29 October 2020

News Flash

अर्थ वल्लभ : अद्वितीय

म्युच्युअल फंड गुंतवणुकीसंबंधित माहिती देणारे साप्ताहिक सदर

वसंत माधव कुळकर्णी

आंतरराष्ट्रीय गुंतवणूक करणाऱ्या फंडात गुंतवणुकीचा भारतीयांचा कल वाढत असल्याने अनेक फंड घराणी अशा प्रकारचे फंड गुंतवणूकदारांना उपलब्ध करून देत आहेत. भौगोलिक वैविध्य आणि लार्जकॅप गुंतवणूक असलेला या प्रकारचा फंड भारतीय गुंतवणूकदारांना पहिल्यांदाच उपलब्ध होत आहे, त्या निमित्ताने..

सध्याच्या भांडवली बाजारातील अस्थिरतेमुळे भारतीय गुंतवणूकदार एक सुरक्षित गुंतवणुकीच्या पर्यायाच्या शोधात असतील. अनेकांची गुंतवणूक सरलेल्या मार्च महिन्याच्या तुलनेत नफ्यात असलेली दिसत आहे. अनेक गुंतवणूकदार कटू स्मृती मागे सोडून आपल्या वित्तीय ध्येयांची नव्याने आखणी करताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत सुज्ञ गुंतवणूकदार आंतरराष्ट्रीय समभाग गुंतवणूक फंडांचा नक्कीच विचार करीत असतील. भारतीय गुंतवणूकदारांचा आंतरराष्ट्रीय गुंतवणूक करणाऱ्या फंडात गुंतवणूक करण्याचा कल वाढत असल्याने अनेक फंड घराणी अशा प्रकारचे फंड भारतीय गुंतवणूकदारांना उपलब्ध करून देत आहेत.

वार्षिक ६ ते ७ टक्के दराने वाढण्याची शक्यता असणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेतील निवडक समभागांबरोबरीनेच, आकाराने जगातील सर्वात मोठय़ा अर्थव्यवस्थेतील सर्वात मोठय़ा कंपन्यांच्या समभागात गुंतवणूक करणाऱ्या फंडाची प्राथमिक विक्री २८ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. प्रिन्सिपल म्युच्युअल फंडांचा ‘प्रिन्सिपल लार्जकॅप फंडा’ची प्राथमिक विक्री त्यापैकीच एक. हा फंड एकूण मालमत्तेच्या कमाल ८५ टक्के मालमत्ता भारतात सूचिबद्ध असलेल्या लार्जकॅप कंपन्यांत, तर कमाल १५ टक्के गुंतवणूक अमेरिकेत सूचिबद्ध असलेल्या लार्जकॅप कंपन्यांत करणार असल्याचे ‘सेबी’कडे दाखल केलेल्या माहितीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. भौगोलिक वैविध्य आणि लार्जकॅप गुंतवणूक असलेला या प्रकारचा फंड भारतीय गुंतवणूकदारांना पहिल्यांदाच उपलब्ध झाला आहे. या फंडासारखा दुसरा फंड उपलब्ध नसल्याने एका अर्थी हा फंड अद्वितीय म्हणायला हवा.

हा फंड एकूण मालमत्तेच्या कमाल ८० टक्के गुंतवणूक भारतीय लार्जकॅप कंपन्यांच्या समभागात करणार असल्याने हा फंड लार्जकॅप गटात स्थान मिळण्यास पात्र ठरतो. उर्वरित १५ टक्के गुंतवणूक अमेरिकेत सूचिबद्ध आणि ५० अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा अधिक भांडवली मूल्य असलेल्या कंपन्यांत करण्यात येईल. उद्योग क्षेत्राबाबत फंड घराणे अज्ञेयवादी दृष्टिकोन बाळगून असून ‘व्हॅल्यू’पेक्षा ‘ग्रोथ ओरिएंटेड’ समभागांकडे निधी व्यवस्थापकांचा कल असेल असे संकेत निधी व्यवस्थापकांनी दिले आहेत. थोडक्यात समभाग निवड किंमत उत्सर्जन गुणोत्तरावर आधारित मूल्यांकनापेक्षा उत्सर्जनाच्या वृद्धीदरावर ठरेल.

