पसाभर धान्य भविष्यातील वापरासाठी बाजूला काढण्याची आपली परंपरा  आर्थिक नियोजनातसुद्धा आचरणात आणायला हवी. म्हणूनच आपल्या पाल्यासाठी आजपासूनच गुंतवणुकीस सुरुवात करावी हे उत्तम..
या स्तंभातून १ एप्रिल रोजी आर्थिक नियोजनाबाबत काय काळजी घ्यावी हा विषय घेऊन संवाद साधला होता. तेव्हापासून वेगवेगळ्या वयोगटातील वाचकांकडून आर्थिक नियोजनाबाबत सल्लेवजा विचारणा सुरू आहे. असाच संपर्क रिद्धीच्या बाबांकडून झाला. ज्यावेळी त्यांनी मेल लिहिली तेव्हा तिचे नामकरणही झाले नव्हते. रिद्धी ही उद्याच्या पिढीची प्रतिनिधी आहे. तिच्यासाठी वित्तीय गुंतवणूक कशी असावी असे विचारणा करणारी ही मेल होती. आज ६ मे या दिवशी रिद्धी पाचव्या महिन्यात पदार्पण करीत आहे. तेव्हा स्तंभलेखनाची सर्वात लहान लाभार्थी ठरणाऱ्या रिद्धीच्या आर्थिक नियोजनाबाबतचा हा आढावा.  
कुटुंबात नवीन सदस्याचे आगमन होणार हे कळल्यापासून सातआठ महिने आधीपासूनच त्या सदस्याच्या स्वागताची तयारीला सुरुवात होते. आर्थिक नियोजनाची सुरुवात ‘तो’ अथवा ‘ती’ या जगात आल्यानंतर होते.  सुरुवात ही शक्य तितक्या लवकर करावी. ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या युक्तीनुसार लहान किंवा मोठ्या रकमेने बचतीस सुरुवात करावी. बचतीत सातत्य असणे महत्त्वाचे. पसाभर धान्य भविष्यातील वापरासाठी बाजूला काढण्याची आपली परंपरा आर्थिक नियोजनातसुद्धा आचरणात आणायला हवी. म्हणूनच आपल्या पाल्यासाठी आजपासूनच गुंतवणुकीस सुरुवात करावी हे उत्तम.
सर्वसाधारणपणे ज्या इस्पितळात  बाळाचा जन्म होतो, ते इस्पितळ शहरातील नगरपालिकेस  बाळाच्या जन्माची माहिती देते. दरम्यान बाळाचा नामकरण विधी झाल्यानंतर बाळाला त्याची कायदेशीर ओळख प्राप्त होते. त्यानंतर बाळाच्या जवळच्यांनी जन्म-नोंदणी कार्यालयात अर्ज करून बाळाच्या जन्माच्या नोंदणीचा दाखला मिळवावा. रिद्धीच्या नावाने मिळालेले हे पहिले कार्यालयीन पत्र. त्यानंतर कुठलीही गुंतवणूक करण्यासाठी एका बचत खात्याची गरज असते. म्हणून रिद्धीच्या नावाने बचत खाते काढावे. बाबाचे नाव संयुक्तपणे नोंदवावे व आईचे या खात्यासाठी नामनिर्देश करून त्याची पासबुकावर नोंद करावी. रिद्धी तिच्या वयाची अठरा वर्षे पूर्ण करेपर्यंत तिचे बाबा पालक या नात्याने हे खाते संभाळणार आहेत.
इथपर्यंत तयारी झाल्या नंतर पॅन-कार्डासाठी अर्ज करावा. कारण कुठल्याही म्युच्युअल फंडाच्या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी अथवा डीमॅट खाते उघडण्यासाठी याची आवश्यकता असते. इतकी गुंतवणूकपूर्व तयारी झाल्यानंतर आता प्रत्यक्ष गुंतवणुकीकडे वळूया.
