|| प्रवीण देशपांडे

प्रश्न : मी पगारदार कर्मचारी आहे. मासिक पगार ४२,००० रुपये इतका आहे. सप्टेंबर २०१८ रोजी मी घेतलेले घर भाडय़ाने दिले आहे. त्याचे भाडे मला दरमहा १४,००० रुपये इतके मिळते. माझा प्रश्न असा आहे की, मला माझ्या कंपनीला (जेथे मी नोकरी करतो), या भाडय़ाच्या व्यवहाराबद्दल कळविणे बंधनकारक आहे का?     – जयेश मसुरकर, ईमेलद्वारे

उत्तर : प्राप्तिकर कलम १९२ (२ब) नुसार करदात्याला पगाराव्यतिरिक्त उत्पन्नाची आणि त्यावर कापलेल्या उद्गम कराची माहिती विहित नमुन्यात पगार देणाऱ्या व्यक्ती, संस्था, कंपनी, वगैरेंना (मालक) देणे बंधनकारक आहे. या मिळालेल्या माहितीनुसार पगार देणाऱ्याला हे उत्पन्न आणि उद्गम कर विचारात घेऊन एकूण उत्पन्नावर उद्गम कर (टीडीएस) कापावा लागतो. त्यामुळे आपल्याला या उत्पन्नाची माहिती मालकाला देणे उचित ठरेल. प्राप्तिकर कायद्यानुसार उत्पन्नामध्ये ‘तोटय़ा’चा सुद्धा समावेश होतो; परंतु करदात्याला ‘इतर उत्पन्न स्रोता’त तोटा झाला असेल तर तो उद्गम करासाठी मालक विचारात घेऊ शकत नाही. याला अपवाद फक्त ‘घरभाडे’ या सदरातील ‘तोटय़ा’चा आहे.

प्रश्न : कर वाचविण्यासाठी मी म्युच्यअल फंडाच्या टॅक्स सेव्हर योजनेमध्ये गुंतवणूक करतो. माझा प्रश्न असा आहे की, तीन वर्षांनंतर मिळणारा दीर्घ मुदतीचा भांडवली नफा करमुक्त असतो का? आणि नसल्यास मला महागाई निर्देशांकाचा फायदा घेता येईल का?   – वसंत तडवळकर, अमरावती

उत्तर : ‘कलम ८० सी’नुसार केलेल्या म्युचुअल फंडातील गुंतवणूक किमान तीन वर्षे कालावधीसाठी आहे. तीन वर्षांनंतर या गुंतवणुकीची विक्री केल्यास होणारा भांडवली नफा हा मागील वर्षांपर्यंत करमुक्त होता; परंतु १ एप्रिल २०१८ पासून हा नफा करपात्र झाला आहे. करदात्याला एका वर्षांत एक लाख रुपयांपेक्षा जास्त भांडवली नफा झाला असल्यास, एक लाख रुपयांच्या वरील रकमेवर १० टक्के इतक्या सवलतीच्या दराने कर भरावा लागेल. या कलमानुसार महागाई निर्देशांकाचा फायदा घेता येणार नाही.

प्रश्न : माझा जन्म १६ मार्च १९५९ रोजी झाला आहे. मी ३१ मार्च २०१९ रोजी सेवानिवृत्त होत आहे. २०१८-१९ आर्थिक वर्षांसाठी मी ज्येष्ठ नागरिक म्हणून आयकर विवरणपत्र दाखल करू शकतो का? आणि ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या सवलती घेऊ शकतो का?   – महेश देशपांडे, ईमेलद्वारे

उत्तर : आपण आपल्या वयाची ६० वर्षे १६ मार्च २०१९ रोजी (म्हणजेच आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये) पूर्ण करीत आहात, त्यामुळे आपण प्राप्तिकर कायद्याप्रमाणे २०१८-१९ या आर्थिक वर्षांपासून ज्येष्ठ नागरिक म्हणून समजले जाता. यानुसार आपल्याला २०१८-१९ या आर्थिक वर्षांत मिळालेल्या उत्पन्नासाठी कमाल करमुक्त मर्यादा ३ लाख रुपये इतकी असेल आणि या वर्षांपासून आपल्याला ज्येष्ठ नागरिकांच्या सवलती घेता येतील. आपल्या पगाराच्या उत्पन्नावर ज्येष्ठ नागरिक म्हणून उद्गम कर आपल्या मालकाला कापावा लागेल.

