औद्योगिक उत्पादन वाढीचा उणे वृद्धीदर, त्यात आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्था ‘मूडीज’चे भारताच्या विकासदरावरचे निराशाजनक भाष्य या घटनांमुळे मंदीने पुन्हा उचल खाल्ली. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स : ४०,३५६.६९

निफ्टी : ११,८९५.५०

येणाऱ्या दिवसात निर्देशांकाचा ‘महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर’ हा सेन्सेक्सवर ४०,००० आणि निफ्टीवर ११,८०० असेल. सेन्सेक्स ४०,००० आणि निफ्टी ११,८००च्या वर सातत्याने टिकल्यास नवीन उच्चांक सेन्सेक्सवर ४१,७०० आणि निफ्टीवर १२,४५० असा असेल.

भविष्यात सेन्सेक्स ४०,००० आणि निफ्टी ११,८००चा स्तर राखण्यात अपयशी ठरल्यास सेन्सेक्स ३८,७०० आणि निफ्टी निर्देशांक ११,५०० पर्यंत खाली घसरू शकतो.

जाहीर झालेले कंपन्यांचे वित्तीय निकाल व त्यांचे विश्लेषण..

‘महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर’ ही एक महत्त्वाची संकल्पना आता काळाच्या कसोटीवर उतरत आहे. ही चिकित्सा ख्यातनाम, प्रथितयश, गुणवत्तेचे मापदंड जोपासणाऱ्या इन्फोसिस या समभागावर ‘हा सूर्य हा जयद्रथ’ या निकषावर आपण लावून पाहिली. इन्फोसिसची तिमाही निकालाची नियोजित तारीख ११ ऑक्टोबर होती. ४ ऑक्टोबरचा बंद भाव ७९३ रुपये होता. निकालानंतरचा महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर ७५० रुपये होता (संदर्भ ‘अर्थवृत्तान्त’ ७ ऑक्टोबर २०१९). गुंतवणूकदारांच्या मानसिक तयारीसाठी तिमाही निकालाअगोदर चार दिवसांचा कालावधी होता. तिमाही वित्तीय निकाल जाहीर झाल्यानंतर, समभागाचा बाजारभाव महत्त्वाच्या केंद्रिबदू स्तरावर टिकला, तर तिमाही निकाल चांगला, अन्यथा वाईट. इन्फोसिसचा प्रत्यक्ष वित्तीय निकाल जाहीर झाल्यानंतर समभागाचा भाव सातत्याने ७५० रुपयांवर टिकणे नितांत गरजेचे होते. अन्यथा भाव ६५० रुपयांपर्यंत घसरण्याची दाट शक्यता होती. त्यात ‘विसलब्लोअर’नी जोरात शिट्टी मारल्याने भाव कोसळणे अपेक्षितच होते आणि झालंही तसंच. बरोबर २३ ऑक्टोबरला ६१५ रुपयांचा नीचांक नोंदवत इन्फोसिसचा त्या दिवशीचा बंद भाव बरोबर ६५० रुपये होता, हे नवलच! याच ६५० रुपयांच्या स्तराचा आधार घेत १५ नोव्हेंबरचा बंद भाव हा ७०४ रुपये होता.

याच स्तंभातील ७ ऑक्टोबरच्या लेखातील दुसरा समभाग हा टीसीएसचा होता. टीसीएसचा त्या वेळी बंद भाव २,०७८ रुपये होता व निकाल जाहीर झाल्यानंतरचा महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर हा २,१०० रुपये होता. लेखात म्हटल्याप्रमाणे जर निकाल उत्कृष्ट असेल तर २,१०० रुपयांचा स्तर राखत प्रथम वरचे लक्ष्य २,२५० रुपये सूचित केले होते. हे प्रत्यक्ष निकालाअगोदरचे विश्लेषण होते. प्रत्यक्ष निकाल हा उत्कृष्ट होता. टीसीएसने २,१०० रुपयांचा स्तर राखत ३१ ऑक्टोबरला २,२८४ रुपयांचा उच्चांक नोंदवला. ज्या वाचकांकडे टीसीएस दीर्घ मुदतीच्या गुंतवणूक धारणेअंतर्गत आहे त्यांनी ते राखून ठेवले व अत्यल्प मुदतीच्या गुंतवणूकदारांना (शॉर्ट टर्म ट्रेडर) अल्पावधीत आठ टक्क्यांचा परतावा मिळविता आला. आजही टीसीएस २,१०० रुपयांचा महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर राखून आहे आणि १५ नोव्हेंबरचा बंद भाव हा २,१७४ रुपये आहे.

यातील विलक्षण योगायोग – वरील दोन्ही कंपन्या या संगणक आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्या पण तिमाही वित्तीय निकाल जाहीर झाल्यानंतर, समभागाचा बाजारभाव महत्त्वाच्या केंद्रिबदू स्तरावर टिकला तर वरचे लक्ष्य टीसीएसने अचूक गाठले, तर बरोबर उलट इन्फोसिसने खालचे लक्ष्य नेमके गाठले.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.