24 February 2019

News Flash

गुंतवणूक कमी, सट्टा जास्त!

नावामुळे बिटकॉइन हे एखादे चलनी नाणे आहे असे वाटते.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

|| जयंत विद्वांस

नावामुळे बिटकॉइन हे एखादे चलनी नाणे आहे असे वाटते. परंतु कोणत्याही चलनासाठी काही मूलभूत गोष्टी आवश्यक आहेत. त्या पाच गोष्टी सारांशाने पुढीलप्रमाणे सांगता येतील.

प्रत्येक राष्ट्रात त्यांचे मान्यताप्राप्त चलन आहे. भारतात आज रुपया हे विनिमयाचे माध्यम म्हणून मान्य आहे. तसेच प्रत्येक राष्ट्राच्या चलनास फक्त त्या देशाचीच नव्हे जागतिक मान्यता असल्यासारखे आहे. म्हणूनच पाकिस्तानने भारताच्या नोटा छापणे बेकायदेशीर आहे. आज रुपयाची क्रयशक्ती कमी झाली तरीसुद्धा संपूर्ण भारतात रुपयाचे साठवणूक व रूपांतर मूल्य (जवळपास) सारखेच असते. मुंबई-पुणे-नाशिक शहरात किंवा खेडय़ातून हजार रुपये बचत स्वरूपात साठवले तर त्याचे साठवणूक मूल्य बदलत नाही. ज्या शंभर रुपयांच्या नोटेचे मूल्य आज आहे ते अजून पंधरा दिवसांनी शंभर रुपयेच राहणार आहे. चौथे म्हणजे कोणत्याही चलनाच्या मागे त्या देशाची अर्थव्यवस्था (भक्कम) उभी असते.

ज्या वेळेस अर्थव्यवस्था डळमळीत होते त्याच वेळेस त्या चलनाचे अवमूल्यन होते. सर्वमान्यता व सर्वसमावेशकता : आज भारतीय चलनास संपूर्ण भारतभर मान्यता आहे. संपूर्ण भारतात गरीब असो किंवा श्रीमंत, कोणीही शंभर रुपयाची नोट बाळगू शकतो. नोटेवर लिहिल्याप्रमाणे ‘मी ही नोट असणाऱ्या व्यक्तीस रु. शंभर देण्याचे वचन देतो.’ हे प्रत्यक्षात त्या मूल्यावर असलेल्या दोन्ही व्यक्तींचा विश्वास दर्शविते.

यापैकी कोणतीही गोष्ट बिटकॉइनमध्ये आढळून येत नाही. बिटकॉइन हे त्याच्या भरमसाट किमतीमुळे विनिमयासाठी वापरता येणे शक्य नाही. आज एखाद्या दुकानात जाऊन ५०० रुपयांची नोट दिल्यावर बाकी रक्कम दुकानदार परत करेल. हे बिटकॉइन बाबतीत शक्य नाही. याला सोने, चांदीप्रमाणे साठवणूक मूल्य आहे, परंतु बिटकॉइनप्रमाणे एका दिवसात भरमसाट चढ-उतार सोने, चांदीसारख्या दुर्मीळ धातूमध्ये होत नाहीत. बिटकॉइनच्या मागे कोणत्याही अर्थव्यवस्थेचे पाठबळ नाही. बिटकॉइनचा मालक (निर्माण करणारा/ व्यवस्थापक) कोणालाही माहीत नाही. भारताप्रमाणेच पुष्कळ देशांनी याच्या व्यवहारांवर बंदी घातली आहे. भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेने भारतातील सर्व बँकांना बिटकॉइनसंबंधित व्यवहार करण्यावर बंदी घातली आहे.

