तृप्ती राणे

एक करोना विषाणू. सहा महिन्यांपूर्वी ज्याच्या अस्तित्वाची आपण फारशी दखलही घेतली नव्हती. तो आला, फोफावला आणि गुंतवणुकीचं सगळंच समीकरण विस्कटून बसला!

फेब्रुवारी महिन्यापर्यंत शेअर बाजार वर जात होता. व्याजदर जास्त नसले तरी बऱ्यापैकी स्थिरावले होते. वरिष्ठ नागरिकांना बऱ्यापैकी व्याज मिळत होतं आणि सोनं अनेक वर्षांच्या गाढ झोपेतून उठून चालू लागलं होतं! तेव्हा कुणालाही स्वप्नात वाटलं नव्हतं – असं काही तरी होईल की ज्यामुळे सगळीकडेच निराशामय परिस्थिती तयार होईल. आर्थिक परिस्थिती फक्त आपल्या देशातच नाही तर संपूर्ण जगभरात खालावेल आणि झपाटय़ाने गोष्टी बदलतील.. याबाबत जर कुणाचे अंदाज अचूक ठरले असतील तर ती अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी मंडळी असतील. बहुतांश भाकितं, जसे – करोना मे महिन्यापर्यंत राहील, मोठय़ा अर्थव्यवस्था लवकर बाहेर येतील, लवकरच लस तयार होईल, दोन-तीन महिन्यांत सगळं व्यवस्थित होईल.. इत्यादी सपशेल चुकीची ठरली!

पण आज जेव्हा आपण आजूबाजूच्या परिस्थितीचा आढावा घेतोय, तर असं लक्षात येत आहे की, अर्थव्यवस्था किती खाली जाणार आहे याबद्दल सगळेच साशंक आहेत, टाळेबंदी कधी संपणार हेसुद्धा कळत नाही, करोनाचे आकडे अजून किती दिवस असे वाढणार आणि त्याचा प्रादुर्भाव कसा कमी होणार, ही मोठी चिंता बऱ्याच देशांना सतावत आहे, उद्योगधंदे अजूनही पूर्णपणे सुरू नाही होऊ शकले आहेत! आणि या सर्वापेक्षा सामान्य व्यक्तीला भेडसावणारा प्रश्न आहे तो पैशांचा! अगदी नोकरी नसणाऱ्यांपासून ते चांगली गुंतवणूक असणाऱ्यालासुद्धा. ज्येष्ठांचा वर्ग जो मुदत ठेवी, प्रधानमंत्री वय वंदना योजना, ज्येष्ठ नागरिक बचत योजनेमध्ये सगळेच पैसे ठेवत होते ते चिंतेत आहेत की, यापुढे अजून किती कमी व्याजदर पाहावे लागणार आहेत. जी मंडळी ‘म्युच्युअल फंड सही है’ म्हणून ‘एसआयपी’ करत आहेत, तीसुद्धा बुचकळ्यात पडली आहेत की नक्की किती वर्षांनी परतावे मिळणार! पारंपरिक गुंतवणूक पर्याय म्हणून सोन्याकडे बघणारी मंडळी आजचा भाव बघून खूश आहेत, पण अजून पैसे घालायचे का याचं ठोस उत्तर काही केल्या मिळत नाही. स्थावर मालमत्तेचे चांगले दिवस अजून किती लांब आहेत, भाडय़ाने दिलेल्या जागांमधून नियमित मिळकत चालू राहील का, गरजेसाठी जर एखादी प्रॉपर्टी घ्यायची असेल तर ही योग्य वेळ आहे का, असे संभ्रमसुद्धा लोकांना भंडावून सोडत आहेत. व्याजदर कमी, शेअर मार्केट अनिश्चित, सोने खूप महाग, स्थावर मालमत्ता अडचणीत – मग गुंतवणूक करायची तरी कुठे? त्यासाठीच आजचा लेख.

अशा परिस्थितीमध्ये सर्वात पहिली आपल्या गरजांची तरतूद करावी आणि मग गुंतवणुकीकडे वळावे. येत्या वर्षभरातील गरजांना व्यवस्थितपणे पुरतील इतके पैसे पूर्णत: सुरक्षित ठिकाणी ठेवावे. बचत खाते, चांगल्या बँकेत मुदत ठेव, अतिशय सुरक्षित असणाऱ्या कंपन्यांचे डिपॉझिट, कमी मुदतीचे आणि चांगला पोर्टफोलिओ असणारे डेट म्युच्युअल फंड – हे गुंतवणूक पर्याय वापरावेत. सगळे पैसे एकीकडे न ठेवता तीन-चार ठिकाणी विभागून ठेवावेत.

पुढे दोन-पाच वर्षांत लागणाऱ्या पैशांना गुंतवताना थोडं जास्त खबरदार राहणं गरजेचं आहे. कारण आज जरी व्याज दर खाली असले तरीही येत्या काळात कधी हे चक्र पालटेल ते सांगता येत नाही. अजून खाली जातील या भीतीने सर्व पैसे दीर्घ काळासाठी ठेवले आणि मध्येच महागाई वाढल्यामुळे व्याज दर वाढले तर मग परतावे कमी पडतील आणि गुंतवणुकीचं मूल्य कमी होईल. तेव्हा ‘लॅडरिंग’ पद्धत वापरून प्रत्येक वर्षी मुदतपूर्ती होणाऱ्या गुंतवणुकीच्या पर्यायात रक्कम विभागून ठेवावी.

