पोर्टफोलियोच्या सहामाही कामगिरीचा आढावा..

गेले काही आठवडे भारतीय शेअर बाजारात प्रचंड अनिश्चितता आहे. यंदाच्या वर्षांत ऑगस्ट २०१८ पर्यंत केवळ पाच महिन्यांत मुंबई शेअर बाजार निर्देशांकात तब्बल ६,३०० अंशांनी वाढ झाली. हाच टप्पा गाठायला मुंबई निर्देशांकाला या आधी तब्बल १६ महिने लागले होते. एकीकडे अनेक बाबतीत चिंतेचे वातावरण असताना शेअर बाजाराचा निर्देशांक मात्र रोज नवीन उच्चांक गाठत असतानाच गेला शुक्रवार म्हणजे २१ सप्टेंबर रोजी मात्र शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना बरेच काही शिकवून गेला असेल. अक्षरश: १० मिनिटांत तुमचे नेटवर्थ निम्म्याहून कमी होऊ शकते याची जाणीव बहुतांशी गुंतवणूकदारांना त्या दिवशी झाली असेल. त्यानंतरचा पुढचा आठवडा पण असाच मारक ठरला आणि हे असेच काही काळ चालू राहील तसेच यापुढे कधीही होऊ शकते याचे भान आणि हे वास्तव आता गुंतवणूकदारांनी स्वीकारायलाच हवे.

शेअर बाजाराचे पानिपत – मुख्य कारणे :

आपल्या अर्थव्यवस्थेचा वाढीचा वेग आता उत्तम आहे अशा कितीही वल्गना केल्या, तरी देखील आपल्या व्यवस्थेला भडसावणारे अनेक प्रश्नही आहेत हे वास्तव आहे. परंतु त्यातील सर्वात गहन प्रश्नांचा विचार करायचा झाला तर कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, घसरता रुपया, अमेरिकेतील वाढते व्याज दर आणि अर्थात आंतरराष्ट्रीय बाजारातील व्यापारी युद्ध या सर्वाचा प्रतिकूल परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर होताना दिसत आहे. या खेरीज सध्या अतिशय गंभीर असलेली सरकारी बँकांची परिस्थिती, बँकांच्या वाढत्या अनुत्पादित कर्जाची समस्या, वाढती वित्तीय तूट, वस्तू आणि सेवा कराचा कमी झालेला महसूल, बेरोजगारीचा प्रश्न आणि सरकारी दावे आणि वास्तव यातील तफावतीचे आलेले भान याचा नकारात्मक परिणाम सध्याच्या बाजारावर झालेला दिसून येतो. आयडीबीआय बँकेचा प्रश्न सोडवण्यासाठी अपेक्षेप्रमाणे सरकारने पुन्हा एकदा एलआयसीला पणाला लावले आणि वेळ तारून नेली. परंतु त्यापाठोपाठ आयएल अ‍ॅण्ड एफएस अडचणीत आल्यावर मात्र त्याचा प्रतिकूल परिणाम शेअर बाजारावर आणि एकंदरीत आर्थिक घडमोडीवर होणे साहजिक होते. आयएल अ‍ॅण्ड एफएस सारख्या मोठय़ा वित्तीय संस्थेला सावरण्याकरिता आता सरकार पुन्हा एलआयसीला दावणीला बांधणार असेच संकेत मिळत आहेत. एलआयसीकडे बुडीत आयएल अ‍ॅण्ड एफएसचे अध्यक्षपद देणे ही त्याचीच पहिली पायरी आहे. आयसीआयसीआय बँक आणि अ‍ॅक्सिस बँकेच्या पाठोपाठ येस बँकेच्या राणा कपूर यांना रिझव्‍‌र्ह बँकेने जानेवारी २०१९ नंतर मुदतवाढ देण्यास नकार दिला आहे. तर नुकताच ‘आयपीओ’ येऊन गेलेल्या बंधन बँकेच्या अध्यक्षांना पगारवाढ देण्यास तसेच बँकेच्या शाखा विस्तारास रिझव्‍‌र्ह बँकेने परवानगी नाकारली आहे.

कुठल्याही गुंतवणूकदाराला काळजी वाटावी अशीच ही स्थिती. परंतु दरवर्षी शेअर बाजारात घवघवीत नफा मिळेल अशी अपेक्षा करणेच चुकीचे आहे. गेल्या काही वर्षांत शेअर बाजाराने अगदी सामान्य गुंतवणूकदारालादेखील भरभरून दिले आहे. मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समधील झालेली भरघोस वाढ अवाजवी वाटू लागल्याने त्यात विक्री होणे अपेक्षित होते. अजूनही अनेक स्मॉल आणि मिड कॅप शेअर्सचे भाव दोन वर्षांपूर्वीच्या मानाने चढे असल्याने त्यांच्यात पुन्हा तेजी यायला वेळ लागेल.

आपला पोर्टफोलियो ७.२ टक्के नुकसानीत असला तरीही पोर्टफोलियोमध्ये सुचविलेली शेअर बाजारातील गुंतवणूक ही दीर्घकालीन असल्याने वाचक गुंतवणूकदारांनी गांगरून जाण्याचे काहीच कारण नाही. शेअर बाजारच्या या चढ-उतारात ट्रेडर्सचे फावत असले तरी सगळ्याच गुंतवणूकदारांना ही चांगली संधी असेलच असे सांगता येत नाही. त्यामुळे थोडे थांबून बाजाराचा अंदाज घेऊन मगच खरेदी किंवा विक्रीचे धोरण ठरवावे. किंबहुना आपण घेतलेल्या कंपनीचा शेअर चांगला असेल आणि त्याबद्दल आत्मविश्वास असेल तर तो शेअर पुन्हा खरेदी करावा. कारण मंदीत खरेदी करताना आपण खरेदी करत असलेला शेअर अजून किती खाली जाईल याची कल्पना नसल्याने अशा शेअर्सची टप्प्याटप्प्याने खरेदी करणे हिताचे ठरते. तसेच याच काळात लार्ज कॅप तसेच डिफेन्सिव्ह शेअर्स तुम्हाला तारू शकतात. त्यामुळे फार्मा, एफएमसीजी क्षेत्रातील तसेच बहुराष्ट्रीय कंपन्यांचे शेअर्स सुरक्षित खरेदी ठरू शकते. तसेच गुंतवणुकीसाठी कंपनी निवडताना त्या कंपनीवर कुठलेही कर्ज नाही किंवा त्या कंपनीचे इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर किमान तीन आहे याची खात्री करून घ्या. दिलेल्या कालावधीत कंपनीच्या करपूर्व नफ्याला त्या कंपनीकडून कर्जावरील व्याज फेडण्यासाठी होणाऱ्या खर्चाने विभाजित करून येणारे प्रमाण हे इंटरेस्ट कव्हरेज रेशो असते.  इंटरेस्ट कव्हरेज रेशो जितका कमी, तितका कंपनीचा कर्जाचा भार अधिक आणि ती कंपनी कर्जबुडवी आणि पर्यायाने दिवाळखोर ठरण्याची शक्यता जास्त.