प्रश्न : मी नुकतीच वयाची ६० वर्षे पूर्ण केली आहेत. माझे उत्पन्न म्हणजे दरमहा ४०,००० रुपयांचे घरभाडे आणि वार्षिक सुमारे ७ लाख रुपयांचे बँकेकडून मिळणारे व्याज. माझे एकूण उत्पन्न सुमारे १२ लाख रुपये आहे. या उत्पन्नावर बँक १० टक्के इतका उद्गम कर कापते. बाकी कर मला भरावा लागतो. मला अग्रिम कर भरावा लागेल का? मागील जून आणि सप्टेंबरमध्ये मी अग्रिम कराचा हप्ता भरलेला नाही. मला यावर व्याज भरावे लागेल का?   – प्रभाकर जाधव, ईमेलद्वारे

उत्तर : ज्या करदात्याचा अंदाजित देय कर १०,००० रुपयांपेक्षा जास्त (उद्गम कर वजा जाता) असेल त्याला चार हप्त्यात अग्रिम कर भरणे बंधनकारक आहे.

या अग्रिम कराच्या तरतुदीतून खालील करदात्यांना वगळण्यात आले आहे :

  • जे वैयक्तिक करदाते आहेत, आणि
  • जे निवासी भारतीय आहेत, आणि
  • ज्यांचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त आहे, आणि
  • ज्यांच्या उत्पन्नात धंदा-व्यवसायाच्या उत्पन्नाचा समावेश नाही.

या वरील सर्व अटींची पूर्तता करणाऱ्या करदात्यांना अग्रिम कर भरावा लागणार नाही. त्यांना विवरण पत्र भरण्यापूर्वी कर भरला तरी कोणतेही व्याज भरावे लागत नाही. आपण निवासी नागरिक असल्यास आपल्या बाबतीत वरील सर्व अटींची पूर्तता होते, त्यामुळे आपल्याला अग्रिम कराच्या तरतुदी लागू नाहीत. आपण व्याज न भरता विवरणपत्र भरण्यापूर्वी कर भरू शकता.

प्रश्न :  मी एका कंपनीच्या विक्री विभागात काम करतो. विक्री विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगाराव्यतिरिक्त कमिशन दिले जाते. हे कमिशन आम्ही केलेल्या विक्रीवर अवलंबून असते. माझ्या माहितीनुसार हे उत्पन्न ‘इतर उत्पन्न’ या सदरात दाखवून या उत्पन्नावर ५ टक्केइतका उद्गम कर कापला गेला पाहिजे, कंपनीने हे कमिशन पगाराच्या उत्पन्नात गणून त्यावर वाढीव दराने उद्गम कर कापला आहे. हे बरोबर आहे का?     – प्रसाद गायकवाड, ईमेलद्वारे

उत्तर : कंपनीने कर्मचाऱ्याला दिलेले कमिशन हे पगारातील उत्पन्न म्हणूनच गणले जाते. हे कमिशन दरमहा निश्चित रक्कम किंवा विक्रीवर आधारित रक्कम या स्वरूपात दिले गेले असले तरी ती रक्कम ‘पगारातील उत्पन्न’ म्हणूनच गणली जाईल. त्यामुळे आपल्या कंपनीने हे कमिशन ‘पगारातील उत्पन्न’ म्हणून विचारात घेतले हे बरोबर आहे आणि त्याप्रमाणे उद्गम कर कापणे हेसुद्धा उचित आहे.

प्रश्न : आमची शेतजमीन आहे. ही शेतजमीन आता नगरपालिकेच्या हद्दीत आली आहे. ही जमीन सरकारी कामासाठी वापरली जाणार आहे. त्यासाठी सरकारकडून मोबदला मिळणार आहे. हा मोबदला मला करपात्र आहे का?     – सुधाकर काळे, ईमेलद्वारे

उत्तर : प्राप्तिकर कलम कायदा १० (३७) नुसार सरकारकडून मिळालेला मोबदला, खालील अटींची पूर्तता केली असल्यास, करमुक्त आहे :

  • ही सवलत फक्त वैयक्तिक करदाते आणि हिंदू अविभक्त कुटुंब यांनाच मिळते.
  • जमीन शहरी भागात असली पाहिजे.
  • जमीन संपादित केल्याच्या तारखेपासून मागील दोन वर्षांत करदात्याने किंवा त्यांच्या पालकाने जमीन, शेतीसाठी वापरलेली असली पाहिजे.
  • जमीन ‘कम्पल्सरी अ‍ॅक्विझिशन’च्या अंतर्गत हस्तांतरित झाली असली पाहिजे किंवा मोबदला केंद्र सरकारने ठरविला असला पहिजे किंवा केंद्र सरकारने किंवा रिझव्‍‌र्ह बँकेने प्रमाणित केला असला पाहिजे.
  • हा मोबदला १ एप्रिल २००४ नंतर मिळाला असला पाहिजे.
  • या अटींची पूर्तता होत असल्यास आपल्याला मिळालेला मोबदला करमुक्त असेल.