|| वसंत कुलकर्णी

गंपू जन्माला आला तो हितचिंतक म्हणूनच. जन्माला येणारा प्रत्येक जीव भोकाड पसरून येतो; पण गंपूने आईला नसले तरी सुईणीला तरी नक्की विचारले असेल, ‘कसं काय गोपिकाबाई, तब्येत ठीक आहे ना?’ गंपू जन्माला आला तोच उपकारापुरता आला! केवळ आईची वासल्यभावना तृप्त करणे आणि वडिलांना वारसाची सोय करणे यापलीकडे गंपूच्या जन्माला येण्याचा दुसरा हेतू नसावा. इतका उपकारी पुरुष या भूतलावर नांदला असेल की नाही देव जाणे! गंपू कपडे शिवून घेतो तो बाबूराव शिंप्याचा धंदा चालावा म्हणून, जेवतो तो किरण भुसार दुकानदारावर उपकार म्हणून, सरकारी कचेरीत नोकरी करतो तो पंचवार्षकि योजना यशस्वी व्हाव्यात म्हणून, शाळा-कॉलेजातदेखील मास्तरा-प्रोफेसरांची चूल पेटावी म्हणून आणि लग्न केले तेसुद्धा सासऱ्यांचा एक नवमांश भार उतरावा म्हणून.

आजोबांचे गुण नातवात येतात असे म्हणतात. गंपूचा ‘उरलो उपकारापुरता’ हा गुण त्याच्या नातवात अजितमध्येसुद्धा आला असावा. अजित फंड, विमा आदी उत्पादने विकत घेतो तेदेखील परोपकाराच्या भावनेने; विमा आणि म्युच्युअल फंड वितरकांची चूल पेटावी म्हणून.

एक दिवस अजितच्या मोबाइलवर एक संदेश आला. ‘आत्ता गुंतवणूक करा आणि आयुष्यभर निश्चिंत व्हा, हवी तेव्हा पेन्शन सुरूकरा आणि तहहयात पेन्शन मिळावा.’ अशा थाटाचा तो संदेश होता. सोनाली राजाध्यक्ष ही अजितची विमा सल्लागार, तिच्याकडून हा मेसेज आला होता. एक विमा कंपनी आयुष्यभराची ‘शांती’ जीवनभर देणार असेल तर हे उत्पादन खरेदी करण्यास काहीच हरकत नसावी असा अजितचा समज झाला.

अजितचे वडील श्रीकृष्ण हा माझ्या शाळेपासूनचा मित्र म्हणून. आम्ही महिनोन्महिने भेटतही नाही; पण भाजी बाजारात, एखाद्या रविवारी सकाळी नाभिकाच्या दुकानांत हजामतीसाठी लावलेल्या रांगेत, कॉलनीत एखादे निधन झाल्यावर अंत्ययात्रेत आमची गाठ पडते. विमा, म्युच्युअल फंड इत्यादीची विक्री हा माझा व्यवसाय नसला तरी यात मला उत्तम गती आहे असा माझा मित्रमंडळात लौकिक आहे. त्यामुळे मंडळी नेहमीच ‘सेकंड ओपिनियन’ घेण्यासाठी माझा सल्ला घेत असतात. माझा हा लौकिक अजितला चांगलाच ठाऊक होता. हे उत्पादन घेऊ का, असे विचारण्यासाठी अजित भेटायला आला.

‘‘काका, मला ‘जीवनभर शांती’ लाभावी म्हणून हे उत्पादन मी घ्यावे अशी सोनालीची इच्छा आहे. माझ्या या निर्णयावर मी तुम्ही शिक्कामोर्तब करण्याची वाट पाहात आहे.’’

‘‘कोणतेही विमा किंवा म्युच्युअल फंड उत्पादन हे परिपूर्ण चांगले नसते. प्रत्येक उत्पादनात काही तरी खोट असतेच आणि ही खोट समजून घेऊन एखादे उत्पादन खरेदी केले तर त्याचा पूर्णपणे लाभ घेता येतो. हे उत्पादन खरेदी करण्याचे काही फायदे आहेत, तशा या उत्पादनातसुद्धा काही त्रुटी आहेत. अन्य विमा विक्रेत्यांप्रमाणे सोनालीनेसुद्धा तुला फक्त या उत्पादनाचे फायदे सांगितले. या उत्पादनाची डावी बाजू तुझ्यापासून हेतूपूर्वक लपवून ठेवली. विमा विक्रेता किंवा म्युच्युअल फंड विक्रेता उत्पादनाचे फायदे सांगत असतो; पण उत्पादनाच्या मर्यादा कधीच स्पष्ट सांगत नाही. उदाहरण द्यायचे तर म्युच्युअल फंड विक्रेते नेहमीच ‘एसआयपी’च्या पूर्वपरताव्याबद्दल बोलतात; पण भविष्यातील परताव्याची खात्री देता नाही हे सांगत नाहीत. ‘सेबी’ने सांगूनदेखील म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बाजार जोखमींच्या अधीन असते, हे सांगणे सोयीस्करपणे टाळतात. बाजार जोखीम म्हणजे काय? बाजारात अस्थिरता असते म्हणजे नेमके काय? याबाबत ते गुंतवणूकदाराला कधीच सजग करीत नाहीत. या उत्पादनाबाबतीतदेखील तिने काही गोष्टी तुझ्यापासून दडवून ठेवल्या आहेत.’’

