03 December 2020

News Flash

अर्थ वल्लभ : पंत मेले राव चढले

म्युच्युअल फंड गुंतवणुकीसंबंधित माहिती देणारे साप्ताहिक सदर

वसंत माधव कुळकर्णी

हा लेख प्रसिद्ध होईल तेव्हा अमेरिकेत पुढील चार वर्षे अध्यक्षपदी ट्रम्प की बायडेन याचा निकाल बहुधा लागलेला असेल. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतातील लोकप्रतिनिधी संख्येच्या निकषावर महत्त्वाचे राज्य असलेल्या बिहारच्या निवडणुकांची मतमोजणी मंगळवारी आहे. सर्वात प्रगत असलेल्या अमेरिकेत आणि आर्थिक निकषांवर मागासलेले राज्य असलेल्या बिहारच्या राजकीय क्षितिजावर ‘पंत मेले राव चढले’सारखी स्थिती आहे.

राजकीय जगतात खांदेपालट नेमकी केव्हा करावी हे निश्चित असते. फंड जगतात मात्र ‘पंत मेले राव चढले’सारखी स्थिती वारंवार अनुभवण्यास मिळते. प्रवर्तक एल अ‍ॅण्ड टी म्युच्युअल फंड घराणे विकण्यासाठी खरेदीदाराच्या शोधात आहेत. एल अ‍ॅण्ड टी म्युच्युअल फंडाच्या ‘स्टार’ निधी व्यवस्थापकांनी राजीनामा दिला, डीएसपी फंड घराण्यातून गोपाल अग्रवाल बाहेर पडले. अशा प्रसंगी निधी व्यवस्थापक बदलतो तेव्हा माझ्या गुंतवणुकीचे काय होईल, असा प्रश्न गुंतवणूकदारांच्या मनात येतो. बदल ही नेहमीच समस्या किंवा अप्रिय गोष्ट नसते. बरेचदा गुंतवणूकदार निधी व्यवस्थापकाच्या ‘एग्झिट’ला वाईट गोष्ट समजतात.

एल अ‍ॅण्ड टी म्युच्युअल फंडाने आठ वर्षांपूर्वी फिडेलिटी फंड घराणे खरेदी केले तेव्हासुद्धा अनेकांनी हा प्रश्न विचारला होता. प्रत्यक्षात फिडेलिटी या वलयांकित फंड घराण्याकडून नवख्या आणि कमी मालमत्ता असलेल्या फंड घराण्याकडे मालकी हस्तांतरित झाल्यानंतर एल अ‍ॅण्ड टीच्या बहुतांश फंडांनी आधीपेक्षा सरस कामगिरी बजावल्याचे दिसते. कॅनरा रोबेको म्युच्युअल फंडातून कृष्णा संघवी बाहेर पडल्यानंतर फंड घराण्याच्या बहुतांश फंडांनी निमेश चंदन आणि श्रीदत्त भांडवलदार यांच्या नेतृत्वाखाली दमदार कामगिरी केल्याचे दिसते. कॅनरा रोबेकोचे चार फंड क्रिसिलच्या यादीत अव्वलस्थानी पोहोचले. यूटीआय इक्विटी फंड मल्टीकॅप गटात एक अव्वल कामगिरी असणारा फंड समजला जात असला तरी जानेवारी २०१६ मध्ये जेव्हा फंड घराण्याने या फंडाची सूत्रे अजय त्यागी यांच्याकडे दिली तेव्हा ते यूटीआय फ्लेक्झीकॅप या फंडाचे निधी व्यवस्थापक होते. त्यांनी आखलेल्या रणनीतीमुळे मागील दीड-दोन वर्षांत त्यांना या फंडाने केवळ ओळख मिळवून दिली नाही तर त्यांची गणना एक वलयांकित निधी व्यवस्थापकांमध्ये होऊ लागली. यूटीआय इक्विटी फंड हा यूटीआयच्या ताफ्यातील सर्वाधिक मालमत्ता असलेला फंड ठरला आहे. ही मालमत्ता कोणा एका वितरकाने (प्रवर्तक बँकेच्या माध्यमातून) दिलेली नसून, बँका, ‘वेल्थ मॅनेजर्स’ फंड वितरक यांच्या एकत्रित शहाणपणातून आली आहे. फंडाची मालमत्ता तीन वर्षांत दुप्पट झाल्याने ‘मार्केट रिवॉर्ड्स फॉर परफॉर्मन्स’ या बाजारातील वाक्प्रचाराची प्रचीती या फंडाने फंड घराण्याला करून दिली आहे.

