|| अनुराधा सहस्रबुद्धे

छंद किंवा आवडी जोपासण्यासाठी लवकर निवृत्त व्हावे, हे अनेकांचे स्वप्न असते. मात्र, लवकर निवृत्ती घ्यायची असल्यास, त्यानंतर स्वतंत्रपणे व आरामदायी जगण्यासाठी; तसेच जीवनातील सर्व उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आवश्यक असणारे आर्थिक स्रोत निवृत्तीनंतरसुद्धा उपलब्ध होतील, याची तरतूद करायला हवी.

एका फंड घराण्याने नुकताच ‘रिटायरमेंट प्लान’ गुंतवणूकदारांना उपलब्ध करून दिला. या ‘रिटायरमेंट प्लान’साठी सर्वेक्षण करताना या सर्वेक्षणात भाग घेतलेल्या ८० टक्के लोकांनी निवृत्तीनंतर आवश्यक असणाऱ्या निधीचा अंदाज नव्हता. सर्वेक्षणात भाग घेतलेल्यांनी एक कोटी आणि अधिक पगार असलेल्यांनी दोन कोटी अशी उत्तरे दिली. या सर्वेक्षणात भाग घेतलेल्यांपकी फक्त ५ टक्के लोकांचा ‘रिटायरमेंट प्लान’ लिखित स्वरूपात होता. निवृत्तीनंतर आवश्यक असणाऱ्या निधीचा अंदाज वर्तवणे आणि या दृष्टीने संपत्तीचा संचय करण्यास सुरुवात करणे ही मुदतपूर्व निवृत्तीची पहिली पायरी होय.

लवकर निवृत्ती स्वीकारण्याच्या दृष्टीने तर पहिले पाऊल म्हणजे, निवृत्तीच्या वेळी तुम्हाला नेमका किती निधी आवश्यक असेल, ते ठरविणे. निवृत्तीपश्चात उदरनिर्वाहासाठी असणाऱ्या निधीचे नियोजन करताना सध्याची जीवनशैली विचारात घेणे गरजेचे आहे. सध्याचे खर्च, अपेक्षित आयुर्मान, भविष्यातील वैद्यकीय खर्चासाठी आरोग्य विम्याची पुरेशी तरतूद त्या व्यक्तीचा जोखिमांक, हे घटक विचारात घ्यायला हवेत. तुमच्या निवृत्तीनंतरच्या निधीचा अंदाज वर्तवण्यासाठी व्यावसायिक वित्तीय सल्लागाराची मदत घेणे कधीही चांगले. तुमचे वय वाढेल, तसे आरोग्यसेवेचा खर्चही वाढण्याची शक्यता असते. आरोग्यासेवांसाठी येणाऱ्या खर्चामुळे तुमच्या निधीमध्ये घट होऊ नये, यासाठी निवृत्तीनंतर आवश्यक असणारी रक्कम ठरवत असताना हा खर्च विचारात घ्यायला हवा.