‘‘जीवनात शांती मिळवून देणारे हे उत्पादन देशातील सर्वात मोठय़ा विमा कंपनीचे उत्पादन आहे. या उत्पादनाचे वैशिष्टय़ म्हणजे पेन्शन २० वर्षांच्या आत कधीही सुरू करता येते. ‘सिंगल प्रीमियम पॉलिसी’ या प्रकारात मोडणारे हे उत्पादन खरेदी करण्यासाठी एकदाच विमा हप्ता भरायचा आहे आणि हप्त्याच्या ११० टक्के तुला विमाछत्र मिळेल.’’

‘‘हे उत्पादन खरेदी केल्यावर तुझ्यासमोर तीन गोष्टींची शक्यता आहे. तुझी पेन्शन सुरू होण्यापूर्वी तुझा मृत्यू होईल ही पहिली शक्यता, पेन्शन सुरू झाल्यावर लगेचच तुझा मृत्यू होईल ही दुसरी शक्यता आणि दीर्घ काळ तू पेन्शन उपभोगशील आणि मृत्यूनंतर विमाछत्राइतके पसे तुझ्या वारसांना मिळतील. या तीन शक्यतांचे वेगवेगळे परिणाम होणार आहेत.’’

‘‘विमा विक्रेतीने तुझे उदाहरण घेऊन दाखविल्यानुसार तुला सातव्या वर्षी १०.६२ टक्के वार्षकि दराने पेन्शन मिळणार आहे. हा दर काढताना तिने तुला भरावा लागणारा वस्तू आणि सेवा कराचा अंतर्भाव केलेला नाही. वस्तू आणि सेवा कर गृहीत धरल्यास पेन्शनचा दर १०.५८ टक्के येतो. पहिली सात वर्षे तुला तुझ्या गुंतवणुकीवर एकाही पशाची आवक मिळणार नाही हा कालावधी गृहीत धरल्यास पेन्शनचा दर ५.६७ टक्केच आहे. दुसरा दोष ही गुंतवणूक लौकिक अर्थाने रोकडसुलभ नाही. तुला पसे लागले तर तुला कर्ज घ्यावे लागेल आणि तिसरा आणि सर्वात मोठा दोष हे उत्पन्न करपात्र आहे. तू भरलेल्या हप्त्याच्या १० पट विमाछत्र नसल्याने हे उत्पन्न तुझ्या त्या वर्षीच्या उत्पन्नात गणले जाईल आणि तू ३० टक्के कर कक्षेत असल्यास तुझ्या पेन्शनचा परतावा दर १०.६२ टक्के न येता ५ टक्क्यांहून कमी येतो.’’

‘‘निश्चित उत्पन्नाची खात्री आणि तुझ्या मृत्यू विम्याचे पसे तू नामनिर्देशित केलेल्या वारसांना मिळण्याची खात्री आहे. जोखीम आणि परतावा यांचे प्रमाण नेहमीच व्यस्त असते. या गुंतवणुकीत परतावा मिळण्याची खात्री असल्याने परतावा कमी असला तरी व्याजदर कमी होण्यामुळे पेन्शन कमी होण्याचा धोका अजिबात नाही. तुझा जोखीमांक आणि या गुंतवणुकीची डावी बाजू लक्षात घेऊन गुंतवणूक करण्याने तुला ‘जीवनभर शांती’ मिळेल असे वाटत असेल तर तू या योजनेत गुंतवणूक जरूर कर.’’

‘‘धन्यवाद काका, तुम्ही मला या गुंतवणुकीचे फायदे आणि तोटे समजावलेत. घरी जाऊन तुमचे म्हणणे सांगतो आणि चर्चा करून निर्णय घेतो,’’ अजित म्हणाला.

shreeyachebaba@gmail.com