प्रवीण देशपांडे

व्यक्तीची करपात्रता ही त्याच्याकडील संपत्तीच्या प्रकारानुसार आणि तिच्या धारण काळानुसार ठरते. म्हणूनच ‘संपत्ती’ म्हणजे काय आणि भांडवली नफ्यासाठी ‘संपत्ती’ची व्याख्या काय हेही करदात्यांनी समजून घेतले पाहिजे.

Man Commits Suicide, Killing Second Wife , Killing Son, Immoral Relationship, nagpur crime, Immoral Relationship crime, nagpur news, murder news, crime news, marathi news,
नागपूर : अनैतिक संबंधामुळेच घडले हत्याकांड, तिघांवर एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
Like daughter even daughter in law can get job on compassionate basis
मुलीप्रमाणेच सुनेलासुद्धा अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळू शकते…

नियमित उत्पन्नाव्यतिरिक्त मिळालेल्या उत्पन्नावर करपात्रता कशी आणि किती आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे. सोने, घर, जमीन, प्लॉट, दुकान, समभाग, वगैरे संपत्तीची विक्री केल्यास होणारा नफा किंवा तोटा प्राप्तिकर कायद्यात कशा पद्धतीने हाताळला जातो? याबद्दल करदात्यांच्या मनात संभ्रम असतो.

संपत्तीच्या प्रकारानुसार आणि त्याच्या धारण काळानुसार व्यक्तीची करपात्रता ठरते. ज्या व्यक्ती खरेदी-विक्रीचा धंदा करतात त्यांच्यासाठी विक्रीवर होणारा नफा हा ‘धंदा-व्यवसायाच्या उत्पन्नात’ गणला जातो. उदाहरणार्थ, ज्या व्यक्ती सोन्याचांदीचा व्यापार करतात त्यांच्यासाठी सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीवर होणारा नफा हे धंदा-व्यवसायाचे उत्पन्न आहे. इतर व्यक्तींसाठी याच्या विक्रीवर होणारा नफा हा भांडवली नफा आहे. भांडवली नफा हा संपत्ती कोणत्या प्रकारची आहे यावर अवलंबून असतो. प्राप्तिकर कायद्यात भांडवली नफ्यासाठी ‘संपत्ती’ची व्याख्या दिलेली आहे. यानुसार संपत्ती म्हणजे काय हे समजून घेतले पाहिजे. संपत्तीच्या व्याख्येत सर्व प्रकारच्या संपत्तीचा समावेश होतो. परंतु यामध्ये व्यापारातील साठा, ग्रामीण भागातील शेतजमीन, सुवर्ण रोखे (गोल्ड बाँड), वैयक्तिक वस्तू यांचा समावेश होत नाही. वैयक्तिक वस्तूंमध्ये कपडे, भांडी, गाडी, फर्निचर, इत्यादी वस्तूंचा समावेश होतो. म्हणजे या वस्तूंच्या विक्रीवर होणारा नफा हा करपात्र भांडवली नफा म्हणून गणला जात नाही. परंतु काही वैयक्तिक वस्तू मात्र यातून वगळण्यात आल्या आहेत. यामध्ये सोने-चांदीपासून तयार केलेले दागिने, शिल्पे, चित्रे, पुरातत्त्व वस्तूंचा संग्रह वगैरेंचा समावेश आहे. म्हणजेच सोन्याचे दागिने जरी वैयक्तिक वस्तू असली तरी त्याच्या विक्रीवर होणारा नफा हा करपात्र भांडवली नफा म्हणून गणला जातो.

