19 September 2020

News Flash

अर्थ वल्लभ : हृदयी ‘मारुती’चे  ध्यान

यूटीआय ट्रान्सपोर्टेशन अँड लॉजिस्टिक फंड

यूटीआय ट्रान्सपोर्टेशन अँड लॉजिस्टिक फंड

वसंत माधव कुळकर्णी

वावाहन उद्योग हा अर्थचक्राशी निगडित उद्योग समजला जातो. अर्थचक्राची गती मंदावल्याचा परिणाम वाहन उद्योग आणि पूरक उत्पादनांच्या समभागांच्या किमतीत घसरण होण्यात झाला. घसरणीच्या कारणांचा शोध घेतल्यास अनेक कारणे सापडतील. मंदावलेली अर्थव्यवस्थेच्या जोडीला आणि सरकारी धोरण पारंपरिक वाहनांपेक्षा ई-वाहन खरेदीला प्रोत्साहन देणारे असल्याने एकूण वाहन उद्योगाबाबत गुंतवणूकदारांमध्ये नकारात्मकता निर्माण झाली. नवीन वाहनांच्या विक्रीत घट झाल्यामुळे सध्याच्या मूल्यांकनावर वाहन उद्योगात गुंतवणुकीची संधी नव्याने निर्माण झाली आहे. जोखीम आणि परताव्याच्या समतोलात सध्या जोखमीच्या बाजूला कललेल्या यूटीआय ट्रान्सपोर्टेशन अँड लॉजिस्टिक फंडाचा गुंतवणूकदार नव्याने विचार करू शकतील. तथापि, हे लक्षात घेतले पाहिजे की हा एका विशिष्ठ उद्योग क्षेत्रात गुंतवणूक करणारा सेक्टोरल फंड असल्याने योग्य वेळी या गुंतवणुकीतून बाहेर पडता येणे तितकेच महत्त्वाचे आहे. जे वाहन उद्योग आवर्तनावर नजर ठेवून योग्य वेळी बाहेर पडू शकतील त्यांनीच या फंडात गुंतवणूक करावी. ‘कोअर अ‍ॅण्ड सॅटेलाइट’ रणनीतीचा अवलंब करणाऱ्यांनी गुंतवणुकीचा काही हिस्सा अधिक जोखमीच्या गुंतवणुकीत गुंतविल्यास सरासरीपेक्षा अधिक परतावा मिळू शकेल.

प्रवासी वाहन क्षेत्र टाळेबंदीत शिथिलता केल्यानंतर करोनापूर्व पातळीवर सर्वाधिक वेगाने सावरणारे ठरले. जुलै २०२० च्या मासिक विक्रीत प्रवासी वाहन विक्री सर्वाधिक जलद गतीने रुळावर आली त्या खालोखाल दुचाकी व तीनचाकी, नंतर ट्रॅक्टर असा विक्रीनुसार क्रम लागतो. चालू आर्थिक वर्षांतील निराशाजनक पहिल्या तिमाहीनंतर दुसऱ्या तिमाहीत वाहन उत्पादन देशांतर्गत विक्री आणि निर्यातीत सकारात्मक वाढ झाली.

करोनापश्चात कृषी क्षेत्र इतर कोणत्याही क्षेत्रांपेक्षा तुलनेने चांगली कामगिरी करत असल्याचे दिसत आहे अन्नधान्य उत्पादनांची मागणी, पुरेसा आणि बहुतांश भागात सरासरीपेक्षा अधिक झालेला पाऊस आणि सरकारकडून ग्रामीण अर्थव्यवस्था सावरण्याचा होत असलेले प्रयत्न यांचा वाहन उद्योग लाभार्थी ठरत असल्याचे दिसत आहे. नवीन प्रवासी वाहनांची मागणी, मुखत्वे समष्टी अर्थव्यवस्थेवर अवलंबून असेल. करोनाबाधितांची संख्या किती लवकर आटोक्यात येईल यावर बरेच अवलंबून असल्याने या फंडात दोन ते तीन टप्प्यात गुंतवणूक करण्याचा विचार करावा.

हा फंड ‘एसआयपी’साठी नसून गुंतवणुकीतील एक व्यूहरचना म्हणून या फंडाकडे पाहावे लागेल. या गुंतवणुकीला यश मिळणे हे अर्थव्यवस्थेच्या संथ पण सकारात्मक पुनरुत्थानावर अवलंबून आहे.

जानेवारीपासून करोना उद्रेकामुळे कमी झालेल्या मागणीने वाहन उद्योगाला उत्पादन कपात करणे आणि विक्री दालने बंद करणे भाग पाडले. वाढलेली बेरोजगारी, वेतन कपात आणि उत्पन्नाची अनिश्चितता यामुळे अनेकांनी आपली प्रस्तावित वाहन खरेदी पुढे ढकलली. याव्यतिरिक्त, एकूणच संथ झालेल्या अर्थव्यवस्थेमुळे मालवाहतुकीची मागणी कमी झाल्याची व्यावसायिक वाहनांच्या विक्रीला मोठी झळ पोहचली. तसेच व्यापारी वाहनांना जास्त भार वाहून नेण्यासाठी  (एक्सेल लोड नॉम्र्स) लागणाऱ्या सुधारित परवान्याच्या नियमाचा माल वाहतूक करणाऱ्या व्यापारी वाहनांच्या विक्रीत घट झाली. चालू आर्थिक वर्षांत प्रवासी वाहनांची विक्री (निर्यात धरून) २० ते २२ टक्यांनी घसरून २६.६५ ते २६.७५ लाख युनिट्सच्या दरम्यान होण्याचा अंदाज आहे. मागील वर्षी नवीन वाहनांच्या विक्रीत १५ टक्के घट झाली होती. विक्रीत दोन आकडी घसरण झाल्याचे हे सलग दुसरे वर्ष असेल.

