वसंत माधव कुळकर्णी

कॅनरा रोबेको कन्झ्युमर  ट्रेंडस फंड

म्युच्युअल फंड गुंतवणुकीसंबंधित माहिती  देणारे साप्ताहिक सदर

भारत ही मुख्यत्वे देशांतर्गत उपभोगामुळे वाढणारी अर्थव्यवस्था असल्याने, जागतिक पातळीवर विचार करता करोनामुळे सर्वात कमी झळ पोहोचलेल्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. उपभोग (कन्झम्प्शन) हे मागील काही वर्षांतील गुंतवणुकीचे सर्वात यशस्वी सूत्र असून टाळेबंदीपश्चात त्याची कामगिरी उज्ज्वलच दिसत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारही ‘कन्झम्प्शन फंडां’चा प्राधान्याने विचार करू शकतात..

टाळेबंदीनंतर अर्थव्यवस्था रुळावर आणण्यात ज्या उद्योग क्षेत्राचा मोठा हात असेल त्यात कृषी आणि ग्राहकोपयोगी वस्तू यांचा समावेश असेल. या कंपन्यांतून गुंतवणूक करणाऱ्या कॅनरा रोबेको कंझ्युमर ट्रेंडस फंड या फंडाची ही शिफारस. मागील आठवडय़ात हिंदुस्थान युनिलिव्हरसारख्या या उद्योग क्षेत्रातील बलाढय़ कंपनीने देशभरातील कारखान्यांतून उत्पादन पातळी करोनापूर्व पातळीच्या ८० टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचे शेअर बाजारांना पाठविलेल्या पत्रकात नमूद केले आहे. कंपनीचा आसाममधील एक कारखाना वगळता (जो कामगारांच्या संपामुळे बाधित आहे) इतर सर्व कारखाने आणि सर्व गोदामे सरकारी आवश्यक परवानग्या आणि सर्वोच्च सुरक्षा मानकांचे पालन करून पूर्वपदावर आली आहेत. टाळेबंदीच्या सुरुवातीच्या काळात बंद असलेली पुरवठा साखळी कार्यरत झाली असून सर्व कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी १७ मार्चपासून घरून काम चालू ठेवले आहे, असे कंपनीकडून कळविण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये, उपभोग्य वस्तूंची मागणी सातत्याने वाढत असून उपभोग्य वस्तूंच्या व्यवसायातील गुंतवणूक हा संस्थात्मक आणि देशांतर्गत निधी व्यवस्थापकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. उपभोग (कन्झम्प्शन) हे सूत्र मागील दोन वर्षांतील सर्वात यशस्वी ठरलेले सूत्र असून टाळेबंदीपश्चात त्याची कामगिरी उज्ज्वल दिसत आहे. भारत ही वेगाने वाढणारी बाजारपेठ आणि मुख्यत्वे एक देशांतर्गत उपभोगामुळे वाढणारी अर्थव्यवस्था आहे. जागतिक पातळीवर विचार करता करोनामुळे सर्वात कमी झळ पोहोचलेल्या अर्थव्यवस्थांपैकी आपण एक असल्याने ‘कन्झम्प्शन फंडां’चा गुंतवणूकदार प्राधान्याने विचार करू शकतात.

ग्राहक-उपभोग्य वस्तूंचे (एफएमसीजी) वर्गीकरण मुख्यत्वे तीन भागांत केले जाते. एक- ‘फूड अँण्ड ब्रीव्हरेजेस’ जो या बाजारपेठेचा सर्वात मोठा घटक आहे. दुसरा- ‘होम केअर’ आणि तिसरा- ‘पर्सनल केअर’. पैकी वैयक्तिक वापराच्या वस्तू जसे की साबण, फेसवॉश, टूथपेस्ट आणि ‘होम केअर’ प्रकारातील डिशवॉश, कपडे धुण्याची पावडर यांचा खप करोनापूर्व पातळीवर तीन ते चार महिन्यांत येईल; परंतु ‘एफएमसीजी’ प्रकारातील सर्वात मोठा वाटा असलेल्या ‘फूड अँण्ड ब्रीव्हरेजेस’ क्षेत्र जसे की चॉकलेट, बिस्किट्स, तयार अन्नपदार्थ आणि पेये यांचा खप करोनापूर्व पातळीवर येण्यास अधिक काळ जावा लागेल.

कॅनरा रोबेको कन्झ्युमर ट्रेंडस फंड १४ सप्टेंबर २००९ रोजी ‘कॅनरा रोबेको फोर्स’ या नावाने मल्टिसेक्टर फंड म्हणून अस्तित्वात आला. ‘सेबी’च्या फंड सुसूत्रीकरणापूर्वी हा फंड फायनान्शियल अपॉच्र्युनिटीज रिटेल कन्झम्प्शन आणि एन्टरटेन्मेंट या उद्योग क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करीत असे. या क्षेत्रांच्या आद्याक्षरांपासून ‘फोर्स’ हा शब्द तयार झाला होता. चिनू गुप्ता या फंडाच्या निधी व्यवस्थापिका (कार्यभार १५ जून २०१८ पासून) असून, श्रीदत्त भांडवलकर यांची नेमणूक १ ऑक्टोबर २०१९ पासून फंडाचे सहनिधी व्यवस्थापक म्हणून झाली आहे. फंड सुसूत्रीकरणानंतर या फंडाची ओळख उपभोग्य क्षेत्रात गुंतवणूक करणारा फंड अशी झाली. या फंडाच्या गुंतवणुकीत हिंदुस्थान युनिलिव्हर, आयसीआयसीआय बँक, नेस्ले, बाटा इंडिया, अ‍ॅव्हेन्यू सुपरमार्ट, डाबर इंडिया, भारती एअरटेल, एमसीएक्स, एशियन पेंट्स आणि एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स या कंपन्यांचा समावेश आहे. एकाच उद्योग क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या फंडाला कमाल २० टक्के गुंतवणूक त्या उद्योग क्षेत्राव्यतिरिक्त करण्यास मुभा असल्याचा फायदा घेत निधी व्यवस्थापकांनी आरोग्य निगा क्षेत्रात केलेली गुंतवणूक सध्या नफ्यात आपले योगदान योग्य प्रकारे देत आहे. देशांतर्गत बाजारपेठेवर विसंबून असलेल्या आरोग्य निगा क्षेत्रातील कंपन्यांची निवड निधी व्यवस्थापकांनी गुंतवणुकीसाठी केलेली आहे.

उपलब्ध ताज्या आकडेवारीनुसार पाच वर्षे पूर्ण केलेले आठ ‘कन्झम्प्शन फंड’ असून पाच वर्षे एसआयपी आणि पाच वर्षांपूर्वी एकरकमी गुंतवणुकीवर सर्वात जास्त परतावा कॅनरा रोबेको कन्झ्युमर ट्रेंडस फंडाने दिला आहे. फंडाच्या ‘एनएफओ’मधील एक लाखाच्या गुंतवणुकीचे २.८० लाख रुपये झाले असून परताव्याचा वार्षिक दर १३.२६ टक्के तर पाच वर्षांपूर्वी गुंतविलेल्या एक लाखावर वार्षिक ८.८८ टक्के नफा झाला आहे. पाच वर्षे पूर्ण केलेल्या फंडांपैकी कॅनरा रोबेको कन्झ्युमर ट्रेंडस फंड आणि आदित्य बिर्ला सनलाइफ जेननेक्स्ट फंड या दोन फंडांना टॉप क्वारटाइलमध्ये स्थान मिळाले आहे. कॅनरा रोबेको कन्झ्युमर ट्रेंडस फंडाच्या दहा वर्षांच्या कामगिरीचा विचार केल्यास या फंडाला ‘अप्पर मिडल क्वारटाइल’मध्ये स्थान मिळाले आहे. फंड सुसूत्रीकरणानंतर २०१९ मध्ये या फंडाने ‘लोकसत्ता कर्ते म्युच्युअल फंड’ यादीत एसबीआय कन्झम्प्शन अपॉच्र्युनिटीज फंडाची जागा घेतली. या वर्षी ‘लोकसत्ता कर्ते म्युच्युअल फंड’ यादीत कॅनरा रोबेको कन्झ्युमर ट्रेंडस फंडाने अनेक दिग्गज फंडांना मागे सरत या फंडाने आपली जागा दुसऱ्या वर्षी कायम राखली. (संदर्भ: ‘अर्थ वृत्तान्त’ २० जानेवारी २०२०) या फंडाने मागील बारा वर्षांत एका महिन्यातील सर्वाधिक घसरण २३ फेब्रुवारी ते २२ मार्च २०२० या कालावधीत (-३६%) तर एका महिन्यातील सर्वाधिक वाढ २३ मार्च ते २२ एप्रिल २०२० या कालावधीत (२२%) दिसून आली. साहजिक फंड ‘हाय रिस्क, हाय रिवॉर्ड’ (आलेख क्रमांक १) प्रकारात मोडणारा असल्याने हा फंड जोखीम परतावा समजणाऱ्या आणि गुंतवणुकीत मुरलेल्या गुंतवणूकदारांसाठी आहे. वेगवेगळ्या कालावधींतील फंडाची अव्वल आणि खराब कामगिरीचा अभ्यास केल्यास (कोष्टक क्रमांक-१) फंडाच्या गुंतवणुकीतील कमालीची अस्थिरता लक्षात येईल.

मागील पाचपैकी दोन वर्षे भारतात दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी पडलेल्या पावसाने ग्रामीण अर्थव्यवस्था आक्रसली होती; परंतु मागील वर्षी सरासरीहून अधिक झालेल्या पावसाने पाणलोट क्षेत्रात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध झाल्याने दोनही हंगामांत कृषी उत्पन्नात वाढ आणि सरकारने हमी भावात केलेल्या वाढीचा फायदा ग्रामीण अर्थव्यवस्थेला झाला आहे. याचा परिणाम उपभोग्य वस्तूंच्या मागणीत दिसून येईल. स्थूल अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केल्यास जागतिक बाजारपेठेत जिन्नसांच्या किमतींमध्ये झालेली घसरण व्याजदरात केलेल्या कपातीमुळे मध्यम मुदतीच्या उपभोग्य वस्तूंच्या मागणीत अनुकूल परिणाम दिसून येईल. फंड गुंतवणुकीत संरक्षणात्मक रणनीती म्हणून या फंडाचा गुंतवणूकदारांना उपयोग होऊ शकेल.

shreeyachebaba@gmail.com