29 October 2020

News Flash

थेंबे थेंबे तळे साचे : शेअर बाजारातील अभिमन्यू की अर्जुन?

शेअर कधी घ्यावा आणि कधी विकावा हे सुद्धा ठरवणं महत्वाचं आहे.

तृप्ती राणे

शेअर बाजाराचं आकर्षण अनेकांना असतं. शेअर बाजारातून कमी भांडवलात खूप पैसे मिळतात किंवा पटापट श्रीमंतीचा मार्ग म्हणजे शेअर बाजार असा समज (गैरसमज?)  अनेक लोकांचा असतो. आणि ही काही आजची गोष्ट नाहीये! कितीही हर्षद मेहता, केतन  पारीख येऊन गेले तरीही शेअर बाजाराची भुरळ मात्र कायम. यावर्षी तर अगदी करोना  आला, मार्केट धाडकन् आपटलं. तरीसुद्धा बाजाराकडे खेचली जाणारी मंडळी काही कमी  झाली नाही! अहो, उलट त्यांचा ओघ चांगलाच वाढला. किरकोळ (रिटेल) गुंतवणूकदारांनी एप्रिल ते जूनदरम्यान २४ लाख नवीन डिमॅट खाती उघडली. टाळेबंदीमध्ये मिळालेला वेळ, खाली आलेला बाजार, ट्रेडिंग करण्यासाठी मिळणाऱ्या भरपूर टिप्स, नवीन खातं कमीत कमी वेळात आणि विनासायास उघडायची सोय, दुसऱ्या मिळकतीचा पर्याय – अशा सर्व कारणांमुळे नवीन गुंतवणूकदारांचा वर्ग शेअर बाजाराकडे वळला आहे.

तसं पाहायला गेलं तर गुंतवणूक करण्याचा एक चांगला पर्याय म्हणून आपण शेअर बाजारात नक्कीच पैसे घालू शकतो. परंतु शेअर बाजार हे एक चक्रव्यूह आहे आणि आपला अभिमन्यू तर नाही ना होणार ही काळजी आपल्याला घ्यायलाच हवी. नाही तर शेअर बाजार म्हणजे लॉटरी किंवा सट्टा असाच ग्रह होण्याची शक्यता जास्त आहे. तेव्हा कुठले शास्त्र शिकून व कोणते शस्त्र घेऊन या चक्रव्यूहातून आपण पुढचा मार्ग काढू शकतो यासाठी आजचा लेख!

ऑनलाइन पर्यायांमुळे शेअर बाजारात शिरणं खूप सोप्पं झालं आहे. कुठल्याही मोठय़ा बँकेत किंवा शेअर ब्रोकरकडे थ्री इन वन खात्याद्वारे बँक खाते, डिमॅट खाते आणि  ट्रेडिंग खाते असं पॅकेज अगदी सहजरीत्या मिळतं. अनेक नवीन ट्रेडिंग प्लॅटफॉर्मसुद्धा गुंतवणूकदाराला उपलब्ध आहेत जिथे तुमचं सद्य डिमॅट खातं आणि बँकेचं खातं जोडता येत. ऑनलाइन ट्रेडिंग खातं असेल तर तुम्हाला स्वत:चे व्यवहार स्वत: करता येतात. परंतु जर तुम्हाला हे उद्योग करायचे नसतील तर तुम्ही एखाद्या चांगल्या ब्रोकरकडे ऑफलाइन ट्रेडिंग अकाऊंटसुद्धा उघडू शकता. इथे तुम्हाला व्यवहार करताना ब्रोकर किंवा सब-ब्रोकरला फोन किंवा मेल करावी लागते.

एकदा ट्रेडिंग खातं उघडलं की अनेकांना घाई होते की कधी एकदाचा शेअर घेतो आणि फटाफट नफा करून आपण श्रीमंत होतो! इथे मग लक्ष जातं ते टिप्सवर. आज आपल्याला अनेकांकडून आणि वेगवेगळ्या माध्यमातून अशा टिप्स मिळतात – टीव्ही, पेपर,  ब्रोकर, व्हॉट्सअ‍ॅप, गूगल, निरनिराळे शेअर रिसर्च आणि अ‍ॅडव्हायझर प्लॅटफॉम्र्स! या शिवाय आपली मित्रमंडळी आणि कार्यालयातील सहकारीसुद्धा कधी कधी न मागता आपल्याला कोणता शेअर घ्यायचा याबाबत सल्ला देत असतात. परंतु गेल्या १५ वर्षांच्या माझ्या गुंतवणुकीतील अनुभवावरून मी हे नक्कीच सांगू शकते की, ‘गुंतवणूक करताना आपला जर थोडा तरी अभ्यास असेल की कोणता शेअर कधी घ्यायचा तर आपण आपल्या जोखीम क्षमतेनुसार शेअर्स घेऊन जास्त निर्धास्त राहू शकतो. टिप्स चुकीच्या असतात असं मी अजिबात म्हणत नाहीये. परंतु स्वत:चा अभ्यास (फंडामेंटल आणि टेक्निकल अ‍ॅनालिसिस) किंवा तज्ज्ञांचं मार्गदर्शन हे गुंतवणूकदाराला खडतर काळात जास्त चांगल्या पद्धतीने मानसिक व्यवस्थापन करायला मदत करतात.’

