01 March 2021

News Flash

पल्याडची गुंतवणूक : गुंतवणुकीच्या वैश्विक शहाणिवेकडे!

पाश्चत्त्य देशांमधील गुंतवणूकदार आणि त्यांची गुंतवणुकी प्रति जागरूकता,

सुयोग काळे

आपला देश गुंतवणूक साक्षरतेच्या बाबतीत विकसित देशांच्या तुलनेत आजही बराच पिछाडीवर आहे आणि त्यामुळेच पाश्चत्त्य देशांमधील गुंतवणूकदार आणि त्यांची गुंतवणुकी प्रति जागरूकता, त्यांना आलेले अनुभव यामधून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. परदेशातील वित्तीय व्यवस्था ही अनेक वर्षांपासून विकसित असल्यामुळे भारतापेक्षा तेथील उपलब्ध गुंतवणूक साधनांचे प्रमाणसुद्धा अधिक आहे.

कामानिमित्त तसेच पर्यटनासाठी परदेशवारी करण्याचा योग अनेकदा आला. २०२० हे अपवादात्मक वर्ष. पण आवड म्हणूनही अनेक देशांना भेट देतच असतो. अनेकांना परदेशाविषयी, तेथील लोक, खानपान, रीतीभाती संस्कृती, सोयीसुविधांबाबत उत्सुकता असते. माझे काम गुंतवणूक क्षेत्राशी संबंधित असल्यामुळे पर्यटन करताना, तेथील प्रसिद्ध स्थळांना भेटींव्यतिरिक्त तेथील प्रमुख गुंतवणूक साधने, गुंतवणुकीसंबंधी स्थानिक नागरिकांची मानसिकता अशा अनेक गोष्टींची माहिती घेण्याची संधींचा मी सतत शोध घेत असतो. अशाच काही प्रमुख देशांमधील गुंतवणूकविश्वासंबंधीचे निवडक अनुभव वर्षभर चालणाऱ्या लेखमालेतून सादर करणार आहे.

सोबतच्या तक्त्यातील प्रमुख देशांचा सकल राष्ट्रीय उत्पादनानुसार विकसित देशांच्या यादीत समावेश होतो. या सर्व प्रमुख देशांमधील गुंतवणूक संबंधित शक्य तितका सखोल आढावा आपल्याला घ्यावयाचा आहे. अमेरिकेतील आर्थिक सत्तेचे केंद्र असलेल्या न्यूयॉर्कसारख्या मोठय़ा शहरापासून ते रशियातील सेंट पीटर्सबर्ग या पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या शहरापर्यंत तेथील गुंतवणूकदारांशी संवाद साधताना आलेले काही मजेशीर तर काही कटू अनुभव ओघाने येतील. युरोपातील दुर्गम भागातील नागरिकांशी संवाद साधताना गुंतवणूक आणि वित्तीय नियोजन ही फक्त शहरातील किंवा आर्थिकदृष्टय़ा संपन्न असलेल्या व्यक्तीनेच करण्याची गोष्ट आहे हा आपल्या देशातील रूढ गैरसमज खोडून काढते. विकसित देश हे तेथील रस्ते, दळणवळण तसेच पायाभूत सुविधा याबरोबरच गुंतवणूक क्षेत्रातातही आघाडीवर आहेत याची प्रचीती तिथे फिरताना दिसून येते.

*  तरुण वर्ग, वयाची चाळिशी ओलांडलेले विवाहित, तसेच सेवानिवृत्त झालेले वरिष्ठ नागरिक यांची त्यांच्या देशात कुठल्या गुंतवणूक साधनांना पसंती असते? 

– या सर्व देशांत स्थावर मालमत्ता, बँकेतील ठेवी, सरकारी योजना, म्युच्युअल फंड, समभाग  अशा अनेक गुंतवणूक साधनांत किती आणि कशा प्रकारे गुंतवणूक होते आणि साधारण याचा परतावा किती असतो?

*  २००८ साली अमेरिकेतील वित्तीय संकट , २०१० सालापासून सुरू असलेले युरोपमधील कर्ज संकट, २०१४-१५ साली रशियात झालेले चलन अवमूल्यन या आणि इतर कारणांमुळे समभाग बाजारात झालेली मोठी पडझड, त्याला तेथील सरकार आणि किरकोळ गुंतवणूकदारांनी कसा प्रतिसाद दिला?

या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे द्यायचा प्रयत्न पुढील काही लेखांमधून करणार आहे. तसेच भारतीयांना या देशांत गुंतवणुकीच्या कुठल्या संधी उपलब्ध आहेत ज्याद्वारे वाचकांना परिचय करून देऊन गुंतवणुकीच्या संधीची नवीन दालने नक्कीच खुली केली जातील. अनुभवांचे हे गाठोडे वाचकांचे आर्थिक जीवन समृद्ध करण्यास मदतकारक ठरेल अशी आशा करतो. जगातील सर्वात विकसित अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिका या जगातील महासत्ता असलेल्या देशापासून या लेखमालेचा श्रीगणेशा पुढील महिन्यापासून करूया.

देश                                 जीडीपी               दरडोई

(ट्रिलियन)            उत्पन्न

अमेरिका                         $२१.४३             $६५,२९८

जपान                              $५.०८              $४०,२४७

जर्मनी                              $३.८६              $४६,४४५

इंग्लंड                             $२.८३              $४२,३३०

फ्रांस                                $२.७२              $४०,४९३

संयुक्त अरब अमिराती    $०.३५४             $३१, ९४८

रशिया                              $१.७०              $११,५८५

स्वित्झर्लंड                      $०.७०३०८          $८१,९९४

थायलंड                          $०.५४३५             $७,८०७

कॅनडा                              $१.७४                  $४६,१९५

स्रोत – विकिपीडिया 

contactsuyogk@gmail.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2021 12:06 am

Web Title: international financial management investors in western countries zws 70
Next Stories
1 माझा पोर्टफोलियो : पॉलिमरच्या किमतीतील घसरणीचा लाभ
2 विमा.. सहज, सुलभ : स्पर्धात्मक नवपर्व आणि विमा नियामकाची भूमिका
3 फंडाचा ‘फंडा’.. : ‘न्यू नॉर्मल’चा लाभार्थी!
Just Now!
X