|| अजय वाळिंबे

पोर्टफोलियोचा सहामाही आढावा

‘माझा पोर्टफोलियो’ने आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत केलेली कामगिरी तसेच कॅलेंडर वर्षांच्या पहिल्या सहा महिन्यांची त्याची कामगिरी तशी वाईट नाही. कारण पोर्टफोलियोसाठी सुचविलेले शेअर्स हे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी असतात. सुचविलेले शेअर्स टप्प्याटप्प्याने घ्यायचे धोरण ठेवले असेल तर तुम्हाला प्रत्यक्षात कदाचित नुकसान झालेही नसेल. ज्या काही शेअर्समध्ये नुकसान दिसत आहे त्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून सरासरी करण्याचे धोरण काही शेअर्सच्या बाबतीत फायद्याचे ठरू शकेल.

रिझव्‍‌र्ह बँकेचे पतधोरण नुकतेच जाहीर झाले आणि अपेक्षेप्रमाणे रेपो दरात ०.२५ टक्के कपात करण्यात आली. मात्र तरीही शेअर बाजारात द्रवणीयता आणि सध्या अडचणीत असलेल्या बँकेतर वित्तीय कंपन्या – एनबीएफसीमुळे नराश्याचे वातावरण कायम राहिले. आगामी कालावधीतदेखील रिझव्‍‌र्ह बँकेकडून व्याज दर कपातीचे धोरण चालू राहील अशी अपेक्षा असली तरीही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील व्यापारी युद्ध, कच्च्या तेलाच्या किमती, दुष्काळाचे सावट, अनुत्पादित कर्जाची समस्या, गृहवित्त आणि एनबीएफसी कंपन्यामधील द्रवणीयता अशा अनेकविध कारणांमुळे शेअर बाजारावर मंदीचे सावट आहे.

या मंदीच्या वातावरणात सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकातील अधूनमधून होणारी वाढ दिलासा देणारी असली तरीही केवळ ठरावीक शेअर्समध्येच वाढ होत असल्याने सामान्य गुंतवणूकदार गोंधळात आहे. गुंतवणूकदारांसाठी सध्याची वेळ ही संयम दाखवण्याची आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅपमधील गुंतवणूक नजीकच्या काळात परतावा देण्याची शक्यता कमी आहे. गेल्या ऑगस्टमध्ये ‘आयएलएफएस’कडून कर्जफेड टाळली गेल्याने सुरू झालेली चिंता नंतर एस्सेल, डीएचएफएल अशा घटनांमधून काही ना काही कारणांनी वाढतच गेली आहे. ‘सेबी’ लवकरच या बाबतीत काहीतरी ठोस पावले उचलेल अशी आशा आहे.

निवडणुकांचे निकाल लागल्यावर शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले ते अपेक्षित अर्थसंकल्प जाहीर झाल्यावर अजून बहरेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी पुन्हा उत्साहाने शेअर बाजारात गुंतवणुकीला सुरुवात करावी. अर्थात ‘माझा पोर्टफोलियो’ हा दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी असल्याने गुंतवणुकीत सातत्य आणि अर्थात संयम आवश्यक आहेच.