एखाद्या पोर्टफोलिओमध्ये किती आणि कशा प्रकारचे शेअर्स ठेवावेत यावर एकमत कधीच होऊ शकत नाही, कारण प्रत्येकाची आवड, जोखीम क्षमता, गुंतवणुकीबद्दल असणारी माहिती ही सारखी नसते. दीर्घकाळ गुंतवणूक म्हटली की, ३०-३५ कंपन्यांचे शेअर्स पुरेसे असतात. परंतु ट्रेडिंग, म्हणजेच दिवसागणिक किंवा कमी काळातील गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हा नियम लागू होत नाही. कारण इथे मुद्दा असतो तो पैसे फिरवायचा. त्यामुळे तेजी-मंदीच्या समीकरणानुसार वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स नियमितरीत्या घेणं आणि विकणं हे सतत चालू असतं. तेव्हा तुम्हाला नक्की कोणत्या प्रकारची गुंतवणूक करायची आहे हेसुद्धा ठरवून घ्या. लार्ज, मिड आणि स्माल कॅप शेअर्सचं प्रमाण ठरवणं हेसुद्धा महत्त्वाचं आहे. बाजाराचा कल आणि तुमची जोखीम क्षमता समजून मग हे प्रमाण ठरवावं.

शेअर बाजारात गुंतवणूक करताना अनेक जण डेरिव्हेटिव्हजमध्ये पैसे गुंतवतात. शेअर्सपेक्षा कमी पैसे या गुंतवणुकीसाठी लागतात, म्हणून हा पर्याय अनेकांना परवडतो. परंतु एक महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात घेण्याजोगी आहे की डेरिव्हेटिव्हज हे अनेक जणांना समजत नसूनसुद्धा त्यात पैसे घातले जातात आणि अनेक वेळा मी अशी उदाहरणं पाहिली आहेत, जिथे लाखोंचं नुकसान झालेलं आहे. तेव्हा जर समजत असेल, तरच फ्युचर आणि ऑप्शन्सच्या भानगडीत पडा, नाहीतर होत्याचं नव्हतं व्हायची वेळ येईल!

आता वळू या गुंतवणुकीच्या रकमेकडे. थेट गुंतवणुकीत किती पैसे घातले पाहिजेत याबाबत अनेकांना साशंकता असते. मुळात, शेअर बाजारातील गुंतवणूक ही समभाग निगडित गुंतवणूक असल्याने आपण म्युच्युअल फंडाच्या माध्यमातूनसुद्धा ती करत असतो. आपल्या आर्थिक उद्दिष्टानुसार शक्यतो दीर्घ काळासाठी गुंतवणूक करताना लागणारी रक् कम आधी ठरवून घ्यावी. आणि मग त्यातील किती गुंतवणूक म्युच्युअल फंडांमध्ये आणि की ती थेट शेअर्समध्ये करावी हे ठरवावं. नीट समजेपर्यंत सुरुवात थोडय़ा रकमेने करावी. पुढे हिम्मत आणि ज्ञान दोन्ही वाढलं की मग जास्त रक्कम थेट गुंतवणुकीकरिता वापरता येऊ  शकते. एसआयपी आणि एकरकमी व्यवहार देखील थेट गुंतवणुकीतून शक्य होतात. साजेल तो पर्याय निवडून दीर्घकाळ गुंतवणूक करून एक चांगला पोर्टफोलिओ तयार करता येतो. जितका जास्त वेळ गुंतवणुकीला मिळेल तितकं चांगलं, कारण काही शेअर्स भराभर वाढतात, तर काही अनेक वर्ष हळूहळू चालत राहतात आणि अचानक मोठी उडी मारतात. तर काही काळाबरोबर न राहिल्याने मागे पडतात.

शेअर बाजारातील गुंतवणूक शक्यतो कर्ज घेऊन करू नये. यामागे एक साधं समीकरण आहे. कर्जाचा हफ्ता चुकणार नाही, परंतु शेअर बाजारातील परतावे मात्र कमी-जास्त होऊ  शकतात, किंवा काही वेळेला पोर्टफोलिओ तोटय़ातसुद्धा असू शकतो. शिवाय आपत्तीसाठी बाजूला ठेवलेल्या किंवा नजीकच्या काळात लागणाऱ्या रकमेतून गुंतवणूक करू  नका.