क्रिसिलने निवडक वाहन निर्मात्या आणि पूरक उत्पादनांच्या उत्पादकांच्या (ओईएम) ताळेबंदाचे विश्लेषण करून काही कंपन्यांच्या (बजाज ऑटो, एमआरएफ, टीमकेम इंडिया, मारुती, सुंदरम फास्टनर्स इत्यादी) ताळेबंदातील रोकडसुलभ गुंतवणुका या कंपन्यांना कठीण परिस्थितीत साथ देतील, असे निरीक्षण नोंदविले आहे. क्रिसिलने विश्लेषण केलेल्या वाहन निर्मात्या कंपन्यांचा एकूण उद्योग क्षेत्राच्या नफ्यात ८० टक्के वाटा आहे, यापैकी सहा कंपन्यांचा एकूण विक्रीत ७५ टक्के हिस्सा आहे. या अहवालानुसार वेगाने रुळावर येत असलेली ग्रामीण अर्थव्यवस्था वाहन उद्योगासाठी पूरक असेल असा आशावाद व्यक्त करण्यात आला आहे.

सेक्टोरल फंड असूनही, हा फंड गुंतवणुकीसाठी सरासरी ३५ कंपन्यांची निवड करतो. निधी व्यवस्थापकांचा मारुतीवर पूर्ण भरवसा असल्याने २० टक्के गुंतवणूक या एका कंपनीत केंद्रित झाली आहे. प्रवासी वाहन क्षेत्रात संख्यात्मक दृष्टय़ा अग्रगण्य असलेल्या मारुतीचा या फंडाच्या कामगिरीत मोठा वाटा आहे. मार्चमधील नीचांकी पातळीवरून मारुतीने ५० टक्के उसळी घेतल्याचा फायदा या फंडाला मिळाला असून करोनापश्चात समाजाचा एक मोठा समुदाय आहे जो सार्वजनिक वाहन व्यवस्थेऐवजी खासगी वाहनांचा वापर करेल.

लहान मोटारींच्या बाजारपेठेवर वर्चस्व असलेला हा समभाग जितक्या वेगाने गतिशीलतेकडे वाटचाल करेल तशी या फंडाची कामगिरी सुधारेल. आयशर मोटर्स, हीरो मोटोकॉर्प, महिंद्र अँड महिंद्र आणि बजाज ऑटो यांसारखे इतर प्रमुख वाहन निर्मात्या कंपन्यांतून आठ टक्क्यांपर्यंत गुंतवणूक आहे. फंडाच्या शेपटाकडचा भाग अंमळ थोडा लांबच आहे. सेक्टोरल फंड असल्याने लांब शेपूट अपेक्षित नाही. ग्रामीण आणि शहरी उपभोगांवर समतोल साधण्याचा निधी व्यवस्थापकांचा प्रयत्न दिसतो. व्यावसायिक वाहनांच्या (सीव्ही) विक्रीच्या वाढीवर असलेल्या मर्यादा लक्षात घेऊन निधी व्यवस्थापकांनी अशोक लेलँड आणि ऑटोमोटिव्ह अ‍ॅक्सेल्ससारख्या कंपन्यांतून गुंतवणूक कमी केलेली दिसत आहे.

आर्थिक आवर्तनाशी निगडित उद्योग असल्याने हा फंड टोकाचा अस्थिर आहे. फंडाचे ‘कॅलेंडर रिटर्न्‍स’ तपासले असता नकारात्मक परतावा ते एका वर्षांत तिप्पट परतावा दिलेला हा फंड आहे. फंडाची उलाढाल ११ टक्के असून मानदंडाच्या ३१.२२ ‘पी/ई’च्या तुलनेत या फंडाचा ‘पी/ई’२० दरम्यान असल्याने जोखीम परताव्याचा लंबक परताव्याच्या बाजूला झुकलेला आहे.

कमालीच्या अस्थिरतेचा सामना करत किमान पाच वर्षे गुंतवणूक राखून ठेवण्याची क्षमता असलेल्या गुंतवणूकदारांनी आपल्या जोखीम क्षमतेनुसार या फंडाचा विचार करावा.

ashishthakur1966@gmail.com / लेखक भांडवली बाजार विश्लेषक

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

shreeyachebaba@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 24, 2020 1:09 am

Web Title: information on mutual fund investments zws 70 4
Next Stories
1 बाजाराचा तंत्र कल : लबाडाघरचे आवतन..
2 कर बोध : करदात्यांच्या हक्क आणि कर्तव्याची कलमे
3 नावात काय : प्रा. से यांचा नियम
Just Now!
X