13 December 2019

News Flash

‘पहाट फुटण्यापूर्वीचा काळोखच अधिक गर्द असतो!’

सध्याची अर्थव्यवस्था आणि दाटलेल्या गर्द काळोखाच्या स्थितीचे वर्णन

|| वसंत कुलकर्णी

म्युच्युअल फंडांच्या वर्तुळात अनुप भास्कर स्वत:च्या कर्तृत्वाने आपले स्थान निर्माण केलेले निधी व्यवस्थापक आहेत. आयडीएफसी म्युच्युअल फंडाचे समभागसंलग्न गुंतवणुकीचे मुख्य गुंतवणूक अधिकारी म्हणून सध्या ते कार्यरत आहेत. फंड विश्वातील अनुप भास्कर यांच्या मुशाफिरीला सुरुवात कोठारी पायोनीयर नावाच्या पहिल्या खासगी मालकीच्या म्युच्युअल फंडात वरिष्ठ विश्लेषक पदावरून झाली. त्यानंतर ते सुंदरम म्युच्युअल फंडात ‘हेड इक्विटीज्’ या पदावर त्यांनी काम केले आहे. आयडीएफसी म्युच्युअल फंडात दाखल होण्यापूर्वी, यूटीआय म्युच्युअल फंडात त्यांनी स्थानिक फंड व्यवसायाचे प्रमुख म्हणून काम केले. काही काळ त्यांनी यूटीआयचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. अनुप भास्कर यांना आवश्यकता भासेल तेव्हा भेटणे ही गेल्या काही वर्षांतील औपचारिकता झाली आहे. मागील आठवडय़ात अशीच भेट झाली. त्यांच्या कक्षात प्रवेश करतानाच ते म्हणाले, ‘सुबह होने के पहले सबसे ज्यादा अंधेरा होता है.. या एका वाक्यात त्यांनी सध्याची अर्थव्यवस्था आणि दाटलेल्या गर्द काळोखाच्या स्थितीचे वर्णन केले.

क्रिकेटमध्ये एकेका फलंदाजाची ओळख असते. कोणी फिरकी गोलंदाजी उत्तम खेळू शकतो, तर कोणी वेगवान गोलंदाजीला फटकावून काढतो. फंड जगतात तुमची ओळख मिड आणि स्मॉलकॅपचे माहीर अशी आहे. जानेवारी २०१८ पासून निफ्टी आणि सेन्सेक्सने पाच टक्के परतावा दिला असताना, बीएसई मिडकॅप निर्देशांकात २५ टक्के, तर स्मॉलकॅप निर्देशांकात ५० टक्के घसरण झाली आहे. नव्याने गुंतवणूक कारायला लागलेले निराश झाले आहेत आणि जुन्याजाणत्यांचा धीर सुटू लागलेला आहे.. काळोखाचे धागे उसवणारे माझे त्यांच्यापुढे हे कथन.

‘‘मार्केट नेहमीच स्वत:चा मार्ग चोखाळत असतं, आपण या मार्गाला कॅलेंडरवरील तारखा आणि महिन्यांच्या तपशिलात शोधात असतो. दुर्दैवाने ज्यांनी आपल्या गुंतवणुकीला, मिडकॅप, स्मॉलकॅप निर्देशांक सार्वकालिक उच्चांकावर असताना सुरुवात केली, त्यांना आजच्या पातळीवर बाजार पाहून हतबलता आलेली आहे. परंतु जे गुंतवणूकदार दीर्घकालीन ‘एसआयपी’ करीत आले आहेत, त्यांना सध्याच्या परताव्याने निराशा आलेली नाही. नफ्याची घसरण झालेली जरूर दिसत आहे, पण नराश्य यावे इतकी घसरण झालेली नाही. उलट या घसरणीने गुंतवणुकीच्या अनेक संधी नव्याने उपलब्ध झाल्या आहेत. ‘गुड न्यूज’ आणि ‘गुड प्राइसेस’ यांच्यात नेहमीच व्यस्त प्रमाण असते. येणाऱ्या बातम्या चांगल्या असतात तेव्हा समभाग मूल्यांकन गुंतवणूकयोग्य पातळीवर नसते आणि गुंतवणूकयोग्य पातळीवर समभाग असतात तेव्हा ऐकायला, वाचायला, पाहायला मिळणाऱ्या बातम्या उत्साहवर्धक नसतात. जेव्हा कानावर आदळणारी प्रत्येक बातमी गुंतवणूक नको असे सुचवीत असते तेव्हाच गुंतवणुकीची योग्य वेळ आली असे समजावे.’’

