01 October 2020

News Flash

आक्रोश इथेही!

जितका कालावधी अधिक तितकी एखाद्या गोष्टीची गुंतवणुकीच्या परताव्यावर परिणाम करण्याची दाहकता कमी असते.

|| वसंत कुलकर्णी

जितका कालावधी अधिक तितकी एखाद्या गोष्टीची गुंतवणुकीच्या परताव्यावर परिणाम करण्याची दाहकता कमी असते. त्यामुळे ‘नमो १’ पर्वात गुंतवणुकीवर पुरेसा नफा झाला नाही म्हणून गोंधळून ‘वंचितां’सारखा आक्रोश करण्याचे कारण नाही.’’ पाच वर्षांसाठी सुरूकेलेल्या ‘एसआयपी’ गुंतवणुकीवर मागील वर्षभरात नफा दिसला नाही म्हणून ‘एसआयपी’ बंद करणे किंवा फंड बदल करणे हे लक्षण वाईटच. समभाग गुंतवणूक दीर्घावधीसाठी असते आणि ‘एसआयपी’ हाच यशाचा एकमेव मंत्र आहे.

माझे आजोबा कांदेवाडीपासून फणसवाडीपर्यंत बेंबटय़ा जोशी या नावाने मित्र परिवारात ओळखले जात. त्यांचे पाळण्यातले नाव धोंडू. शाळेतले नाव धोंडू भिकाजी जोशी. बेन्सन जॉन्सन कंपनीत नोकरीला लागले आणि सेवानिवृत्त झाले. माझे वडील शंकर धोंडोपंत जोशी ऊर्फ ‘शंकऱ्या’ स्टेट बँकेत चिकटले आणि रिटायर होताना ‘स्केल फोर ग्रेड’ पर्यंत पोहोचले. पणजोबा भिकाजी जोशी पण पोस्टात स्टँपसारखे चिकटले, म्हणून नातेवाईक त्यांना पोष्टय़ा जोशी म्हणत. माझे नाव जरी विनायक शंकर जोशी असले तरी जोशी कुलोत्पनांत माझी ओळख ‘पोष्टय़ा जोश्याचा पणतू’ किंवा बेंबटय़ा जोश्याचा नातू अशीच आहे. मी एका विदेशी बँकेत ‘प्रायव्हेट वेल्थ ग्रुप’चा प्रेसिडेंट आहे. दोन वर्षांपूर्वीच सिंगापूरहून मुंबईत आलो. आमचे पणजोबा नेहमी म्हणत, ‘‘ब्रह्मदेवाने ब्राह्मणाच्या नशिबी लिहिल्या गोष्टी दोनच! एक पळी-पंचपात्र आणि दुसरी दौत आणि लेखणी! तिसऱ्या गोष्टीचे भटांस धार्जणिे नाही.’’

कालपरत्वे पळी-पंचपात्र सुटले तशी दौत आणि लेखणीसुद्धा सुटली आणि हाती संगणक किंवा स्मार्ट फोनचा कळफलक आला. देशभरातील आमच्या बँकेच्या क्लायंटना भेटणे आणि त्यांच्या गुंतवणुकीचा जास्तीतजास्त हिस्सा आमच्या व्यवस्थापनाखाली कसा गुंतविला जाईल हे पाहणे हे माझे आणि माझ्या टीमचे काम. आमच्या टीमला क्लायंटकडून ‘‘मागील सहा महिने सतत त्यांच्या म्युच्युअल फंडातील गुंतवणुका का नफा मिळवून देत नाहीत’’ अशी विचारणा होत होती. गेले सहा महिने आम्ही आमच्या परीने आमच्या क्लायंट लोकांचे समाधान करण्याचा प्रयत्न करीत आहोत. ‘नमो-१’ वरून ‘नमो-२’ झाल्याने आमच्या गुंतवणुकांचे पुढे काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

गुंतवणूकदारांना नेहमीच सर्वाधिक नफा देणाराच फंड हवा असतो. मालमत्ता विभाजन, रिस्क अ‍ॅडजस्टेड रिटर्न्‍स या गोष्टी त्यांच्या लेखी बिनकामाच्या. ‘नमो-१’मध्ये मागील पाच वर्षांत (२३ मे २०१४ ते २४ मे २०१९) या काळात एसबीआय स्मॉल कॅप, मिरॅ इमìजग ब्लूचिप, आणि कॅनरा रोबेको इमìजग इक्विटीज या तीन फंडांनी वार्षकि २० टक्क्यांपेक्षा अधिक नफा गुंतवणूकदारांच्या पदरात टाकला आहे, तर आठ फंडांनी वार्षकि १५ टक्क्यांपेक्षा अधिक परतावा दिला आहे. ‘नमो-१’मध्ये स्मॉल कॅप फंडांचा सरासरी वार्षकि नफा २०.८२ टक्के, तर मिडकॅप फंडांचा सरासरी वार्षकि नफा १८.०८ टक्के आहे. मल्टिकॅप फंडांचा सरासरी वार्षकि नफा १४.३२ टक्के तर याच कालावधीतील लार्ज कॅप फंडांचा सरासरी नफा १२.३१ टक्के आहे. २३ मे २०१४ रोजी पाच वर्षांचा इतिहास असलेल्या आणि आमच्या निकषांच्या चौकटीत बसणारे २८७ फंड होते यापकी ५० फंडांची आम्ही आमच्या क्लायंटना गुंतवणुकीसाठी शिफारस केली होती. आम्ही शिफारस केलेल्या ९२ टक्के फंडांनी आपापल्या मानदंड निर्देशांकापेक्षा सरस कामगिरी केली आहे. सर्वाधिक नफा देणाऱ्या १० फंडांपकी आठ फंड हे स्मॉल कॅप आणि मिड कॅप प्रकारात मोडणारे आहेत.

वाचकांनी अभिमान बाळगावा अशी गोष्ट म्हणजे लखलखीत कामगिरी असलेले हे सर्वच फंड ‘लोकसत्ता कत्रे म्युच्युअल फंड’ या शिफारसप्राप्त यादीचा भाग आहेत. २३ मे २०१४  आणि २४ मे २०१९ दरम्यान पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. २२ ऑक्टोबर २०१७ रोजी ‘सेबी’ने परिपत्रक काढून फंडाचे प्रमाणीकरण केले, त्यामुळे मिडकॅप फंडात सध्या ज्यांना मिड कॅप संबोधले जाते असे समभाग १४ ते २४ टक्क्यांच्या दरम्यान होते. सध्या मिड कॅप फंड गटातील फंडांच्या गुंतवणुकीत किमान ६५ टक्के मिड कॅप असणे सक्तीचे आहे. एका अर्थाने ही तुलना त्यामुळे फोल ठरते. अनेक गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ समाधानकारक परतावा देत नसल्याने म्युच्युअल फंडातील ‘एसआयपी’ बंद करण्याकडे गुंतवणूकदारांचा कल आहे.

‘नमो-१’ पेक्षा ‘नमो-२’ मध्ये सत्तारूढ पक्ष अधिक जागा मिळून सत्तेवर आला आहे. ‘नमो-२’ मध्ये सत्तारूढ पक्ष ‘नमो-१’पेक्षा अधिक आक्रमकपणे आर्थिक सुधारणा कार्यक्रम राबवेल असे आमचे मत आहे. गुंतवणूकदार नवा असो अथवा जुना सगळ्यांच्याच गुंतवणुकीवर तोटा झालेला दिसत आहे. पहिली गोष्ट सगळ्यांच्याच गुंतवणुकीवर तोटा झालेला दिसतो कारण आधी उल्लेख केल्यानुसार मोजके समभाग वगळता बहुतांश समभाग त्यांच्या सार्वकालिक उच्चांकापासून दूर आहेत. मागील वर्षभरात विस्तृत समभाग मोठय़ा घसरणीला सामोरे गेले आहेत. जेव्हा अशा प्रकारची घसरण होते तेव्हा चांगले व्यवस्थापन आणि चांगला ताळेबंद असलेल्या कंपन्यांची घसरण अन्य समभागांच्या घसरणीच्या तुलनेत कमी होते. जानेवारी २०१८ नंतर वेळोवेळी झालेल्या घसरणीत दर्जेदार कंपन्यांच्या मूल्यातसुद्धा घसरण झाली. अशावेळी तुमचे गुंतवणूक सल्लागार या नात्याने मालमत्ता विभाजन निश्चित केले आहे. त्यात घसरणीमुळे बदल करू नये असेच आमचे सांगणे असते. मिड कॅप, स्मॉल कॅपमध्ये घसरण झाली म्हणून या फंडातील ‘एसआयपी’ बंद करण्याची आवश्यकता नाही. सध्याचा काळ हा कसोटीचा आहे. मिड आणि स्मॉल कॅप फंडांतील ‘एसआयपी’ गुंतवणुकीने मागील पाच वर्षांत वार्षकि १२ ते १४ टक्के दराने परतावा दिलेला आहे. हाच कालावधी २० वर्षांचा केलात तर परताव्याचा वार्षकि दर यापेक्षा थोडा अधिक आहे. या २० वर्षांत किमान सात पंतप्रधान, डझनभर अतिरेकी हल्ले, दोन युद्धं, कितीतरी भ्रष्टाचार उघड झाले. जितका कालावधी अधिक तितकी एखाद्या गोष्टीची गुंतवणुकीच्या परताव्यावर परिणाम करण्याची दाहकता कमी असते. त्यामुळे गुंतवणुकीवर पुरेसा नफा होत नाही म्हणून गोंधळून ‘वंचितां’सारखा आक्रोश करण्याचे कारण नाही. समभाग गुंतवणूक वर्षां दोन वर्षांसाठी नसून दीर्घावधीसाठी असते. साहजिकच अशा अस्थिर वातावरणात ‘एसआयपी’ हा यशाचा एकमेव मंत्र आहे. दीर्घ काळ केलेली ‘एसआयपी’ नक्कीच चांगला परतावा देते. जेव्हा जेव्हा बाजार एखाद्या घटनेला प्रतिसाद देत मोठी घसरण नोंदवतो तेव्हा तेव्हा गुंतवणुकीत समभाग मात्रा वाढविणे अधिक फायद्याचे ठरते.