भांडवली नफा हा कोणत्या संपत्तीवर करपात्र आहे हे समजल्यानंतर यावरील करपात्रता त्याच्या धारण काळावर अवलंबून असते. या धारण काळानुसार भांडवली नफा हा अल्प मुदतीचा आहे किंवा दीर्घ मुदतीचा आहे हे ठरते. साधारणत: ३६ महिन्यांपेक्षा जास्त काळासाठी संपत्ती धारण केली असेल तर ती संपत्ती दीर्घ मुदतीची होते आणि त्यावर होणारा भांडवली नफादेखील दीर्घ मुदतीचा असतो. ३६ महिन्यांपेक्षा कमी काळासाठी संपत्ती धारण केली असेल तर ती संपत्ती अल्प मुदतीची होते. याला काही अपवाद आहेत. शेअर बाजारात नोंदणीकृत कंपन्यांचे समभाग, रोख्यांसाठी आणि इक्विटी फंडातील युनिट्ससाठी हा कालावधी ३६ महिन्यांऐवजी १२ महिन्यांचा आहे. शेअर बाजारात नोंदणीकृत नसलेल्या समभागांसाठी, स्थावर मालमत्तेसाठी (जमीन, इमारत किंवा दोन्ही) हा कालावधी ३६ महिन्यांऐवजी २४ महिन्यांचा आहे.

दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर करबचतीसाठी गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत शिवाय महागाई निर्देशांकाचा फायदासुद्धा घेता येतो आणि सवलतीच्या दरात (२० टक्के) कर भरता येतो. शेअर बाजारात नोंदणीकृत समभाग आणि इक्विटी फंडातील युनिट्स ज्यावर ‘कलम ११२ अ’नुसार सवलतीच्या दरात (१० टक्के) कर भरला जातो त्यासाठी महागाई निर्देशांकाचा फायदा घेता येत नाही.

अल्पमुदतीच्या भांडवली नफ्यावर करदात्याच्या उत्पन्नाच्या टप्प्याप्रमाणे लागू असलेल्या कराच्या दराने कर भरावा लागतो. शेअर बाजारात नोंदणीकृत समभाग आणि इक्विटी फंडातील युनिट्सवर, ज्यावर प्रतिभूती व्यवहार कर (एसटीटी) भरला जातो त्यावर सवलतीच्या दरात (१५ टक्के) कर भरला जातो.

आता वाचकांकडून आलेल्या प्रश्नांच्या समाधानाकडे वळू या.

’  प्रश्न : मे २०१७ मध्ये मी एक घर ४५ लाख रुपयांना खरेदी केले होते. या घरासाठी मी गृहकर्ज घेतले होते. हे घर मी एप्रिल २०२१ मध्ये ६० लाख रुपयांना विकले. या पैशातून मी माझे गृह कर्ज फेडले. मी नवीन गुंतवणूक करू इच्छित नाही. मला यावर किती कर भरावा लागेल.

–    माधुरी कुलकर्णी

उत्तर : आपण घर खरेदी केल्या तारखेपासून २४ महिन्यांनंतर विकले आहे, ही संपत्ती दीर्घ मुदतीची आहे. आपल्याला महागाई निर्देशांकाचा फायदा घेता येईल. यानुसार आपल्या घराची खरेदी किंमत ५२,४४,४८५ इतकी असेल (प्रत्यक्ष खरेदी किंमत ४५ लाख  आर्थिक वर्ष २०२१-२२ चा निर्देशांक ३१७ भागिले आर्थिक वर्ष २०१७-१८ चा निर्देशांक २७२). आपल्याला झालेला दीर्घ मुदतीचा भांडवली नफा हा ७,५५,५१५ इतका असेल. या नफ्यावर २० टक्के इतका कर (अधिक त्यावर ४ टक्के शैक्षणिक आणि आरोग्य कर) भरावा लागेल. तथापि आपण या घराच्या खरेदीसाठी गृह कर्ज घेतले होते. गृह कर्जावर ‘कलम ८० सी’नुसार वजावट घेतली असेल आणि हे घर ताबा घेतल्या तारखेपासून पाच वर्षांत विकले तर या वर्षी वजावट तर मिळतच नाही शिवाय मागील वर्षांत घेतलेली वजावटसुद्धा या वर्षीचे उत्पन्न समजले जाते.

