|| जयंत विद्वांस

जोखीम व अनिश्चितता यातील फरक समजून घ्या. अमेरिका-इराण युद्ध होईल का? या वर्षी पाऊस चांगला होईल का? पुन्हा नोटाबंदी होईल का? या सर्व अनिश्चितता आहेत. या उलट शेअर बाजार वर-खाली होणे, कंपन्यांच्या किंवा पतपेढीमधील ठेवी बुडणे ही जोखीम आहे. जोखीम टाळता येते. अनिश्चितता टाळता येत नाही..

मागील लेखासंबंधाने बराच वाचक प्रतिसाद दिसून आला. त्यातल्या काही निवडक पत्रांची दखल घ्यावीशी वाटते. पुष्कळ ज्येष्ठ नागरिकांनी सोन्यामधील नातवंडांसाठीची गुंतवणूक न केल्यास पर्यायी गुंतवणूक काय करावी, असे विचारले आहे. एक आजी आपल्या नातीसाठी सुकन्या समृद्धी खात्यामध्ये दरवर्षी दीड लाख रुपये गुंतवणूक करतात. त्यांचा मुलगा एका खासगी क्षेत्रातील कंपनीत मोठय़ा हुद्दय़ावर आहे. तो मुलीच्या नावाने म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतो. पशाची कमतरता नसेल आणि पसे कुठे ठेवायचे, हाच प्रश्न असेल तर आहे तसेच चालू राहू द्या.

एक आजोबा परदेशात स्थायिक झालेल्या नातवंडांच्या वाढदिवसाला दरवर्षी म्युच्युअल फंडाच्या लहान मुलांच्या योजनांमध्ये थर्ड पार्टी डिक्लरेशन देऊन गुंतवणूक करतात. ही रक्कम त्या त्या नातवंडाच्या अठराव्या वर्षी त्यांच्या नावाने त्यांच्या भारतातील खात्यात जमा होणार. अठराव्या वर्षांनंतर पुनर्खरेदीच्या वेळी रुपयाचे किती अवमूल्यन झाले असू शकेल? किंवा परदेशात शिकण्याचा खर्च किती असू शकेल? परदेशातील आपली मुले त्यांच्या मुलांसाठी हा खर्च करू शकणार नाहीत का? किंवा त्या वेळची सामाजिक परिस्थिती कशी असू शकेल? अठराव्या वर्षी नातवंडांच्या हातात ही रक्कम देऊन चालेल का? हा काहीही विचार केलेला नाही. नातवंडांसाठी गुंतवणूक हा प्रश्न भावनात्मक अधिक आणि आर्थिक फार कमी आहे. चीन व भारतात ‘सिक्स पॉकेट सिंड्रोम’ हा प्रकार मोठय़ा प्रमाणावर आढळून येतो. ‘एक कुटुंब, एक अपत्य’च्या जमान्यात एकुलत्या एक आई-वडिलांचे एकुलते एक नातवंड असते. त्यामुळे त्या नातवंडावर आई-वडिलांबरोबरच दोन कमावत्या (किंवा निवृत्त) आज्या आणि दोन निवृत्त आजोबा प्रेमाचा (पशाचा) वर्षांव करीत असतात.

एका निवृत्त उच्चपदस्थ व्यक्तीने शेअर्स किंवा म्युच्युअल फंडामधील गुंतवणुकीबद्दल काहीही माहिती नाही. म्हणून आपली सर्व पुंजी सोने व भरपूर जमीन खरेदी करून गुंतविली आहे. काही प्रमाणात बँकांमध्ये ठेव स्वरूपात ठेवली आहे. आपण जमिनीत किंवा स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करताना आपल्या जवळपासची किंवा आपल्या जिल्ह्य़ातील जमीन निवडतो. स्थावर मालमत्ता निवडताना आपल्या शहरातील किंवा बाजूच्या शहरातील मालमत्तेमध्ये गुंतवणूक करतो. ही गुंतवणूक करताना सोय बघितली जाते. त्यामधील व्यवहार्यता तपासली जात नाही. म्हणूनच बुर्ज खलिफा किंवा लंडनमधील स्थावर मालमत्तेत गुंतवणुकीचा विचारसुद्धा करत नाही. या उलट स्थावर मालमत्तेमधील व्यावसायिक गुंतवणूकदार मुंबई-पुण्यातून बाहेर पडून पर्यायी परदेशातील स्थाने शोधत आहेत.