अर्थशास्त्रीय भाषेत आज ‘एम वन’ म्हणजे एकूण नाणी व नोटा यांचा भारतातील चलनात असलेला साठा २९,७७,५३० कोटी रुपये इतका आहे, तर अमेरिकन डॉलरचा ३,६५,८३० कोटी इतका प्रचंड आहे. या तुलनेत बुद्धिमंत खाणकामगारांनी गणिती पद्धतीने तयार केलेला बिटकॉइनचा साठा नगण्य आहे आणि तो नव्याने निर्माण होण्यासही मर्यादा आहेत. स्वाभाविकच मागणी जास्त आणि पुरवठा अत्यल्प म्हणून बिटकॉइनच्या किमती गगनाला भिडल्या. आज एखाद्या कंपनीच्या शेअरची सुयोग्य किंमत (फंडामेंटल व्हॅल्यू) काय असू शकते हे मांडता येते. गणिती पद्धतीने कितीही प्रयत्न केले तरी बिटकॉइनची किंमत ठरवता येत नाही. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या स्थितीवरून सांगता येते त्या देशाचे चलन वधारणार की खाली जाणार (अंदाज वर्तवता येतो). सर्व चलनात वायदे व्यवहार (फ्यूचर्स व ऑप्शन्स) जगभर चालतात तसे बिटकॉइनचे व्यवहार सर्वत्र होत नाहीत.

डिसेंबर २०१७ पासून शिकागो बोर्ड ऑप्शन्स एक्स्चेंज व शिकागो र्मकटाइल एक्स्चेंजवर बिटकॉइनवर वायदे चालू झाले. वायदे व्यवहार चालू झाल्यावर वाजवी किंमत (फेअर व्हॅल्यू) प्रचलित होऊ शकते, कारण तुमच्याजवळ बिटकॉइन नसतानासुद्धा पुढील वायद्यावर विकता येते. ‘शॉर्ट सेल’ व्यवहार चालू झाल्यावर किमती १७,२८५ अमेरिकी डॉलरवरून १०,९०० डॉलपर्यंत खाली आल्या. १५ मे २०१८ रोजी हीच किंमत ८,४५५ अमेरिकन डॉलरच्या आसपास होती. ही किंमत रोजच थोडी थोडी कमी होत आहे.

किंमत मोठी असल्याने सर्वसामान्य गुंतवणूकदार या वाटेस जात नाही, परंतु ज्यांना ही रक्कम परवडते ते हमखास विचारत असतात, ‘‘मी एखादे बिटकॉइन घेऊ  का?’’ यांच्यापैकी काहींचे हात जिग्नेश शहाच्या स्पॉट एक्स्चेंजमध्ये पोळलेले असूनसुद्धा खुमखुमी कमी झालेली नसते. एका व्यक्तीला मी सहज विचारले, ‘‘आपण शर्यतीत धावणारा एक घोडा खरेदी करूयात का? पाच-सहा जणांनी मिळून दहा-दहा लाख रुपये घालू या. घोडा जिंकला नाही तरी शर्यतीत धावला म्हणून पैसे मिळतात.’’ त्याला सर्व जण नको म्हणतात. का? त्याची माहिती नाही. मग बिटकॉइनची आहे का? नाही. मग अमिताभने कसे घेतले? त्याला काही कोटींचा फायदा झाला ही बातमी आली, पण भाव कोसळल्यावर किती कोटी पाण्यात गेले ही बातमी आली नाही.

रॉबर्ट शिलर यांनी म्हटले आहे, ‘‘बिटकॉइन ही गुंतवणूक कमी आणि सट्टा जास्त आहे.’’ माणसाला गूढ, अपरिचित गोष्टींचे खासच आकर्षण असते. मग त्या हॅरी पॉटरच्या गोष्टी असोत किंवा अवकाशातील हजारो प्रकाशवर्षे दूरची ग्रहमाला असो. तसेच आकर्षण न समजणाऱ्या बिटकॉइनचे किंवा जिग्नेशभाईच्या चालू-उपला कॉन्ट्रॅक्टचे असते.