शेअर कधी घ्यावा आणि कधी विकावा हे सुद्धा ठरवणं महत्वाचं आहे. गुंतवणूकदार जर शॉर्ट-टर्म (अल्पकालीन) धाटणीचा असेल तर घ्यायचा आणि विकायचा भाव आधीच ठरवावा. परंतु जर लाँग टर्म (दीर्घकालीन) गुंतवणूक असेल तर कोणता शेअर कधी घ्यायचा हे नक्की झाल्यावर कोणत्या परिस्थितीत विकायचा हे ठरवावं. आपलं उद्दिष्ट जर लवकर साध्य झालं तर थोडे पैसे बाहेर काढून, उरलेले पुढे चालू ठेवावेत. जर गुंतवणुकीला कालमर्यादा नसेल तर जोवर शेअरची कामगिरी अपेक्षेनुसार चालू असेल तोवर गुंतवणूक चालू ठेवायला हरकत नाही. परंतु जेव्हा जेव्हा कमी काळात खूप वाढ आणि विनाकारण झाल्यासारखी वाटत असेल तेव्हा बाहेर पडून थोडं थांबलेलं बरं. जर कंपनीची कामगिरी चांगली राहिली तर पुन्हा गुंतवणूक होऊ  शकते.

शेअर घेतल्यानंतर त्यावर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक गुंतवणूकदाराला सजग राहणं हे ओघाने आलंच. म्हणून पोर्टफोलिओ सुटसुटीत ठेवा, कंपनीच्या तिमाही कामगिरीवर लक्ष द्या, कंपनीचा वार्षिक अहवाल समजून घ्या, कंपनीबाबत नवीन बातमी जाणून घ्या आणि जागतिक गोष्टींचा बाजारावर होणाऱ्या परिणामांचासुद्धा आढावा घ्या. तरच तुमचा पोर्टफोलिओ चांगल्या पद्धतीने वाढू शकेल. फक्त कमी किंमत आहे किंवा बाजार पडलाय म्हणून शेअर घेऊ नका. नुकसान झालं तर कितीसं होईल म्हणण्यापेक्षा, नुकसान काय करून टाळता येईल किंवा कमी होईल या भावनेने गुंतवणूक केली तर ते जास्त योग्य होईल.

अभिमन्यूकडे पर्याय नव्हता म्हणून अर्धवट ज्ञानासकट तो चक्रव्यूहात घुसला. परंतु आपल्याकडे पर्याय आहेत. तेव्हा, अर्जुन होऊन शेअर बाजारात या. ज्ञानाचं शस्त्र आणि गुंतवणुकीचं शास्त्र जवळ बाळगून प्रत्येक वेळी गुंतवणूक करताना माशाच्या डोळ्यावर (परतावे व आर्थिक उद्दिष्ट) लक्ष ठेवा. एक गुंतवणूकदार म्हणून एवढंच तुमच्या हाती आहे. कंपनी व तिच्या शेअरची भविष्यातील कामगिरी आणि शेअर बाजाराची परिस्थिती हे आपल्या हातात नसतं. तेव्हा कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन!

शेअर बाजारात व्यवहाराची पद्धत कोणतीही असो, खालील खबरदारी आपल्याला घ्यायला हवी:

१. आपल्या निर्देशानुसार शेअर्सची खरेदी किंवा विक्री झाली का, खरेदी/ विक्रीचा व्यवहार नीट नमूद होऊन वेळेवर त्याची पोचपावती (कॉन्टॅक्ट नोट) मिळाली का?

२. सेबीच्या नियमानुसार खरेदीनंतर वेळेत आपल्या डिमॅट खात्यामध्ये शेअर्स आले का?

३. आपल्या सगळ्या व्यवहाराची नोंद ब्रोकरकडे (लेजरमध्ये)तारखेनुसार आणि योग्य रकमेची झाली आहे का?

४. ब्रोकर आपण दिलेले पैसे, शेअर्स विकल्यावर मिळणारे पैसे आणि डिमॅट किंवा इतर चार्जेस कसे लावतोय आणि या संदर्भात व्यवस्थित माहिती देतोय की नाही?

५. जेव्हा आपण शेअर्स विकतो तेव्हा आपल्याला भांडवली नफा/नुकसान होतं, आणि याचा हिशोब आपल्या कर विवरणात आपल्याला द्यावा लागतो. तेव्हा ही माहितीसुद्धा ब्रोकरने आपल्याला दिली पाहिजे.

लेखिका सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.

trupti_vrane@yahoo.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2020 1:43 am

Web Title: investment in share market zws 70
Next Stories
1 अर्थ वल्लभ : आहे मनोहारी तरी..
2 कर बोध : घर आणि प्राप्तिकर  वजावटी  
3 बंदा रुपया : ‘अनंत’ ध्येयासक्ती!
Just Now!
X