जमीन-जुमला आणि सोने-चांदी यामध्ये काळा पसा मोठय़ा प्रमाणावर असतो, हे सर्वश्रुत आहे. मोदींच्या दुसऱ्या इिनगमध्ये सर्जिकल स्ट्राइक झाल्यास याच्या किमती कोसळू शकतात. पण हा सर्जिकल स्ट्राइक नोटाबंदी करण्यापेक्षाही खूप कठीण आहे. त्यामुळे लगेच गर्भगळीत होण्याचे कारण नाही.

काही वाचकांनी ‘नकुशा मालमत्ता’ वाचून गुंतवणूक कुठे करावी, असे विचारले आहे. हा लेख लिहिण्यापूर्वी ६ मेच्या लेखात गुंतवणूक कशी करावी हे लिहिले होते. खूप जणांना त्याचे विस्मरण झाले असावे. तर काही जणांनी ‘थ्री बकेट्स’ हा लेख अजून विस्ताराने मांडा, असे लिहिले आहे.

गुंतवणूक करण्यापूर्वी आपली जोखीम क्षमता व जोखीम घेण्याची वृत्ती याचा अंदाज घ्या. आपली जोखीम घेण्याची वृत्ती नसेल पण क्षमता असेल तरी उतारवयात ‘अ’ बकेटमध्ये (जोखीमयुक्त गुंतवणुका) हात घालू नका. तसेच जोखीम घेण्याची वृत्ती असेल पण क्षमता नसेल तर नसते धाडस करू नका. गुंतवणूक करण्यापूर्वी योजनेची संपूर्ण माहिती मिळवा. म्युच्युअल फंड योजना आणि बँक ठेवी यात खूप फरक आहे. एका प्रतिष्ठित खासगी क्षेत्रातील बँकेने त्यांच्या परिवारातील म्युच्युअल फंडाची बॅलन्स फंड योजना, मासिक प्राप्ती योजना म्हणून सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या गळ्यात मारली. टायवाल्या एमबीएने वर अजून सांगितले की, आमची बँक मुदत ठेवीवर ७ टक्के वार्षिक व्याज देते. तर ही योजना १ टक्का महिना व्याज देते. ही योजना अशा पद्धतीत विकून त्याची गंगाजळी ३५ हजार कोटींच्या पुढे नेऊन ठेवली. कोणत्याही पद्धतीत शेअर बाजाराची जोखीम लक्षात आणून दिली गेली नाही. दोन वर्षांनी पसे काढून मागितल्यावर फक्त ८० टक्के रक्कम हातात दिली. फेरवर्गीकरणामुळे या योजनेचे नाव पुढे बदलले. गुंतवणूक करताना कमी जोखीमयुक्त (‘ब’ बकेट) गुंतवणूक भासवून जोखीमयुक्त (‘अ’ बकेट) गुंतवणूक केली गेली.

खूप जणांनी ‘ब’ बकेटची कमी जोखीमयुक्त गुंतवणूक सहकारी पतपेढय़ांमध्ये किंवा कंपनी ठेवींमध्ये जास्त व्याजासाठी गुंतविल्यास चालेल काय? असे विचारले आहे. ‘ब’ बकेटची गुंतवणूक ही जवळपास जोखीममुक्त स्वरूपात सांगितली आहे. निवृत्तीनंतर आपण कोणती गुंतवणूक जोखीमयुक्त आहे हे समजून विचार करून करणे आवश्यक आहे. म्हणूनच १५ लाख रुपये ‘वरिष्ठ  वयवंदन योजना’ आणि दुसरे पंधरा लाख ‘ज्येष्ठ नागरिक गुंतवणूक योजना’ या सरकारी योजनांमध्ये गुंतविण्यास सुचविले आहे. दोन्ही केंद्र सरकारच्या योजना असल्याने यात मुद्दल सुरक्षित आहे.

