20 January 2021

News Flash

वर्ष नवे, संकल्प नवा

नववर्षांच्या शुभेच्छा देताना हे वर्ष तुम्हा सर्वासाठी ‘कंटाळवाण्या’ पण फायदेशीर गुंतवणुकीचे ठरो!

अरुण सुंदरेशन

सर्वसाधारणपणे वर्षअखेरीस प्रत्येक जण नवीन वर्षांसाठी संकल्प करतो. अशा मंडळींना हेच सांगणे की, एखादी चांगली गोष्ट करण्यासाठी एखाद्या विशिष्ट दिवसाची प्रतीक्षा कशासाठी? परंतु अनेक जण नवीन वर्षांच्या पहिल्या दिवसापासून काही चांगल्या गोष्टी करण्यास प्रारंभ करण्याचा संकल्प करतात. जसे की सामान्यत: नियमाने व्यायामशाळेत जाण्याचा संकल्प, स्वास्थ्यास अपायकारक पदार्थाचा, व्यसनांचा त्याग करण्याचा संकल्प वगैरेसारखे काही संकल्प तुमच्यापैकी प्रत्येक जण करत असतील. निरोगी राहणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच अर्थसाक्षर होणे महत्त्वाचे आहे. तुमच्या आर्थिक कल्याणासाठी आगामी नवीन वर्षांच्या निमित्ताने काही संभाव्य संकल्प तुम्हाला सुचवू इच्छितो. हे संकल्प गुंतवणूक करताना ज्या गोष्टी टाळण्याची आवश्यकता त्या गोष्टी टाळण्यासाठीचे आहेत. कारण गुंतवणूक करताना, ‘काय करावे’ याइतकेच ‘काय करू नये’ हेही महत्त्वाचे ठरते.

इंग्रजीत एक छान संकल्पना आहे, ‘डू नॉट पुट युवर ऑल एग्ज इन वन बास्केट.’ याचा अर्थ आपली सर्व पुंजी एकाच मालमत्ता प्रकारात ठेवू नका. आपली बचत समभागसंलग्न म्युच्युअल फंड, रोखेसंलग्न म्युच्युअल फंड, सोने यासारख्या भिन्न मालमत्ता वर्गात विभागलेली असायला हवी. कारण या सर्वाचे जोखीम-परतावा वर्तन भिन्न आहे तसेच एकमेकांशी परस्परसंबंध क्षीण किंवा नकारात्मक (ल्लीॠं३्र५ी ू११ी’ं३्रल्ल) आहे. तसेच बचतीचे एकाच मालमत्ता प्रकारात केंद्रीकरण करण्याऐवजी विविध मालमत्ता वर्गावर आपली गुंतवणूक केल्यास जोखीम कमी होते.

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे केवळ गत परतावा कामगिरीनुसार फंडांची निवड करणे. गुंतवणूकदारांकडून घडणाऱ्या चुकांपैकी ही सर्वात जास्त आढळणारी चूक आहे. गत परतावा चांगला दिसला की बरेच जण उत्तेजित होऊन गुंतवणूक करतात. आणि थोडय़ा कालावधीत फंडाची कामगिरी समाधानकारक नसल्यास गुंतवणूक काढून घेतात. पद्धतशीर गुंतवणूक पद्धतीतसुद्धा (एसआयपी) मागील परतावा खराब असेल तेव्हा गुंतवणूक थांबवली जाते. खरे तर आपण या उलट करायला हवे! ही संकल्पना फंड निवडण्यासाठीही लागू आहे. गुंतवणुकीचे निर्णय घेताना आपल्याला खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे आणि केवळ गत परतावा प्रमाण मानून फंड निवड न करणे हा दुसरा संकल्प असू शकेल.

अनेक गुंतवणूकदारांना असे वाटते की बाजारात वेळ साधल्याने परतावा वाढतो. आज निर्देशांक (सेन्सेक्स / निफ्टी) सार्वकालिक उच्चांकावर आहेत. मी या कंपनीत रुजू झालो होतो तेव्हा सेन्सेक्स ६,०००च्या पातळीवर होता. आणि सेन्सेक्समध्ये नुकतीच १,००० अंशांची वाढ झाली होती. त्यानंतर सेन्सेक्सने १० हजार, १५ हजार आणि २० हजाराची शिखरे ओलंडली तेव्हासुद्धा निर्देशांक त्या त्या वेळी उच्चांकी पातळीवर होते. आपण निर्देशांकाच्या उच्चांकी पातळीवर असलो तरी त्यामुळे आपल्या गुंतवणुकीत वाढ झाल्याचा उन्माद नको, किंवा गुंतवणुकीची संधी गमावल्याबद्दल हताश होण्याचे कारण नाही. आपण प्रचलित बाजारपेठेतील संदर्भ समजून घ्या आणि भविष्यातील शक्यता लक्षात घेऊन निर्णय घ्यावेत.

गुंतवणूक ही साधीसरळ गोष्ट आहे. यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी तुम्हाला फार वेगळे काही करण्याची गरज नाही. खरं तर, जगातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदारांनी त्यांचा गुंतवणुकीचा मंत्र सोपा ठेवला आहे : चांगल्या व्यवसायात गुंतवणूक करा, शिस्तबद्ध पद्धतीने दीर्घ काळासाठी गुंतवणूक करा आणि  चक्रवाढीच्या सामर्थ्यांचा फायदा घ्या. म्हणूनच तुमच्या बाबतीत, चांगल्या म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक आणि तीही दीर्घ मुदतीसाठी राखणे हा यशाचा एक सोपा मार्ग आहे. एक प्रसिद्ध अवतरण आहे, ‘जर गुंतवणूक मनोरंजक असेल तर, तर आपल्याला त्यात मजा जरूर येईल, पण त्यामधून पैसे बहुदा मिळणार नाहीत! चांगली गुंतवणूक ही कंटाळवाणी(च) असते.’

नववर्षांच्या शुभेच्छा देताना हे वर्ष तुम्हा सर्वासाठी ‘कंटाळवाण्या’ पण फायदेशीर गुंतवणुकीचे ठरो!

(लेखक निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडाच्या उत्पादने विभागाचे प्रमुख)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2020 12:03 am

Web Title: investment tips for 2021 risks and opportunities for investors in 2021 zws 70
Next Stories
1 बाजाराचा तंत्र कल : नफावसुलीसाठी विक्री महत्त्वाचीच!
2 कर बोध – विवरणपत्र : वेळेवर दाखल न केल्यास?
3 टाळेबंदीतही तगलेली ‘पोलादी’ नाममुद्रा
Just Now!
X