|| प्रवीण देशपांडे

कोणत्या भेटी करपात्र आहेत आणि कोणत्या करमुक्त आहेत हे आपण याच स्तंभातील मागील लेखातून बघितले. आता या भेटी स्वीकारल्यानंतर त्याचे पुढे त्याचे काय होते हे समजणेसुद्धा गरजेचे आहे.

भेटींपासून मिळालेले उत्पन्न :

काही ठरावीक नातेवाईकांकडून मिळालेल्या भेटी, भेट स्वीकारणाऱ्याला करपात्र नाहीत, हे आपण मागील लेखात जाणून घेतले. या भेटी जरी करपात्र नसल्या तरी त्या भेटीच्या गुंतवणुकीतून मिळणारे उत्पन्न मात्र करपात्र आहे. काही भेटींच्या बाबतीत भेटींवर मिळालेले उत्पन्न भेट देणाऱ्या व्यक्तीलाच करपात्र आहे. अशा भेटी कोणत्या हे खाली सांगितले आहे :

’ पती किंवा पत्नीला दिलेल्या भेटी : पतीने पत्नीला किंवा पत्नीने पतीला जर भेट दिली तर त्या भेटीच्या गुंतवणुकीतून मिळणारे उत्पन्न भेट देणाऱ्याला करपात्र आहे. उदा. जर पतीने पत्नीला त्यांच्या उत्पन्नातून १ लाख रुपये भेट म्हणून दिले आणि पत्नीने ते बँकेत मुदत ठेवीत गुंतविले आणि त्यावर तिला ९,००० रुपये व्याज मिळाले. हे व्याज पतीच्या उत्पन्नात गणले जाईल आणि ते पतीला करपात्र असेल. पतीने पत्नीला किंवा पत्नीने पतीला घर भेट म्हणून दिले आणि भेट स्वीकारणाऱ्याने ते घर भाडय़ाने दिले तर त्यावर मिळणारे उत्पन्न भेट देणाऱ्याला करपात्र असेल.

याला अपवाद म्हणजे पत्नीला लग्नाच्या पूर्वी दिलेल्या भेटी. उदा. जर एका करदात्याने त्याच्या लग्नापूर्वी भावी पत्नीला १ लाख रुपये भेट दिले आणि तिने ते बँकेत मुदत ठेवीत गुंतविले तर त्यावर मिळालेले व्याज लग्नानंतरसुद्धा पतीच्या उत्पन्नात गणले जात नाही. परंतु ही भेट ५०,००० रुपयांपेक्षा जास्त असल्यामुळे भावी पत्नीला लग्न होण्यापूर्वी मिळालेली रक्कम करपात्र आहे. पत्नीचे लग्नापूर्वीचे उत्पन्न या भेटी स्वीकारूनसुद्धा करपात्र उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी असेल तर या रकमेवरसुद्धा कर भरावा लागणार नाही.

विभक्त राहण्यासाठी दिलेल्या संपत्तीवर मिळालेले उत्पन्न हे संपत्ती भेट देणाऱ्याला करपात्र नाही.

पती किंवा पत्नीला जर भेट म्हणून काही रक्कम हस्तांतरित केली आणि भेट घेणाऱ्याने ते पसे करमुक्त पर्यायात गुंतविले तर त्यावर भेट देणाऱ्याला कर भरावा लागणार नाही. उदा. पतीने पत्नीला १ लाख रुपये भेट म्हणून दिले आणि पत्नीने ते सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीत (पीपीएफ) गुंतविले तर त्यावर मिळणारे व्याज करमुक्त असल्यामुळे कोणालाच कर भरावा लागणार नाही.

’  सुनेला दिलेल्या भेटी : सासू-सासऱ्यांनी सुनेला रोख रकमेच्या किंवा मालमत्तेच्या स्वरूपात भेट दिली आणि त्या भेटीतून उत्पन्न मिळाले तर ते उत्पन्न सुनेला करपात्र नसून सासू किंवा सासऱ्यांना (ज्यांनी भेट दिली आहे) करपात्र आहे. मुलाच्या लग्नापूर्वी सासू-सासऱ्यांनी, होणाऱ्या सुनेला भेट दिली आणि त्यावर काही उत्पन्न मिळाले तर ते सासू किंवा सासऱ्याच्या उत्पन्नात गणले जात नाही. मुलाच्या लग्नानंतरसुद्धा लग्नापूर्वी दिलेल्या भेटीवर मिळालेले उत्पन्न सासू किंवा सासऱ्याच्या उत्पन्नात गणले जात नाही.

’  अजाण मुलांना दिलेल्या भेटी : अजाण मुलांना (ज्यांचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आहे) मिळालेले उत्पन्न पालकाच्या उत्पन्नात (ज्याचे उत्पन्न जास्त आहे) गणले जाते. त्यामुळे अजाण मुलांच्या नावाने ठेवलेल्या गुंतवणुकीवर पालकांनाच कर भरावा लागतो. १८ वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या मुलांना दिलेल्या भेटींच्या गुंतवणुकीवर मिळणारे उत्पन्न मात्र पालकांच्या उत्पन्नात गणले जात नाही.

या तरतुदीची माहिती नसल्यास जास्त कर भरावा लागू शकतो. काही करदाते आपले उत्पन्न कमी दाखविण्यासाठी मुदतठेव पत्नीच्या नावाने ठेवतात आणि व्याजाचे उत्पन्न पत्नीला करपात्र समजून, स्वतच्या उत्पन्नात घेत नाहीत, हे प्राप्तीकर खात्याच्या नजरेस आल्यास त्यावर कर, व्याज आणि दंड भरावा लागू शकतो.

भेटीद्वारे मिळालेल्या मालमत्तेची विक्री :

कोणत्याही मालमत्तेची विक्री केल्यास त्यावर होणाऱ्या भांड्वली नफ्यावर कर भरावा लागतो. यासाठी करदात्याने मालमत्ता स्वत खरेदी केली असली पहिजे असा नियम नाही, ती भेट किंवा वारसाहक्काने मिळालेली असली तरी भांडवली नफा करपात्र आहे. मालमत्ता स्वत खरेदी केलेली असल्यास करदात्याला खरेदी मूल्य माहिती असते. मालमत्ता जर भेटीच्या रूपाने किंवा वारसाहक्काने करदात्याकडे आलेली असल्यास कोणते खरेदी मूल्य विचारात घेऊन भांडवली नफा गणावा हा प्रश्न पडतो.

मालमत्ता जर भेटीद्वारे किंवा वारसाहक्काने मिळालेली असल्यास, आधीच्या मालकाने ज्या किमतीस मालमत्ता खरेदी केली होती ती किंमत, खरेदी मूल्य म्हणून विचारात घेऊन, करदात्याला भांडवली नफा गणावा लागतो. उदा. वडिलांनी आपल्या मुलाला एक घर भेट दिले, ते त्यांनी २०११ मध्ये २५ लाख रुपयांना खरेदी केले होते, मुलाने ते घर ६० लाख रुपयांना विकले, तर यावर होणारा भांडवली नफा गणण्यासाठी, खरेदी मूल्य २५ लाख रुपये विचारात घेतले जाईल. जर भेटकर्त्यांने दिलेली भेट, कलम ५६ नुसार करपात्र असेल आणि भेट स्वीकारणाऱ्याने हा व्यवहार करपात्र उत्पन्नात घेतला असेल तर मात्र या भेटीचे मूल्य हे या मालमत्तेचे खरेदी मूल्य म्हणून समजण्यात येइल (कलम ४९ (४))

दुसरा प्रश्न असा पडतो की संपत्ती दीर्घ मुदतीची किंवा अल्प मुदतीची आहे, हे ठरविण्यासाठी खरेदीची कोणती तारीख विचारात घ्यावी. न्यायालय आणि कर लवादाच्या निकालानुसार आधीच्या मालकाने खरेदी केलेल्या तारखेपासून ही मुदत ठरवली जाते. वरील उदाहरणात वडिलांनी हे घर, समजा, मुलाला मे २०१८ मध्ये भेट म्हणून दिले आणि मुलाने ते घर मार्च २०१९ मध्ये विकले, तर ही संपत्ती मुलासाठी अल्पमुदतीची असली तरी, भांडवली नफा गणण्यासाठी, वडिलांनी हे घर जेव्हा खरेदी केले त्या दिवसापासून धारणकाळ विचारात घेऊन ही संपत्ती दीर्घ मुदतीची असेल. याशिवाय महागाई निर्देशांकाचा फायदासुद्धा मुलाला घेता येतो.

भेटींद्वारे कर नियोजन करतांना विशेष काळजी घेतली पाहिजे. या भेटींमुळे प्राप्तिकर कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन तर होत नाही ना याची खात्री केली पाहिजे. प्राप्तिकर खात्याकडून मोठय़ा रकमेचे असे व्यवहार तपासले जाण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे करसल्लागाराची मदत घेणे उचित ठरते.

लेखक सनदी लेखाकार आणि कर सल्लागार आहेत. त्यांच्याशी pravin3966@rediffmail.com या  ई-मेलवर संपर्क साधून आपले करविषयक प्रश्न विचारता येतील.