गुंतवणुकीची शिफारस करण्यापूर्वी फंडाबाबत न पटलेल्या गोष्टींची माहिती एक फंड विश्लेषक म्हणून मांडायला हव्यात. सर्वप्रथम फंडाचा प्रस्तावित मानदंड – ‘निफ्टी १०० टीआरआय’ हा संपूर्णपणे देशी निर्देशांक असणे हे खटकणारे ठरते. जर फंड अमेरिकेतील लार्जकॅपमध्ये गुंतवणूक करणार आहे तर १५ टक्के ‘एसअ‍ॅण्डपी १००’ आणि ८५ टक्के  ‘निफ्टी १०० टीआरआय’ असे प्रमाण योग्य ठरले असते. भारतात असे अनेक फंड आहेत ज्या फंडांची कामगिरी एकाहून अधिक मानदंडांसोबत निश्चित गुणोत्तरात तपासली जाते. याच न्यायानुसार या फंडासाठी दोन मानदंडाची निवड आणि प्रमाण निश्चित करणे आवश्यक होते. गुंतवणुकीत परदेशी समभाग, परंतु मानदंडात परदेशी निर्देशांकाच्या अभावामुळे या फंडाची कामगिरी उजवी दाखवण्याची किमया फंड घराणे साधू शकेल.

अमेरिकी गुंतवणूक गुंतवणूकदाराला स्थैर्य देते. उदाहरणार्थ, माहितीपत्रकात म्हटल्यानुसार, पोर्टफोलिओमध्ये ‘एसअ‍ॅण्डपी ५००’चा समावेश केल्यास (८५ टक्के निफ्टी १०० टीआरआय आणि १५ टक्के एसअ‍ॅण्डपी ५००) एकत्रित निर्देशांकाने ११ वर्षांंपैकी ७ कॅलेंडर वर्षे गुंतवणुकीने नफा झाल्याचे दिसते. परंतु मागील दहा वर्षांत ‘निफ्टी १०० टीआरआय’ आणि ‘एसअ‍ॅण्डपी ५००’ मध्ये बरेच बदल आणि निर्देशांक ठरविण्याच्या पद्धतीत (फ्री फ्लोट) झालेले बदल लक्षात घेतले तर हा दावा जशाचा तसा स्वीकारता येणार नाही.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांच्या तुलनेत लार्जकॅप या अधिक सुरक्षित कंपन्या आहेत. या कंपन्यांचे ताळेबंद सुदृढ असल्याने करोनासारख्या प्रसंगाला तोंड देण्यास या कंपन्या समर्थ असतात. साहजिकच लार्जकॅप गुंतवणूक करणारे फंड तुलनेने अधिक सुरक्षित मानले जातात. लार्जकॅप समभागांचे लाभांश वाटपाचे प्रमाण अधिक असते. परंतु अशा फंडांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी काही जोखमीच्या बाबी विचारात घेतल्या पाहिजेत. वॉरेन बफे यांनी म्हटल्याप्रमाणे, करोनाने जगाला नेमकी किती हानी पोहचली हे कळून येण्यास काही काळ जावा लागेल. त्यामुळे अल्प ते मध्यम मुदतीत आपले पैसे दुप्पट किंवा तिप्पट होतील अशी समजूत खात्रीने भ्रम ठरेल. या फंडाला २० टक्कय़ांपर्यंत रोखे साधनांत गुंतवणूक करण्याची मुभा असल्याने निधी व्यवस्थापक अनेकदा ‘कॅश कॉल’ घेण्याची शक्यता असून, तो काही काळासाठी परताव्यावर परिणाम करू शकेल. परदेशी गुंतवणुकीला चलन अस्थिरतेला सामोरे जावे लागते. हा धोका देखील दुर्लक्षिता येणार नाही.

जागतिक बँकेच्या एका अहवालानुसार जगाच्या व्यापारात भारतीय कंपन्यांचा वाटा फक्त तीन टक्के आहे. या उलट विकसित अर्थव्यवस्थांमध्ये मोठा वाटा जागतिक ग्राहकांचा आहे (उदाहरणार्थ, अमेरिकेच्या कंपन्यांची सरासरी ४१ टक्के विक्री अमेरिकेच्या बाहेरच्या ग्राहकांकडून होते). जागतिकीकरणाचा वेग लक्षात घेता, भारतीय गुंतवणूकदारांना जागतिक अर्थव्यवस्थांच्या लाभार्थी असणाऱ्या कंपन्यांत गुंतवणूक करण्याची संधी या फंडाच्या गुंतवणुकीतून साधता येईल.

