28 October 2020

News Flash

अर्थ वल्लभ : थकलेल्यांना निरोप आणि नव्यांची शिफारस 

म्युच्युअल फंड गुंतवणुकीसंबंधित माहिती देणारे साप्ताहिक सदर

वसंत माधव कुळकर्णी

मागील २० तिमाहीत जानेवारी ते मार्च २०२० ही सर्वात अस्थिर तिमाही निश्चित म्हणता येईल. त्यानंतर हळूहळू अस्थिरता कमी होत असल्याचे दिसत आहे. जुलै ते सप्टेंबर या तीनही महिन्यांत समभाग गुंतवणुकीला गळती लागली हे या तिमाहीचे वैशिष्टय़ म्हणायला हवे. सप्टेंबर २०१९ मधील २५.६० लाख कोटींवरून, सप्टेंबर २०२० मध्ये एकूण फंड मालमत्ता २६.८५ लाख कोटींवर पोहोचली आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाने (अ‍ॅम्फी) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सप्टेंबरमध्ये समभाग आणि समभागसंलग्न फंडातून गुंतवणूकदारांनी ७३४ कोटी रुपये काढून घेतले. काढून घेतलेल्या फंडामध्ये ईएलएसएस फंडांचा मोठा वाटा होता.

मार्च २०१७ मध्ये अ‍ॅम्फीने ‘म्युच्युअल फंड सही है’ मोहिमेला सुरुवात केल्यापासून फंड गुंतवणुकीत निधीचा ओघ वाढला. योग्य फंडाबाबत शहानिशा न केल्याने चुकीच्या फंडात गुंतवणूक केली गेली परतावा न मिळालेले निराश गुंतवणूकदार तीन वर्षांचा कालावधी संपताच बाहेर पडते झाले. थोडय़ा फार फरकाने अन्य फंड गटात हेच चित्र दिसते. मोठय़ा संख्येने बाहेर पडणारे गुंतवणूकदार तोटय़ातील गुंतवणुका नफ्यात येताच बाहेर पडत असल्याचे दिसते. म्युच्युअल फंडांची सप्टेंबरअखेरीस सर्वाधिक गुंतवणूक बँका आणि वित्तीय सेवा, वैयक्तिक वापराच्या ग्राहकोपयोगी वस्तू, माहिती तंत्रज्ञान, आरोग्य निगा आणि पेट्रोलियम उत्पादने या उद्योग क्षेत्रात होती. मागील दोन तिमाहीत जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून म्युच्युअल फंडांनी सर्वाधिक खरेदी रिलायन्स इंडस्ट्रीजची केली, तर जुलै सप्टेंबर तिमाहीत म्युच्युअल फंडांनी सर्वाधिक विक्री रिलायन्सच्या समभागांची केली. रिलायन्सची सर्वाधिक विक्री एचडीएफसी आणि एसबीआय या फंड घराण्यांनी केली. तर अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंड रिलायन्सच्या समभागांचा सर्वात मोठा खरेदीदार होता. रिलायन्सच्या समभागाची त्या खालोखाल खरेदी करणाऱ्यांत आयआयएफएल म्युच्युअल फंड, एस्सेल म्युच्युअल फंड, एलआयसी एमएफ, एचएसबीसी आणि पीजीआयएम इंडिया यांचा समावेश आहे. निधी व्यवस्थापकांनी रिलायन्समध्ये नफावसुली करण्याची जी कारणे आहेत, त्यातील पहिले कारण, मार्चमधील (१६ मार्च) नीचांकापासून सप्टेंबर (१६ सप्टेंबर) उच्चांकी पातळी गाठल्याने १७३ टक्के भांडवली वृद्धी रिलायन्स इंडस्ट्रीजने गुंतवणूकदारांना दिली. जुलै महिन्यांत अनेक फंडाच्या एकूण मालमत्तेच्या १० टक्के मालमत्ता रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये असल्याने गुंतवणुकीची कमाल मर्यादा गाठल्याने निधी व्यवस्थापकांना सक्तीची विक्री करावी लागली. जुलै महिन्यात फंड घराण्यांनी विक्री केली असली तरी ऑगस्ट महिन्यात त्यापेक्षा दुपटीने खरेदी केल्यामुळे सर्वच समभाग गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीत रिलायन्स पहिल्या दहा कंपन्यांपैकी एक आहे. त्या खालोखाल म्युच्युअल फंडांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेला सर्वाधिक खरेदीसाठी पसंती दिली. जुलै ते सप्टेंबर या कालावधीत सर्वाधिक विकलेल्या समभागांमध्ये एचडीएफसी बँक आणि एचडीएफसीचा समावेश होता. या तिमाहीत यूटीआय एएमसीने केलेली प्राथमिक विक्री ही दखल घेण्यासारखी गोष्ट आहे. यूटीआय एएमसी आज बाजारात सूचिबद्ध होणार आहे.

