18 February 2019

News Flash

सल्ल्याला मानवी भावनिक स्पर्श मोलाचाच

वाचकांच्या म्युच्युअल फंडविषयक प्रश्नांचे निवारण करणारे मार्गदर्शन

संग्रहित छायाचित्र

वाचकांच्या म्युच्युअल फंडविषयक प्रश्नांचे निवारण करणारे मार्गदर्शन

  • माझा म्युच्युअल फंड सल्लागार त्याच्या रोबो अ‍ॅडव्हायझरच्या सल्ल्याप्रमाणे गुंतवणूक केल्यास अधिक नफ्याची शक्यता वर्तविली आहे. मानवी सल्लागारापेक्षा रोबो अ‍ॅडव्हायझर हुशार असतो काय? – अमेय (ई-मेलवरून)

उत्तर – रोबो अ‍ॅडव्हायझर म्हणजे काय तर वित्तीय सल्ला देणारे माणसानेच बनविलेले एक मशीन. कमीत कमी मनुष्य हस्तक्षेपाशिवाय ते ऑनलाइन व्यासपीठावर सेवा पुरवतात. गुंतवणूक सल्लागाराचे काम हे आपल्या गुंतवणूकदाराची खरी गरज ओळखून निष्पक्ष सल्ला देणे हे आहे. रोबो अ‍ॅडव्हायझरीमध्ये कुठल्याही सल्लागाराचा थेट सहभाग नसल्यामुळे गुंतवणूकदाराला काहीशा कमी खर्चात म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता येते. त्यामुळे वरकरणी हे बरोबर आहे की गुंतवणूकदाराला यामुळे थेट गुंतवणुकीचा फायदा मिळतो. पण खोलात जाऊन याचे विश्लेषण केल्यास याबाबत अधिक माहिती मिळू शकेल.

आपण आधी रोबो अ‍ॅडव्हायझर आणि गुंतवणूक सल्लागार यामध्ये फरक करणारी वैशिष्टय़े बघूया. रोबो अ‍ॅडव्हायझर हे आधुनिक आणि ज्याप्रमाणे त्यांना माहिती पुरविली जाते त्याप्रमाणेच प्रमाणित सल्ला देतात, तर गुंतवणूक सल्लागार गुंतवणूकदाराच्या त्याच्या वैयक्तिक गरजा समजून सानुकूलित सल्ला देऊ शकतात. रोबो अ‍ॅडव्हायझरीमध्ये मानवी संपर्क फारच कमी असतो. किंबहुना तो नसतोच. परंतु गुंतवणूक सल्लागाराला आपण प्रत्यक्ष समोरासमोर भेटून गुंतवणुकीबाबत चर्चा करू शकतो.

रोबो अ‍ॅडव्हायझर हा एक निष्क्रिय व्यवस्थापनाचा भाग आहे, तर गुंतवणूक सल्लागार तुम्हाला सक्रिय आणि निष्क्रिय व्यवस्थापन अशा दोन्ही सेवा पुरवू शकतो. आणि म्हणूनच गुंतवणूक सल्लागार हा तुमच्या गुंतवणुकीवर अधिक परतावा (‘अल्फा’ निर्मितीद्वारे) मिळवून देण्यास मदत करतो.

कमीत कमी खर्चात रोबो अ‍ॅडव्हायझर सेवा पुरवते आणि गुंतवणूक सल्लागारचा सक्रिय सहभाग असल्यामुळे गुंतवणुकीवर होणारा खर्च हा काहीसा अधिक असतो. रोबो अ‍ॅडव्हायझरीमध्ये गुंतवणुकीचे पर्याय हे मर्यादित असतात. परंतु गुंतवणूक सल्लागाराची मदत घेतल्यास तो विविध पर्याय सुचवू शकतो.

रोबो सल्लागार तुम्हाला वरवरची माहिती देतो, पण गुंतवणूक सल्लागार सखोल माहिती देतो. जर तुम्हाला तुमच्या निवृत्ती नियोजनासाठी गुंतवणूक करायची असेल तर रोबो अ‍ॅडव्हायझर तुम्हाला एक त्याची ढोबळ योजना तयार करून देईल आणि गुंतवणूक सल्लागार निवृत्ती नियोजनाबरोबरच तुमच्या उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ, कराचे नियोजन अशा अनेक संलग्न परंतु महत्त्वाच्या बाबींचा सल्ला देईल.

वरील मुद्दय़ांवरून हे स्पष्ट होते की, रोबो अ‍ॅडव्हायझरीमुळे तुमच्या गुंतवणुकीच्या खर्चात बचत होत असली तरी अनेक बाबींमध्ये रोबो अ‍ॅडव्हायझरला मर्यादा आहेत. रोबो अ‍ॅडव्हायझर गुंतवणूकदारांच्या भावना ओळखू शकत नाही. परंतु गुंतवणूक सल्लागार हा बाजारात होणारे चढ-उतार आणि याचा त्या गुंतवणूकदाराच्या मानसिकतेवर होणारा परिणाम याचा परामर्श घेऊ शकतो. तेजीत ठेवायचा संयम आणि मंदीत वाटणारी भीती हे गुंतवणूक सल्लागार रोबो अ‍ॅडव्हायझरपेक्षा व्यवस्थितरीत्या हाताळू शकतो. रोबो म्हणजे काही परमेश्वर नव्हे, तर मनुष्यानेच बनविलेले एक यंत्र आहे. त्यामुळे आपल्या गुंतवणुकीच्या दृष्टीने फायदेशीर काय आहे हे प्रत्येकाने आपल्या गरजेनुसार आणि कुवतीनुसार ठरवायचे.

 

First Published on February 5, 2018 12:16 am

Web Title: investment advice from expert in loksatta arth salla 4