|| अनुराधा सहस्रबुद्धे

या स्तंभातील मागील लेख (सोमवार, ६ मे २०१९) निवृत्तीपश्चात नियोजनावर होता. त्यावर अनेक वाचकांनी त्यांच्यासाठी निवृत्ती नियोजन आणि त्यांच्या मनातील काही निवृत्ती नियोजनाशी संबंधित प्रश्न विचारले होते. आलेल्या ई-मेल्समधून एक प्रातिनिधिक मेल आजच्या नियोजनासाठी निवडली आहे.

कौटुंबिक पाश्र्वभूमी :

सुनील भोसले (४९) हे पुण्यात एका बहुराष्ट्रीय कंपनीत उपाध्यक्ष आहेत. वार्षकि वेतन २६ लाख रुपये असले तरी कर व अन्य वजावटींनंतर खात्यात दरमहा साधारण १.२० लाख रुपये जमा होतात. मासिक खर्चाचा तपशील खालीलप्रमाणे.

दरमहा खर्चाचा तपशील                  हजार रु.

घर खर्च                             ४०

आई-वडिलांना पाठवायची रक्कम       २५

गृहकर्ज हप्ता              ३५

एसआयपी                          ०५

शिल्लक                            १५

पत्नी सीमा (४५) गृहिणी असून मोठी मुलगी श्वेता (२३) नोकरी करत आहे. धाकटी मुलगी सुप्रिया (२१) पदवीच्या शेवटच्या परीक्षेला बसली आहे. नोकरीची शेवटची ११ वष्रे शिल्लक असताना २३ लाख रुपयांची निवृत्ती नियोजनाशी संबंधित बचत उपलब्ध आहे. ही बचत पुरेशी नाही अशी जाणीव झाल्यामुळे आपण निवृत्ती नियोजन केलेले नाही असे त्यांना वाटले.

निश्चित केलेली वित्तीय ध्येये –

१.      सेवानिवृत्तीपश्चात मासिक खर्चासाठी नियमित उत्पन्नासाठी गुंतवणूक

२.      श्वेताच्या लग्नाच्या खर्चाच्या तरतुदीसाठी गुंतवणूक

३.      सुप्रिया लग्नाच्या खर्चाच्या तरतुदीसाठी गुंतवणूक

वित्तीय नियोजकाचा सल्ला :

‘कॉमनसेन्स इज नॉट कॉमन’ अशा आशयाची एक म्हण आहे. व्यवहारज्ञान सर्वाकडेच नसते. या म्हणीचा अनुभव यावा असे सुनील भोसले यांचे आर्थिक वर्तन आहे. नोकरीत मोठीमोठी पदे भूषविणारे आणि नोकरीत जबाबदारीने निर्णय घेणाऱ्या व्यक्ती स्वत:चे लहानसहान निर्णय घेण्यास सक्षम नसतात. सुनील भोसले यांच्या बाबतीत नेमके असेच झाले आहे. नोकरीत मोठी जबाबदारी पार पाडणारे आणि सर्व कौटुंबिक कर्तव्य पार पाडणारे सुनील भोसले स्वत:बाबतचे कर्तव्य पार पाडण्यास विसरले आहेत.

कोणत्याही कमावत्या व्यक्तीच्या आयुष्यात संपत्तीनिर्मितीचे तीन टप्पे असतात. संपत्तीचा संचय, संपत्तीचे संरक्षण आणि संपत्तीचा विनियोग. कमावत्या वयात संपत्तीची निर्मिती होते. साठीनंतर पंधरा वष्रे संपत्तीचे संरक्षण आणि पुढील वष्रे विनियोगाची असतात. आजचा ४० हजाराचा मासिक खर्च सेवानिवृत्त होताना महागाई वाढीचा वार्षकि दर सात टक्के गृहीत धरल्यास ७८ हजार रुपये झालेला असेल. सुनील भोसले यांच्या वयाच्या ७० व्या वर्षी मासिक खर्च दीड लाख रुपये तर ८० व्या वर्षी तीन लाख झालेला असेल. व्याजाचे दर कमी होत असल्याने सेवानिवृत्तीपश्चात २५ वर्षांत गुंतवणुकीवरील परतावा ७ टक्के गृहीत धरल्यास निवृत्तीपश्चात उदारनिर्वाहासाठी १.७८ कोटी रुपयांचा निधी असणे आवश्यक आहे. सध्याची बचत लक्षात घेता सर्वच वित्तीय ध्येयांची पूर्तता करता येणे शक्य नाही. या १ कोटी ७८ लाखांच्या निधीतून अन्य वित्तीय ध्येये पूर्ण करायची आहेत.

पीएफ आणि ग्रॅच्युइटीतील जमा रक्कम २३ लाख रुपये आहे, आणि त्यात दरमहा २३ हजाराची गुंतवणूक होत आहे. या गुंतवणूक होत असलेल्या रकमेत दर वर्षी ३ टक्के वाढ लक्षात घेता हा निधी वाढून एक कोटीचा झालेला असेल. सध्या असलेल्या उत्पन्नातून तरतूद नसलेल्या, परंतु आवश्यक अतिरिक्त ७८ लाख रुपयांसाठी दरमहा ३६ हजाराची गुंतवणूक करणे गरजेचे आहे. नोकरीच्या सुरुवातीपासून बचत केली असती तर हाच ७८ लाखांचा निधी नोकरीच्या ३५ वर्षांत जमा करण्यास केवळ मासिक १,१०० रुपयांची बचत पुरेशी होती. अनेक सुशिक्षित व्यक्ती गुंतवणुकीत महत्त्वाचा असलेला ‘पॉवर ऑफ कम्पाऊंिडग’ अर्थात चक्रवाढ दराचे सामथ्र्य या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. मग संपत्ती संचयाच्या शेवटच्या टप्प्यात अचानक आठवण झाल्यासारखे गुंतवणूक करायला लागतात. अधिक परतावा मिळविण्यासाठी अधिक जोखमीच्या गुंतवणुकीची कास धरतात. हे टाळण्यासाठी नोकरीच्या पहिल्या पगारापासून निवृत्ती नियोजनासाठी गुंतवणूक करायला हवी. यासाठी प्रसंगी व्यावसायिक गुंतवणूक सल्लागाराची मदत घ्यायला हवी. सुनील भोसले यांच्या जोखीमांक चाचणीनुसार ते ‘बॅलन्स्ड’ प्रकारचे गुंतवणूकदार आहेत. या प्रकारच्या गुंतवणूकदारांनी ७० टक्के रक्कम लार्ज कॅप, ३५ टक्के मिड कॅप आणि पाच टक्के स्मॉल कॅप प्रकारच्या फंडात करायला हवी. आवश्यक असलेला निवृत्ती कोष तयार करण्यासाठी फंडांचे पर्याय (बाजूची चौकट पाहावी) सुचवत आहे.

(लेखिका पात्रताधारक वित्तीय नियोजनकार आहेत, akswealth@gmail.com ई-मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल)