12 August 2020

News Flash

कर बोध : गुंतवणूक आणि कर आकारणी

प्रत्येक गुंतवणुकीच्या पर्यायावर मिळणाऱ्या उत्पन्नासाठी कराच्या तरतुदी निरनिराळ्या आहेत.

प्रवीण देशपांडे

शेअर बाजारातील चढ-उतार, पर्यायाने म्युचुअल फंडावर होणारा परिणाम, मुदत ठेवींवरील घटते व्याजदर या पाश्र्वभूमीवर गुंतवणुकीचा पर्याय निवडणे कठीण झाले आहे. गुंतवणूक करताना त्यावर मिळणाऱ्या उत्पन्नावर भरावा लागणारा करसुद्धा विचारात घेणे गरजेचे असते. प्रत्येक गुंतवणुकीच्या पर्यायावर मिळणाऱ्या उत्पन्नासाठी कराच्या तरतुदी निरनिराळ्या आहेत. आर्थिक नियोजन करताना गुंतवणुकीवर भरावा लागणारा कर आणि त्याचे अनुपालन (कम्प्लायन्स) करण्यासह, विवरण पत्रात कोणती माहिती दाखवावी लागते याची जाण गुंतवणूकदाराला असली पाहिजे. या लेखात काही गुंतवणुकीच्या उत्पन्नावर प्राप्तिकर कायद्याच्या तरतुदी काय आहेत ते बघू या :

कर आकारणीसाठी कंपन्यांचे समभाग हे दोन प्रकारचे आहेत. पहिले शेअर बाजारात सूचिबद्ध असलेले समभाग आणि दुसरे शेअर बाजारात सूचिबद्ध नसलेले समभाग. या दोन्हीसाठी प्राप्तिकर कायद्यात वेगवेगळ्या तरतुदी आहेत. शेअर बाजारात सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांचे समभाग कसे खरेदी केले आणि कसे विकले यावर सुद्धा करआकारणी वेगवेगळी आहे.

१. इक्विटी फंड किंवा सूचिबद्ध कंपन्यांचे समभाग :

* दीर्घ मुदतीचा भांडवली नफा : शेअर बाजारात सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांचे समभाग, शेअर बाजारामार्फत खरेदी आणि विक्री केले असतील (म्हणजेच या दोन्ही व्यवहारांवर एसटीटी भरला गेला असेल तर) किंवा इक्विटी फंडातील युनिट्सच्या विक्रीवर एसटीटी भरला गेला असेल तर ‘११२ अ’ या कलमानुसार सवलतीच्या दराने कर भरता येतो. समभागांच्या खरेदीवर एसटीटी भरला गेला नसला तरी काही अपवादात्मक खरेदीसाठी या कलमानुसार सवलतीच्या दरात कर भरता येतो. असे समभाग किंवा युनिट्स जर १२ महिन्यांपेक्षा जास्त काळासाठी धारण केले असतील तर त्याच्या विक्रीवर होणारा भांडवली नफा हा दीर्घ मुदतीचा असतो. प्रथम एक लाख रुपयांचा दीर्घ मुदतीचा भांडवली नफा हा करमुक्त आहे आणि त्यापेक्षा जास्त रकमेकर १० टक्के इतक्या सवलतीच्या दराने कर भरावा लागतो. ३१ जानेवारी २०१८ पूर्वी समभाग किंवा युनिट्स खरेदी केलेले असतील तर (१) आणि (२) मधील जी जास्त रक्कम आहे अशी रक्कम ‘खरेदी मूल्य’, भांडवली नफा गणताना विचारात घ्यावी लागते. (१) प्रत्यक्ष खरेदी मूल्य आणि (२) ३१ जानेवारी २०१८ रोजीचे बाजार मूल्य आणि विक्री किंमत यापैकी जी कमी आहे ती. समभागाची किंवा युनिट्सची खरेदी १ फेब्रुवारी २०१८ नंतर केलेली असल्यास प्रत्यक्ष खरेदी किंमत ही ‘खरेदी मूल्य’ म्हणून विचारात घेतली जाते. या कलमानुसार महागाई निर्देशाकाचा (इंडेक्सेशन) फायदा घेता येत नाही.

अशा दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यासाठी निवासी भारतीयांना आणि हिंदू अविभक्त कुटुंबांना (एचयूएफ) कमाल करमुक्त मर्यादेचा फायदा घेता येतो. अनिवासी भारतीयांना हा फायदा घेता येत नाही.

* अल्प मुदतीचा भांडवली नफा : समभाग किंवा इक्विटी फंडातील युनिट्स खरेदी केल्यानंतर १२ महिन्यांच्या पूर्वी त्याची विक्री केल्यास होणारा भांडवली नफा अल्प मुदतीचा असतो. समभाग किंवा इक्विटी फंडातील युनिट्सच्या विक्रीतून (ज्यावर एसटीटी भरला आहे) होणाऱ्या अल्प मुदतीच्या भांडवली नफ्यावर १५ टक्के इतक्या सवलतीच्या दरात कर भरावा लागतो. अल्प मुदतीच्या भांडवली नफ्यासाठी निवासी भारतीयांना आणि हिंदू अविभक्त कुटुंबांना (एचयूएफ) कमाल करमुक्त मर्यादेचा फायदा घेता येतो. अनिवासी भारतीयांना हा फायदा घेता येत नाही. ‘८० सी’ ते ‘८० यू’ या कलमानुसार सुद्धा फायदा या भांडवली नफ्यातून घेता येत नाही.

२. सूचिबद्ध नसलेल्या कंपन्यांचे समभाग :

* दीर्घ मुदतीचा भांडवली नफा : शेअर बाजारात सूचिबद्ध नसलेल्या कंपन्यांचे समभाग जर २४ महिन्यांपेक्षा जास्त काळासाठी धारण केले असतील तर त्याच्या विक्रीवर होणारा भांडवली नफा हा दीर्घ मुदतीचा असतो. अशा दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर २० टक्क्य़ांइतका कर भरावा लागतो. हा भांडवली नफा गणताना महागाई निर्देशांकाचा फायदासुद्धा घेता येतो.

* अल्प मुदतीचा भांडवली नफा : शेअर बाजारात सूचिबद्ध नसलेल्या कंपन्यांचे समभाग हे खरेदी केल्यानंतर २४ महिन्यांच्या पूर्वी विक्री केल्यास होणारा भांडवली नफा अल्प मुदतीचा असतो. अशा अल्प मुदतीच्या भांडवली नफ्यावर, करदात्याला त्याच्या उत्पन्नाच्या टप्प्याप्रमाणे कर भरावा लागतो. अल्प मुदतीच्या भांडवली नफ्यासाठी कमाल करमुक्त मर्यादेचा फायदा घेता येतो आणि ‘८० सी’ ते ‘८० यू’ या कलमानुसारसुद्धा फायदा या भांडवली नफ्यातून घेता येतो.

सूचिबद्ध नसलेल्या कंपन्यांमधील गुंतवणुकीचा तपशील करदात्याला विवरणपत्रात द्यावा लागतो. अशा समभागाची विक्री केलेली नसली तरी किंवा अशा कंपनीकडून कोणतेही उत्पन्न मिळाले नसले तरी ही माहिती विवरणपत्रात द्यावी लागते.

३. डेट फंड :

* दीर्घ मुदतीचा भांडवली नफा : डेट फंडातील युनिट्सची खरेदी केल्या तारखेपासून ३६ महिन्यांनंतर विक्री केल्यास होणारा भांडवली नफा हा दीर्घ मुदतीचा असतो. महागाई निर्देशांकाचा फायदा घेऊन खरेदी किंमत काढून भांडवली नफा गणावा लागतो. या भांडवली नफ्यावर २० टक्के इतक्या दराने कर भरावा लागतो. दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यासाठी निवासी भारतीयांना आणि हिंदू अविभक्त कुटुंबांना(एचयूएफ) कमाल करमुक्त मर्यादेचा फायदा घेता येतो.

* अल्प मुदतीचा भांडवली नफा : डेट फंडातील युनिट्स हे खरेदी केल्यानंतर ३६ महिन्यांपूर्वी विक्री केल्यास होणारा भांडवली नफा अल्प मुदतीचा असतो. अशा अल्प मुदतीच्या भांडवली नफ्यावर, करदात्याला त्याच्या उत्पन्नाच्या टप्प्याप्रमाणे कर भरावा लागतो. अल्प मुदतीच्या भांडवली नफ्यासाठी कमाल करमुक्त मर्यादेचा फायदा घेता येतो आणि ‘८० सी’ ते ‘८० यू’ या कलमानुसार सुद्धा फायदा या भांडवली नफ्यातून घेता येतो.

४. इतर संपत्ती – स्थावर मालमत्ता, सोने वगैरे :

घर, जमीन, इमारत, सोने, इत्यादी संपतीची विक्री केल्यास होणारा भांडवली नफा हा सुद्धा दीर्घ मुदत आणि अल्प मुदत या श्रेणींमध्ये विभागला जातो. या संपत्ती खरेदी केल्या तारखेपासून ३६ महिन्यांनंतर विक्री केल्यास होणारा भांडवली नफा हा दीर्घ मुदतीचा असतो. फक्त घर जमीन, इमारत यासाठी हा कालावधी २४ महिन्यांचा करण्यात आलेला आहे. दीर्घ मुदतीचा भांडवली नफा गणतांना महागाई निर्देशांकाचा फायदा घेता येतो. अशा दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर २० टक्के इतक्या दराने कर भरावा लागतो.

इतर संपतीच्या अल्प मुदतीच्या भांडवली नफ्यावर, करदात्याला त्याच्या उत्पन्नाच्या टप्प्याप्रमाणे कर भरावा लागतो. अल्प मुदतीच्या भांडवली नफ्यासाठी कमाल करमुक्त मर्यादेचा फायदा घेता येतो आणि ‘८० सी’ ते ‘८० यू’ या कलमानुसार फायदा या भांडवली नफ्यातून घेता येतो.

५. लाभांश :

मागील वर्षांपर्यंत म्हणजेच ३१ मार्च २०२० पर्यंत कंपन्यांकडून एका वर्षांत मिळालेला १० लाख रुपयांपर्यंतचा लाभांश गुंतवणूकदारांना करपात्र नव्हता. १० लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेवर मिळालेल्या लाभांशावर १० टक्के इतका कर गुंतवणूकदारांना भरावा लागत होता. म्युचुअल फंडाने दिलेला लाभांश हा गुंतवणूकदारांना पूर्णपणे करमुक्त होता. ३१ मार्च २०२० पर्यंत कंपनी किंवा फंडाला या लाभांशावर वितरण कर भरावा लागत होता. २०२०-२१ या आर्थिक वर्षांपासून कर भरण्याची जबाबदारी गुंतवणूकदारावर टाकली गेली आहे. त्यामुळे १ एप्रिल २०२० नंतर मिळालेला लाभांश हा गुंतवणूकदाराचे करपात्र उत्पन्न म्हणून गणले जाईल आणि त्याला त्याच्या उत्पन्नाच्या टप्प्याप्रमाणे कर भरावा लागेल. जर लाभांश ५,००० रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्यावर १० टक्के उद्गम कर (टीडीएस) कापण्याची जबाबदारी कंपनी किंवा फंडावर आहे. टाळेबंदीच्या परिस्थितीमुळे हा उद्गम कर ३१ मार्च २०२१ पूर्वी कापल्यास ७.५० टक्के इतका असेल. करदाता हा उद्गम कर न कापण्याची विनंती (अटींची पूर्तता केल्यास) कंपनीला किंवा फंडाला फॉर्म १५ जी किंवा १५ एच देऊन करू शकतो.

दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यातून ‘८० सी’ ते ‘८० यू’ या कलमानुसार वजावटींचा फायदा घेता येत नाही.

वरील दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावरील कर वाचविण्याकरिता ‘कलम ५४ एफ’नुसार नवीन घरात गुंतवणूक करता येते. यासाठी काही अटींचे पालन करावे लागते. तसेच ‘कलम ५४ ईसी’नुसार ५० लाख रुपयांपर्यंत बाँडमध्ये गुंतवणूक करून कर वाचविता येतो. परंतु ‘कलम ५४ ईसी’नुसार बाँडमधील गुंतवणूक मागील वर्षांपासून फक्त जमीन आणि इमारत याच्या विक्रीतून झालेल्या भांडवली नफ्यासाठीच लागू केलेली आहे. म्हणजेच समभाग, सोने वगैरे संपतीच्या विक्रीतून झालेल्या भांडवली नफ्यावरील कर वाचविण्यासाठी बाँडमध्ये गुंतवणूक आता करता येणार नाही.

करदात्याने आपल्या संपत्तीची आणि त्याच्या व्यवहारांची योग्य नोंद ठेवणे गरजेचे आहे. आपल्या विवरणपत्राचा फॉर्म निवडताना आणि योग्य माहिती त्यातील सदरात दर्शविण्यासाठी या नोंदीचा उपयोग करदात्याला होईल.

लेखक सनदी लेखाकार व कर सल्लागार

pravin3966@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2020 12:05 am

Web Title: information about investment and taxation zws 70
Next Stories
1 क.. कमॉडिटीचा : कापूससाठे ‘पेटणार’!
2 बंदा रुपया : हिरवाईची निर्यात होते तेव्हा..
3 माझा पोर्टफोलियो : कचऱ्यापासून ‘सुगंधा’चा दरवळ
Just Now!
X