निवृत्तीकोशासाठी संचय करण्यासाठी जितक्या लवकर सुरुवात केली जाईल, तितका मोठा निधी उभारणे शक्य होऊ शकेल. म्हणूनच, अर्थार्जनाच्या सुरुवातीच्या काळापासून गुंतवणूक करायला सुरुवात करणे आवश्यक आहे. सुरुवातीच्या वर्षांमध्ये, तुमची जोखीम घेण्याची क्षमता अधिक असू शकते आणि इक्विटीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या जितक्या लवकर ‘एसआयपी’ चालू कराल, तितका फायदा जास्त होईल; शिवाय कमी वयात गुंतवणूक करायला लागणारी रक्कमही कमी असेल. उदा. जर एखाद्याचे निवृत्तीपर्यंत रु. पाच कोटी जमा करण्याचे उद्दिष्ट असेल आणि निवृत्तीला अजून ३० वर्षेकालावधी बाकी असेल, तर साधारणपणे वार्षिक परतावा १० टक्के धरल्यास दरमहा फक्त २१,९३६ रुपये गुंतविल्यास हे उद्दिष्ट गाठणे शक्य होईल. परंतु हेच ध्येय साध्य करण्यासाठी २५ वर्षेकालावधी बाकी असेल, आणि वार्षिक परतावा १० टक्के धरल्यास दरमहा ३७,३७२ रुपये गुंतवावे लागतील. आपण आपल्या गुंतवणुकीला वाढण्यासाठी पुरेसा वेळ दिला, तर हीच गुंतवणूक तुम्हाला कैकपटीने परतावा देऊ शकते. चक्रवाढीचा आनंद अनुभवता येतो. निवृत्तीकोशासाठी धन संचय करण्यासाठी वित्तीय साधनांची निवड करताना निश्चित उत्पन्न देणाऱ्या साधनांपेक्षा मार्केट-लिंक्ड उत्पादनांची निवड अधिक फायदेशीर ठरते. नियमितपणे व दीर्घ काळ केलेली गुंतवणूक असल्यास महागाईच्या दरापेक्षा अधिक परतावा दिला आहे. निवृत्तीकोशासाठी धन संचयाच्या उद्दिष्टासारख्या दीर्घ कालावधीच्या गुंतवणुकीतून मोठा निधी उभारता येईल. करवजावटीसाठी आयकराच्या कलम ८० (सी) मान्यताप्राप्त गुंतवणुकीत करबचत योजनेतील (ईएलएसएस) फंडांचा समावेश होतो. दरमहा १२,५०० रुपयांची ‘एसआयपी’ म्युच्युअल फंडाच्या करबचत योजनेत केल्यास वार्षिक दीड लाख रुपयांची गुंतवणूक कलम ८० (सी) अन्वये प्राप्तिकर निश्चितपणे वाचवू शकते. तुम्ही जर आयकराच्या ३० टक्के कर कक्षेत असाल तर ईएलएसएस फंडातून मिळणाऱ्या भांडवली लाभाव्यतिरिक्त ४५ हजार रुपयांचा कर आणि त्यावरील अधिभार व उपकर इतकी मोठी बचत होऊ शकते. इक्विटी फंडातील गुंतवणुकीवर झालेल्या एक लाखांपेक्षा अधिकच्या दीर्घकालीन भांडवली नफ्यावरील करदायित्व जास्तीत जास्त (१० टक्के + अधिभार + उपकर) इतके कमी आहे; परंतु, आज व्याजाच्या उत्पन्नावरील सर्वोच्च करदर (३० टक्के + अधिभार + उपकर) इतका जास्त आहे. प्रगल्भ गुंतवणूकदार ‘ईएलएसएस फंड’ या मालमत्ता प्रकारची निवड करतात.

निवृत्तीनंतर नियमित उत्पन्नाच्या नियोजनासाठी निधी चांगला असला, तरी तो जास्त काळ टिकण्यासाठी विचारपूर्वक खर्च करायला हवा. म्हणूनच, निवृत्तीनंतर तुमच्याकडे नियमित उत्पन्न देणारा स्रोत असणे गरजेचे आहे. तुमच्या निधीचा काही भाग किंवा संपूर्ण निधी वापरून ‘वर्षांसन’ (अॅन्युइटी) आणि /किंवा ‘एसडब्यूपी’च्या माध्यमातून आयुष्यभर नियमित उत्पन्न मिळू शकेल. जीवनाच्या एका टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यात जात असताना, तुमची जीवनशैली व आकांक्षा बदलतात. त्यामुळे निवृत्तीसाठीच्या निधीसाठी राखून ठेवलेल्या बचतीचा व गुंतवणुकीचा वार्षिक आढावा घेणे गरजेचे आहे. एक नियम म्हणून, तुमच्या प्लानचा व गुंतवणुकीचा नियमित आढावा घ्या. (जीवनातील टप्प्यानुसार) आणि ठरवलेल्या लक्ष्यापेक्षा निवृत्तीचा निधी कमी पडतो आहे असे वाटले, तर लक्ष्य पूर्ण होण्यासाठी आवश्यक असणारी गुंतवणूक वाढवा किंवा विशिष्ट संपत्तीतील गुंतवणूक बदला.

लवकर निवृत्त होण्यासाठी नियोजन करणे, हे केवळ मोठा निधी उभारण्यापुरते मर्यादित नाही; तर हा निधी दीर्घ काळापर्यंत पुरेल, याचीही दक्षता घ्यायला हवी. म्हणूनच, गुंतवणुकीचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. हे नियोजन निधी संचयाच्या टप्प्यामध्ये निधी उभा करण्यासाठी उपयुक्त असायला हवे व रिडम्शनच्या टप्प्यामध्ये उत्पन्न मिळण्यातही सातत्य राहायला हवे. निवृत्तीनंतर आरामदायीपणे जगण्यासाठी लवकर व स्मार्ट नियोजन केले, तरच लवकर निवृत्ती घेणे अर्थपूर्ण ठरू शकते.

‘एसआयपी’ म्हणजे जणू काही अधिकचे अपत्यच – आतापासून या नव्या अपत्याचा सांभाळ आपण लक्षपूर्वक आणि बिनचूक केल्यास हे अपत्य आपल्या निवृत्तीनंतरच्या काळात काही कमी पडू देणार नाही. उलट हे आपत्य आर्थिक आधाराची काठी बनून आपल्याला आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी राहण्यास नक्की मदत करेल. आजही आपल्याला अनेक जण असे दिसतात, की ज्यांना भांडवलाच्या कमतरतेमुळे किंवा कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे मनाजोगते उपजीविकेचे साधन निवडता आलेले नाही. एखाद्याने जर का ठामपणे ठरविले आणि ‘मार्केट टायिमग’च्या विचारात न अडकता जास्तीत जास्त गुंतवणूक ‘एसआयपी’च्या मार्गाने दीर्घ कालावधीत केली तर शक्य तितक्या लवकर त्याला स्वतला आवडेल छंद किंवा आवडी जोपासण्यासाठी लवकर निवृत्त होण्याचा मार्ग उपलब्ध करून देण्याचे सामथ्र्य ‘एसआयपी’मध्ये आहे.

अल्पकालीन फायदा कमावण्याच्या उद्देशाने किंवा अल्पकालीन तोटय़ाने बाजाराच्या दिशेचा (चूक-बरोबर) अंदाज घेत, गुंतवणूक करण्यापेक्षा दीर्घकालीन उद्दिष्टे साध्य करण्यासाठी उपयुक्त, नियोजनपूर्वक व सातत्यपूर्ण आणि योग्य गुंतवणूक साधनांतील गुंतवणूक करायला हवी. इमारत बांधताना इमारतीच्या पाया महत्त्वाचा असतो त्याचप्रमाणे आयुष्याच्या संध्याकाळी मागे वळून पाहिल्यास असे लक्षात येईल की, आपली आर्थिक आघाडी अधिक भक्कम बनविण्यात ‘एसआयपी’चा वाटा महत्त्वाचा ठरतो. ‘एसआयपी’तील प्रत्येक रुपयाचा वाटा किती मोठा होत गेला हे अनुभवल्याशिवाय कळणे कठीण म्हणून छंद वा आवडी जोपासण्यासाठी लवकर व्हायचे असेल तर आजच ‘एसआयपी’ ला सुरुवात करावी. हे शक्य नसेल तर लवकर निवृत्त होणे दिवास्वप्न ठरेल.

 (लेखिका पात्रताधारक वित्तीय नियोजनकार आहेत, akswealth@gmail.com  ई-मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल)