vittbhanपनवेलमधील एक वाचक श्री. अंबर सहस्रबुद्धे विचारतात, की त्यांची मुलगी एक महिन्याची आहे नुकतेच बारसे झाले. तिच्या नावाने गुंतवणूक करावयाची आहे कोणती योजना सर्वोत्तम म्हणता येईल?
१) श्री. अंबर यांना आयुर्वमिा महामंडळाच्या व इतर विमा कंपन्यांच्या प्रतिनीधीने सुचवलेल्या योजना या अशा- अ) मुलासाठी मनीबॅक योजना, ब) सिंगल एन्डोमेंट प्लॅन
२) सराफ पेढीवर काम करणाऱ्याने सुचवलेली योजना –
    दरमहा अर्धा किंवा एक ग्रॅम सोने खरेदी केल्यास २० वर्षांत १२० ते २४० ग्रॅम सोने जमा होईल, की जे तिच्या लग्नात उपयोगी येईल.
३) पोस्टाच्या एजंटने सुचवलेली योजना-
    दरमहा रु. १,०००/- आवर्ती ठेव योजनेत गुंतवून पाच वर्षांनी मिळणारी रक्कम राष्ट्रीय बचतपत्रांत पुन्हा गुंतविणे
४) म्युच्युअल फंड एजंटने सुचवलेल्या योजना-
अ) टाटा यंग सिटिझन फंड
ब) एचडीएफसी चिल्ड्रन्स गिफ्ट फंड
क) आयसीआयसीआय चाईल्ड केअर प्लॅन
ड) एलआयसी नोमुरा चिल्ड्रेन फंड
५) कोणीही एजंट नसल्याने कोणीही न सुचवलेली योजना- सुकन्या समृद्धी खाते.
वरील सर्व योजनांचे फायदे/तोटे (तोटेच जास्त!) विचारांत घेऊन ‘आíथक नियोजनकार’ म्हणून मला सुचवावीशी वाटते ती वरील पाचवी योजना, अन्य सुचविल्या गेलेल्या पर्यायांमध्ये सर्वोत्तम. ही योजना तपशिलाने विचारात घेऊ.
अंबरजी, पहिली बेटी धनाची पेटी. त्यात बाप-लेकीचे नाते वेगळेच असते. त्यामुळे आपण गुंतवणुकीचे निर्णय खूपदा भावनात्मक बाजूने घेतो. जो एजंट पहिला येईल त्याची योजना आपण घेऊन टाकतो व नंतर पाच-सहा वर्षांनी ही योजना का घेतली म्हणून कपाळाला हात लावून घेतो.
लहान मुलांच्या नावावर आयुर्वमिा पॉलिसी घेतली नाही असे फार थोडे लोक आहेत. लहान मुले मिळवती नसतात. आयुर्वमिा कमावत्या व्यक्तीचा उतरवायचा असतो. आयुर्वमिा ही नुकसान भरपाई योजना असते. कमावत्या व्यक्तीचा दुर्दैवाने मृत्यु ओढवल्यास पुढे मिळणारे उत्पन्न आज नुकसान भरपाई म्हणून मिळते. त्या दृष्टीने लहान मुलांचा आयुर्वमिा योजनांवर कायद्याने बंदी घातली पाहिजे.
गुंतवणूक म्हणून या योजना वाईट कशा?
या योजनांवर परतावा वयानुसार सहा ते सात टक्के इतका कमी आहे. मनी बॅक पॉलिसीमध्ये पॉलिसी कोणत्याही वयात काढली तरी मुदत २५ व्या वर्षी संपते. वयाच्या १८, २०, २२ व्या वर्षी २०% रक्कम मिळते व २५ व्या वर्षी बाकी ४०% रक्कम बोनससह मिळते. सर्व आयुर्वमिा कंपन्यांजवळ ही योजना जवळपास अशीच आहे.
एकल प्रिमीयम एन्डोमेंट प्लॅनमध्ये रक्कम एकदाच गुंतवून १२ वर्षांनंतर किंवा वयाची १८ वष्रे पूर्ण झाल्यावर (जे नंतर असेल) रक्कम बोनससह परत मिळते.
