागार आहेत. त्यांच्याशी ई-मेल pravin3966@rediffmail.com वर संपर्क साधून आपले करविषयक प्रश्न विचारता येतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2019 12:20 am

Web Title: income tax
Next Stories
1 व्यापारचक्र
2 कांद्यासाठी अच्छे दिन
3 नकुशा मालमत्ता
Just Now!
X