केवळ निधी व्यवस्थापकच नव्हे तर फंड घराण्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी बदलल्यावर फंडाच्या कामगिरीत कसा फरक पडतो याची अगदी विरुद्ध टोकाची दोन उदाहरणे आहेत. पहिले उदाहरण आपल्या कारकीर्दीच्या शेवटच्या दिवशी राजीनामा द्यावा लागलेले यूटीआय म्युच्युअल फंडाचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी लिओ पुरी यांचे. पुरी यांच्या कारकीर्दीत फंड मालमत्तेत आणि फंडांच्या कामगिरीत घसरणच झाली. देशातील पहिले म्युच्युअल फंड घराणे हे आघाडीच्या पहिल्या पाचातून गायब झाले. त्यांच्यापश्चात हंगामी मुख्य कार्यकारी अधिकारपदी आलेल्या आणि नुकत्याच कायमस्वरूपी नेमणूक झालेल्या आय. रहमान यांनी फंड घराण्याची धुरा यशस्वीरीत्या सांभाळली. या तिमाहीत मालमत्ता क्रमवारीत यूटीआयने अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंडाला मागे टाकले. कोणाला तरी मागे टाकण्याचा योग यूटीआयच्या नशिबात येण्यास तब्बल दहा वर्षे जावी लागली. दुसरे उदाहरण कोणाच्या खिजगणतीतही नसलेल्या पीजीआयएम इंडिया म्युच्युअल फंडाचे. अजित मेनन यांच्यासारखा कसबी मुख्य कार्यकारी अधिकारी आल्यावर वर्षभरात फंडांचे क्रिसिल क्रमवारीत मानांकन उंचावले. आज या लहान फंड घराण्याची परताव्याच्या मागे लागलेल्या वितरकांना दखल घ्यावी लागली आहे.

‘कर्ते म्युच्युअल फंडा’च्या यादीतील फंड निवडण्यासाठी फंड कामगिरीचा मागोवा घेताना फंडाची रणनीती, गुंतवणुकीची मूलतत्त्वे आणि त्यातील गुंतवणूक प्रक्रियेच्या सातत्याचा अभ्यास केला जातो. यामुळे फंड व्यवस्थापक बदलला तरी फंडाच्या गुंतवणूक प्रक्रियेत व्यापक बदल होण्याची शक्यता खूपच कमी असते. परिणामी साधारणपणे फंडाची कामगिरी घसरण्याचा धोका कमी असतो. नवीन निधी व्यवस्थापक आणि विशेषत: त्याच फंड घराण्यातील नसल्यास त्याच्या शैलीनुसार गुंतवणुकीत थोडेफार फेरफार होतात. गुंतवणूक रणनीतीत फारच बदल केले असे कमी वेळा घडते. उदाहरण द्यायचे तर डीएसपी फोकस्ड फंडाच्या गुंतवणुकीत हरीश जव्हेरी यांच्या काळात बँका आणि वाहन तसेच वाहन पूरक उत्पादने यावर भर होता तर माहिती तंत्रज्ञान पूर्णपणे वागळले होते. त्यांच्यानंतर निधी व्यवस्थापक म्हणून आलेल्या गोपाल अग्रवाल यांनी वाहन उद्योग कमी करून माहिती तंत्रज्ञान आणि ग्राहकाभिमुख उद्योगांतील कंपन्यांना स्थान दिले. आता गोपाल अग्रवाल जाऊन या फंडांची धुरा विनीत सांबारे यांच्याकडे तात्पुरती आली आहे. ते याच फंड घराण्याचे समभाग गुंतवणूक प्रमुख असल्याने या फंडाच्या कामगिरीनुसार फंडाला वगळण्याचा किंवा कायम राखण्याचा निर्णय घेतला जाईल. निधी व्यवस्थापक न बदलता केवळ रणनीती बदलल्याने आयसीआयसीआय प्रू. व्हॅल्यू डिस्कव्हरी फंडाला २०१५ मध्ये या यादीतून वगळण्यात आले आजतागायत हा फंड आपल्या २०१२ ते २०१५ मधील कामगिरीचे पुन्हा प्रदर्शन करू शकलेला नाही.

