13 August 2020

News Flash

विदेशी गुंतवणुकीचा परीघ सीमितच; मिड-स्मॉल कॅप्सना वगळणारा

करोना संकटाची चाहूल लागताच माघारी गेलेल्या परदेशी गुंतवणुकीचा ओघ अडीच-तीन महिन्यांत वेगाने परतत आहे.

रस्मिक ओझा

करोना संकटाची चाहूल लागताच माघारी गेलेल्या परदेशी गुंतवणुकीचा ओघ अडीच-तीन महिन्यांत वेगाने परतत आहे. तथापि, त्यांची खरेदी सर्वसमावेशक नसून, बिनीच्या समभागातच त्यांचे ध्रुवीकरण सुरू असल्याचे कोटक सिक्युरिटीजच्या मूलभूत संशोधन विभागात कार्यकारी उपाध्यक्ष रस्मिक ओझा सांगतात. त्यांच्याशी झालेली ही बातचीत..

* मार्चमधील नीचांकाला खूप मागे टाकत बाजार बराच झेपावला आहे. करोनाची चिंता ओसरून, आता अर्थव्यवस्थेच्या पुनरुज्जीवनावर लक्ष वळले आहे, असे वाटते काय?

– निफ्टीने वर्षांतील नीचांकापासून ३७ टक्क्य़ांची उसळी आजपावेतो घेतली आहे. आपल्याकडे करोनाचा धोका आणि रुग्णसंख्या घटल्याचे चित्र नसताना, जागतिक, विशेषत: विकसित बाजारपेठांमधील निर्देशांक तेजीचे अनुकरण करीत हे घडले आहे. जागतिक तेजी ही वाढलेल्या रोकडतरलतेतून आणि त्यापायी उंचावलेल्या बाजारभावनांमुळे आहे. अलीकडची बाजारातील उसळी ही अर्थात अर्थचक्र पुन्हा रुळावर येईल या आशेमुळे जरूरच आहे. अनेक व्यवसाय व उद्योगांवर टाळेबंदीचे पाश सैल होऊन, ते कार्यरत झाले असले तरी अर्थचक्राचा वेग अद्याप धिमा आहे. अनेक महानगरे आणि बडय़ा शहरांमध्ये करोनाचा कहर सुरूच आहे. तरी अनेक उद्योगांच्या व्यवस्थापनांच्या मते चालू आर्थिक वर्षांच्या उत्तरार्धात परिस्थिती स्थिरावू शकेल.

*  सेन्सेक्स-निफ्टीमध्ये सामील मोजक्या लार्ज-कॅप समभागांपुरती तेजी सध्या सीमित असल्याचे दिसून येते. मुख्यत: परदेशी गुंतवणुकीचा होरा हा मिड व स्मॉल-कॅपच्या दिशेने सद्य:स्थितीत वळू शकेल काय?

– हे खरे आहे की, विदेशी संस्थात्मक गुंतवणुकीचा परीघ हा लार्ज कॅप म्हणजे अव्वल १०० कंपन्यांपुरता सीमित आहे. गेल्या वर्षभरात उदयोन्मुख बाजारांकडे आणि भारतात बऱ्यापैकी गुंतवणूक ओघ आला आणि तो पॅसिव्ह फंडांमार्फत आला आहे. अर्थात ही गुंतवणूक मुख्यत: ईटीएफच्या माध्यमातून झाली असून, ती ‘पॅसिव्ह’ धाटणीची असल्याने निर्देशांकात सामील बिनीच्या समभागांमध्येच होत आहे. परिणामी, निफ्टी-५० निर्देशांकाचे मूल्यांकन वरच्या स्तरावर असून, बँकिंग-वित्तीय सेवा क्षेत्रातील काही मोजके समभाग वगळता मूल्यवृद्धीच्या शक्यता दिसून येत नाहीत. सध्याच्या घडीला तरी विदेशी संस्थात्मक गुंतवणूक ही मिड व स्मॉल कॅपकडे वळेल अशी चिन्हे नाहीत. या वर्तुळात देशी संस्था म्हणजे म्युच्युअल फंड आणि उच्च धनसंपदेच्या व्यक्तींची गुंतवणूक मात्र सुरू आहे.