आता फायदे दाखवायचेच म्हटले तर ८० सी आयकर सवलत आहे; मिळणारे उत्पन्न मुलाच्या खात्यावर अठरा वर्षांनंतर मिळत असल्याने पालकांना त्यावर आयकर द्यावा लागत नाही.
पण तोटे भरपूर आहेत-
१) आयकर वाचवण्यासाठी इतर पर्याय भरपूर आहेत. त्यासाठी हीच योजना कशाला.
२) दीर्घ मुदतीत परतावा फक्त ६-७ टक्के म्हणजे महागाईपेक्षाही कमी आहे.
३) मुले वयाच्या सतराव्या वर्षी बारावी परीक्षा उत्तीर्ण होतात, त्या नंतर पुढील शिक्षणासाठी मोठी रक्कम लागते त्या वेळेस ही रक्कम हातात न येता एक वर्ष उशिराने येते.
सुवर्ण खरेदी योजना: प्रत्येक जण आपली योजना कशी चांगली आहे हे सांगत असतो. फक्त अर्धा ग्रॅम सोने वीस वष्रे खरेदी करा सांगणे सोपे आहे. २४० तुकडे जमा कसे करून ठेवणार? मग त्याचे दागिने करा (आधीच?) म्हणजे लग्नाच्या वेळेस ते मोडून दुसरे करा. मग आम्हाला दोन वेळा घडणावळ मिळेल. मग ही खरेच गुंतवणूक योजना आहे का?
मागील ४५ वर्षांच्या १९७०-७१ पासून सोन्याच्या किमतीनुसार परतावा कितीसा आहे? (प्रस्तुत लेखकाच्या, अर्थवृत्तान्त, १९ मे २०१४ चा ‘सोने-झळाळी गेली, रया गमावली!’ या लेखात ते दाखवले आहे) १९८० ते २००० या वीस वर्षांसाठी, दरसाल परतावा फक्त पाच टक्के आहे. तर १९९० ते २०१२ या २२ वर्षांसाठी परतवा १० टक्के आहे. २०१३ साली सोन्याचा उच्चांक दहा ग्रॅमसाठी ३१,००० रुपये होता. आज सोने त्याच्या खूप खाली आले आहे.
गुंतवणूक म्हणून सोन्याचा परतावा महागाई इतकाच असतो. म्हणजे तुमचे मुद्दल कमी जास्त न होता सुरक्षित राहते, इतकेच. ज्या वेळेस महागाई खूप वाढते त्या वेळेस सोन्याचे दर वाढतात. मुलीच्या लग्नात उपयोगी येईल, ही भावनात्मक बाब सोडल्यास, गुंतवणूक म्हणून ही योजना चांगली नाही.
मुलीचे लग्न ही बाब भारतीय समाजात इतकी महत्त्वाची मानली जाते की तिच्या शिक्षणाची तरतूद म्हणून योजना न काढता तिच्या लग्नाच्या सोयीचा विचार आधीपासून केला जातो. पूर्वी आयुर्वमिा महामंडळाची मुलींच्या लग्नाची सोय म्हणून मॅरेज एंडोमेंट पॉलिसी (टेबल क्र. ९०) होती. सुदैवाने ती बंद झाली. त्या योजनेत एक कलम असे होते- पालकाचा मृत्यू झाल्यास पुढील हप्ते भरावयाचे नाहीत, परंतु विम्याची रक्कम लगेच न मिळता मुलीच्या लग्नाच्या वेळेस मिळेल. म्हणजे तिच्या शिक्षणासाठी रक्कम आधी मिळणार नाही. हाच प्रकार सुकन्या समृद्धी खात्याबाबतही आहे. फक्त ५०% रक्कम १८ व्या वर्षांनंतर एकदाच शिक्षणासाठी काढता येईल. मुलीला शिक्षण परदेशात घ्यावयाचे असल्यास रक्कम पूर्ण मिळणार नाही.
इतर योजना पुढील लेखांत पाहू.
(लेखक ‘सेबी’कडे नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार)