13 December 2019

News Flash

विवरणपत्र कोणी भरावे, कोणत्या फॉर्ममध्ये?

जुल महिना हा प्राप्तिकर कायद्याच्या दृष्टीने महत्त्वाचा महिना.

|| प्रवीण देशपांडे

जुल महिना हा प्राप्तिकर कायद्याच्या दृष्टीने महत्त्वाचा महिना. ज्या करदात्यांना त्यांच्या लेख्यांचे लेखापरीक्षण बंधनकारक नाही अशा करदात्यांना, २०१८-१९ या आर्थिक वर्षांचे प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची शेवटची तारीख ३१ जुल २०१९ आहे. वैयक्तिक करदाते आणि हिंदू अविभक्त कुटुंब यांना भराव्या लागणाऱ्या विवरणपत्राबद्दलची माहिती या लेखातून करून घेऊ या.

विवरणपत्र कोणी भरावे :

ज्या वैयक्तिक किंवा हिंदू अविभक्त कुटुंबांचे एकूण उत्पन्न (कलम ८० च्या वजावटीपूर्वी) कमाल करमुक्त मर्यादेपेक्षा जास्त आहे अशांना विवरणपत्र भरणे बंधनकारक आहे. कमाल करमुक्त मर्यादा खाली दर्शविली आहे :

  • करदात्याचे वय ६० वर्षांपेक्षा कमी आहे किंवा हिंदू अविभक्त कुटुंब यासाठी = २,५०,००० रु.
  • करदात्याचे वय (जे निवासी भारतीय आहेत) २०१८-१९ या आर्थिक वर्षांमध्ये केव्हाही ६० वष्रे किंवा त्यापेक्षा जास्त आहे आणि ८० वर्षांपेक्षा कमी आहे = ३,००,००० रु.
  • करदात्याचे वय (जे निवासी भारतीय आहेत) २०१८-१९ या आर्थिक वर्षांमध्ये केव्हाही ८० वष्रे किंवा त्यापेक्षा जास्त आहे = ५,००,००० रु.

बऱ्याच करदात्यांची अशी समजूत असते की, कोणताही कर देय नसेल तर विवरणपत्र भरले नाही तरी चालते. हे बरोबर नसून विवरणपत्र भरण्यासाठी निकष उत्पन्नाचा आहे, देय कराचा नाही. करदात्यांनी आपले उत्पन्न तपासून बघावे, करदात्याचे एकूण उत्पन्न कलम ८० क, ८० ड, ८० जी, ८० टीटीए, वगरे कलमांच्या वजावटी घेण्यापूर्वी वर दर्शविलेल्या कमाल करमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा जास्त असेल तर विवरणपत्र भरणे बंधनकारक आहे. ज्या करदात्याला विवरणपत्र भरणे बंधनकारक आहे आणि त्याने ते मुदतीत भरले नाही तर त्याला विलंब शुल्क भरावे लागते.

कोणत्या फॉर्ममध्ये भरावे :

मागील काही वर्षांपासून विवरणपत्राच्या फॉर्ममध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत. या वर्षीसुद्धा विवरणपत्राच्या फॉर्ममध्ये बदल करून अतिरिक्त माहिती भरणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे करदात्यांनी योग्य विवरणपत्राच्या फॉर्मची निवड करणे गरजेचे आहे. विवरणपत्र कोणत्या फॉर्ममध्ये भरावे हे करदात्याच्या उत्पन्नावरून, निवासी दर्जा, कंपनीत संचालक (डायरेक्टर) आहे का, नोंदणीकृत नसलेल्या कंपनीचे शेअर्स असणे यावर अवलंबून असते. कोणत्या करदात्यांना कोणता फॉर्म लागू होतो याबद्दल:

फॉर्म १ :

फॉर्म २ :

१. वैयक्तिक, २. हिंदू अविभक्त कुटुंब, ३. ज्या करदात्यांना फॉर्म १ लागू होत नाही त्यांना या फॉर्ममध्ये विवरणपत्र भरता येते. तर ज्या करदात्यांच्या उत्पन्नात धंदा-व्यवसायाच्या उत्पन्नाचा समावेश नाही अशांनाही भरता येईल.

थोडक्यात, करदाता कोणत्याही कंपनीत संचालक (डायरेक्टर) असेल किंवा करदात्याकडे २०१८-१९ या आर्थिक वर्षांत कधीही नोंदणीकृत नसलेल्या कंपन्याचे शेअर्स असतील किंवा करदात्याकडे भारताबाहेर संपत्ती किंवा त्याला भारताबाहेरील संपत्तीत आर्थिक स्वारस्य असेल किंवा करदाता भारताबाहेरील खात्यात अधिकृत सही करणारा असेल तर किंवा करदात्याचे भारताबाहेर उत्पन्न असेल, परंतु करदात्याच्या उत्पन्नात धंदा-व्यवसायापासूनच्या उत्पन्नाचा समावेश नसेल तर फॉर्म २ मध्ये विवरणपत्र भरता येते.

फॉर्म ३ :

ज्या वैयक्तिक किंवा हिंदू अविभक्त कुटुंबांच्या उत्पन्नामध्ये धंदा-व्यवसायाच्या उत्पन्नाचा समावेश होतो त्या करदात्यांना फॉर्म ३ मध्ये विवरणपत्र भरावे लागेल.

फॉर्म ४ :

कोणत्या करदात्यांना भरता येतो –

१. वैयक्तिक, २. हिंदू अविभक्त कुटुंब, ३. भागीदारी संस्था (एलएलपी सोडून) आणि ४. निवासी भारतीय

  कोणते उत्पन्न असेल तर भरता येतो –

१. एकूण उत्पन्न ५० लाख रुपयांपेक्षा कमी

२. वेतन किंवा निवृत्तिवेतनाचा, एका घरापासूनच्या उत्पन्नाचा आणि इतर उत्पन्नाचा समावेश

३. धंदा-व्यवसायातील उत्पन्न हे अनुमानित करावर ‘कलम ४४ एडी’नुसार (ज्याची उलाढाल २ कोटी रुपयांपेक्षा कमी)  ४. व्यवसायातील उत्पन्न हे अनुमानित करावर ‘कलम ४४ एडीए’नुसार (ज्याची उलाढाल ५० लाख रुपयांपेक्षा कमी)    ५. वाहतूक धंद्यातील उत्पन्न हे अनुमानित करावर ‘कलम ४४ एई’नुसार (ज्यांच्याकडे १० पेक्षा कमी मालवाहू वाहने आहेत)           ६. करदात्याच्या उत्पन्नात इतर व्यक्तींचे उत्पन्न मिसळले जात असेल तर (उदा. पती/पत्नी, अजाण मुलगा/मुलगी, वगरे) त्याचे उत्पन्नसुद्धा वरील उत्पन्नाच्या स्रोतापासूनच असले पाहिजे

कोणत्या करदात्यांना भरता येत नाही -१. करदाता कोणत्याही कंपनीत डायरेक्टर असेल तर २. करदात्याकडे २०१८-१९ या आर्थिक वर्षांत कधीही नोंदणीकृत नसलेल्या कंपन्याचे शेअर्स असतील  ३. करदात्याकडे भारताबाहेर संपत्ती किंवा भारताबाहेरील संपत्तीत आर्थिक स्वारस्य असेल  ४. करदाता भारताबाहेरील खात्यात अधिकृत सही करणारा असेल तर       ५. करदात्याचे भारताबाहेर उत्पन्न असेल तर      ६. अनिवासी भारतीय

  कोणते उत्पन्न असेल तर भरता येत नाही –

१. एकूण उत्पन्न ५० लाख रुपयांपेक्षा जास्त आहे २. धंदा-व्यवसायाच्या उत्पन्नाचा समावेश आहे आणि ४४ एडी, ४४ एडीए किंवा ४४ एई या कलमानुसार कर भरत नसेल तर  ३. एकापेक्षा जास्त घरांपासून उत्पन्न आहे  ४. भांडवली नफ्यापासून उत्पन्न असल्यास ५. करदात्याच्या इतर उत्पन्नांत लॉटरीचे उत्पन्न किवा शर्यतीच्या घोडय़ांची मालकी आणि देखभाल यापासून उत्पन्न असल्यास    ६. पाच हजार रुपयांपेक्षा जास्त शेतीचे उत्पन्न    ७. करदात्याचा कोणत्याही प्रकारचा मागील वर्षांचा तोटा किंवा या वर्षीचा तोटा पुढील वर्षांत कॅरी फॉरवर्ड करावयाचा असल्यास

