16 January 2019

News Flash

कमाल करमुक्त मर्यादेचा फायदा दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यासाठी नाही..

मी ऑगस्ट, २०१५ मध्ये माझ्या घराची विक्री केली होती.

|| प्रवीण देशपांडे

 • प्रश्न : मी ऑगस्ट, २०१५ मध्ये माझ्या घराची विक्री केली होती. दुसरे घर घेणार म्हणून मी भांडवली नफ्याएवढी रक्कम, म्हणजेच ३५ लाख रुपये, कलम ५४ नुसार कॅपिटल गेन स्कीम, १९८८ खात्यात जमा केली आणि आर्थिक वर्ष २०१५-१६ मध्ये या रकमेची वजावट घेऊन पूर्ण कर सवलत घेतली. माझे नवीन घर एप्रिल, २०१८ मध्ये ३२ लाख रुपयांना बांधून तयार झाले. भांडवली नफ्यापैकी, नवीन घरात ३ लाख रुपये कमी गुंतवणूक झाली, मला या रकमेवर कर भरावा लागेल का? भरावा लागेल तर तो कोणत्या वर्षांसाठी? – इशा कुलकर्णी : इमेलद्वारे

उत्तर : कलम ५४ नुसार एका घराची विक्री करून  झालेल्या दीर्घ मुदतीचा भांडवली नफ्याएवढी किंवा त्या पेक्षा जास्त रक्कम नवीन घरात गुंतविली तर भांडवली नफ्यावर कर भरावा लागत नाही. घराची विक्री झालेल्या तारखेच्या १ वर्ष आधी किंवा दोन वर्षांच्या आत नवीन घर खरेदी (बांधले तर तीन वर्षे) केले  असले पाहिजे. नवीन घर त्या वर्षीचे विवरण पत्र भरण्याच्या मुदतीत म्हणजे ३१ जुलै पूर्वी (आपल्या बाबतीत ३१ जुलै, २०१६) घेता आले नाही तर ३१ जुलै, २०१६ पूर्वी भांडवली नफ्याएवढी रक्कम, कॅपिटल गेन स्कीम, १९८८ नुसार खाते उघडून त्यात जमा करणे बंधनकारक आहे. अशी रक्कम जमा करून भांडवली नफ्यावरील कराची सवलत घेता येते आणि वरील मुदतीत नवीन घर खरेदी किंवा बांधता येते. आपण नवीन घर बांधले आहे त्यामुळे आपल्याला ऑगस्ट, २०१८ पूर्वी घर बांधणे बंधनकारक होते ते आपले मुदतीत बांधून (एप्रिल, २०१८ मध्ये) तयार झाले. या अटीचीही आपण पूर्तता केली. परंतु आपण आर्थिक वर्ष २०१५—१६ सालचे विवरणपत्र भरतांना ३५ लाख रुपयांची गुंतवणूक विचारात घेऊन भांडवली नफ्यातून पूर्ण कर सवलत घेतली होती आणि प्रत्यक्षात आपण ३२ लाख रुपयांचीच गुंतवणूक नवीन घरात केली. त्यामुळे न वापरल्या गेलेली रक्कम, ३ लाख रुपये, ज्यावर आपण कर सवलत घेतली आहे, ती रद्द होईल आणि ही रक्कम आर्थिक वर्ष २०१८—१९ या वर्षांसाठी भांडवली नफा म्हणून करपात्र असेल.

 • प्रश्न : माझे नाशिकमध्ये एक घर आहे जे मी १५ वर्षांपूर्वी खरेदी केले होते. या घराची विक्री करून मिळालेले पैसे मी दुकानात गुंतविण्याचा विचार करीत आहे. या घराची अंदाजित विक्री किंमत २५ लाख रुपये इतकी आहे आणि दुकानाची खरेदी किंमत साधारण ३० लाख रुपये इतकी असेल. घराच्या विक्रीवर झालेला भांडवली नफा दुकानात गुंतविला तर मला करातून सवलत मिळेल का? – सुनील परब, मुंबई

उत्तर : कलम ५४ नुसार घराची विक्री करून झालेल्या दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्याएवढी किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम जर दुसरम्य़ा घरात गुंतविली तर नफ्यावर कर भरावा लागत नाही. परंतु, ही गुंतवणूक फक्त “घरात” केली तरच ही सवलत मिळते, दुकानात केली तर ही सवलत मिळत नाही.

 • प्रश्न : मी एक सेवा निवृत्त ज्येष्ठ नागरिक आहे. माझे वय ६७ वर्षे आहे. माझे २०१७—१८ या आर्थिक वर्षांत मुदत ठेवींवरील व्याजाचे उत्पन्न १,०२,५०० रुपये आहे आणि याशिवाय मी शेअर बाजारात एका नोंदणीकृत दलालातर्फे शेअरच्या खरेदी विक्रीचे व्यवहार करतो. या व्यवहारात मला ३,२५,००० रुपयांचा लघु मुदतीचा भांडवली नफा झाला आहे. मी कलम ८० क नुसार सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी मध्ये १,५०,००० रुपयांची गुंतवणूक केली आहे. मला २०१७—१८ या वर्षीसाठी किती कर भरावा लागेल? – प्रभाकर सावंत, मुंबई

आपण ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे ३,००,००० रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त आहे. शेअर्सचे व्यवहार दलालामार्फत केले असल्यामुळे त्यावर रळळ भरला गेला आहे. लघु मुदतीच्या भांडवली नफ्यावर १५% सवलतीच्या दरात कर भरावा लागतो.   आपण कलम ८० क नुसार १,५०,००० रुपयांची गुंतवणूक केली असली तरी शेअर्सच्या लघु मुदतीच्या भांडवली नफ्यासाठी, ज्यावर रळळ भरला गेला आहे अशा नफ्यातून कलम ८० च्या वजावट मिळत नाहीत. या वजावटी या नफ्याव्यतिरिक्त उत्पन्नासाठीच घेता येतात.

 • प्रश्न : मी अनिवासी भारतीय आहे, मी फेब्रुवारी, २०१८ मध्ये एक छोटा प्लॉट ३,२५,००० रुपयांना विकला. हा प्लॉट मी जून, २०११ मध्ये ६०,००० रुपयांना खरेदी केला होता. माझे भारतात दुसरे काहीही उत्पन्न नाही. माझे करपात्र उत्पन्न कमाल करमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा, म्हणजेच २,५०,००० रुपयांपेक्षा, कमी आहे. मला यावर कर भरावा लागेल का? – एक वाचक : इमेलद्वारे

उत्तर : आपण प्लॉट २४ महिन्यांच्या कालावधीपेक्षा जास्त काळासाठी धारण केला असल्यामुळे आपली संपत्ती दीर्घ मुदतीची होते आणि त्यावर होणारा भांडवली नफा हा दीर्घ मुदतीचा आहे. आपल्याला झालेला दीर्घ मुदतीचा नफा खालील प्रमाणे :

 • प्लॉटची खरेदी किंमत रु. ६०,०००
 • आर्थिक वर्ष २०११-१२ सालचा निर्देशांक रु. १८४
 • आर्थिक वर्ष २०१७-१८ सालचा निर्देशांक रु. २७२
 • महागाई निर्देशाकानुसार खरेदी किंमत रु. ८८,६९६
 • प्लॉटची विक्री किंमत रु. ३,२५,०००
 • दीर्घ मुदतीचा भांडवली नफा रु. २,३६,३०४

आपले एकूण उत्पन्न जरी कमाल करमुक्त मर्यादेपेक्षा (म्हणजेच २,५०,००० रुपयांपेक्षा) कमी असले तरी अनिवासी भारतीयांना दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यासाठी या मर्यादेचा फायदा घेता येत नाही आणि तुम्हाला भांडवली नफ्यावर २०% इतका कर आणि त्यावर ३% शैक्षणिक कर असा एकूण ४८,६७८ रुपये कर भरावा लागेल.

