अजय वाळिंबे

वर्ष १९७१ मध्ये स्थापन झालेले बनारस हॉटेल्स २०११ मध्ये टाटा समूहाच्या इंडियन हॉटेल्सने ६२.५० टक्के भागभांडवल ताब्यात घेतले. केवळ १.३० कोटी भागभांडवल असलेल्या या कंपनीची उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथे ‘द गेटवे हॉटेल गँजेस’ आणि ‘नादेसार पॅलेस’ अशी दोन हॉटेल्स आहेत, तर महाराष्ट्रात गोंदिया येथे ‘द गेटवे हॉटेल बालाघाट रोड’ हे हॉटेल आहे.

वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ. साहजिकच गेल्या काही वर्षांत वाराणसीचे रुपडे पालटले आहे. केवळ पायाभूत सुविधाच नव्हेत तर इतरही अनेक विकासाची कामे जोरात सुरू आहेत. यात प्रामुख्याने ट्रेड सेंटर, सामनाथ-गया-वाराणसी बुद्धिस्ट हा वर्तुळाकार महामार्ग तसेच पूर्वाचल येथे एम्स हॉस्पिटल अशा अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा समावेश आहे. पायाभूत सुविधांवर देण्यात आलेला भर तसेच गंगा नदी स्वच्छता प्रकल्प, अलाहाबाद आणि हल्दिया यांना जोडणारा जलमार्ग, घाट परिसर आणि गंगा परिसर यांची सौंदर्यीकरण मोहीम आणि नुकताच आलेला अयोध्येचा निकालदेखील पथ्यावर पडणारा असल्याने यांचा एकत्रित परिणाम देशी तसेच परदेशी पर्यटक वाढण्यात होईल. सध्या वाराणसी येथे उत्तम तारांकित हॉटेल्समध्ये गंगेच्या किनारी वसलेले नादेसार हॉटेल आणि विमानतळापासून केवळ २१ किलोमीटर, तर मुख्य शहरापासून केवळ ७ किलोमीटरवर ४० एकर परिसरात वसलेले द गेटवे हॉटेल गँजेस ही दोन्ही हॉटेल्स महत्त्वाची ठरतात.

गोंदियामधील हॉटेलचे गेल्या दोन वर्षांत झालेले नुकसानही नूतनीकरणानंतर आता भरून निघत आहे.

सप्टेंबर २०१९ अखेर समाप्त तिमाहीत कंपनीने ११.२२ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ६५ लाख रुपयांचा नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत तो तब्बल ३६४ टक्क्यांनी अधिक आहे. वर म्हटल्याप्रमाणे आगामी कालावधीत कंपनीकडून भरीव कामगिरीची अपेक्षा आहे.

अत्यल्प भागभांडवल असलेली, केवळ ०.२ बीटा असलेली ही टाटा समूहाची कंपनी म्हणूनच गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटते. फक्त ‘बीएसई’वर नोंदणी असलेल्या या कंपनीचे भरणा झालेले भागभांडवल केवळ १.३ कोटी असल्याने तसेच त्यापैकी ६२.५ टक्के प्रवर्तकांकडे असल्याने या शेअरची द्रवणीयता खूप कमी आहे हे इथे लक्षात घेणे आवश्यक आहे.

बनारस हॉटेल्स लिमिटेड

(बीएसई कोड – ५०९४३८)

शुक्रवारचा बंद भाव : रु. १,३१५

मायक्रो कॅप समभाग

प्रवर्तक : टाटा समूह

व्यवसाय :  हॉटेल्स

बाजार भांडवल : रु. १७५ कोटी

वर्षभरातील उच्चांक/नीचांक : रु.  १,६६८/१,२५०

भागभांडवल : रु. १.३ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक    ६२.५६

परदेशी गुंतवणूकदार  —

बँक/ म्यु. फंड/ सरकार    —

इतर/ जनता    ३७.४४

पुस्तकी मूल्य : रु. ५५१.५०

दर्शनी मूल्य :   रु. १०/-

लाभांश :  १५०%

प्रति समभाग उत्पन्न :    रु. ७०.३८

पी/ई गुणोत्तर : १९.१

समग्र पी/ई गुणोत्तर :    ३२.२

डेट इक्विटी गुणोत्तर :    ०.१५

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर : १३

रिटर्न ऑन कॅपिटल : १७.२१

बीटा :    ०.२