१ जुलै २०१५ ते ३० सप्टेंबर २०२० या पाच वर्षांतील फंडांच्या कामगिरीनुसार ‘कर्त्यां’च्या यादीतील झालेल्या बदलांपैकी नोंद घेण्याजोगा बदल म्हणजे २०१४ पासून मागील सहा वर्षे या यादीचा भाग राहिलेल्या एसबीआय फोकस्ड इक्विटी फंडाला या यादीतून वगळावे लागले. एसबीआय इमर्जिग बिझनेसेस फंड अर्थात नवीन रूपातील एसबीआय फोकस इक्विटी फंड ‘लोकसत्ता कर्ते’ म्युच्युअल फंड यादीचा प्रदीर्घ काळ भाग राहिले आहे. एसबीआय म्युच्युअल फंडाने मे २०१८ मध्ये एसबीआय इमर्जिग बिझनेसेस फंडाचे ‘एसबीआय फोक्सड फंड’ असे नामकरण केले. ‘सेबी’ने निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार फोकस्ड फंड गटासाठी कमाल ३० समभाग आणि किमान ६५ टक्के गुंतवणूक मिड आणि स्मॉल कॅप कंपन्यांत असणे आवश्यक असते. जोखीम परतावा गुणोत्तरात फंडांच्या गुंतवणुकीवर परतावा सोडाच, पण ज्या फंड घराण्यांचे बहुतांश फंडांनी मुद्दल सुरक्षित राखले नाही, अशा फंड घराण्यात एसबीआय म्युच्युअल फंड आघाडीवर आहे. कधीकाळी ‘कर्त्यां’च्या यादीत पाचपेक्षा अधिक फंडांना स्थान मिळवत वर्चस्व असलेल्या या फंड घराण्याचा केवळ एकच फंड आता यादीत उरला आहे. या फंड घराण्याच्या मालमत्तेत संख्यात्मक वाढ झाली असली तरी फंड घराण्याची गुणात्मक अधोगती झाली आहे. मागील तीन वर्षांच्या कामगिरीनुसार मानदंडापेक्षा अधिक परतावा मिळविणारे केवळ तीन फंड असणे हे मालमत्तेच्या निकषावर पहिला क्रमांक मिरविणाऱ्या फंड घराण्यास भूषणावह नक्कीच नाही. एसबीआय फोकस्ड इक्विटी फंडाच्या १ सप्टेंबर २०१० ते ३० सप्टेंबर २०२० या कालावधीत पाच वर्षांच्या चलत परताव्याची वार्षिक सरासरी १६.६१ टक्के असली तरी २८ महिन्यांपूर्वी हा फंड नव्या रूपात सादर झाल्यापासून फंडाच्या अलीकडील कामगिरीत सातत्याने घसरण होताना दिसत आहे. या फंडाच्या कामगिरीत सप्टेंबर २०१७ पासून सातत्याने घसरण होत असल्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. एसबीआय फोकस्ड इक्विटी फंडाने गेल्या तीन वर्षांच्या चलत सरासरीवर मागील १० वर्षांत सरासरी ८ टक्क्यांपेक्षा अधिक परतावा दिल्याची टक्केवारी २८ टक्के असली तरी अलीकडील पाच वर्षांतील १० वर्षांच्या चलत सरासरीत ८ टक्क्यांपेक्षा अधिक परतावा मिळालेल्या आधार बिंदूंचे प्रमाण १५ टक्क्यांवर आले आहे.

एसबीआय म्युच्युअल फंडांच्या निधी व्यवस्थापकांच्या कर्तृत्वावर पूर्ण भरवसा ठेवून या फंडांचे कर्त्यांच्या यादीत पुनरागमन होईल असा आशावाद असला तरी सद्य:स्थितीत या फंडाला वगळण्यात आले आहे. दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे लार्ज अ‍ॅण्ड मिडकॅप फंड गटात एडेल्वाईज लार्ज अ‍ॅण्ड मिडकॅप फंडाला वगळण्यात आले असून त्याची जागा प्रिंसिपल इमर्जिग ब्लूचिपने घातली आहे. मिडकॅप फंड गटात एल अ‍ॅण्ड टी मिडकॅप फंडाला वगळण्यात आले असून डीएसपी मिडकॅप फंडाचा तीन तिमाहीनंतर पुन्हा समावेश झाला आहे. ‘लोकसत्ता कर्ते म्युच्युअल फंडां’च्या यादीत समावेश होण्यासाठी किमान फंड तीन वर्षे अस्तित्वात असावा लागतो. एडेल्वाईज यूएस टेक्नॉलॉजी फंडाला तीन वर्षांचा इतिहास नाही म्हणून कर्त्यांच्या यादीत समावेश नसला तरी जोखीमप्रेमी गुंतवणूकदारांनी आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीसाठी या फंडाचा विचार नक्कीच करायला हवा.

shreeyachebaba@gmail.com

 म्युच्युअल फंड गुंतवणुकीसंबंधित माहिती देणारे साप्ताहिक सदर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2020 12:05 am

Web Title: information on mutual fund investments zws 70 6
Next Stories
1 कर बोध : लेखापरीक्षण आणि प्राप्तिकर कायदा
2 थेंबे थेंबे तळे साचे : गुंतवणुकीचा भूगोल बदलूया!
3 माझा पोर्टफोलियो : दीर्घावधीसाठी धारणेचे उमदे व्यवसाय क्षेत्र
Just Now!
X