करावे कर-समाधान

प्रवीण देशपांडे  
गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये ‘जीवन विमा’ हा लोकप्रिय पर्याय आहे. हे क्षेत्र खासगी कंपन्यांना खुले केल्यानंतर अनेक नावीन्यपूर्ण योजना बाजारात आल्या आहेत आणि येत आहेत. जीवन विम्यामध्ये गुंतवणूक केल्या स त्याचे फायदे मिळतात, विमा संरक्षण, बचत आणि प्राप्तिकर सवलत. यामुळे याची लोकप्रियता जास्त आहे. विमा हप्त्याच्या रकमेवर ‘कलम ८० सी’प्रमाणे दीड लाख रुपयांपर्यंत उत्पन्नातून वजावट मिळू शकते. करदात्यांचा असा गैरसमज आहे की, जीवन विम्यामध्ये गुंतविलेल्या हप्त्याची उत्पन्नातून वजावट मिळते आणि मिळालेले पैसे करमुक्त आहेत; परंतु हे सर्व विमा योजनांना लागू नाही. जे आयुर्विमापत्र ३१ मार्च २००३ पूर्वी जारी केले आहे त्याद्वारे मिळणारी रक्कम ही करमुक्त आहे; परंतु १ एप्रिल २००३ नंतर आणि १ एप्रिल २०१२ पूर्वी जारी झालेल्या विमापत्रातील विमा कोणत्याही वर्षी राशीच्या (सम अश्युअर्ड) २० टक्के जास्त विमा हप्ता असेल तर आणि १ एप्रिल २०१२ नंतर जारी झालेल्या विमापत्रातील विमा राशीच्या १० टक्कय़ांपेक्षा जास्त विमा हप्ता असेल तर मिळणारी विमा रक्कम करपात्र असते. अपंगांच्या विमा हप्त्यासाठी हे प्रमाण १५ टक्के (१ एप्रिल २०१३ पासून) आहे. अशा रकमेवरसुद्धा उद्गम कराच्या तरतुदी लागू होतात. याशिवाय विमा राशीच्या १० टक्के/१५ टक्के/२० टक्के (वरीलप्रमाणे जी लागू आहे ती) यापेक्षा जास्त रकमेची वजावट ‘कलम ८० सी’प्रमाणे मिळत नाही. मागील अंदाजपत्रकात झालेल्या सुधारणेत १ फेब्रुवारी २०२१ नंतर जारी केलेल्या ‘युलिप’साठी, ज्याचा एकूण वार्षिक प्रीमियम, मुदत कालावधीत कोणत्याही वर्षी २,५०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल तर मुदतीनंतर मिळणारी रक्कम आता करपात्र करण्यात आलेली आहे.

जीवन विम्याव्यतिरिक्त आरोग्य विमा (मेडिक्लेम) हादेखील लोकप्रिय आहे. वैद्यकीय खर्चात होणारी वाढ याबाबत असणाऱ्या अनिश्चिततेमुळे आरोग्य विमा हा गरजेचा झाला आहे. प्राप्तिकर कायद्यातसुद्धा आरोग्य विम्याच्या हप्त्यावर ५०,००० रुपये (ज्येष्ठ नागरिकांसाठी) आणि २५,००० रुपये (इतर नागरिकांसाठी) इतकी उत्पन्नातून वजावट ‘कलम ८० डी’नुसार मिळते. फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी वैद्यकीय खर्च केला असला तरी या कलमानुसार ५०,००० रुपयांपर्यंतची वजावट उत्पन्नातून मिळू शकते. हा खर्च करदात्याने रोखीने केल्यास त्याची वजावट मिळत नाही. फक्त प्रतिबंधक चाचण्यांसाठी केलेला ५,००० रुपयांपर्यंतचा खर्च रोखीने केल्यास त्याची वजावट करदाता उत्पन्नातून घेऊ  शकतो; परंतु एकूण वजावट वरील मर्यादेपेक्षा जास्त नसली पाहिजे.

त्यामुळे विम्यामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी या तरतुदींचा विचार करणे गरजेचे आहे. आर्थिक नियोजनाचा भाग असेल तरच जीवन विम्यामध्ये गुंतवणूक केली पाहिजे. फक्त कर वाचविणे हे उद्देश ध्यानात ठेवून गुंतवणूक केल्यास आर्थिक उद्दिष्टे साकार करणे कठीण होईल.

आता वाचकांकडून आलेल्या प्रश्नांच्या समाधानाकडे वळू या.     

’  प्रश्न :  मी मागील वर्षी जीवन विम्याच्या योजनेत पैसे गुंतविले आणि ‘कलम ८० सी’नुसार वजावटदेखील घेतली; परंतु माझ्या काही आर्थिक अडचणीमुळे मी ही योजना पुढे चालू ठेवू शकत नसल्यामुळे माझी पॉलिसी मी रद्द केली. मला यावर कर भरावा लागेल का?

