‘‘शेअर्समध्ये गुंतवणूक करावी की नाही?’’ हा अनेक सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या मनात असलेला नेहमीचा प्रश्न! शेअर्समधील गुंतवणूक म्हणजे सट्टा किंवा जुगार खेळण्यासारखंच असा विचार मनात ठामपणे घर करून राहिलेले अनेक गुंतवणूकदार आहेत. कारण एका बाजूला अशा गुंतवणूकदारांच्या संपर्कात असलेले त्यांचे नातेवाईक, मित्र शेअर्समधील गुंतवणुकीवर ३ ते ५ वर्षांत दुप्पट-तिप्पट पैसे मिळवीत असतात; तर दुसऱ्या बाजूला काही जणांना शेअर्समधील गुंतवणुकीवर प्रचंड नुकसान सोसावे लागले आहे, असेही त्यांच्या कानावर येत असते. त्यामुळे शेअर्समधील गुंतवणुकीबाबत अनेक गुंतवणूकदार संभ्रमात पडलेले असतात.
परंतु गुंतवणूक ही जशी नियमित व्याज देणाऱ्या योजनांमध्ये करायला हवी तशी ती वृद्धी किंवा ग्रोथ (कॅपिटल अ‍ॅप्रिसिएशन) देणाऱ्या गुंतवणूक योजनांमध्येही करायला हवी! शेअर्समधील करायच्या गुंतवणुकीबाबत काही नियम पाळले गेले तर शेअर्स मार्केटमधील गुंतवणूक सट्टा किंवा जुगार न राहता वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी जी पैशाची वृद्धी होणं आवश्यक आहे, त्याकरिता गुंतवणुकीचं एक चांगलं साधन आहे, असाच प्रत्यय गुंतवणूकदारांना येईल. शेअर्समधील गुंतवणुकीमधून मिळणाऱ्या फायद्यावर प्राप्तिकर सवलती मिळतील त्या वेगळ्याच! आजच्या लेखात शेअर्समधील गुंतवणुकीबाबत कोणते नियम पाळणे आवश्यक आहे ते पाहू आणि पुढच्या लेखात प्राप्तिकर कायद्यानुसार शेअर्समधील गुंतवणुकीवर कोणत्या सवलती मिळतात ते पाहू.
शेअर्समधील गुंतवणुकीला ‘कला’ आणि ‘शास्त्र’ असं म्हटलं जातं ते योग्यच आहे. ‘कला’ या अर्थी की, गुंतवणूकदाराने विकत घेतलेले शेअर्स योग्य वेळी विकण्याचा निर्णय घेण्याची कला! आणि ‘शास्त्र’ या अर्थी की, घेतलेले शेअर्स योग्य वेळी विकण्याचा निर्णय हा शेअर मार्केट आणि आर्थिक घडामोडी याविषयीच्या माहितीच्या विश्लेषणावर आधारित असला पाहिजे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांनी खालील मुद्दे विचारात घ्यावेत :
(१) माहिती घ्या : प्रस्थापित आणि प्रसिद्ध कंपनी असेल तर गोष्ट निराळी! पण तुलनेने कंपनी नवी असेल तर त्या कंपनीविषयी खालील मुद्दे लक्षात घेऊन मगच त्या कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवावेत –
१. कंपनीचे प्रवर्तक कोण आहेत? त्यांचा त्या क्षेत्रातील अनुभव किती वर्षांचा आहे?
२. कंपनी चालविण्याची (प्रत्यक्षात) जबाबदारी कुणाची आहे?
३. कंपनीचे उत्पादन किंवा सेवा यांना बाजारपेठेमध्ये मागणी/ वाव (स्कोप) किती आहे?
४. कंपनीचा डिव्हिडंड देण्याबाबत ट्रॅक रेकॉर्ड कसा आहे?
५. शेअर मार्केटमध्ये त्या कंपनीच्या शेअरला काय सेन्टीमेन्ट्स (भावना) आहेत इ.
(२) प्रवेश आणि गमन (एन्ट्री अ‍ॅण्ड एक्झिट) : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी काही गुंतवणूकदारांना प्रचंड उत्साह आणि इच्छाही असते, पण इथेच एक चूक घडते. ‘शेअर बाजारात प्रचंड तेजी’ असा मथळा वृत्तपत्रांत वाचल्यानंतर किंवा टीव्ही चॅनेलवर ऐकल्यानंतर हे (अति)उत्साही गुंतवणूकदार चढलेल्या भावात शेअर्स विकत घेतात. याउलट शेअर बाजारात मंदी असताना (म्हणजे ढोबळमानाने) शेअर्सच्या किमती तुलनात्मकरीत्या खाली आलेल्या असताना शेअर्स घ्या, अशी शिफारस केली तर ‘सध्या शेअर मार्केटमध्ये मंदीचं सावट’ असं वृत्तपत्रात वाचतोय. आता कसे काय शेअर्स घ्यायला सांगता, असा प्रश्न गुंतवणूकदार विचारतात. पण खरं म्हणजे मंदी असताना शेअर्स घ्यायचे आणि तेजीत विकायचे, हे तंत्र आत्मसात केल्यास फायदा कमावता येतो.