जॉन केन्स यांनी १९३६ साली असा मुद्दा मांडला होता की, माणूस अनिश्चित, संदिग्ध अशा घटनांचा विचार करताना, संख्यात्मक विश्लेषण आणि शक्याशक्यतांचा विचार न करता, सारासार बुद्धी न वापरता, भावनेच्या भरात उत्स्फूर्त निर्णय घेतो. याला त्यांनी प्राणिवृत्ती (अ‍ॅनिमल स्पिरिट) असे नाव दिले. बाजारात होणाऱ्या किमतीतील चढ-उतारास पुष्कळ लोकांबाबत प्राणिवृत्तीच कारणीभूत असतात असे त्यांनी मांडले. उदाहरणार्थ मिठाच्या टंचाईची आवई निर्माण केली जाते आणि सर्वसामान्य माणूस मीठ खरेदी करण्यासाठी धावतो. भारताला अफाट समुद्रकिनारा लागून असल्यामुळे मिठाची टंचाई शक्यच नाही या विचाराचा सर्वसामान्यांना विसर पडतो. हाच मुद्दा बिटकॉइन खरेदी करण्याच्या वृत्तीस लागू पडतो.

न्यूरोलॉजिस्ट स्कॉट ह्य़ुटेल याने २००६ साली असे सिद्ध केले की अनिश्चित, असंदिग्ध परिस्थितीत निर्णय घेताना माणूस मेंदूचा तो भाग वापरत नाही जो शक्यता (प्रॉबॅबिलिटी), अपेक्षित निर्णय, संख्यात्मक विश्लेषणासाठी असतो. न्यूरोसायंटिस्ट बेंजामिन लू याने असे मांडले आहे की, संदिग्ध परिस्थितीत मानसिक तणावपूर्ण वातावरणामुळे मज्जासंस्थेच्या प्रक्रियेमध्ये बदल घडतो. बिटकॉइनच्या एकंदरच गूढ रचनेत आपण असे गुरफटले जातो.

माणसाच्या उत्क्रांतीच्या काळापासूनच, स्वभावत:च गूढ गोष्टींचे आकर्षण आणि जुगारी वृत्ती बरोबर आल्या आहेत. याला धर्मराजासुद्धा अपवाद नाही तर आपणासारख्या सर्वसामान्य माणसांचे काय? बिटकॉइन आणि शेअर बाजारातील डे ट्रेडिंग हा या जुगारी वृत्तीचाच भाग आहे. बिटकॉइनचा विचार करतानाच १९९९-२००० सालातील केतन पारेखच्या काळातील हिमाचल फ्युचरिस्टिक, ग्लोबल टेली सिस्टीम या कंपन्यांची आठवण झाली. माणूस जुन्या गोष्टी पटकन विसरतो.

बिटकॉइन हा अनिश्चितता आणि प्राणिवृत्तीच्या अभ्यासासाठी उत्तम विषय आहे. जगभर अर्थशास्त्री, मनोविकारतज्ज्ञ आणि न्यूरोसायंटिस्ट एकत्र येऊन माणसाच्या आर्थिक वर्तणुकीच्या (बिहेव्होरल फायनान्स) बाबतचा अभ्यास करीत आहेत. त्यातूनच जुगारी वृत्तीवर रोग या दृष्टीने उपचारपद्धती विकसित होत आहे.

  • बिटकॉइनची नक्कल करीत आज एथरम, रिपल, लिटकॉइन, झेक, डॅश, मोनेरो अशी सहा प्रमुख आणि इतर आभासी चलने निर्माण झाली आहेत. तरी सुरुवात करणारा आभासी चलन म्हणून म्हणून बिटकॉइन हे नाव नजरेसमोर/ लक्षात राहते. आता भारतातही अशा चलनाच्या निर्मितीच्या वावडय़ा उठत आहेत.
  • भारतात निश्चलनीकरणानंतर रु. ५००, १००० च्या नोटा रद्द झाल्याने बिटकॉइनचे नाव ऐकू येऊ लागले. भ्रष्टाचारासाठी हिशेब, नाण्यात सांगितला जाऊ लागला. एक नाणे म्हणल्यावर दहा ग्रॅमचे सोन्याचे, चामडय़ाचे की बिटकॉइनचे हे देणारा समजत असे. सोने आणि बिटकॉइन हे काळा पैसा लपवण्याचे निश्चलनीकरणानंतरचे सुरक्षित साधन बनले.

sebiregisteredadvisor@gmail.com

(लेखक ‘सेबी’द्वारे नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार व सीएफपी पात्रताधारक आहेत)

First Published on June 4, 2018 12:07 am

Web Title: investment in bitcoin