मालमत्तेचे विभाजन हे आर्थिक नियोजनाच्या वेळी करायची गोष्ट असते. एखाद्या वर्षी मिड कॅपने चांगला परतावा दिला किंवा लार्ज कॅपने दिला म्हणून मालमत्तेचे विभाजन बदलायचे नसते. निर्देशांकाच्या उत्सर्जनाचा विचार केला तर, त्या निकषावर स्मॉल कॅप महाग वाटले तरी मिड आणि स्मॉल कॅप समभागांच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे स्मॉल कॅप फंडात नवीन गुंतवणुकीची संधी उपलब्ध झाली आहे. स्मॉल कॅप समभागांचे सध्याचे मूल्यांकन पाहता स्मॉल कॅप फंडांना थोडा अधिक वाटा देणे गरजेचे आहे. लार्ज कॅप की मिड कॅप आणि स्मॉल कॅप हा मूल्यांकनाचा विषय नसून जोखिमांक, वित्तीय ध्येये पूर्ण करण्यास उपलब्ध असलेला कालावधी यावर ठरत असते. इतकेच सांगावेसे वाटते की सध्याच्या पातळीवर स्मॉल कॅप फंडात टप्प्याटप्प्याने नव्याने गुंतवणूक सुरू करणे लाभदायक ठरू शकेल. असे आमचे आमच्या क्लायंटना सांगणे असते.

निवडणूक निकालांच्या पाश्र्वभूमीवर आजोबांची आठवण आली. त्यांना सगळ्या पक्षाच्या पुढाऱ्यांची मते पटत असत. पन्नास वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत ‘‘शेतकऱ्यांच्या झोपडय़ातून भूक भूक अशा आरोळ्या ऐकू येत आहेत आणि भांडवलदारांच्या हवेल्यातून नाचरंग चालले आहेत. सांगा अशावेळी भांडवलदारधार्जण्यिा कॉंग्रेस पक्षाला मत देणार की आम्हाला? सांगा बापूजींच्या आत्म्याला हे दैन्य दारिद्रय़, लाचलुचपत, ही लबाडी पाहून काय वाटत असेल?’’ अशी भाषणे होत. आजोबांना मात्र बिचाऱ्या बापूजींचा आत्मा शिवाजी पार्कवरून चौपाटीवर आणि चौपाटीवरून कामगार मदानावर पतंगासारखा उडतोय आणि प्रत्येक जण आपापल्या मांजाने तो पतंग काटायला बघत असतो, असे वाटत असे. मात्र जिंकलेल्या उमेदवाराच्या सत्काराच्या सभेला चप्पल पिशवीत टाकून आजोबा पहिल्या रांगेत हजर असत. आजोबा म्हणत – ‘‘आज पन्नास वर्षांनतर झालेला निवडणूक प्रचार पाहून बापूंच्या आत्म्याला शांती लाभली असेल काय हा प्रश्नच आहे.’’ पाच वर्षांसाठी सुरूकेलेल्या एसआयपी गुंतवणुकीवर मागील वर्षभरात नफा दिसला नाही म्हणून एसआयपी बंद करणे किंवा फंड बदल करणे हे न बदलणाऱ्या माणसांचे लक्षण आहे. मुगभाटातला गुंतवणूकदार असो किंवा मलबार हिलवर राहणारा असो ‘एसआयपी’ बंद करण्याचा विचार दोघांच्या डोक्यात एकाच वेळी येतो. आणि म्हणूनच ‘जग इतकं भराभर बदलतंय की काही समजेनासं होतंय, मात्र जग बदललं तरी माणसे तीच असतात.’ या वाक्याची आठवण मात्र राहून राहून येते.

shreeyachebaba@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2019 4:16 am

Web Title: investment in india 3
Next Stories
1 झाले मोकळे आकाश..
2 कठीण शब्दे वाईट वाटते। तें तों प्रत्ययास येते।।
3 इच्छापत्र : समज-गैरसमज – ‘ट्रस्ट’चे फायदे-तोटे
Just Now!
X