02 March 2021

News Flash

बलाढय़ भार संतुलक!

पोर्टफोलियोचा समतोल राखताना काही अशा कंपन्यांचे शेअर्स निवडावे लागतात जे बहुतांश काळात स्थिर राहतात.

|| अजय वाळिंबे

पोर्टफोलियोचा समतोल राखताना काही अशा कंपन्यांचे शेअर्स निवडावे लागतात जे बहुतांश काळात स्थिर राहतात. तर अशा या स्थिर प्रकृतीच्या शेअर्सपैकी एक म्हणजे आयटीसी. खरे तर पूर्वी आयटीसी म्हणजे ‘इंडियन टोबॅको’ म्हणजे ‘विल्स’ असे सरळ समीकरण होते. परंतु गेल्या २० वर्षांत हे चित्र बरच बदललेले दिसते. आता इंडियन टोबॅकोची आयटीसी लिमिटेड झालेली ही कंपनी एक मोठी एफएमसीजी कंपनी म्हणून ओळखली जाते. १९७५ मध्ये आयटीसीने ‘आयटीसी वेलकम’ या ब्रॅण्ड नावाने हॉटेल व्यवसायात प्रवेश केला. त्यानंतर भद्राचलम पेपर्स ताब्यात घेऊन पेपर आणि पॅकेजिंग उद्योग आणि नंतर शालेय वस्तू, स्टेशनरी, वह्य़ा, बिस्किट्स, उदबत्ती, काडेपेटी, साबण, शाम्पू, तयार कपडे, पर्फ्यूम अशा एक ना अनेक व्यवसायांत कंपनीने आपले बस्तान बसवले. गेल्या पंचवीस वर्षांत विल्स आणि गोल्ड फ्लेक या खेरीज आशीर्वाद, सनफीस्ट, बी नॅचरल, क्लासमेट, पेपरक्राफ्ट, यीप्पी, बिंगो, मंगलदीप, एंगेज, फियामा असे अनेक लोकप्रिय ब्रॅण्ड तिने निर्माण केले आहेत. त्यामुळे पूर्वी केवळ एक सिगारेट कंपनी म्हणून ओळखली जाणारी आयटीसी आता एक बलाढय़ एफएमसीजी कंपनी म्हणून ओळखली जाते. कंपनीचा शेअरहोल्डिंग पॅटर्न पहिला तर त्यात प्रवर्तकांचा कुठलाही हिस्सा नाही असे तुम्हाला दिसून येईल. खऱ्या अर्थाने व्यावसायिक व्यवस्थापन असलेली आयटीसी ही जगातील एक बलाढय़ कंपनी असून भारतामध्ये एका शतकाहून अधिक काळ तिने आपले स्थान जपले आहे. आपल्या भागधारकांना कायम भरभरून लाभांश देणाऱ्या या कंपनीचे आर्थिक निष्कर्ष कायमच उत्तम राहिले आहेत. आतापर्यंत अनेक वेळा बक्षीस समभाग दिल्याने कंपनीचे भागभांडवल १,२२० कोटी रुपयांवर गेले आहे. मात्र तरीही आता केवळ सिगारेट आणि तांबखूजन्य उत्पादनावर अवलंबून नसल्याने भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात आयटीसी आपले स्थान अजून बळकट करेल असा विश्वास वाटतो. डिसेंबर २०१७ अखेर समाप्त तिमाहीसाठी ९६७२.५७ कोटी रुपयांच्या उलाढालीवर २८१४.५९ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावणाऱ्या आयटीसीकडून आगामी काळात भरीव कामगिरीची अपेक्षा आहे. लवकरच कंपनीचे वार्षिक लेखापरीक्षित निकाल जाहीर होतील. मात्र हा निकाल कसाही असला तरीही आपला पोर्टफोलियो बळकट करण्यासाठी आयटीसीसारखी बहुआयामी गुणी कंपनीचा शेअर जमा करत राहावा असाच आहे. त्यामुळे कधीही खरेदी करावा अशा प्रतीचा हा शेअर प्रदीर्घ काळासाठी जतन करा.

सूचना :

१. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.

२. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2018 12:08 am

Web Title: indian tobacco company itc limited
Next Stories
1 निर्देशांकांची उद्दिष्टपूर्ती!
2 नभि नक्षत्रे बहुत एक परि प्यारा
3 ज्येष्ठ नागरिकांना पन्नास हजार रुपयांच्या व्याजावर करातून सूट
Just Now!
X