*  सामान्य गुंतवणूकदारांचे काय, त्यांचा सहभाग वाढल्याचे दिसते काय?

– मिड व स्मॉल कॅप समभागातील वेगवान हालचाली आणि बाजारपेठेची सर्वसमावेशक वाढ पाहता छोटय़ा गुंतवणूकदारांचा सहभाग मोठय़ा प्रमाणात परतला असल्याचे जरूर म्हणता येईल. लार्ज कॅप समभागांनी तळ गाठला असताना ते खरेदी करण्याची संधी हुकली आणि म्हणूनच आता छोटे गुंतवणूकदार सपाटून मार खाल्लेल्या मिड व स्मॉल कॅपना अजमावू पाहत आहेत. आठवडय़ाभरापूर्वी बीएसई स्मॉल कॅप निर्देशांकातील १९० समभागांमध्ये १० ते ६० टक्क्य़ांपर्यंत वाढ दिसून आली. चालू महिन्यात बीएसई स्मॉल कॅप निर्देशांक १४ टक्के वधारला, त्या उलट निफ्टी निर्देशांकातील वाढ ७ टक्क्य़ांची आहे. हे छोटय़ा गुंतवणूकदारांनी दाखविलेल्या खरेदी उत्साहाचाच परिणाम आहे.

* अनिश्चिततेचे वातावरण कायम आहे, अशा स्थितीत आगामी वर्षभरात तुम्ही कोणत्या क्षेत्राकडे गुंतवणुकीसाठी पाहता, कोणत्या क्षेत्रांबाबत तुमचे नकारार्थी मत आहे?

– अर्थव्यवस्थेच्या उभारीशी थेट संलग्न असलेल्या भांडवली वस्तू, बांधकाम, उपयुक्त सेवा, धातू आणि तेल व वायू अशा उद्योग क्षेत्रातील समभागांत जबर घसरण झाली आहे. करोना आपत्तीच्या परिणामी चालू आर्थिक वर्षांत पुढेही यापैकी बहुतांश क्षेत्रांची कामगिरी दिनवाणीच असेल. तथापि, आगामी वर्षांत अर्थव्यवस्थेत उभारीच्या परिणामी याच क्षेत्रात सर्वोत्तम वाढीचे चित्र दिसून येईल. त्यामुळे २०२१-२२ च्या संदर्भात याच क्षेत्रातील गुंतवणुकीला चांगले भवितव्य दिसून येते. बँकिंग व वित्तीय सेवा क्षेत्राभोवतील अनिश्चिततेचा फेरा कायमच आहे. मोठय़ा बाजार घसरणीच्या समयी काही बडय़ा बँका आणि बँकेतर वित्तीय कंपन्यांचा गुंतवणूकदृष्टय़ा विचार करता येईल. अपवाद करावा अशा उद्योग क्षेत्रांमध्ये ग्राहकोपयोगी वस्तू, कृषी रसायने, औषध निर्माण (भरधाव वाढ आणि उच्च मूल्यांकन मिळाल्या कारणाने), माहिती-तंत्रज्ञान (भविष्यात वाढीच्या शक्यता खुंटल्याने) यांचा समावेश करावा लागेल.

*  वाढत्या विदेशी गुंतवणुकीच्या परिणामी सेन्सेक्स-निफ्टी त्यांच्या शिखर स्थानापर्यंत आगामी सहा महिन्यांत परतू शकतील काय?

