गुंतवणुकीचा तोटा अथवा परतावा हा गरीब-श्रीमंत, खालच्यावरच्या जातीच्या गुंतवणूकदारांसाठी एकसारखाच असतो. बाजार कोसळतो तेव्हा तो गरीब-श्रीमंतात तफावत करीत नसतो, सगळ्यांनाच तो सारखाच धक्का देऊन जातो.
प्रेम व्यक्त करण्याचा, प्रेमाचा गौरव करणारा दिवस या आठवडय़ात साजरा केला जाईल. करुणा, समता, न्यायता ही प्रेमाची पूर्व अटच. जात, धर्म, वर्ग, वर्ण इतकेच काय गरीब-श्रीमंत असा कोणताही भेद न मानणारे एक आणि कदाचित एकमेव क्षेत्र हे गुंतवणुकीचेच. गुंतवणुकीचा तोटा आणि परतावा हा गरीब-श्रीमंत, खालच्या-वरच्या वर्ण-जातीच्या गुंतवणूकदारांना एकसारखाच असतो. बाजार कोसळतो तेव्हा तो गरीब-श्रीमंतात तफावत करीत नसतो, सगळ्यांनाच तो सारखाच धक्का देऊन जातो. म्युच्युअल फंड तर अशी गुंतवणूक आहे, जेथे ५०० रुपये गुंतविणारा आणि ५० लाखांचे गुंतवणूकदार एकाच पायावर, म्हणजे एकाच फंड योजनेत सहभागी असतात. आहे ना खऱ्या अर्थाने लोकशाहीचे अस्सल रूप..!
या स्तंभातून खास करून म्युच्युअल गुंतवणुकीवरील भर अशा साठीच की, किमान समज, थोडीशी काळजी, थोडक्या रकमेची तजवीज करून, तुलनेने सुरक्षित आणि महागाई दरापेक्षा अधिक परतावा मिळविला जाऊ शकतो. होय हे खरेच आहे. गेल्या काही स्तंभातून ते सोदाहरण पटवून दिले गेले आहे. पाहा फायदे काय ते या गुंतवणुकीचे..
तरलता- निश्चित मुदतीच्या योजना (एफएमपी) आणि ईएलएसएस सारख्या योजना वगळल्यास, म्युच्युअल फंडातून कोणत्याही समयी आपला गुंतलेला पैसा काढून घेणे सहज शक्य आहे. ज्या दिवशी ठरविले पैसे काढायचे, त्या दिवसापासून उशिरात उशीरा तिसऱ्या दिवशी तुमच्या बँक खात्यात पैसे जमाही झालेले असतील. अशी सुविधा अन्य पर्यायांमध्ये अभावानेच आढळते.
पारदर्शकता – तुम्ही कोणत्या फंडात गुंतवणूक केली असेल, त्या फंडाचे गुंतवणूक उद्दिष्ट ठरलेली असतात. खरेच तशीच गुंतवणूक केली गेली आहे काय, याची गुंतवणूकदार म्हणून तुम्हाला चाचपणी करता येते. अन्य कोणत्या गुंतवणूक योजनांतून अशी सोय आहे काय?
किफायतशीरता- सर्वात कमी व जवळपास नगण्य उलाढाल खर्च आहे. सोन्यात गुंतवणूक करताना, घडणावळ खर्च, सांभाळ- सुरक्षितता, विम्याच्या कवचाचा खर्च, जमीनजुमल्यातील गुंतवणुकीतही मुद्रांक शुल्क, नोंदणी एकरकमी मोठा तसेच देखभालीचा आवर्ती खर्च आहे.
तज्ज्ञ मार्गदर्शनाची साथ – म्युच्युअल फंडात तुमचा पैसा हा तज्ज्ञांकडूनच गुंतविला जात असतो. एका सामान्य गुंतवणूकदाराला अर्थव्यवस्था, बाजाराचा कल, कंपन्यांची आर्थिक स्थिती वगैरे क्लिष्टतेत स्वत:ला गोवण्याची गरजच पडत नाही. शिवाय हा तज्ज्ञ गुंतवणूक साथ अगदी नगण्य मोबदल्यात मिळत असते.
वैविध्य – एका म्युच्युअल फंडाच्या गुंतवणूक भांडारातून (पोर्टफोलियोतून) सामान्यत: २० ते ४० ठिकाणी गुंतवणूक केलेली असते. परिणामी एक-दोन पर्यायातून चांगला परतावा आला नाही अथवा नुकसान झाले तरी ती तूट अन्य पर्यायांतून भरून काढली जाते. व्यक्तिगत गुंतवणूकदाराला हे वैविध्य (डायव्हर्सिफिकेशन) सहजी शक्य नाही.
दगाबाजी अशक्य – म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही ज्याने धनादेश दिला, बँक खात्यांचा तपशील दिला त्याच्या नावेच असते. तुम्ही दिलेल्या धनादेशावर दुसऱ्याने त्याच्या नावाने गुंतवणूक करणे शक्यच नाही. ‘केवायसी’ची प्रक्रिया काटेकोर पाळली जाते. शिवाय तुमची निर्गुतवणूक रक्कमही थेट बँक खात्यातच जमा होते.
एक मात्र खरे की, या सर्वागाने मन:शांती व निश्चिंतता प्रदान करणाऱ्या गुंतवणुकीकडे लांब पल्ल्याचा दृष्टिकोन ठेवून पाहिले पाहिजे. नव दाम्पत्याला त्यांचे अपत्य येण्याची चाहूल लागली, तर त्यांना त्याच्या नावाने सुयोग्य फंड निवडून, अगदी दरमहा ५०० रु., हजार रुपयांची ‘एसआयपी – सिप’ सुरू करता येईल. मुलगी असेल तर तिच्या गोल्ड ईटीएफ योजनेत ‘सिप’ सुरू करता येईल. तिच्या लग्नासमयी तुम्ही कल्पनाही करवणार नाही, इतकी पूंजी विनासायास जमा झालेली तुम्हाला दिसून येईल. लक्षणीय गोष्ट म्हणजे, कोणत्याही संपत्ती हस्तांतरणाचे दस्त (इच्छा पत्र) न करता, त्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्काचा भरुदड न येता अथवा प्राप्तिकराचा भार न येता ही पूंजी आपसूक तुमच्या नामनिर्देशित वारसाकडे हस्तांतरीत होईल.
अगदी दोन दिवस इतक्या छोटय़ा कालावधीसाठी गुंतवणुकीचीही सोय असलेले अल्ट्रॉ शॉर्ट टर्म लिक्विड फंडाचा पर्यायही आहे. शुक्रवार ते सोमवार असे मोठा वीकएण्ड येत आहे, तुम्ही बाहेर फिरायला जाण्याचे नियोजन आखले आहे. तेथे तुम्ही पिकनिकला मजा करीत आहात, तर लिक्विड फंडात गुंतलेला तुमचा पैसा येथे तुमच्यासाठी परतावा मिळवून देण्यासाठी श्रम घेत आहे, अशी गंमत केवळ या पर्यायातच शक्य आहे.

 

विजय मंत्री
arthmanas@expressindia.com
(लेखक निर्मल बंग सिक्युरिटीजमध्ये सल्लागार आहेत.)