|| अजय वाळिंबे

काही मोजक्या मराठी यशस्वी उद्योग घराण्यांपैकी एक किर्लोस्कर समूह आहे. एका शतकाहून जास्त काळ हा समूह यशस्वीरीत्या अनेक उद्योगांत, मुख्यत्वे इंजिनीयरिंग व्यवसायात कार्यरत आहे. किर्लोस्कर ब्रदर्स ही १९२० मध्ये स्थापना झालेली अशीच एक यशस्वी इंजिनीयरिंग कंपनी आहे. पंप आणि कॉम्प्रेसरचे उत्पादन करणारी ही जागतिक स्तरावरील उत्तम कंपनी मानली जाते. औद्योगिक, शेतकी तसेच घरेलू वापरासाठी विविध प्रकारच्या पंपचे उत्पादन करणारी ही कंपनी अनेक पायाभूत प्रकल्पांसाठीदेखील विविध इंजिनीयरिंग उत्पादनांचा पुरवठा करते. यात मुख्यत्वे पाणीपुरवठा, जल-सिंचन प्रकल्प, ऊर्जा तसेच तेल आणि वायू प्रकल्प, संरक्षण इ. चा समावेश होतो. २००३ मध्ये किर्लोस्कर ब्रदर्सने इंग्लंडमधील एसपीपी पंप ही कंपनी ताब्यात घेतली. त्यानंतर या कंपनीची उपकंपनी अमेरिकेत अटलांटा येथे स्थापन केली. त्यानंतर कंपनीने जागतिक बाजारपेठेत पाय रोवताना थायलंड, जपान, नेदरलँड्स, इजिप्त, दक्षिण आफ्रिका, तसेच युरोपमधील अनेक कंपन्या ताब्यात घेतल्या अथवा स्थापन केल्या. भारतामध्ये कंपनीचे आठ कारखाने असून परदेशांत सात कारखाने आणि पॅकेजिंग युनिट्स आहेत. कंपनीचे भारतात १२,७०० तर परदेशांत ८० चॅनल पार्टनर आहेत. कंपनीचे मार्च २०१८ साठी संपलेल्या आर्थिक वर्षांचे निकाल अपेक्षेप्रमाणे नाहीत. या आर्थिक वर्षांत कंपनीच्या उलाढालीत ६.९ टक्के वाढ होऊन तो १९१२.५ कोटीवर गेला आहे तर ६५.६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. गेल्या आर्थिक वर्षांच्या तुलनेत तो ९९ टक्के जास्त आहे. जीएसटीचा सकारात्मक परिणाम कंपनीच्या कामगिरीवर होत आहे. सौर ऊर्जा प्रकल्पासाठी कंपनीकडे सध्या अनेक सरकारी प्रकल्प असून कंपनीचे आगामी कलावधीसाठी ऑर्डर बुकदेखील उत्तम (रु. २,१४९ कोटी) आहे. गेल्या वर्षांत कंपनीने जवळपास ३० नवीन उत्पादने बाजारात आणली आहेत. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती कंपनीच्या पथ्यावर पडतील. आगामी कालावधीत कंपनीच्या आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत प्रकल्पांकडून भरीव कामगिरी अपेक्षित आहे. केवळ १५.९ कोटी रुपये भागभांडवल असलेली ही कंपनी तुम्हाला येत्या दोन वर्षांत तुमचा पोर्टफोलियो भरीव करून दाखवेल यात शंका नाही.