‘‘दुसरी गोष्ट अशी की, सरकारने विदेशी पोर्टफोलियो गुंतवणूकदारांवर (एफपीआय) लादलेला वाढीव कर अधिभार, घसरलेली वाहन विक्री, रोकडसुलभता नसल्याने ग्रासलेले गरबँकिंग वित्तीय क्षेत्र, या सगळ्यांचा परिणाम कंपन्यांच्या मूल्यांकनावर होत असतो. तेव्हा नव्याने गुंतवणुकीचा विचार करावा या पातळीवर समभागांचे मूल्यांकन आले आहे. मागील दोन वष्रे, साधारण डिसेंबर २०१६ पासून विविध कारणांनी बँका कर्ज वितरण करू शकत नव्हत्या. बँकांच्या कर्ज वितरणाची जागा गरबँकिंग वित्तीय कंपन्यांच्या कर्ज वितरणांनी भरून काढली होती. आयएल अँड एफएस प्रकरणानंतर गरबँकिंग वित्तीय कंपन्यांची रोकडसुलभता आटण्यास सुरुवात झाली. परिणामी दुचाकींसाठी कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज इत्यादींची उपलब्धता होत नसल्याचा परिणाम त्यांच्या मागणी/उपभोगतेवर झाला आहे. आमच्या मते कंपन्यांच्या उत्सर्जनांत वाढ दिसून यायला किमान तीन ते चार तिमाही इतका कालावधी जावा लागेल.’’

मिड कॅप फंडांनी मागील एका वर्षांत सरासरी १५ टक्के गमावले आहेत..

‘‘माझे असे निरीक्षण आहे की, गुंतवणूकदार मालमत्ता विभाजन तत्त्वाचे पालन करीत नाहीत. मालमत्ता विभाजन तत्त्व म्हणजे एकदा का तुमचे गुंतवणूकयोग्य पैशाचे कुठे व कसे विभाजन करायचे निश्चित झाले की, दरवर्षी या आपल्या गुंतवणुकीचा आढावा घेऊन त्यात समतोल साधणे गरजेचे असते. मालमत्तेचा जो प्रकार अधिक परतावा देतो त्यातून रक्कम काढून घेऊन पोर्टफोलिओचे समतोल नियतकालिक स्वरूपात साधणे गरजेचे असते. २०१७ सालात मिडकॅप सर्वोत्तम परतावा देणारा मालमत्ता प्रकार होता. मालमत्ता विभाजन तत्त्वाचा विचार करता, मिडकॅपमध्ये गुंतवणूकदारांनी नफावसुली करणे गरजेचे होते. प्रत्यक्षात त्या वेळी बाजारात येणाऱ्या १०० रुपयांपकी ७० रुपये मिडकॅप फंडात येत होते. त्या उलट, संयम आणि कठोर शिस्तीने ज्यांनी मालमत्ता विभाजन केले त्यांना त्यांची मिडकॅप मात्रा कमी झाल्याने नव्याने गुंतवणूक करण्यास वाव मिळाला आहे. ज्यांनी या तत्त्वाला हरताळ फासला त्यांना आज पुन्हा मिडकॅप गुंतवणूक करण्याचे धाडस करण्याची हिंमत होताना दिसत नाही. गुंतवणुकीत करडी शिस्त आणि कठोरपणे केलेले मालमत्ता विभाजन संभाव्य घसरणीपासून कमी हानी पोहचविते.’’

‘‘बाजारात तेजी आणि मंदी या निरंतर येणाऱ्या गोष्टी आहेत. तेजी किंवा मंदीत मी माझ्या गुंतवणुका सुरू ठेवीन हाच गुंतवणुकीत यशस्वी होण्याचा राजमार्ग आहे.’’

shreeyachebaba@gmail.com

First Published on August 12, 2019 12:19 am

Web Title: invest money inidfc mutual fundmpg 94
Just Now!
X