22 April 2019

News Flash

इंडेक्स फंडातील गुंतवणूक

गेल्या वर्षी आपण प्रातिनिधिक पोर्टफोलिओ बनवताना वेगवेगळ्या म्युच्युअल फंडांचा वापर केला.

प्रातिनिधिक छायाचित्र

|| तृप्ती राणे

गेल्या वर्षी आपण प्रातिनिधिक पोर्टफोलिओ बनवताना वेगवेगळ्या म्युच्युअल फंडांचा वापर केला. आपले हे पोर्टफोलिओ आपण यापुढेही तसेच चालू ठेवणार आहोत. त्याशिवाय या वर्षी आपण नवीन पोर्टफोलिओ तयार करणार आहोत. ते असणार आहेत ‘इंडेक्स’वर आधारित, म्हणजेच निर्देशांकामधील गुंतवणुकीचा अनुभव या वर्षांपासून आपण घेणार आहोत.

इंडेक्स फंडातील गुंतवणूक दोन प्रकारची असते:

रेग्युलर म्युच्युअल फंड : या फंडांमध्ये आपण कधीही गुंतवणूक करू शकतो. या फंडांमध्ये ‘एसआयपी’ही करता येते. म्युच्युअल फंडाच्या खर्च आणि एक्झिट लोडव्यतिरिक्त इतर कोणताही खर्च या फंडांमध्ये गुंतवणूक करताना किंवा पैसे काढताना नसतो. उदाहरणार्थ, एचडीएफसी इंडेक्स सेन्सेक्स, रिलायन्स इंडेक्स सेन्सेक्स, यूटीआय निफ्टी इंडेक्स, एचडीएफसी इंडेक्स निफ्टी ५०, आयसीआयसीआय प्रु. निफ्टी इंडेक्स, आयसीआयसीआय प्रु. निफ्टी नेक्स्ट ५०.

ईटीएफ- एक्स्चेंज ट्रेडेड फंड : हे फंड काही काळासाठी गुंतवणूक स्वीकारतात. एकदा फंड बंद झाला की नवीन गुंतवणूक करता येत नाही. या कारणामुळेच या फंडामध्ये एसआयपीचे निर्देश देता येत नाही. फंड ऑफर संपल्यानंतर या फंडांना शेअर बाजारात सूचिबद्ध करणे बंधनकारक आहे. ते झाल्यावर या फंडाची खरेदी-विक्री ही शेअर बाजारामार्फतच होऊ शकते. म्हणून डिमॅट खाते असावे लागते आणि दलालीचा खर्च होतो. दर महिन्याला तुम्ही या फंडाची किमान एक युनिट विकत घेऊ शकता आणि या पद्धतीने एसआयपी करू शकता. उदाहरणार्थ, एचडीएफसी सेंसेक्स ईटीएफ, आयसीआयसी-प्रु सेंसेक्स ईटीएफ, कोटक सेंसेक्स ईटीएफ, एचडीएफसी निफ्टी ५० ईटीएफ, आयसीआयसीआय प्रु. निफ्टी १०० ईटीएफ.

वरील दोन्ही प्रकारची गुंतवणूक जरी निर्देशांकात होत असली, तरी खर्च आणि परतावे हे वेगळे आहेत. हे आपल्याला खालील तक्त्यातून लक्षात येईल:

ज्या गुंतवणूकदारांना सेन्सेक्स किंवा निफ्टी निर्देशांकामध्ये उडी मारायची आहे आणि एसआयपी करायची आहे त्यांच्यासाठी सेन्सेक्स इंडेक्स फंड व निफ्टी इंडेक्स फंड हे चांगले पर्याय आहेत. म्हणून या वर्षी अजून एक पोर्टफोलिओ माझ्या लेखामध्ये समाविष्ट करत आहे. (सोबत सहाव्या क्रमांकाचा पोर्टफोलियो पाहावा)

तर यापुढे वर्षभर आपण या निर्देशांक पोर्टफोलिओचा नियमित आढावा घेत राहणार आहोत.

trupti_vrane@yahoo.com

(लेखिका सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार)

सूचना : जोखीम क्षमता तपासून, सल्लागाराची मदत घेऊन आणि संपूर्ण माहिती मिळवून मग गुंतवणूक करा. तुमच्या फायद्याची किंवा तोटय़ाची जबाबदारी ही तुमचीच असेल.

  • या सदरामध्ये गुंतवणुकीसाठी वापरलेले म्युच्युअल फंड आणि शेअर्स हे उदाहरण म्हणून आहेत. कोणत्याही म्युच्युअल फंडाची किंवा शेअरची शिफारस इथे केली जात नाहीये.
  • सर्व रेग्युलर ग्रोथ प्लानचे म्युच्युअल फंड
  • यातील काही म्युच्युअल फंड आणि शेअर्स हे माझ्याकडे असतील किंवा घेतले/विकले जातील; परंतु माझ्या पोर्टफोलिओचा या सदरांमधील पोर्टफोलिओंच्या कामगिरीबरोबर काहीही संबंध नाही.
  • म्युच्युअल फंडांचे एक्झिट लोड, शेअर खरेदी/विक्रीवर होणारा खर्च आणि कर – यांचा विचार या सदरामध्ये केलेला नाही. कोणतीही गुंतवणूक करताना या खर्चाचा आणि कर नियमांचा आढावा घ्या.

First Published on January 21, 2019 12:04 am

Web Title: index fund investment