’  प्रश्न : मी २०१४ मध्ये खरेदी केलेले शेअर बाजारात सूचिबद्ध असलेल्या कंपनीचे समभाग मे २०२१ मध्ये विकले. मला भांडवली नफा कसा गणावा लागेल?

–    प्रसाद शिंदे

उत्तर : आपल्याला ‘कलम ११२ अ’नुसार सवलतीच्या दरात कर भरता येईल. आपण समभाग १ फेब्रुवारी २०१८ पूर्वी खरेदी केले असल्यामुळे या कलमानुसार भांडवली नफा गणतांना समभागाची खरेदी किंमत खालीलप्रमाणे दोन्हीपैकी (१ आणि २ पैकी) जी जास्त आहे ती विचारात घेतली जाईल :

१.    प्रत्यक्ष खरेदी किंमत

२.    खालील पैकी (अ आणि आपैकी) जी कमी आहे ती

अ.   समभागाचे ३१ जानेवारी २०१८ रोजीचा योग्य बाजार भाव

आ.  विक्री किंमत

अशा प्रकारे गणलेली खरेदी किंमत आणि विक्री किंमत यामधील फरक हा भांडवली नफा किंवा तोटा असेल. प्रथम १ लाख रुपयांच्या नफ्यावर कर भरावा लागणार नाही. नफा त्यापेक्षा जास्त असेल तर अशा जास्त रकमेवर १० टक्के इतक्या सवलतीच्या दराने कर भरावा लागेल. या कलमानुसार महागाई निर्देशांकाचा फायदा घेता येणार नाही.

’  प्रश्न : मी डिसेंबर २०१९ मध्ये डेट फंडाचे काही युनिट्स १,५०,००० रुपयांना खरेदी केले होते. मार्च २०२१ मध्ये मी ते १,८०,००० रुपयांना विकले. मला यावर कर भरावा लागेल का?

–    एक वाचक

उत्तर : डेट फंडाचे युनिट्स खरेदी केल्यापासून ३६ महिन्यांच्या आत विकल्यामुळे. ही संपत्ती अल्प मुदतीची ठरेल त्यामुळे महागाई निर्देशांकाचा फायदा घेता येणार नाही. यावर ‘एसटीटी’ भरला गेला नसल्यामुळे सवलतीच्या दराचा फायदा मिळणार नाही. आपल्याला ३०,००० रुपयांच्या नफ्यावर उत्पन्नाच्या टप्प्याप्रमाणे कर भरावा लागेल.

’  प्रश्न : माझ्या आईचे वय ७५ वर्षे आहे. तिला व्याजाचे ३,००,००० रुपये वार्षिक उत्पन्न मिळते. तिला सोन्याच्या विक्रीतून तीन लाख रुपयांचा दीर्घ मुदतीचा नफा झाला आहे. तिला कर भरावा लागेल का?

–    साधना देशमुख

उत्तर : आई ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे कमाल करमुक्त उत्पन्नाची मर्यादा तीन लाख रुपये इतकी आहे. व्याजाचे करपात्र उत्पन्न २,५०,००० रुपये (३,००,००० आणि यातून ‘कलम ८० टीटीबी’नुसार ५०,००० रुपयांची वजावट) आहे. हे उत्पन्न वजा जाता ५०,००० रुपयांचे करमुक्त उत्पन्न (३ लाख वजा व्याज २,५०,००० रुपये) शिल्लक राहते. ही शिल्लक दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यातून वजा करता येते. ही वजा केल्यानंतर २,५०,००० रुपयांचा भांडवली नफा करपात्र असेल आणि त्यावर २० टक्के इतका कर (अधिक त्यावर ४ टक्के शैक्षणिक आणि आरोग्य कर) भरावा लागेल. एकूण ५२,००० रुपये कर भरावा लागेल.

लेखक सनदी लेखाकार आणि कर सल्लागार आहेत.

pravin3966@rediffmail.com