विवरणपत्रामधील बदल :

या वर्षी विवरणपत्रात खालील बदल करण्यात आले आहेत :

  • मागील वर्षांपर्यंत फॉर्म १ किंवा ४ (सुगम) मधील कागदी विवरणपत्र भरण्याची मुभा (१) अतिज्येष्ठ नागरिक (ज्यांचे वय ८० वर्षांपेक्षा जास्त आहे) आणि (२) ज्यांचे उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा कमी आहे आणि कर परताव्याचा (रिफंड) दावा नाही अशा करदात्यांना देण्यात आली होती. आर्थिक वर्ष २०१८-१९ साठी ही मुभा फक्त अतिज्येष्ठ नागरिकांसाठीच आहे. इतर करदात्यांना संगणकाद्वारे (ई-फायलिंग) विवरणपत्र भरणे बंधनकारक करण्यात आले आहे.
  • अनिवासी भारतीयांसाठी : कोणत्या अधिकार क्षेत्रातील निवासी आहेत आणि त्या क्षेत्रामधील करदात्याचा ओळख क्रमांक द्यावा लागेल. जे भारतीय नागरिक आहेत किंवा मूळ भारतीय नागरिक आहेत त्यांना आर्थिक वर्ष २०१८-१९ मधील भारतातील वास्तव्य आणि मागील चार वर्षांतील भारतातील वास्तव्य किती दिवस आहे ते नमूद करावे लागेल.
  • करदात्यांनी या वर्षी स्थावर मालमत्तेची विक्री केलेली असल्यास, मालमत्ता खरेदी करणाऱ्याचा तपशील द्यावा लागेल, त्याचे नाव, पत्ता, पॅन, मालमत्तेतील त्याचा हिस्सा असा तपशील दीर्घ मुदतीच्या आणि अल्प मुदतीच्या भांडवली नफ्यासाठी द्यावा लागेल. या तरतुदीमुळे खरेदीदाराचा ‘पॅन’ घेणे गरजेचे झाले आहे.
  • करदाता जर आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये केव्हाही, एखाद्या कंपनीत संचालक असेल तर त्याला त्या कंपनीचे नाव, पॅन, कंपनी शेअर बाजारात नोंदणीकृत आहे किंवा नाही आणि करदात्याचा डीन (संचालक ओळख क्रमांक) हा तपशील विवरणपत्रात द्यावा लागेल.
  • करदात्याकडे जर आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये केव्हाही, एखाद्या शेअरबाजारात नोंदणीकृत नसलेल्या कंपनीचे शेअर्स असतील तर त्याचा तपशील विवरणपत्रात द्यावा लागेल. या तपशिलामध्ये कंपनीचे नाव, पॅन, वर्षांच्या सुरुवातीला किती शेअर्स होते, या वर्षी किती शेअर्स खरेदी केले, किती हस्तांतरित केले आणि वर्षांच्या शेवटी किती शेअर्स आहेत आणि त्याची खरेदी किंवा विक्री किंमत याचा समावेश होतो. हा तपशील अशा शेअर्सपासून उत्पन्न असले किंवा नसले तरीही द्यावयाचा आहे. करदात्यांचा व्यवहार नोंदणीकृत कंपन्याच्या शेअर्समध्ये असेल तर त्याचा तपशील द्यावा लागणार नाही.
  • ११ जुल २०१९ रोजी प्राप्तिकर विवरणपत्र फॉर्म २ मध्ये नव्याने काही माहिती जोडण्यात आली आहे. शेअरबाजारात नोंदणीकृत असलेल्या कंपन्यांच्या शेअर्सची विक्री करून दीर्घ मुदतीचा भांडवली नफा झाला असेल तर त्या प्रत्येक शेअर्सप्रमाणे (स्क्रिप्ट) तपशील विवरणपत्रात द्यावा लागेल. पूर्वी एकूण खरेदी, एकूण विक्री आणि एकूण भांडवली नफा द्यावा लागत होता.

लेखक सनदी लेखाकार आणि कर सल्लागार आहेत. त्यांच्याशी pravin3966@ rediffmail.com  या  ई-मेलवर संपर्क साधून आपले करविषयक प्रश्न विचारता येतील.

First Published on July 22, 2019 12:46 am

Web Title: income tax statement mpg 94
Just Now!
X