एचारच महिन्यांपूर्वी ‘इंडियन एनर्जी एक्स्चेंज (आयईएक्स)’ची प्रारंभिक खुली समभाग विक्री (आयपीओ) झाली. त्यामुळे बऱ्याच जणांना कदाचित या कंपनीबद्दल माहिती असेल. गेल्या ऑक्टोबरमध्ये १,६५० रुपये प्रति शेअर किमतीने दिलेल्या या शेअरची बाजारात नोंदणी मात्र खूप निराशाजनक झाली. किंबहुना अजूनही हा शेअर त्या विक्री किमतीपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहे.

नावातच कंपनीच्या व्यवसायाचे स्वरूप कळते. ‘आयईएक्स’ हे भारतातील पहिल्या क्रमांकाचे विजेचा व्यापार करणारे पॉवर एक्स्चेंज आहे. भारतातील एकूण होणाऱ्या विजेच्या व्यवहारांपैकी सुमारे ९४ टक्के व्यवहार केवळ आयईएक्सच्या मंचावरून होतात. गेली काही वर्षे शासन सातत्याने अहोरात्र अखंडित वीजपुरवठय़ाबद्दल प्रयत्नशील आहे. संपूर्ण देशांत आणि खेडय़ापाडय़ांतून त्याकरिता विविध योजना राबवल्या जात आहेत. २५ वर्षांहून जुने असलेले ४० गिगावॅटचे थर्मल प्रकल्प बंद करणे किंवा ‘उदय’ प्रकल्प, सौभाग्य योजना या त्यापैकीच सरकारच्या काही महत्त्वाच्या योजना. या दोन्ही योजना यशस्वीपणे राबवण्यात येत असून येत्या दोन वर्षांत याचा फायदा दिसू लागेल. नुकतीच कार्यान्वित झालेली उत्तरेतील चम्पा-कुरुक्षेत्र (८०० केव्ही) ट्रान्समिशन लाइन तसेच दक्षिणेतील वर्धा-निजामाबाद, अंगुल-वेमागिरी (७६५ केव्ही) ट्रान्समिशन लाइन यामुळे उत्तरेतील तसेच दक्षिणेतील ऊर्जा हस्तांतरणासाठी उपलब्ध होत आहे.

भारतात ऊर्जा वापराच्या केवळ ३ टक्के ऊर्जा पॉवर एक्स्चेंजवर ट्रेड होते. युरोप किंवा इतर प्रगत देशांत हेच प्रमाण ५० टक्क्यांहून अधिक आहे. सप्टेंबर २०१७ साठी संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीने ६१.०९ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ३२.६६ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या तिमाहीच्या तुलनेत तो ८ टक्क्यांनी जास्त असून आगामी काळात ‘आयईएक्स’वर जास्त उलाढाल अपेक्षित असल्याने नफ्यातही वृद्धी अपेक्षित आहे. सध्या साधारण १,६०० च्या आसपास उपलब्ध असलेला हा शेअर तुम्हाला मध्यम कालावधीत चांगला फायदा मिळवून देऊ शकेल.

शेअर बाजाराचा निर्देशांक नवीन उच्चांकावर गेला असला तरीही स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअर्सच्या भावात मात्र चांगलीच घट झालेली दिसते. डिसेंबर २०१७ अखेर संपलेल्या तिमाहीचे निकाल लागायला सुरुवात झाली असून लवकरच अर्थसंकल्पदेखील सादर होणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी कंपन्यांचे आर्थिक निकाल तसेच येणारा अर्थसंकल्प या दोन्ही बाबी लक्षात घेऊन मग गुंतवणुकीचे धोरण आखावे.