14 August 2020

News Flash

कर बोध  : करदात्यांच्या व्यवहारांचे ‘माहिती-स्रोत’

नवीन ‘फॉर्म २६ एएस’द्वारे पडताळणी आवश्यक

नवीन ‘फॉर्म २६ एएस’द्वारे पडताळणी आवश्यक

प्रवीण देशपांडे

अनवधानाने का होईना पण करदात्याकडून योग्य ती माहिती विवरणपत्रात भरताना नमूद केली गेली नाही, तर अशा करदात्याला त्रास सहन करावा लागतो. अशा व्यवहारांची माहिती प्राप्तिकर खात्याकडे अनेक स्रोतांतून जमा होत असते. विवरणपत्र भरण्यापूर्वी करदाता ती माहिती आता बघू शकणार आहे.

करदाता आपल्या उत्पन्नाची, व्यवहाराची आणि कराची माहिती विवरणपत्राद्वारे प्राप्तिकर खात्याकडे दर वर्षी सादर करीत असतो. प्राप्तिकर खात्याकडेसुद्धा करदात्याच्या अनेक व्यवहारांची माहिती विविध सरकारी खाते, बँका, संस्थांकडून प्राप्त होत असते. ही माहिती करदात्याने सादर केलेल्या विवरणपत्राबरोबर तपासली जाते आणि त्यात काही तफावत असेल तर प्राप्तिकर खात्याकडून याबाबत विचारणा केली जाते.

अनवधानाने का होईना पण करदात्याकडून योग्य ती माहिती विवरणपत्रात भरताना नमूद केली गेली नाही, तर अशा करदात्याला त्रास सहन करावा लागतो. अशा व्यवहारांची माहिती जी प्राप्तिकर खात्याकडे आहे ती करदाता आता बघू शकणार आहे. यामुळे करदात्याचा त्रास थोडय़ा प्रमाणात कमी होईल. प्राप्तिकर खात्याने ‘फॉर्म २६ एएस’मध्ये १ जून २०२० पासून बदल केले आहेत.

पूर्वी ‘फॉर्म २६ एएस’मध्ये फक्त करविषयक माहिती करदात्याला दिसत होती. यात उद्गम कर (टीडीएस), अग्रिम कर, स्व:निर्धारण कर, मालमत्तेवरील कापलेला आणि कापला गेलेला कर याची माहिती करदात्याला दिसत होती. १ जून २०२० नंतर करदात्याला खालील माहिती त्याच्या ‘फॉर्म २६ एएस’मध्ये दिसेल.

उद्गम कर आणि गोळा केलेल्या कराची माहिती : या पहिल्या भागात करदात्याच्या कापल्या गेलेल्या उद्गम कराचा (टीडीएस) आणि गोळा केलेल्या कराचा (टीसीएस) समावेश आहे. करदात्याच्या पगारावर, व्याजाच्या उत्पन्नावर, कंत्राटी उत्पन्नावर, भाडय़ाच्या उत्पन्नावर, कमिशन, व्यावसायिक उत्पन्नावर, स्थावर मालमत्तेची विक्री वगैरे उत्पन्नावर कापलेल्या उद्गम कराची माहिती असेल. याशिवाय गाडी खरेदी, वगैरेवर गोळा केलेला कर (टीसीएस) सुद्धा या सदरात दाखविला जाईल. ही माहिती जुन्या ‘फॉर्म २६ एएस’मध्येदेखील उपलब्ध होती. उद्गम कर कापणाऱ्याने तो न भरल्यास किंवा उद्गम कराचे विवरणपत्र न भरल्यास किंवा पॅन चुकीचा भरल्यास करदात्याच्या ‘फॉर्म २६ एएस’मध्ये या नोंदी दिसणार नाहीत. करदात्याने स्वत:हून नोंदी ठेवून ही माहिती वेळोवेळी तपासली पाहिजे आणि उद्गम कर ‘फॉर्म २६ एएस’मध्ये न दिसल्यास कर कापणाऱ्याकडे याविषयी पाठपुरावा करावा.

