थोर शास्त्रज्ञ आल्बर्ट आइन्स्टाइन यांनी ‘पॉवर ऑफ कम्पाऊंडिंग (पीओसी)’बद्दल बोलताना, हे जगातील आठवे आश्चर्य असल्याचे सांगितले. इतक्या मोठय़ा माणसाने पीओसी अर्थात चक्रवाढीतून साधल्या जाणाऱ्या सामर्थ्यांची एवढी मोठी गोष्ट बोलावी? हे कसे? काय आहे नेमके हे सामथ्र्य? आइन्स्टाइन म्हणतात तसे आपण या बहुसामर्थ्यांचा वापर आपल्यासाठी कसा करून घेऊ शकतो, हे एकदा तपासून पाहू.
जर तुमच्या पाशी महिन्याच्या पहिल्या दिवशी एक पैसा आहे. तो दर दिवसाला दुप्पट होईल असे तुम्हाला सांगितले. म्हणजे पहिल्या दिवसाच्या एका पैशाचे, दुसऱ्या दिवशी दोन, तिसऱ्या दिवशी चार आणि चौथ्या दिवशी आठ पैसे होणार. असे करीत महिन्याअंती होऊन होऊन किती पैसे होणार? पण विश्वास ठेवा, ३१ व्या दिवशी एका पैशाचे १ कोटी रुपये झालेले असतील. खरं सांगा, महिन्याच्या सुरुवातीच्या दिवसांत असा काही अंदाज तुम्हाला होता काय? जर तो महिना २८ दिवसांचा असेल तर तुमच्याकडे १२.५ लाख रुपयेच जमा होतील. शेवटच्या तीन दिवसांनी तुम्हाला अधिकचे ८७.५ लाख मिळवून दिले आहेत.
हेच आहे कम्पाऊंडिंग अर्थात चक्रवाढीचे सामथ्र्य. जितक्या अधिक काळासाठी पैसा गुंतलेला राहील तितका तो अधिक वाढत जाईल. सर्वाधिक फायदा हा शेवटच्या काही दिवसांतून मिळेल. वर दिलेल्या उदाहरणालाच आणखी शेपूट जोडून आपण या सामर्थ्यांच्या सौष्ठवाचा वेध घेऊ. तुमच्याकडे गुंतवण्याजोगे १ लाख रुपये आहेत असे मानू या. दर साल दर शेकडा ८ टक्के व्याज देणाऱ्या पर्यायात ते तुम्ही गुंतविलेत. हे वर्षांचा ८ टक्के व्याज परतावा न घेता, गुंतवणुकीत कायम राहिल्यास, तुमचा व्याज परतावा चक्रवाढीने १० टक्के होईल.
डावपेच १ : तुमचे लाख रुपये वार्षिक ८ टक्के व्याजावर लावले गेल्यास, तुम्हाला दर वर्षी ८,००० रुपये व्याज मिळेल. ३० वर्षांनंतर तुम्हाला तुमचे एक लाख परत मिळतील, पण तोवर व्याजापोटी २,४०,००० रुपये मिळाले असतील. म्हणजे १ लाख मुद्दलावर तुम्ही ३,४०,००० रुपये मिळविलेत.
डावपेच २ : या प्रसंगात तुम्हाला दर वर्षी मिळणारे व्याज तुम्ही त्याच पर्यायात त्याच व्याजावर गुंतविलेत. तर १ लाख गुंतवणूक मुद्दलीवर ३० वर्षांनंतर तुम्हाला १०,०६,२६६ रुपये मिळतील. म्हणजे पहिल्या डावपेचाच्या तुलनेत जवळपास तीन पट रक्कम मिळेल. मुद्दल तेवढीच, व्याजाचा दरही तोच, परंतु सर्वात मोठा फायदा हा व्याजावर व्याजाचा जो ६,६६,२६६ रुपये इतका मोठा आहे.
डावपेच ३ : या ठिकाणी तुम्हाला मिळणाऱ्या परताव्याचा दर सरासरी १६ टक्के झाला (जे ३० वर्षांच्या मुदत काळात शक्यही आहे!) असे मानू या. म्हणजे ३० वर्षांत केवळ गुंतलेल्या १ लाखांवर व्याजापोटी मिळकत ४,८०,००० रुपये होईल. पण व्याजावर व्याजाचे चक्रवाढ गणित केल्यास ३० वर्षांअखेर तुमच्याकडे ८५,८४,९८८ रुपयांची पुंजी जमा झालेली असेल. म्हणजे पहिल्या डावपेचाच्या तुलनेत २५ पट अधिक. याचा अर्थ परतावा दर दुप्पट झाला तर गुंतवणूक परतावा २५ पटीने वाढतो.
निष्कर्ष : तुमच्या गुंतवणुकीचा कालावधी शक्य तितका मोठा असावा. जितका कालावधी मोठा, तितका परतावा अधिक हे स्पष्टच आहे. पण गुंतवणुकीचा कालावधी मोठाच असणार आहे, तर गुंतवणुकीचा पर्यायही मग चांगल्यात चांगला परतावा देईल, असा निवडावा. अल्पावधीत भले चढ-उतार होत राहतील. पण त्याने बिथरून गेलात तर नुकसान ओढवून घ्याल. ऐतिहासिक वेध घेतल्यास आजवर कोणत्याही एका वर्षांत शेअर निर्देशांक ६० टक्क्यांपेक्षा अधिक घसरलेला नाही. अगर एका वर्षांत आपण गुंतवलेले एक लाखाचे घटून ४० हजार रुपये झाले तरी हे नुकसान केवळ कागदावरच दिसेल. परंतु ती चिंता वाहत न बसता, निर्धास्तपणे ही गुंतवणूक सुरू ठेवल्यास, हे ६० हजार रुपयांचे दिसलेले नुकसान दीर्घावधीत ८५ लाखांवर गेलेले आपण वर पाहिलेच आहे. काय करावे, कोणता पर्याय निवडावा याचा निर्णय ज्याने त्याने घ्यावयाचा आहे. पण एक लक्षात असू द्यावे की, अल्पावधीतील चढ-उतार हे दीर्घ कालावधीत भांडार तयार करते.