(३) प्रॉफिट बुकिंग किंवा नफा मिळवणं : वॉरेन बफे या सुप्रसिद्ध गुंतवणूकगुरूंनी एक संदेश दिला आहे. ‘शेअर बाजारात यशस्वी होण्यासाठी शेअर्सची काळजी घेणारा (केअर टेकर) गुंतवणूकदार असून चालत नाही. ते शेअर्स योग्य वेळी विकून नफा मिळविण्याचा निर्णय घेणारा गुंतवणूकदार असला पाहिजे.’ अनेक गुंतवणूकदार आपल्याजवळ असलेले शेअर्स वर्षांनुवर्षे तसेच ठेवून देतात. मधल्या काळात अनेकदा तेजी येऊन जाते आणि त्यांच्या शेअर्सना भरपूर किंमतही मिळू शकत असते, पण ते शेअर्स विकत नाहीत. अशा प्रकारच्या गुंतवणूकदारांना आपल्याजवळ खूप किंमत असलेले शेअर्स आहेत, याचा (पोकळ) अभिमान वाटतो. याला ‘नोशनल प्रॉफिट’ म्हणतात. त्याचा काय उपयोग? वास्तविक तेजीमध्ये शेअर्स विकून नफा कमाविण्याचं तंत्र वापरावं.
(४) वैविध्यता ठेवा : शेअर्सचे भाव कमी-अधिक होऊ शकतात. त्यामुळे त्यामध्ये जोखीम असू शकते आणि म्हणून एक-दोन कंपन्यांच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवण्याऐवजी विविध क्षेत्रांतील दोन-तीन कंपन्यांच्या उच्च गुणवत्ता असलेल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी.
(५) धीर धरा : शेअर्समधील गुंतवणूक दीर्घकालीन नफा देण्यासाठी असते. त्यामुळे अपेक्षित लाभ मिळण्यासाठी खूप धीर असावा लागतो. एखाद्या शेअर्समध्ये पैसे गुंतवल्यावर त्याच्या किमतीमध्ये लगेच घसरण झाली तर निराश (किंवा पॅनिक) होऊ नका. शेअर्सच्या बाबतीत ‘धीरापोटी फळे रसाळ गोमटी’ हेच तंत्र लागू पडते.
(६) अंगभूत किमतीची (इन्ट्रिन्सिक व्हॅल्यू) माहिती घ्या : ‘भविष्यात मार्केट वर जाईल का खाली?’ हा (टिपिकल) प्रश्न कुणालाही विचारीत बसू नका. शेअर मार्केट वर कधी जाईल आणि खाली कधी जाईल, हे निश्चितपणे कुणालाही सांगता येणार नाही. त्यामुळे या प्रश्नाच्या आधारे गुंतवणूक करू नका. शेअर्सची अंगभूत किंमत महत्त्वाची असते.
(७) वृद्धी मिळविण्याचं गणित : शेअर बाजारात यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी हा महत्त्वाचा मुद्दा आहे. वृद्धी किती मिळवायची हे त्या गुंतवणूकदारानेच ठरविणे योग्य ठरेल. उदा. एखादा १०० रुपयांना घेतलेला शेअर १५० रुपये किंमत झाली की मी तो विकेनच हे त्याने त्याचं ठरवायचं आणि शेअर विकून मोकळं व्हायचं. कुणी सांगेल की त्याची किंमत २२५ रुपये होणार आहे, अशा माहितीवर विसंबून राहू नये.
(८) लाभ आणि लोभ : लाभ आणि लोभ यामध्ये एक पुसट रेषा असते. अतिलोभापायी लाभ घालवून बसण्याची वेळ येऊ शकते. २०० रुपयांना घेतलेला शेअर ३५० रुपये झाल्यावर तो ४५० होईल का? का ५०० रुपये होईल, अशा द्विधा मन:स्थितीत राहू नका. त्या शेअरवर तुमचं रोजच्या रोज लक्ष (ट्रॅक) नसेल तर त्याची किंमत २०० रुपयांच्या खाली कधी आली हे तुमचं तुम्हालाच कळणार नाही.
(९) जुगार नको : शेअर्समधील गुंतवणुकीकडे अभ्यासपूर्ण दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून पाहिलं पाहिजे. सकाळी शेअर्स घेऊन ते दुपारी विकणं किंवा सकाळी विकून ते पुन्हा दुपारी घेणं ही सवय लावून घेऊ नका. यामध्ये जोखीम नक्कीच आहे आणि म्हणून धोकाही आहे.
(१०) शेअर्समधील गुंतवणुकीचं प्रमाण : शेअर्समध्ये किती पैसे गुंतवावेत, असा प्रश्न अनेक गुंतवणूकदारांना पडतो. त्यासाठी एक सोपं गणित म्हणजे १०० वजा तुमचं वय केल्यावर जी संख्या येते तेवढे टक्के शेअर्समध्ये गुंतवावेत. उदा. समजा एखादी व्यक्ती ४० वर्षांची असेल आणि त्याला एक लाख रुपये गुंतवायचे असतील तर १०० वजा ४० म्हणजे ६० टक्के म्हणजे ६० हजार रुपये शेअर्समध्ये गुंतवावेत.
पैशाची वृद्धी करण्यासाठी शेअर्स हा एक चांगला पर्याय आहे. डिमॅट सुविधेमुळे गुंतवणूकदाराला त्याच्या आर्थिक क्षमतेनुसार १, २, ५, १० किंवा १०० असे कितीही शेअर्स खरेदी किंवा विक्री करता येतात. तेव्हा या सुविधेचा उपयोग करून चांगल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून दीर्घकाळात चांगली संपत्ती तयार होऊ शकते आणि या गुंतवणुकीवर प्राप्तिकर सवलतीसुद्धा मिळतात. म्हणजे सोने पे सुहागाच! त्या सवलती कोणत्या ते पुढच्या लेखात.
लेखक गुंतवणूक व प्राप्तिकर नियोजन सल्लागार आहेत.