निर्दिष्ट आर्थिक व्यवहार (स्पेसीफाइड फायनान्शियल ट्रँझ्ॉक्शन – एसएफटी) : बँक, पोस्ट ऑफिस, सहनिबंधक, कंपनी, म्युच्युअल फंड वगैरे संस्थांकडून मोठय़ा रकमेचे व्यवहार (एसएफटी) प्राप्तिकर खात्याकडे विवरणपत्राद्वारे कळविले जातात.  (सोबतचे कोष्टक पाहा)

या व्यवहारांची माहिती मागील काही वर्षांपासून प्राप्तिकर खात्याकडे जात होती. करदात्याच्या विवरणपत्रात दर्शविलेल्या माहितीत तफावत आढळल्यास करदात्याला नोटीस पाठवून माहिती मिळविली जाते. हे मोठय़ा रकमेच्या व्यवहारांचे करदात्याच्या उत्पन्नाशी जुळत नसतील तरीसुद्धा करदात्याकडून खुलासा मागितला जातो. आता ही माहितीदेखील ‘फॉर्म २६ एएस’मध्ये करदात्याला दिसणार आहे. करदाता ही माहिती त्याच्या नोंदीप्रमाणे तपासून बघू शकतो. उत्पन्न गणताना किंवा विवरणपत्रात अतिरिक्त माहिती देताना या फॉर्म २६ एएसचा उपयोग करदाता करू शकतो.

भरलेल्या कराची माहिती : करदात्याने आर्थिक वर्षांत भरलेल्या अग्रिम कर, स्व:निर्धारण कर याची माहिती या सदरात दिसेल. ही माहिती जुन्या ‘फॉर्म २६ एएस’मध्येदेखील उपलब्ध होती. करदात्याने कर भरताना चुकीचा पॅन नमूद केल्यास करदात्याच्या ‘फॉर्म २६ एएस’मध्ये या भरलेल्या कराची माहिती दिसणार नाही. तसेच चलन भरताना चुकीचे वर्ष नोंदवल्यास त्या वर्षीच्या ‘फॉर्म २६ एएस’मध्ये ही कराची रक्कम दिसणार नाही. अशा वेळेला करदात्याने प्राप्तिकर अधिकाऱ्याकडे जाऊन चलनात दुरुस्ती करून घ्यावी, जेणेकरून ही रक्कम या फॉर्ममध्ये दिसेल आणि तो कर ग्राह्य़ समजला जाईल.

देय कर (डिमांड) आणि कर परताव्याची (रिफंड) माहिती : प्राप्तिकर खाते करदात्याचा देय कर आणि करदात्याला कर परतावा देय असेल तर तो या सदरात दाखविणार आहे. कर देय असेल तर करदात्याला तो वेळेत भरता येईल किंवा तो देय कर चुकीचा असेल तर योग्य ती सुधारणा करून घेता येईल. तसेच प्राप्तिकर खात्याने करदात्याचा करपरतावा कमी दाखविला असेल तर त्यासाठीसुद्धा सुधारणा करून घेता येईल.

प्रलंबित कार्यवाहीची माहिती : प्राप्तिकर कायद्याप्रमाणे कोणती कार्यवाही चालू असेल तर त्याविषयीची माहितीसुद्धा आता ‘फॉर्म २६ एएस’मध्ये दर्शविली जाईल.

पूर्ण झालेल्या कार्यवाहीची माहिती : प्राप्तिकर कायद्यानुसार एखादी कार्यवाही पूर्ण झाली असेल तर त्याची माहिती ‘फॉर्म २६ एएस’मध्ये आता दिसेल.

याशिवाय करदात्याचा आधार क्रमांक, भ्रमणध्वनी, जन्मतारीख, ईमेल माहितीदेखील आता करदात्याला नवीन ‘फॉर्म २६ एएस’मध्ये दिसेल. करदात्याला वेळोवेळी ही माहिती अद्ययावत करता येईल. ही सर्व माहिती १ जून २०२० पासून प्राप्तिकर खात्यातर्फे करदात्याच्या पॅन खात्यावर महिना संपल्यानंतर तीन महिन्यांत अपलोड केली जाईल. ही माहिती करदात्याला नक्कीच उपयुक्त ठरेल आणि विवरणपत्र भरताना त्याचा उपयोग करता येईल.

करदात्याला ही माहिती त्याच्या माहितीबरोबर तपासून बघता येईल. प्राप्तिकर खात्याने अपलोड केलेली ही माहिती चुकीची असेल तर करदात्याला ती दुरुस्त करून घ्यावी लागेल. करदात्याने हे लक्षात ठेवले पाहिजे की उद्गम कराची, गोळा केलेल्या कराची, भरलेल्या कराची रक्कम या ‘फॉर्म २६ एएस’मध्ये दिसत असेल तरच ती रक्कम देय करातून वजा करता येईल. ‘फॉर्म २६ एएस’द्वारे मिळालेली माहिती कर भरताना आणि विवरणपत्र भरताना करदात्यांनी विचारात घेतल्यास कराचे आणि कायद्याचे अनुपालन होऊ शकेल आणि प्राप्तिकर खात्याकडून मिळणाऱ्या नोटिसींची संख्या कमी होईल.

