25 April 2019

News Flash

तज्ज्ञ सल्ल्याविना नियोजन: चुका अपरिहार्यच!

कुटुंबाच्या वित्तीय नियोजनाबाबत मार्गदर्शनासह परिस्थितीचे विश्लेषण करून आत्मभान देणारे नवीन पाक्षिक सदर..

|| किरण सहस्रबुद्धे

कुटुंबाच्या वित्तीय नियोजनाबाबत मार्गदर्शनासह परिस्थितीचे विश्लेषण करून आत्मभान देणारे नवीन पाक्षिक सदर..

कौस्तुभ (३१) आणि भाग्यश्री (३१) हे नवी मुंबईत राहतात. कौस्तुभ हे वास्तुविशारद, तर भाग्यश्री यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. कौस्तुभ हे स्वत:च्या व्यवसायात, तर भाग्यश्री बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरीला आहेत. लग्नाला ३ वर्षे झाली असून पुढील वर्षभरात पाळणा हलावा असे वाटते. बाळ झाल्यावर भाग्यश्री वर्षभर रजेवर असतील.

 

 

वित्तीय नियोजकाचा सल्ला:

१. आयुर्विमा : वित्तीय नियोजकाची मदत न घेता केलेल्या नियोजनात काय चुका होतात याचे हे उदाहरण आहे. गरज नसताना विकत घेतलेली ‘युलिप’ आणि आत्यंतिक गरजेचा असलेला शुद्ध विम्याचा अभाव हे तुमच्या सध्याच्या वित्तीय परिस्थितीतील दोष दाखविता येतील.

तरुण वयात घेतलेला विम्याचा नेहमीच कमी हप्ता असतो. कौस्तुभ स्वत:च्या व्यवसायात असल्याने भविष्यात ते कुटुंबाचे मुख्य आर्थिक स्रोत बनतील. आर्थिक उत्पन्न वाढेत तशा महत्त्वाकांक्षासुद्धा वाढल्याने मालमत्तेची खरेदी, चारचाकी वाहनांची खरेदी प्रसंगी कर्ज काढूनसुद्धा केली जाते. दुर्दैवाने कुटुंबाच्या मुख्य कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास वित्तीय जबाबदारी पूर्ण करण्यासाठी आणि असतील तर कर्जे फेडण्यात कुटुंबाची बचत खर्च होते. यासाठी तरुण वयात मुदतीचा विमा खरेदी करणे ही वित्तीय शिस्तीची पहिली पायरी आहे.

कौस्तुभ आणि भाग्यश्री हे पुढील २९ वर्षे कमावते राहणार आहेत. सध्याचे उत्पन्न दरसाल ५ टक्के दराने वाढले तरी कौस्तुभ यांचे पुढील २९ वर्षांतील उत्पन्न ४.८५ कोटी, तर भाग्यश्री यांचे २९ वर्षांतील उत्पन्न ५.३४ कोटी असणार आहे. आयुर्विम्याच्या हप्त्यातून कर बचत होत असली तरी विमा खरेदीदाराला पुरेसे विमा संरक्षण मिळत नाही. विमा कुटुंबाच्या संरक्षणासाठी घ्यायचा असतो. सध्याची कौस्तुभ यांच्या विमा पॉलिसीमुळे केवळ २० लाखांचे विमा संरक्षण मिळते. तुमची कमावण्याची आर्थिक क्षमता (इकॉनॉमिक लाइफ व्हॅल्यू) लक्षात घेता तुमचे विमा संरक्षण किती तोकडे आहे हे ध्यानात येईल.

दोघांनी आवश्यक असणाऱ्या विम्यापैकी किमान ५० टक्के रकमेचे संरक्षण देणारा विमा खरेदी करावा.

२. आरोग्य विमा : आरोग्य विम्यामुळे मिळणारे ५ लाखांचे संरक्षण सध्या पुरेसे आहे; परंतु टप्प्याटप्प्याने ते वाढवायला हवे.

गुंतवणूक नियोजन

 

तुमची पाच वर्षांची आवर्ती ठेव येत्या मार्चमध्ये संपून एप्रिल महिन्यात मुद्दल आणि त्यावरील व्याज तुमच्या हाती पडेल. यापैकी १ लाख वाहन कर्ज फेडण्यासाठी वापरावी आणि २ लाख लिक्विड फंडात आणीबाणीप्रसंगी खर्चासाठी जमा करावेत. तुमचे निवृत्तीपश्चात लागणाऱ्या रकमेच्या तरतुदीसाठी तुम्ही दरमहा २३ हजारांची गुंतवणूक ताबडतोब सुरू करणे गरजेचे आहे.

(लेखिका नोंदणीकृत विमा आणि गुंतवणूक सल्लागार असून, त्यांच्याशी संपर्कासाठी ई-मेल : akswealth@gmail.com)

First Published on January 28, 2019 2:14 am

Web Title: investment advice articles