|| कौस्तुभ जोशी

दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात अर्थमंत्री देशाचा अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर करतात. पूर्वी आधी रेल्वे अर्थसंकल्प आणि नंतर केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात येत असे. मात्र आता सरकारने रेल्वे अर्थसंकल्प मुख्य अर्थसंकल्पात विलीन केल्याने एकच अर्थसंकल्प सादर करण्यात येतो. अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रांमध्ये काय स्वस्त झालं आणि काय महाग याची आकडेवारी उत्सुकतेने पाहिली जाते. मात्र अर्थसंकल्प ही त्यापेक्षा जास्त महत्त्वाचा दस्तऐवज आणि सरकारच्या मध्यम आणि दीर्घकालीन नियोजनाचा लेखाजोखा असतो.

हा अर्थसंकल्प नेमका वाचायचा कसा हे आजच्या लेखात पाहूया. अर्थसंकल्पाच्या दोन बाजू असतात पहिली म्हणजे सरकारकडे जमा होणारा महसूल आणि दुसरी सरकारद्वारे जमा महसुलाचा केला जाणारा विनियोग. अर्थसंकल्पात या दोघांची सविस्तर आकडेवारी दिली जाते. सार्वजनिक उत्पन्न हे दोन प्रकारचे असते, महसुली जमा आणि भांडवली जमा. महसुली उत्पन्नात कर आणि कराव्यतिरिक्त मिळालेले उत्पन्न यांचा समावेश होतो, तर भांडवली उत्पन्नात जुन्या कर्जाची वसुली आणि मालमत्ता विकून किंवा कर्ज काढून जमा झालेले उत्पन्न यांचा समावेश होतो. एकूण प्रस्तावित उत्पन्न हे जर खर्चापेक्षा जास्त असेल तर अंदाजपत्रक शिलकीचे आहे जर उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असेल तर अंदाजपत्रक तुटीचे आहे असे म्हटले जाते. (मागील लेखामध्ये वित्तीय तूट या संकल्पनेचा आढावा घेतला गेला होता!)

अर्थसंकल्पाची प्रक्रिया :

  • सप्टेंबरच्या अखेरीस सर्व विभागांना आपल्या आगामी वर्षांसाठीच्या मागण्या, त्या वर्षीच्या खर्चाचा आढावा घेण्यास सांगितले जाते.
  • सर्व खात्यांना आपल्या प्रस्तावित खर्चाच्या अंदाजाची सविस्तर माहिती वित्त मंत्रालयाला द्यावी लागते आणि त्यानुसार उपलब्ध निधी आणि त्याचा विनियोग कुठे करायचा याचे निर्णय घेण्यात येतात.
  • डिसेंबपर्यंत चालू वित्तवर्षांसाठी मागच्या वर्षी नोंदविलेले आडाखे आणि त्यावेळेची स्थिती यांचा आढावा घेतला जातो.
  • जानेवारीत एक परंपरा म्हणून हलवा समारंभ होतो! अर्थसंकल्प तयार करण्याच्या प्रक्रियेत समाविष्ट असलेल्या अधिकारीवर्गाला संसदेत अर्थसंकल्प सादर होईपर्यंत अर्थमंत्रालय सोडून जाता येत नाही. घरच्यांशी संपर्कही ठेवता येत नाही. म्हणून एका कढईत हलवा तयार करून त्याचा आस्वाद घेऊन कामाला सुरुवात केली जाते!
  • आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर होतो. यात कृषीक्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, सेवा क्षेत्र, चलनवाढ, परकीय चलन साठा, आयात-निर्यात स्थिती यांचा आढावा घेण्यात येतो.
  • त्यानंतर एका दिवसाने अर्थसंकल्प संसदेच्या दोन्ही सभागृहात सादर होतो.

(या प्रक्रियेबाबत विस्तृत माहिती www.indiabudget.nic.in वेबस्थळावर उपलब्ध)

अर्थमंत्री संसदेत जे अर्थसंकल्पीय भाषण करतात याव्यतिरिक्त सविस्तरपणे आकडेवारी सरकारतर्फे  सभागृहाला सादर केली जाते. Annual Financial Statement, यात आगामी वित्तवर्षांत अपेक्षित खर्च आणि उत्पन्न यांची आकडेवारी दिली जाते आणि मागच्या वर्षीच्या अर्थसंकल्पात प्रस्तावित केलेल्या उत्पन्न आणि खर्च याचा त्याच्याशी असलेला मेळ याची तुलना केलेली असते. वित्तीय तूट सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या किती प्रमाणात असेल यावर सुद्धा भाष्य केलेले असते.

मागील वर्षांपासून वित्त मंत्रालय आणि निती आयोगाने ‘आऊटकम बजेट’द्वारे विविध विभागांच्या मागण्या आणि त्यासाठी अर्थसंकल्पात कोणती तरतूद केली होती आणि त्याचा कसा विनियोग करण्यात आला, कोणत्या प्रकल्पाची स्थिती आजच्या तारखेला कशी आहे याची माहिती दिलेली असते.

या वर्षी निवडणुका असल्याने संपूर्ण अर्थसंकल्प सादर होणार नाही. मात्र नवीन सरकार निवडून आल्यावर जुन्या सरकारने वाढून ठेवलेली परिस्थिती पुढे नेणे हे खरे आव्हान असणार आहे!

सरकार सादर करत असलेला अर्थसंकल्प आपण समजून घेणे हाच २०१९-२० या आर्थिक वर्षांचा आपला संकल्प असायला हवा!

joshikd28@gmail.com

(लेखक वित्तीय नियोजनकार आणि अर्थशास्त्राचे प्राध्यापक)