विक्रम-वेताळ या मूळच्या संस्कृतमध्ये लिहिलेल्या गोष्टी आपण शालेय आयुष्यात सोप्या भाषेतून सचित्र वाचत आलो आहोत. सर्वसामान्यही शेअर बाजात रुची घेऊ लागल्याने बाजाराविषयीचे कूट प्रश्न गुंतवणूकदारांना सतावताच. त्यांची सुयोग्य आणि चपखल उत्तरे सापडणे अनेकदा कठीण असते. विक्रम-वेताळ यांच्या संवादातून ती उकलण्याचा हा एक प्रयत्न..
विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. तलवार उपसून पुन्हा तो झाडावर चढला अन् फांदीवर लटकणाऱ्या प्रेताला खांद्यावर घेऊन मौनात चालू लागला. त्यासरशी प्रेतामधला वेताळ पुन्हा एकदा जागा होऊन विक्रमादित्यास प्रश्न विचारू लागला.
‘राजा, तुझी चिकाटी, धर्य अन सत्यवचनी वृत्ती पाहून मी थक्क झालो आहे. या महाराष्ट्रदेशीचे नागरिक हल्ली मुदत ठेवी, विमा इत्यादी परंपरागत गुंतवणूक साधनांची कास सोडून शेअर बाजारात गुंतवणूक करावयास लागले आहेत. सरत्या वर्षांत बाजाराने नकारात्मक परतावा दिल्याने अनेक गुंतवणूकदार चिंतित झाले आहेत. म्हणून नवीन वर्षांकडून गुंतवणूकदारांच्या मोठय़ा अपेक्षा आहेत. राजा, २०१६ हे वर्ष गुंतवणूकदारांना सकारात्मक परताव्याचे जाईल का रे?’
‘या माझ्या प्रश्नांची समाधानकारक अन् योग्य उत्तरे तुला माहिती असूनही तू जर दिली नाहीस तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन ती तुझ्याच पायावर लोळू लागतील’, असे म्हणून वेताळ स्तब्ध झाला.
‘हे बघ, २०१६ हे लीप वर्ष असून या आकडय़ांची बेरीज येते ९. आणि ९ हा गुरूचा आकडा आहे. गुरू म्हणजे प्रसरण पावणे. १९९२ पासून या आधी येऊन गेलेल्या प्रत्येक लीप वर्षांत, – तेही २०१२ चा अपवादवगळता- प्रत्येक नवीन लीप वर्षांत सेन्सेक्सने नवीन शिखर पादाक्रांत केले आहे. २०१६ या वर्षांत सेन्सेक्स व निफ्टी नवीन शिखराला स्पर्श करतील, याबद्दल अणुमात्र शंका नाही.’..इति विक्रम.
‘२०१५ मध्ये सेन्सेक्स निफ्टीने नवीन शिखर गाठले तरी तिथून निफ्टी व सेन्सेक्स माघारी फिरले. पावसाने ओढ दिल्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था कमकुवत झाली. या वर्षांत सतत दुसऱ्या वर्षी पावसाने ओढ दिली. मागील दीड शतकात सतत तिसऱ्या वर्षांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याचा प्रसंग केवळ एकदाच आला आहे. सतत दुसऱ्या वर्षी सरासरीहून कमी पाऊस होण्याचा प्रसंग केवळ दोन वेळा आला आहे. या वर्षी पुन्हा पाऊस कमी पडेल, असे वाटत नाही. कमी झालेल्या जिन्नसांच्या किमती, निवळलेली महागाई, उतरलेले व्याजदर यांचा परिणाम एप्रिलपासून दिसायला लागेल. हे वर्ष गुंतवणूकदरांसाठी मोक्याचे असेल. क्रिकेटच्या भाषेत बोलायचे तर ‘पाटा खेळपट्टीवर मनसोक्त फलंदाजी करावी’ असे हे वर्ष असणार आहे. हे वर्ष तेजीवाल्यांसाठी मांदियाळीचे वर्ष असणार आहे.’ राजा विक्रमाने पट मांडला.
‘चीनने आपल्या चलनाचे कृत्रिम अवमूल्यन केले. संपूर्ण वर्ष अमेरिकेच्या व्याजदर वाढीच्या भीतीखाली होते. शेवटी १५ डिसेंबरला झालेल्या फेडरल रिझव्‍‌र्हच्या बठकीत व्याजदर वाढविण्याचा निर्णय झाला. आता अमेरिकेच्या व्याजदर वाढीची भीती नाहीशी झाली आहे,’ राजाने विस्तृत केले.
‘२०१६ चा फेब्रुवारी सेबीचे सिन्हा यांचा तर याच वर्षांतील सप्टेंबर महिना हा गव्हर्नर रघुरामांसाठी निवृत्तीचा आहे; तर ऑक्टोबर महिन्यात अरुंधती मॅडमची स्टेट बँकेच्या अध्यक्षपदाची मुदतही संपणार आहे. बाजारात तर अशी अफवा आहे की अरुंधती मॅडमना स्टेट बँकेतून मुदतपूर्वच मुक्त करून सिन्हांच्या जागी नियुक्त केले जाईल. असे झाले तर मॅडमच्या रूपात सेबीलाही पहिले महिला अध्यक्षपद मिरविता येईल. पतधोरणाचे निदान करणाऱ्या डॉक्टरांना मात्र दोन वर्षांची मुदतवाढ मिळू शकेल.’ विक्रम भविष्य वर्तवित होता.
‘ते सगळे ठीक आहे. पण नवीन काय खरेदी करणार आहेस?’ वेताळाचा पुन्हा सवाल.
शनिवारची (२ जानेवारी) ‘लोकसत्ता-अर्थसत्ता’ पानावरची बातमी वाचली नाहीस काय? मारुती सुझुकी व ह्य़ुंदाई मोटर यांनी डिसेंबरमध्ये दुहेरी आकडय़ात वाहन विक्रीतील विक्रमी वाढ नोंदविली म्हणून! मारुतीने तर दशकातील एका वर्षांतील सर्वाधिक वाढ नोंदविली. शिवाय ह्य़ुंदाईची गेल्या वर्षांतील ही विक्रमी विक्री वाढ होती. वाहन उद्योग हा अर्थव्यवस्थेत फार संवेदनशील समजला जातो. टाटा मोटर्स, बजाज ऑटो, हीरो मोटोकॉर्प तसेच वाहन उद्योगासाठी पूरक उत्पादनांतील कंपन्या या भावात खरेदी करायला हव्यात. शतकाच्या सोळाव्या वर्षांत बारावर बारा हजार (लाखाचे बारा हजार नव्हे) कसे मिळवायचे याबाबतचा माझा प्लॅन तयार आहे बुवा.’ राजाने खिजविले.
‘थोडक्यात – या शतकातील सोळावे वर्ष हे धोक्याचे नसून बाजारातून कमाई करण्याचे वर्ष आहे. तेव्हा एक लाख रुपये आपल्या पसंतीच्या लिक्विड फंडात ठेव व मी सांगतो तसे तसे शेअर घेत जा.’ राजाने आदेशच दिला.
‘ठीक आहे विक्रमा’, असे म्हणून विक्रमादित्याचे मौन भंग होताच वेताळ प्रेतासहित विक्रमादित्यापासून दूर झाला व पुन्हा स्मशानातील झाडाला लटकू लागला..
gajrachipungi@gmail.com
वित्त विश्वातील घडामोडींवर आधारित साप्ताहिक सदर.