एलआयसी म्युच्युअल फंडात सचिन रेळेकर यांच्या जागी मुख्य गुंतवणूक अधिकारीपदी योगेश पाटील यांची समभाग गुंतवणुकीचे प्रमुख म्हणून अस्थायी नेमणूक करण्यात आली आहे. विनीत सांबारे आणि योगेश पाटील यांची कार्यपद्धती ते निधी व्यवस्थापक असलेल्या फंडांच्या कामगिरीतून सिद्ध झाली आहे. या दोन्हीही निधी व्यवस्थापकांचे फंड दीर्घ काळापासून ‘लोकसत्ता कर्ते म्युच्युअल फंड’ यादीचा भाग असल्याने या फंडांचा नियमित मागोवा घेतला जातो. निधी व्यवस्थापकांचे विचार समजून घेण्यासाठी नियमित मागोवा घेऊन अतिरिक्त गुंतवणूक किंवा निधी दुसऱ्या फंडात वळविण्याबाबत आढावा घ्यावा. निधी व्यवस्थापकाची कामगिरी जोखण्यासाठी चलत सरासरी कामगिरी आणि पोर्टफोलिओ उलाढाल दोन्हींचा मागोवा सातत्याने घेत असतो.

यादीतून एखाद्या फंडाला वगळण्याचा किंवा फंडाचा समावेश करण्याचा निर्णय केवळ निधी व्यवस्थापकावर न ठरता फंडाची सुधारित वर्गवारी आणि जोखीम बदलाच्या स्वरूपावर अवलंबून असतो. एखाद्या फंडाच्या गुंतवणुकीचा ढाचा बदलून फंडाचा समावेश नवीन फंड गटात करण्यात येतो. जसे की मिरॅ असेट इंडिया इक्विटी अपॉच्र्युनिटी, मिरॅ असेट इंडिया इक्विटी फंड आणि मिरॅ असेट लार्जकॅप ही एकाच फंडाची मागील पाच वर्षांतील नावे आहेत. डायव्हर्सिफाइड इक्विटी फंड, मल्टी-कॅप फंड आणि आता लार्जकॅप फंड गटात असलेल्या या फंडाचा नवीन फंड गटात समावेश झाल्यावरदेखील जोखमीच्या पातळीत बदल न झाल्याने नामबदलानंतरदेखील कर्ते म्युच्युअल फंडाच्या यादीत फंडाचा समावेश अबाधित राहिलेला आहे. तर कोटक लो डय़ुरेशन फंडाच्या प्रमाणित विचलनात वाढ झाल्याने आणि कामगिरीत अचानक सुधारणा झाल्याचे लक्षात आल्यावर शोध घेतला असता, फंड व्यवस्थापनाने फंडाची अपेक्षित चौकटीबाहेर साहसी गुंतवणूक केल्याचे दिसून आले. गुंतवणूक असलेले रोखे पुढे कलंकित झाल्याने या फंडातून त्वरित बाहेर पडण्याचा वाचकांना त्या वेळी दिलेला सल्ला योग्य होता.

एखाद्या वेळी एखाद्या फंडाचे मंथन (पोर्टफोलिओ टर्नओव्हर) वाढल्याचे आढळते. एखाद्या फंडाची कामगिरी गचाळ होत असते तेव्हा फंडाच्या गुंतवणुकीत पूर्णपणे बदल करण्याचा तो/ती प्रयत्न करीत असते. परिणामी पोर्टफोलिओ मंथनात वाढ होते. याचे ताजे उदाहरण म्हणजे एल अ‍ॅण्ड टी म्युच्युअल फंडांच्या गुंतवणूक समभाग मंथन वाढल्याचे आकडेवारी सांगते. अशा परिस्थितीत निधी व्यवस्थापकांच्या कार्यपद्धतीनुसार एखाद्या फंडाचा ‘कर्ते म्युच्युअल फंडां’च्या यादीत नव्याने समावेश झाल्यास किंवा यादीतून वगळले गेल्यास ‘लोकसत्ता अर्थवृत्तान्त’कडून वाचकांना नक्कीच सतर्क केले जाईल. अशा परिस्थितीत तोपर्यंत पंतांच्या मरणाचा किंवा रावांच्या पदोन्नतीच्या परिणामाची चिंता वाहण्यास ‘कर्ते’ समर्थ आहेत.

shreeyachebaba@gmail.com

म्युच्युअल फंड गुंतवणुकीसंबंधित माहिती देणारे साप्ताहिक सदर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 9, 2020 12:05 am

Web Title: information on mutual fund investments zws 70 7
Next Stories
1 थेंबे थेंबे तळे साचे : बाजार उसळला.. का बरं?
2 क्षण लक्ष्यपूर्तीचे!
3 क.. कमॉडिटीचा :  अ‍ॅग्रीडेक्सला झळाळी
Just Now!
X