– जर निफ्टी निर्देशांक एक वा दोन आठवडे २०० सप्ताहांच्या चलत सरासरी (डब्ल्यूएमए) पातळी राखण्यास यशस्वी ठरल्यास, लवकरच तो १०,९०० ते ११,००० पर्यंत जाऊ शकेल. जागतिक स्तरावर रोकडतरलतेचे प्रमाण जबरदस्त आहे. जागतिक बाजारात तेजीचा मूड कायम राहिला, तर नजीकच्या भविष्यात निफ्टी ११ हजाराच्या पातळीला गाठू शकेल, ते केवळ याच कारणाने. मूल्यांकन मात्र खूपच ताणले गेले असल्याने, हेच निफ्टी निर्देशांकासाठी वरचे लक्ष्य राहील. त्यामुळे आगामी सहा महिन्यांत ते पुन्हा सार्वकालिक शिखर पातळीला गवसणी घालण्याची शक्यता दिसून येत नाही. पुढील आर्थिक वर्षांमध्ये कंपन्यांची मिळकत पातळी उंचावण्यासह, निर्देशांकाचे मूल्यांकन ताळ्यावर आल्यावर शिखराची आशा करता येऊ शकेल.

*  बँकिंग क्षेत्रासंबंधी तुमचा दृष्टिकोन काय, रिझव्‍‌र्ह बँकेकडून आणखी व्याजदर कपातीची शक्यता दिसून येते काय?

– कर्ज हप्त्यांच्या परतफेडीला स्थगिती आणखी तीन महिने वाढविली गेल्याचा नकारात्मक परिणाम बँकांच्या पुढील काही तिमाहीतील कामगिरीवर दिसून येईल. किंबहुना बँकांच्या तिमाही कामगिरीत वादळी उलटफेर दिसून येतील. काही बँकांनी जूनमध्ये हप्ते फेड स्थगितीचा पर्याय स्वीकारणाऱ्या ग्राहकांची संख्या लक्षणीय घसरल्याचे स्पष्ट केले आहे. पुढे जाऊन पतपुरवठय़ात वाढीची शक्यता आणि बुडीत कर्जाच्या टांगत्या तलवारीची भविष्यातील स्थिती या संबंधाने चित्र अद्याप अस्पष्ट आहे. मूल्यांकनाच्या अंगाने (किंमत/ पुस्तकी मूल्य) पाहता, बऱ्याच बँका आज ऐतिहासिक नीचांक पातळीवर आहेत. हे पाहता पुढील काही तिमाहीपर्यंत बँकांचे समभाग हळूहळू जमवत जाणे खरे तर आदर्शवत ठरेल. दर कपातीचे विचाराल, तर रिझव्‍‌र्ह बँकेकडून आणखी ०.२५ टक्के ते ०.३५ टक्के रेपो कपात शक्य आहे.

* ‘आयपीओ’ बाजाराला पूर्ववैभव प्राप्त झालेले दिसेल काय?

–  निफ्टी निर्देशांक १० हजारापुढील पातळीला कितवर थोपवून धरतो आणि जागतिक बाजारात तीव्र स्वरूपाची सुधारणा होत नाही, यावर हे अवलंबून आहे. भागविक्रीसाठी उत्सुक कंपन्यांनाही प्राथमिक भागविक्री अर्थात आयपीओ बाजारात पुन्हा उत्साह संचारलेला पाहण्याच्या प्रतीक्षेत आहे. मुंबई आणि दिल्लीसारखी महानगरे अद्याप आंशिक टाळेबंदी खाली असल्याने हे नेमके केव्हा घडेल सांगता येणे अवघड आहे. तरी आगामी आर्थिक वर्षांच्या प्रारंभी अनेक कंपन्यांचे आयपीओ बाजाराला धडका देऊ शकतील.

– व्यापार प्रतिनिधी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2020 1:01 am

Web Title: interview with rasmik ojha executive vice president fundamental research kotak securities abn 97
Next Stories
1 अर्थ वल्लभ : तव स्मरण संतत स्फुरणदायी
2 माझा पोर्टफोलियो : उत्पादन भांडार दमदार, वजनदार
3 सापळा तेजीचा
Just Now!
X