खूप जणांनी सीकेपी बँकेत पसे बुडाल्याचा उल्लेख केला आहे. पतपेढय़ा किंवा छोटय़ा बँकांमध्ये ठेवी ठेवताना जोखीम किती घेता येणे शक्य आहे, याचा अंदाज घ्या. आपले प्रॉव्हिडंट फंड व ग्रॅच्युईटीचे पसे (आयुष्यातली शेवटची पुंजी) किंवा मुलांच्या लग्नासाठीचे सर्व पसे एकरकमी छोटय़ा संस्थांमध्ये गुंतवण्याचा जुगाड करू नका.

कंपनींच्या ठेवी ‘ट्रिपल ए’ रेटिंगच्या आहेत, म्हणजे जोखीम शून्य आहेत असे होत नाही. ट्रिपल ए रेटिंगची पूर्वी लॉईट फायनान्स कंपनी आणि आताची दिवाण हाऊसिंग सहा महिन्यांत ‘डिफॉल्टर’ झाली. म्युच्युअल फंडाच्या बॉण्ड फंड/क्रेडिट रिस्क फंडांमध्येसुद्धा जोखीम असते. ज्या योजनांमध्ये दिवाण हाऊसिंग, एस्सेल ग्रुप, आयएल अ‍ॅण्ड एफएस सारख्या संस्थांमध्ये गुंतवणूक केलेली होती, त्यांचा गेल्या काही महिन्यांतील परतावा उणे आहे.

एका वाचकाने १५ टक्के व्याजाच्या रोखे स्वरूपातील ‘पीएमएस’ योजनेबद्दल माहितीपत्रक पाठवून त्यात गुंतवणूक करू का? असे विचारले आहे. माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचले असता, कमीत कमी गुंतवणूक २५ लाख रुपये आहे आणि जवळपास ६० टक्के गुंतवणुका ‘ए मायनस’ किंवा त्याच्याही खालच्या रेटिंगच्या आहेत. या योजनेमध्ये तुमच्या डिमॅट अकाऊंटला गुंतवणूक केलेल्या कंपन्यांचे रोखे जमा होतात. ही पीएमएस योजना ‘सेबी’द्वारा नोंदणीकृत पीएमएस संस्थेमार्फत राबवली जात आहे. आपल्याकडे भरपूर वरकड गंगाजळी असेल व मोठी जोखीम घेण्याची आपली कुवत असल्यास या योजनेत सहभागी व्हावे.

एका वाचकाने ‘अ’ बकेटमधील गुंतवणूक डेरिव्हेटिव्हजमध्ये गुंतवून चालेल का? आपण यासाठी मार्गदर्शन कराल का? असे विचारले आहे. निवृत्तीनंतर काही ज्येष्ठ नागरिक वेळ जायचे साधन म्हणून शेअर बाजारात नऊ ते साडेतीन टर्मिनलसमोर जाऊन बसतात. डेरिव्हेटिव्हज हा प्रकार आपला पोर्टफोलियो सुरक्षित करण्यासाठी (हेजिंग) आहे. आपण त्याचा वापर सट्टेबाजीसाठी करू नये. वॉरेन बफे यांनी म्हटले आहे की, डेरीव्हेटिव्हज खेळणारा माणूस टाइम बॉम्बवर बसलेला असतो. ज्याचा स्फोट कधी होईल कोणालाच माहीत नाही.

जोखीम व अनिश्चितता यातील फरक समजून घ्या. अमेरिका-इराण युद्ध होईल का? या वर्षी पाऊस चांगला होईल का? पुन्हा नोटाबंदी होईल का? या सर्व अनिश्चितता आहेत. याउलट शेअर बाजार वर-खाली होणे, कंपन्यांच्या किंवा पतपेढीमधील ठेवी बुडणे ही जोखीम आहे. जोखीम टाळता येते. अनिश्चितता टाळता येत नाही.

उतारवयात छोटेसे नुकसानसुद्धा सोसण्याची ताकद/वृत्ती नसते. सर्वाना एकच सांगणे. योग्य निवृत्ती नियोजनकाराचा सल्ला घेऊन आपल्या गुंतवणुका करणे, पुढील काळात गरजेचे आहे. आर्थिक नियोजनकारांपेक्षाही निवृत्ती नियोजनकार हा ‘सुपर स्पेशलाइज्ड’ असतो.

sebiregisteredadvisor@gmail.com

(लेखक सेबीद्वारे नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार व सीएफपी पात्रताधारक आहेत.)