तत्पूर्वी रिद्धीची सामाजिक आणि आर्थिक पाश्र्वभूमी समजावून घेऊ. रिद्धीचे आजोबा पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील एक वकील व वकिलीच्या जोडीला जमीन जुमला बागायती शेतीवाडी. आईवडील दोघेही इंजिनीयर असून आपापल्या नोकरी निमित्ताने पुण्यात राहतात. गुंतवणुकीला सुरुवात करण्यापूर्वी त्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट निश्चित करणे आवश्यक असते. रिद्धीसाठी गुंतवणूक करत असताना तिच्या बाबांबरोबर चर्चा करून ती उद्दिष्टे निश्चित केली. रिद्धी तिच्या वयाच्या २२-२३व्या वर्षी उच्च शिक्षणासाठी परदेशी जाईल. अथवा आवडीच्या विषयातील शिक्षण संपल्यानंतर सुरुवातीची तीनचार वष्रे अनुभव घेतल्यानंतर स्वत:चा व्यवसायास २७-२८व्या वर्षी सुरू करेल यासाठी बीजभांडवल उपलब्ध असावे हे या गुंतवणुकीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले.
महागाईचा दर ८% तर रुपयाचे डॉलरच्या तुलनेत घटणारे मूल्य ३% विचारात घेऊन आजपासून २२ वर्षांनी परदेशी उच्च शिक्षणासाठी २०३५ मध्ये हा आकडा १.५५ कोटी असेल. येतो. रिद्धीच्या आईवडिलांकडे सध्या घरखर्च भागविल्यावर (Disposable Income)  जी शिल्लक उरते. त्या रक्कमेपकी २०,००० रुपये हे रिद्धीच्या भविष्यासाठी दरमहा गुंतवावे असे ठरविण्यात आले. या रकमेत दरवर्षी १०% वाढ करावी असे सुचविण्यात आले. सुरुवातीची दोन वष्रे फक्त म्युच्युअल फंडात गुंतवणूक करावी व भविष्यात नवीन गुंतवणुकीचे मार्ग अनुसरावे असे ठरविण्यात आले.  
या म्युच्युअल फंडांच्या निवडीमुळे ७०% रक्कम लार्जकॅपमध्ये तर ३०% मिडकॅपमध्ये  गुंतविली आहे. या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या परताव्याचा दर २०% अपेक्षित आहे. गुंतवणुकीत नेहमीच रोखेसदृश्य स्थिर उत्पन्न देणारी गुंतवणूक असावी. रिद्धी दोन वष्रे वयाची झाल्यावर तिच्या नावाने पीपीएफ खाते उघडून, त्यात दरमहा दोन हजार रुपये जमा करावे.
योग्य वेळी शेअरमध्ये आर्थिक नियोजनकाराच्या सल्ल्याने गुंतवणुकीस सुरुवात करावी.
२०-२२ वर्षांचे आर्थिक नियोजन आत्ताच करणे कठीण आहे. बदलत्या परिस्थितीनुसार त्यात योग्य ते बदल करावेत. गुंतवणुकीच्या उद्देशात बदल न करता गुंतवणुकीची साधने बदलावीत. रोखे, म्युच्युअल फंड, शेअर व सोने यांचा समतोल साधावा. आज रिद्धीच्या आई बाबांची आर्थिक परिस्थिती उत्तम आहे. २०-२२ वर्षांत त्यात सातत्याने भर पडणार आहे. ते रिद्धीच्या परदेशी शिक्षणाचा खर्च उचलू शकणार नाहीत असे नाही. परंतु कुठे तरी एका उद्दिष्टाने बचतीस सुरुवात करायला हवी. अनेक मोठय़ा गोष्टींची सुरुवात छोट्या गोष्टीतूनच झाली आहे.
हुगळी येथे गंगानदी एका विशाल नदीपात्रातून बंगालच्या उपसागराला मिळत असली तरी तिचा उगम गंगोत्री येथे एका लहान जलधारेपासून होतो. सुचविलेला गुंतवणुकीचा मार्ग सर्वोत्तम आहे असा दावा नाही. ठरविलेल्या रकमेची १००% लक्षपूर्ती होईलच असे मानण्याचे कारण नाही. काळाच्या ओघात हा गुंतवणुकीचा ओघ वाढत जाऊन एक मोठी रक्कम तयार होईल हे नक्की. म्हणून आपल्या पाल्यांसाठी छोटय़ा बचतीने आजपासूनच सुरुवात करा इतके सांगून आजच्यापुरती रजा घेतो.