    – यशवंत काणे

उत्तर : जीवन विम्याची पॉलिसी घेतल्यापासून दोन वर्षांच्या आत रद्द केल्यास, रद्द केलेल्या वर्षांत ‘कलम ८० सी’नुसार त्याची वजावट घेता येत नाही आणि मागील वर्षांत या कलमानुसार घेतलेली वजावटसुद्धा ‘इतर उत्पन्नात’ दाखवून ती करपात्र उत्पन्नात दाखवावी लागेल आणि त्यावर कर भरावा लागेल.

’  प्रश्न : मी माझ्या भावाच्या नावे असलेल्या जीवन विमा पॉलिसीचा हप्ता या वर्षी भरला. या हप्त्याची वजावट मला माझ्या उत्पन्नातून घेता येईल का?

– प्रशांत जोशी

उत्तर : ‘कलम ८० सी’नुसार एक व्यक्ती स्वत:च्या, पती/पत्नीच्या आणि मुलांच्या जीवन विम्याच्या हप्त्याची वजावट आपल्या उत्पन्नातून घेऊ शकतो. भावाच्या जीवन विमा हप्त्याची वजावट आपल्याला घेता येणार नाही.

’  प्रश्न : मी अनिवासी भारतीय आहे. मी जून २००४ मध्ये एका शेअर बाजारात सूचिबद्ध कंपनीचे २०० समभाग २२,००० रुपयांना खरेदी केले होते. हे समभाग मी एका व्यक्तीला ऑक्टोबर २०२० मध्ये ४,५०,००० रुपयांना विकले. हा विक्रीचा व्यवहार शेअर बाजारामार्फत न होता खासगीरीत्या झाला. मला या व्यवहारावर कर भरावा लागेल का? भांडवली नफा कसा गणला जाईल?

    – राजेश पुणेकर

उत्तर : आपण हा व्यवहार शेअर बाजारामार्फत न केल्यामुळे ‘कलम ११२ अ’नुसार एक लाख रुपयांपेक्षा जास्त भांडवली नफ्यावर १० टक्के दराने कर भरण्याची तरतूद लागू होत नाही. हे समभाग १२ महिन्यांपेक्षा जास्त काळासाठी धारण केल्यामुळे यावर होणारा भांडवली नफा हा दीर्घ मुदतीचा आहे. आपल्याला कर भरण्यासाठी दोन पर्याय आहेत. एक पर्याय महागाई निर्देशांकाचा फायदा घेऊन २० टक्के दराने कर भरणे आणि दुसरा पर्याय महागाई निर्देशांकाचा फायदा न घेता १० टक्के दराने कर भरणे. जो पर्याय फायदेशीर आहे तो पर्याय करदाता निवडू शकतो. पहिल्या पर्यायानुसार भांडवली नफा ३,९१,३९८ रुपये (विक्री मूल्य ४,५०,००० रुपये वजा महागाई निर्देशांकानुसार खरेदी मूल्य ५८,६०२) इतका असेल. (महागाई निर्देशांकानुसार खरेदी मूल्य ५८,६०२ रुपये असे गणले जाईल – खरेदी मूल्य २२,००० रुपये गुणिले ३०१ जो २०२०-२१ या वर्षीचा महागाई निर्देशांक आहे भागिले ११३ जो २००४-०५ या वर्षीचा महागाई निर्देशांक आहे. यावर २० टक्के कर म्हणजे ७८,२८० रुपये भरता येईल. दुसऱ्या पर्यायानुसार महागाई निर्देशांकाचा फायदा न घेता ४,२८,००० रुपयांच्या भांडवली नफ्यावर (विक्री मूल्य ४,५०,००० रुपये वजा २२,००० रुपये खरेदी मूल्य) १० टक्के इतका कर म्हणजे ४२,८०० रुपये भरता येईल. या दोन्ही पर्यायांमध्ये दुसरा पर्याय म्हणजे महागाई निर्देशांकाचा फायदा न घेता १० टक्के दराने कर भरणे आपल्याला फायदेशीर आहे. या कराच्या रकमेवर ४ टक्के आरोग्य आणि शैक्षणिक कर भरावा लागेल.

’  प्रश्न : मी एक दुकान भाडेतत्त्वावर घेतले आहे. आता टाळेबंदीमुळे ही संपूर्ण जागा माझ्या धंद्यासाठी वापरात नाही. मी या दुकानातील काही जागा दुसऱ्या व्यक्तीला भाडय़ाने दिली आहे. हे भाडे मला करपात्र आहे का?

    – एक वाचक

उत्तर : आपल्याला मिळालेले भाडे हे ‘इतर उत्पन्न’ किंवा ‘धंदा-व्यवसायाचे उत्पन्न’ म्हणून करपात्र असेल.

  • लेखक सनदी लेखाकार आणि कर सल्लागार आहेत.

pravin3966@rediffmail.com