आपण निवासी भारतीय असता तर आपल्याला काहीच कर भरावा लागला नसता. कारण आपल्याला कमाल करमुक्त मर्यादेचा फायदा मिळाला असता.

 • प्रश्न : माझे २०१७—१८ या आर्थिक वर्षांसाठी एकूण करदाइत्व ४२,५०० रुपये आहे. माझ्या उत्पन्नातून ३०,००० रुपये इतका उद्गम कर (टीडीएस) कापला गेला आहे. बाकी १२,५०० रुपये कर मला कधी भरावा लागेल, यावर मला काही दंड किंवा व्याज भरावे लागेल का? – विवेक कोरे : इमेलद्वारे

उत्तर : आपला देय कर १०,००० रुपयांपेक्षा जास्त असल्यामुळे आपल्याला अग्रिम कराच्या तरतुदी लागू होतात. हा अग्रिम कर आपल्याला त्या वर्षीचे अंदाजित उत्पन्न आणि कर विचारात घेऊन चार हफ्त्यात भरावा लागतो. अंदाजित कराच्या १५% रक्कम १५ जून पूर्वी, अंदाजित कराच्या ४५% पर्यंत रक्कम १५ सप्टेंबर पूर्वी, अंदाजित कराच्या ७५% पर्यंत रक्कम १५ डिसेंबर पूर्वी आणि अंदाजित कराच्या १००% रक्कम १५ मार्च, २०१८ पूर्वी भरली पाहिजे. ही रक्कम आपण न भरल्यामुळे आपल्याला कलम २३४ क नुसार व्याज दरमहा १% या दराने भरावे लागेल.

२३४ या कलमानुसार व्याज गणताना ज्या रकमेवर व्याज गणले जाते त्या रकमेतील शंभर रुपयांखालील रक्कम विचारात घेतली जात नाही. उदा. देय रकमेची (म्हणजेच १२,५०० रुपयांची) १५% रक्कम १,८७५ रुपये इतकी आहे पण या कलमानुसार व्याज गणताना १,८०० रुपये विचारात घेतले जातात. निवासी भारतीय ज्येष्ठ नागरिकांना (ज्यांच्या उत्पन्नात धंदा किंवा व्यवसायाच्या समावेश नाही) अग्रिम कराच्या तरतुदी लागू नाहीत. या व्याजाशिवाय आपल्याला कलम २३४ ब या कलमानुसार सुद्धा व्याज भरावे लागेल.

कलमानुसार व्याज, करदात्याला प्रामुख्याने दोन परिस्थितीत भरावा लागते, एक, अग्रिम कर भरला नसेल तर किंवा दोन, अग्रिम कर हा एकूण कराच्या ९०% पेक्षा कमी भरला असेल तर.

आपल्या बाबतीत आपण अग्रिम कर भरला नसल्यामुळे आपल्याला या कलमानुसार सुद्धा व्याज भरावे लागेल. हे व्याज एप्रिल पासून सुरु होते. हे व्याज सुद्धा दरमहा १% या दराने भरावे लागेल. समजा हे पैसे तुम्ही ३१ मे, २०१८ पूर्वी भरल्यास २ महिन्याचे, म्हणजेच २५० रुपये व्याज भरावे लागेल. (१२,५००  १% = १२५ रुपये  २ महिने).

(लेखक सनदी लेखाकार आणि कर सल्लागार आहेत. त्यांच्याशी ई-मेल pravin3966@rediffmail.com वर संपर्क साधून आपले करविषयक प्रश्न विचारता येतील.)

First Published on May 28, 2018 12:02 am

Web Title: investment help from loksatta