असे अनेक घटक आहेत ज्या कारणांमुळे गुंतवणुकीत जागतिक समभाग गुंतवणूक असणे गरजेचे आहे. सर्वात प्रमुख म्हणजे जागतिक स्तरावर गुंतवणुकीचे विकेंद्रीकरण करून जोखीम कमी होण्यास मदत होते. भिन्न बाजारांची जोखीम पातळी भिन्न असते. गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओचा काही भाग वेगवेगळ्या देशांमध्ये विभागल्याने गुंतवणूकदारांना कार्यक्षम पद्धतीने जोखीम कमी करण्यास मदत होते. भारतीय गुंतवणूकदारांना उपलब्ध नसलेल्या जागतिक ग्राहकमान्य आणि तंत्रज्ञानकेंद्रित कंपन्या आंतरराष्ट्रीय भांडवली बाजारात सूचिबद्ध आहेत. गुंतवणुकीला थोडीशी विविधता आणल्याने गुंतवणुकीला स्थैर्य मिळते. जेणेकरून भारतीय बाजारामध्ये चढ-उतार होत असले तरीही विदेशातील गुंतवणुकीचा एक लहान भाग सुरक्षित असतो.

अमेरिकेत अ‍ॅपल, गूगल, कोकाकोला, अमेरिकन एक्सप्रेस बँक, सिटी बँक, मायक्रोसॉफ्ट या सारख्या जगातल्या काही सर्वात शक्तिशाली कंपन्या सूचिबद्ध आहेत. तसेच अ‍ॅपल, मॅकडोनाल्ड, नेटफ्लिक्स या सारख्या अतिशय लोकप्रिय नाममुद्रा मालकीच्या असलेल्या कंपन्या भारतात सूचिबद्ध नाहीत. या कंपन्यांच्या नाममुद्रा भारतीयांना परिचित असल्या तरी या कंपन्यांतून गुंतवणूक करण्याची संधी भारतीयांना उपलब्ध नाही. डिजिटल सशक्तीकरणाने तंत्रज्ञानसक्षम अ‍ॅमेझॉन, अलिबाबा सारखे अनेक मंच उदयाला आले आहेत. आणखी एक पैलू ज्याचा आपण विचार केला पाहिजे, तो म्हणजे तंत्रज्ञानावर आधारित सेवा क्षेत्रात असलेल्या अनेक समभागांमध्ये बहुप्रसवा होण्याची क्षमता असते.

भारतातील गुंतवणूकदारांनी या फंडाकडे स्थानिक चलन विनिमय दराच्या अस्थिरतेवर मात करण्यासाठी पाहायला हवे. शिवाय परकीय भांडवली बाजारात नोंदलेल्या कंपन्यांचे वित्तीय अनुपालन कठोर असते. दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी गुंतवणूक साधनांत विविधता आणण्यासाठी ही एक चांगली संधी आहे. भूतकाळाकडे पाहिले तर, ज्या कंपन्यांनी आपल्या कार्यपद्धतीत वेगाने बदल घडवून आणले आहेत. अशाच कंपन्या काळाच्या ओघात टिकल्याचा इतिहास साक्षी आहे. या बदलांचा मागोवा घेणाऱ्या कंपन्यांतून आपल्या मालमत्तेचा लहानसा हिस्सा गुंतवणाऱ्या फंडात आपल्या गुंतवणुकीचा सुद्धा लहानसा हिस्सा यासाठी गुंतवायला हवा.

shreeyachebaba@gmail.com

म्युच्युअल फंड गुंतवणुकीसंबंधित माहिती देणारे साप्ताहिक सदर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2020 12:06 am

Web Title: information on mutual fund investments zws 70 5
Next Stories
1 बंदा रुपया : साठवण कर्तबगारी!
2 माझा पोर्टफोलियो : निरंतर बहर असणारी गुंतवणूक!
3 क.. कमॉडिटीचा : कृषी-सुधारणांच्या यशासाठी ‘सेबी’चे योगदान महत्त्वाचे!
Just Now!
X