14 October 2019

News Flash

मायक्रो कॅप, पण वृद्धिपथ दृश्यमान!

आज सुचविलेली इंडो बोरॅक्स अ‍ॅण्ड केमिकल्स लिमिटेड अशीच एक लहान कंपनी आहे.

|| अजय वाळिंबे

शेअर बाजारात स्वारस्य असणारा गुंतवणूकदार चौकस राहून सतत काही तरी नवीन गुंतवणूक पर्याय शोधत असतो. अर्थात यामध्ये अनेकदा पेनी स्टॉक्स आणि मल्टिबॅगर स्टॉक्स शोधण्याचा प्रयत्न असतो. परंतु केवळ कमी किमतीचा शेअर म्हणजे तो स्वस्त नव्हे हे सूत्र लक्षात राहत नसल्याने त्याचा परिणाम नुकसानीत होतो. म्हणूनच कंपनीचा इतिहास, प्रवर्तक आणि आवश्यक गुणोत्तरे तपासून मगच अशा कंपनीत गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा.

आज सुचविलेली इंडो बोरॅक्स अ‍ॅण्ड केमिकल्स लिमिटेड अशीच एक लहान कंपनी आहे. १९८० मध्ये स्थापन झाल्यावर कंपनीने प्रथम १९८१ मध्ये बोरिक अ‍ॅसिड उत्पादन प्रकल्प आणि नंतर १९८३ मध्ये महाराष्ट्रात आसनगाव येथे बोरॅक्स प्रकल्प सुरू केला. १९९३ मधील यशस्वी ‘आयपीओ’नंतर कंपनीने मध्य प्रदेशातील पिथमपूर येथे बोरिक अ‍ॅसिड आणि बोरॅक्सचा अत्याधुनिक प्रकल्प चालू केला. कंपनी बोरिक अ‍ॅसिड आणि बोरॅक्सव्यतिरिक्त लिथियम हायड्रॉक्सिड मोनोहायड्रेटचेदेखील उत्पादन करते. गेली ४० वर्षे उत्पादन असणाऱ्या इंडो बोरॅक्सवर कुठलेही कर्ज नाही. ही मायक्रो कॅप कंपनी सातत्याने उत्तम कामगिरी करीत असून गेल्या १२ महिन्यांसाठी कंपनीने १२९.४६ कोटी रुपयांच्या उलाढालीवर १८.६ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. कंपनीचे भरणा झालेले भाग भांडवल केवळ ३.२१ कोटी रुपये असल्याने प्रति समभाग उत्पन्न ५७.९४ रुपये आहे. यंदाच्या आर्थिक वर्षांतील आतापर्यंतची आर्थिक कामगिरी पाहता कंपनीचे मार्च २०१९ साठी संपलेल्या आर्थिक वर्षांचे निकाल उत्तम असतील असा अंदाज आहे. सध्या वर्षभराच्या नीचांकाजवळपास असलेला हा शेअर तुम्हाला उत्तम फायदा करून देऊ शकेल. अर्थात ही गुंतवणूक करायच्या आधी हा शेअर अत्यल्प बाजार भांडवलामुळे पटकन विकत घेणे अथवा विकणे शक्य होणार नाही हा धोका लक्षात घेऊन मगच गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा.

First Published on May 13, 2019 1:39 am

Web Title: indo borax and chemicals ltd