करदात्याचे कोणकोणते आर्थिक व्यवहार

माहिती कोणाकडून दिली जाते?

१. दहा लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेचे बँक ड्राफ्ट किंवा पे ऑर्डर एका वर्षांत रोखीने घेणे

बँक

२. दहा लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीची बँकेची प्रीपेड इंस्ट्रुमेंट्स एका वर्षांत रोखीने घेणे

बँक

३. एक किंवा अनेक चालू खात्यात एका वर्षांत एकूण ५० लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढल्यास किंवा जमा केल्यास

बँक

४. दहा लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम चालू खात्याव्यतिरिक्त आणि मुदत खात्याव्यतिरिक्त खात्यात एका वर्षांत जमा केल्यास

बँक, पोस्ट ऑफिस

५. आर्थिक वर्षांत दहा लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या एक वा अनेक मुदत ठेवी (नूतनीकरण सोडून)

बँक, पोस्ट ऑफिस, एनबीएफसी

६. एका आर्थिक वर्षांत एक लाख रुपये रोखीने क्रेडिट कार्डचे पैसे देणे

बँक किंवा क्रेडिट कार्ड कंपनी

७. एका आर्थिक वर्षांत १० लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेचे कोणत्याही मार्गाने क्रेडिट कार्डचे पैसे देणे

बँक किंवा क्रेडिट कार्ड कंपनी

८. एका आर्थिक वर्षांत एका व्यक्तीकडून १० लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेचे रोखे किंवा डिबेंचर्ससाठी मिळालेले पैसे

कंपनी, रोखे/डिबेंचर्स जारी करणारी संस्था

९. एका आर्थिक वर्षांत एका व्यक्तीकडून १० लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेचे समभागांसाठी मिळालेले पैसे

कंपनी

१०. एका आर्थिक वर्षांत एका व्यक्तीकडून १० लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेचे समभाग बाय-बॅकसाठी मिळालेले पैसे

भांडवली बाजारात नोंदणीकृत कंपनी

११. एका आर्थिक वर्षांत एका व्यक्तीकडून १० लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेचे म्युच्युअल फंडाच्या एका किंवा अनेक योजनांचे युनिट्ससाठी मिळालेले पैसे

म्युच्युअल फंड ट्रस्टी

१२. एका आर्थिक वर्षांत एका व्यक्तीकडून १० लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या विदेशी मुद्रा किंवा विदेशी मुद्रा कार्ड किंवा प्रवासी चेकसाठी मिळालेले पैसे

विदेशी मुद्रेचा अधिकृत व्यापारी

१३. तीस लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेची स्थावर मालमत्तेची खरेदी किंवा विक्री किंवा मुद्रांक शुल्काप्रमाणे तीस लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या मालमत्तेची खरेदी/विक्री

सहनिबंधक

१४. कोणत्याही व्यक्तीकडून एका व्यवहारासाठी २ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम रोखीने पैसे मिळणे (वरीलपैकी व्यवहार सोडून)  ज्या व्यक्तींचे ‘कलम ४४ एबी’नुसार लेखापरीक्षण होते

पडताळा कसा कराल?

‘फॉर्म २६ एएस’ बघण्यासाठी करदात्याला त्यांच्या ‘पॅन’वर www.incometaxindia.gov.in लॉग-इन करावे लागेल. त्यानंतर ‘माय अकाऊंट’ या सदरात ‘व्ह्य़ू फॉर्म २६ एएस टॅक्स क्रेडिट’ या दालनात जाऊन आपला ‘फॉर्म २६ एएस’ त्यांना बघता येईल.  तेथील माहितीवरून त्यांच्या व्यवहारांची पडताळणी करता येईल.

ल्ल लेखक सनदी लेखाकार व कर सल्लागार

pravin3966@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2020 1:03 am

Web Title: income tax information sources of taxpayer transactions zws 70
Next Stories
1 बाजाराचा तंत्र कल : अचूक लक्ष्यवेध
2 थेंबे थेंबे तळे साचे : गुंतवणुकीतील संभ्रमावस्था
3 बंदा रुपया : यशाचे आकर्षक वेष्टन!
Just Now!
X