आता वळू या शेअर बाजाराकडे. गेल्या दोन महिन्यांत भरपूर नवीन डिमॅट खाती उघडली गेली आहेत आणि किरकोळ गुंतवणूक बऱ्यापैकी होत आहे असं निदर्शनास आलं आहे. एकीकडे ही बातमी चांगली वाटते; परंतु दुसरीकडे या नवगुंतवणूकदारांना बाजारातील जोखीम लक्षात आली आहे काय, अशी भीतीसुद्धा वाटते? बाजार खाली आहे म्हणून सगळ्याच कंपन्या स्वस्त दरात उपलब्ध आहे असं अजिबात नाहीये. तेव्हा शेअर्स किंवा इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करताना जरा जपूनच. कारण सगळेच उद्योग पुन्हा पूर्ववत होणार नाहीत आणि काही जरी झाले तरी ते तेवढेच फायदेशीर असतील असंही नाहीये! आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे बाजार खाली जाणार आणि किती खाली जाणार हेसुद्धा नक्की सांगता येत नाहीये. म्हणून चांगल्या उद्योगांचे शेअर्स आणि रास्त जोखीम असणारे म्युच्युअल फंड निवडावेत आणि टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करावी. शिवाय जमेल तसा फायदा काढून घ्यावा. कर वाचतो म्हणून दीर्घकाळासाठी गुंतवणूक ठेवली तर मोठा तोटा होऊ शकेल हे ध्यानात ठेवावं.

सोन्याच्या बाबतीत सांगायचं तर भाव भरपूर वर गेलाय हे निश्चित आहे; परंतु यापुढे अजून वर जाणार नाही असं अजिबात नाहीये. जागतिक अस्थिरता अजून कमी झालेली नाही आणि आपल्या देशाच्या चलनाची म्हणजेच रुपयाची किंमतसुद्धा स्थिरावली नसल्याने आपल्याकडे सोने महाग झालेले आहे. तेव्हा या गुंतवणूक पर्यायाकडे कानाडोळा करून चालणार नाही; परंतु जसा पैसा शेअर बाजाराकडे वळला आहे तसाच तो सोन्याकडेही गेला आहे. तेव्हा सोन्याचे भाव कधी आणि किती खाली येतील हे सांगणं कठीण आहे. तरीसुद्धा, मला असं वाटतं की, थोडे पैसे सोन्यामध्ये घालायला हरकत नाही; पण असं करताना दागिने न घेता, सोन्याचे ईटीएफ किंवा गोल्ड म्युच्युअल फंड (गुंतवणूक करण्यापूर्वी एग्झिट लोड लक्षात घ्या!) हे उपयुक्त पर्याय आहेत. सॉव्हरिन गोल्ड बॉण्डवर जरी व्याज मिळत असलं, तरी अनिश्चिततेच्या काळात हे बॉण्ड विकताना त्यातून योग्य किंमत मिळेल का याबद्दल मला शंका वाटते. गुंतवणूक करताना थोडी थोडी रक्कम गुंतवावी आणि सोन्याच्या किमतीवर व्यवस्थित लक्ष ठेवावं.

स्थावर मालमत्तेत पैसा घालताना, गरज आणि गुंतवणूक यामधील फरक समजून मग निर्णय घ्यावा. स्वत:च्या वापरासाठी जर घर घ्यायचं असेल आणि तेसुद्धा कर्ज काढून तर येणाऱ्या काळात प्रॉपर्टीचे भाव खाली यायची चिन्हं दिसत आहेत. शिवाय गृह कर्जावरील व्याजदरसुद्धा कमी असल्याने निर्णय घेणे फायद्याचे ठरेल. आयकर कायद्यातील तरतुदी लक्षात घेऊन जर नीट नियोजन केलं तर अजून फायदा होऊ शकेल; परंतु जर गुंतवणूक म्हणून या पर्यायाकडे बघत असाल तर लक्षात ठेवा की, जागा भाडय़ाने किती लवकर जाऊ शकेल आणि मुळात अपेक्षेप्रमाणे भाडं मिळेल का याबाबत अजून नीट काही सांगता येऊ  शकत नाही. प्रत्येक ठिकाणी मागणी-पुरवठा समीकरण वेगळं असतं आणि शिवाय पुन्हा निवासी आणि व्यावसायिक जागेनुसार भाडय़ाच्या आणि भाववाढीच्या अपेक्षेमध्ये फरक पडतो. या गुंतवणुकीमध्ये एकरकमी पैसे जास्त मोजावे लागतात म्हणून खबरदारी बाळगणं महत्त्वाचं आहे.

तेव्हा, गुंतवणूकदाराने आता जास्त जागरूक राहून स्वत:च्या पैशाबद्दल अधिक खबरदारीने निर्णय घ्यायला हवेत. ‘अ‍ॅसेट अलोकेशन’कडे नीट लक्ष ठेवून आणि रास्त जोखीम घेऊन पुढील काळातील गुंतवणूक व्यवस्थापन करावं. न भूतो. अशी परिस्थिती असल्यामुळे पुढचा मार्ग व्यवस्थित दिसत नाहीय; परंतु पुढे जर यातून ठणठणीत बाहेर पडायचं असेल तर जपून पावले टाकणं अत्यंत गरजेचं आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर फुकटची चर्चा टाळून स्वत:च्या आर्थिक आयुष्याची घडी बसवायचा प्रयत्न करावा.