12 July 2020

News Flash

नावात काय? : औद्योगिक उत्पादन निर्देशांक (आयआयपी)

उद्योगात तयार होणाऱ्या वस्तू या अधिकाधिक प्रमाणात तयार झाल्या याचा अर्थ औद्योगिक क्षेत्राला सुगीचे दिवस आले असे आपण म्हणू शकतो.

(संग्रहित छायाचित्र)

कौस्तुभ जोशी

ज्याप्रमाणे आपण व्यवहारात वापरतो त्या वस्तू आणि सेवांचे मूल्य कमी अथवा जास्त झाले हे समजून घ्यायचे असेल तर आपण महागाई निर्देशांक विचारात घेतो,त्याचप्रमाणे देशात ठरावीक कालावधीत औद्योगिक उत्पादनात वाढ किंवा घट झाली हे इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रॉडक्शन म्हणजेच ‘आयआयपी’ या निर्देशांकातून समजते. देशाच्या दीर्घकालीन प्रगतीचा कणा म्हणजेच देशातील द्वितीयक (सेकंडरी) क्षेत्र अर्थात कारखानदारी उद्योग! कोणत्याही कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्क्या मालात रूपांतर करणे, वस्तूचे मूल्य वाढवणे हे काम कारखानदारी उद्योगात केले जाते. उद्योग हे रोजगारनिर्मितीसाठी अत्यंत आवश्यक असतात. उद्योगात तयार होणाऱ्या वस्तू या अधिकाधिक प्रमाणात तयार झाल्या याचा अर्थ औद्योगिक क्षेत्राला सुगीचे दिवस आले असे आपण म्हणू शकतो.

‘आयआयपी’ची आकडेवारी ज्या महिन्यात प्रकाशित होते तिथून मागच्या सहा आठवडय़ांपर्यंतची स्थिती विचारात घ्यावी. म्हणजेच नोव्हेंबरमध्ये आकडेवारी प्रकाशित झाली तर सप्टेंबरअखेरीपर्यंत उद्योगधंद्यांची परिस्थिती कशी होती हे या निर्देशांकातून आपल्याला समजते. औद्योगिक उत्पादन निर्देशांक हा २०१२ हे प्रमाण वर्ष विचारात घेऊन तयार केला जातो. म्हणजेच २०१२ सालच्या किमतीला प्रमाण घेऊन आज त्याचे मूल्य किती आहे याचे इंडेक्सेशन केले जाते व ही आकडेवारी प्रकाशित होते.

खाणकाम, निर्मिती क्षेत्र आणि ऊर्जा असे ढोबळ मानाने तीन भाग औद्योगिक उत्पादनाचे केले जातात. कच्चे तेल, कोळसा, सिमेंट, पोलाद, तेल शुद्धीकरण प्रकल्पातून निघणारी उत्पादने, नैसर्गिक वायू, खते आणि ऊर्जानिर्मिती या प्रमुख पायाभूत उद्योगातील आकडेवारी ‘आयआयपी’ मोजताना सर्वात महत्त्वाची ठरते. या उद्योगातून निर्माण होणारी उत्पादने अन्य उद्योगासाठी संजीवनी ठरतात. म्हणून औद्योगिक उत्पादन निर्देशांकात या आठ क्षेत्रांचा वाटा ४० टक्के आहे. हा निर्देशांक तयार करताना खाद्यपदार्थ, पेय, तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ, कापड, तयार कपडे, चामडय़ाच्या वस्तू, कागद, रबर प्लास्टिक, संगणक, नेटवर्किंग संबंधित प्रणाली अशा अनेक वस्तूंचा समावेश केला जातो. वार्षिक औद्योगिक उत्पादन अहवाल (अ‍ॅन्युएल इंडस्ट्रियल आऊटपुट) हा वर्षभरातील उद्योगधंद्याच्या स्थितीचे चित्र स्पष्ट करतो. तर ‘आयआयपी’वरून वर्षभरात कोणत्या कालावधीत उद्योगक्षेत्रातील वाढीचे प्रमाण कमी किंवा अधिक आहे हे समजून येते. औद्योगिक उत्पादन वाढीचा निर्देशांक सतत नकारात्मक असण्यामागे वस्तूंना मागणी नसल्यामुळे उत्पादनात घट होणे, नवीन गुंतवणुकीबाबत सावध पवित्रा घेतल्यामुळे नव्या गुंतवणुका कमी होऊन उत्पादनाचे प्रमाण कमी होणे अशी अनेक कारणे असू शकतात. आयआयपी आकडेवारी अल्प काळातील अर्थव्यवस्थेचे चित्र आपल्यासमोर उभे करते, बऱ्याचदा ही आकडेवारी नकारात्मक आली तर शेअर बाजारावरही त्याचा परिणाम होतो, असेही दिसून येते. अधिक माहितीसाठी संकेतस्थळ  : http://www.mospi.gov.in/

(लेखक वित्तीय नियोजनकार, अर्थशास्त्राचे प्राध्यापक)

joshikd28@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2019 4:13 am

Web Title: industrial production index factory industry abn 97
Next Stories
1 अर्थ वल्लभ : काढी धार क्षीरपात्र घेऊनी..
2 माझा पोर्टफोलियो : बहुविध व्यवसाय, सशक्त नाममुद्रा
3 बाजाराचा तंत्र कल : आमचं खरंच ठरलंय!
Just Now!
X