आशीष ठाकूर

दोन जीवश्चकंठश्च मित्रांमध्ये एकाला झुकते माप मिळाल्याने जो बेबनाव निर्माण होतो व पुढे जे काही घडते त्याचे वर्णन करणारे हे समर्पक शीर्षक. जेव्हा निर्देशांक – सेन्सेक्स  ४०,५०० आणि निफ्टी १२,००० या पातळ्यांच्या पल्याड झेपावले तेव्हा हा तेजीचा पतंग असाच वर उडत राहो ही तेजीवाल्यांच्या मनातली स्वाभाविक इच्छा. पण या इच्छेला मध्येच खो मिळाल्याने, तेजीवाल्यांचे मन खट्ट झाले. त्यांच्या या भावनेला कविवर्य गदिमा यांच्या चित्रपट गीतातील वरील काव्यपंक्ती चपखल बसतात. या पाश्र्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स : ४०,३५९.४१

निफ्टी : ११,९१४.४०

या स्तंभातील नोव्हेंबर महिन्यातील प्रत्येक लेखात एक वाक्य समान होते ते म्हणजे.. ‘तेजीच्या वातावरणात आपण एक क्षीण स्वरूपाची घसरण अपेक्षित असून तिचे प्रथम खालचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ४०,००० आणि निफ्टीवर ११,८०० असे असेल.’ हे वाक्य आता आपण अनुभवत आहोत. हे स्तर राखण्यात निर्देशांक यशस्वी ठरल्यास, या स्तरावर पायाभरणी होऊन निर्देशांक नवीन उच्चांकाला गवसणी घालतील.

कंपन्यांच्या जाहीर वित्तीय निकालांचे विश्लेषण

गेल्या लेखात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नामवंत, गुणवत्ता जोपासणाऱ्या टीसीएस व इन्फोसिसवर, तिमाही वित्तीय निकाल जाहीर झाल्यानंतर ‘महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर’ ही संकल्पना काळाच्या कसोटीवर उतरते का ते पडताळून पाहिले. आज आपण इंडसइंड बँकेवर ही संकल्पना पडताळून पाहूया.

* इंडसइंड बँक

या स्तंभातील ७ ऑक्टोबरच्या लेखातील समभाग हा इंडसइंड बँक होता. तिमाही निकालाची नियोजित तारीख १० ऑक्टोबर होती, तर समभागाचा ४ ऑक्टोबरचा बंद भाव १,२६४ रुपये होता. निकालानंतरचा महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर १,२७० रुपये होता. गुंतवणूकदारांच्या मानसिक तयारीसाठी तिमाही निकालाअगोदर तीन दिवसांचा कालावधी होता. तिमाही वित्तीय निकाल जाहीर झाल्यानंतर, समभागाचा बाजारभाव महत्त्वाच्या केंद्रिबदू स्तरावर टिकला तर तिमाही निकाल चांगला, अन्यथा वाईट. लेखात म्हटल्याप्रमाणे जर निकाल उत्कृष्ट असेल तर १,२७० रुपयांचा स्तर राखत प्रथम वरचे लक्ष्य १,४०० रुपये सूचित केले होते.

हे प्रत्यक्ष निकालाअगोदरच विश्लेषण होते. इंडसइंड बँकेचा प्रत्यक्ष निकाल हा उत्कृष्ट होता. १,२७० रुपयांचा स्तर राखत १३ नोव्हेंबरला १,४६२ रुपयांचा उच्चांक समभागाने नोंदविला. ज्या वाचकांकडे इंडसइंड बँक दीर्घ मुदतीच्या गुंतवणूक धारणेअंतर्गत आहेत त्यांनी ते राखून ठेवले व अत्यल्प मुदतीच्या गुंतवणूकदारांना (शॉर्ट टर्म ट्रेडर) अल्पावधीत दहा टक्क्यांचा परतावा मिळविला. आजही इंडसइंड बँक १,२७० रुपयांचा महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर राखून असून, २२ नोव्हेंबरचा त्याचा बंद भाव हा १,४४६ रुपये आहे.

* अ‍ॅव्हेन्यू सुपरमार्केटस लि.

या लेखातील दुसरा समभाग अ‍ॅव्हेन्यू सुपरमार्केटस लिमिटेड (डी-मार्ट) होता. तिमाही निकालाची नियोजित तारीख १२ ऑक्टोबर होती, तर समभागाचा ४ ऑक्टोबरचा बंद भाव १,८९५ रुपये होता. निकालानंतरचा महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर १,८०० रुपये होता. गुंतवणूकदारांच्या मानसिक तयारीसाठी तिमाही निकालाअगोदर पाच दिवसांचा कालावधी होता. लेखात म्हटल्याप्रमाणे जर निकाल उत्कृष्ट असेल तर १,८०० रुपयांचा स्तर राखत प्रथम वरचे लक्ष्य १,९५० रुपये सूचित केले होते. हे प्रत्यक्ष निकालाअगोदरच विश्लेषण होते. अ‍ॅव्हेन्यू सुपरमार्केटस लिमिटेडचा प्रत्यक्ष निकाल हा उत्कृष्ट होता. १,८०० रुपयांचा स्तर राखत ३१ ऑक्टोबरला २,०१० रुपयांचा उच्चांक समभागाने नोंदवला. आजही डी मार्ट १,८०० रुपयांचा महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर राखून आहे. २२ नोव्हेंबरचा त्याचा बंद भाव हा १,८३७ रुपये आहे.

*  ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.