अ‍ॅक्सिस बँक
या स्तंभातून बँकांच्या शेअरबद्दल जिव्हाळ्याने लिहिले जाते. कोणत्याही निर्देशांकात वित्तीय सेवा व बँकांच्या शेअरचे योगदान २५%च्या दरम्यान आहे. आपल्या पोर्टफोलियोतही मग बँकांचा वाटा आर्थिक आवर्तनानुसार २०-३०%दरम्यान (आपल्या जोखीम घेण्याच्या परिस्थितीनुसार) असावयास हवा. पोर्टफोलियोचा गाभा हा स्टेट बँक, अ‍ॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक आणि दोन किंवा तीन राष्ट्रीयीकृत व खाजगी बँका असा हवा. अ‍ॅक्सिस बँकेच्या मागील वर्षांपेक्षा व्याजाच्या उत्पन्नात १४.८% वाढ झाली. किरकोळ ग्राहकांना दिलेल्या कर्जामध्ये ४३.६% तर लघू व मध्यम उद्योगांना दिलेल्या कर्जात २५.७%  वाढ झाली आहे. चालू व बचत खात्यांचे प्रमाण (CASA) मध्ये २२.६५% वाढ झाली आहे. बँकेचे व्याजाव्यतिरिक्त शुल्काधारीत उत्पन्नात घसघशीत वाढ झाली आहे. पुनर्रचित कर्जे रु. ५४१ कोटींवरून घटून ३९८ कोटी झाली आहेत. पुनर्रचित कर्जे व अनुत्पादित कर्जाच्या पोटी केलेली तरतूद वाढून १२०० कोटी झाली आहे. येत्या तिमाहीत हा आकडा साधारण १००० कोटीच्या जवळपास असावा. प्रति समभाग मिळकत रु. ११०.७० असून ती २०१४ व २०१५ मध्ये अनुक्रमे १३०.१७ व १५०.६५ होणे अपेक्षित आहे. सध्याच्या बाजारभावाचे पुस्तकी किमतीशी गुणोत्तर १.६ पट तर एचडीएफसी बँकेचे हेच गुणोत्तर २.२२ पट आहे.  या स्तंभातून अ‍ॅक्सिस बँकेच्या निकालांचे विवेचन या आधीसुद्धा केले आहे. वेळोवेळी दिलेले लक्ष्य गाठलेही गेले आहे. या वार्षकि निकालांचे विश्लेषणानंतर एक वर्षांनंतरचे लक्ष्य रु. २,०००ची आशा करावयास हरकत नाही.  
दर्शनी मूल्य    रु. १०/-
एका वर्षांतील उच्चांक    रु. १,५१९
एका वर्षांतील नीचांक    रु. ९२२
प्रति समभाग मिळकत    रु. ११०.७०
सद्य बाजारभाव    रु. १४७४
वर्षांनंतरचे लक्ष्य    रु. २०००

रिद्धीचे आर्थिक नियोजन : पायऱ्या
पूर्वतयारी :
*  जन्म-दाखला ’  आईच्या नामनिर्देशनासह बँकेत बचत खाते  ’  पॅन कार्ड
प्रत्यक्ष गुंतवणूक :
गुंतवणुकीचे उद्दिष्ट : विदेशात उच्च शिक्षणाचा आजपासून २२ वर्षांनी खर्च १.५५ कोटी रुपये
उपाय :
१. म्युच्युअल फंडात दरमहा २० हजार रुपये एसआयपी (आदर्श फंड पर्याय तक्ता पाहा)
२. रिद्धी दोन वर्षांची झाल्यावर, पीपीएफ खात्यात तिच्या नावे दरमहा २००० रु.