16 October 2019

News Flash

वित्त मानसाचा लेखाजोखा

आजच्या लेखात कोणत्याही विषयावर माहिती न देता, वर्षभरात या लेखमालेचा आतापर्यंतचा प्रवास थोडक्यात सांगणार आहे.

|| भालचंद्र जोशी

आजच्या लेखात कोणत्याही विषयावर माहिती न देता, वर्षभरात या लेखमालेचा आतापर्यंतचा प्रवास थोडक्यात सांगणार आहे. ‘वित्त मानस’ लेखमालेने आर्थिक साक्षरतेसंबंधी वाचकांना खूप मदत केली. रोजच्या जीवनामध्ये आर्थिक साक्षरता अतिशय महत्त्वाची आहे, जी त्या व्यक्तीच्या सर्व आर्थिक स्रोतांसह सूचित आणि प्रभावी निर्णय घेण्यास मदत करते. त्याचप्रमाणे गुंतवणुकीची संधीदेखील उपलब्ध करते. आर्थिक नियोजनाचे महत्त्व इत्यादींचे ज्ञान हे आर्थिक साक्षरतेचे महत्त्वपूर्ण भाग आहेत. या सगळ्या गोष्टी आजच्या काळात तेवढय़ाच महत्त्वाच्या आणि गरजेच्या आहेत.

संपूर्ण वर्षांत आपण आर्थिक साक्षरता वाढवण्यास कशा प्रकारे माहिती घेतली, याचा थोडक्यात आढावा घेऊ यात. म्युच्युअल फंड उद्योग हा अतिशय विशाल आहे आणि आम्ही त्याच्या महत्त्वाच्या पैलूंवर माहिती देण्याचा प्रयत्न केला. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी विविध पर्यायांचा म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी), सिस्टिमॅटिक ट्रान्सफर प्लॅन (एसटीपी), सिस्टिमॅटिक विथड्रॉवल प्लॅन (एसडब्ल्यूपी) इत्यादींचा उपयोग कसा केला पाहिजे याविषयी आपण माहिती घेतली. गुंतवणुकीसाठी आर्थिक उद्दिष्टांचे तसेच लवकरात लवकर गुंतवणुकीस सुरुवात करण्याचे महत्त्व आणि त्यानुसार आर्थिक सल्लागारांची मदत घेऊन ते ठरावीक वेळेत कसे साध्य करावे हे आपण जाणले. म्युच्युअल फंडाची गुंतवणूक पद्धत ही ‘कंपाऊंडिंग’ची (चक्रवाढ दराने परताव्याची) शक्ती वापरून केली जाते. आपल्या विविध आर्थिक गरजा, उद्दिष्टे आणि आपली गुंतवणुकीची रक्कम यांची सांगड घालून म्युच्युअल फंडातील विविध योजनांचा फायदा कसा करून घेता येईल हे आपण जाणले. सेवानिवृत्ती योजनेसाठी म्युच्युअल फंड हा एक गुंतवणुकीचा अतिशय प्रभावी पर्याय असू शकतो हे आपण जाणले. याचसोबत सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ‘सेबी’ने घोषित केलेले योजनांचे वर्गीकरण गुंतवणूकदारांना गुंतवणुकीसंबंधित जोखीम दर्शविण्यात कशी मदत करते हे आपण जाणले. म्युच्युअल फंडांच्या ‘एसआयपी विमा’ योजना या सुविधेमार्फत गुंतवणूकदारांना विमा पर्याय उपलब्ध असतो आणि त्याचे आर्थिक उद्दिष्टामधील महत्त्वाचे योगदान आपण जाणून घेतले. म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक निश्चितपणे बाजार-जोखीमअधीन आहे. तसेच विविध तंत्रज्ञानाची उपलब्धता असलेले म्युच्युअल फंड्स आणि आपली आर्थिक उद्दिष्टे व जोखीम घेण्याची पद्धत निवडून आर्थिक सल्लागारांच्या मदतीने केलेली विविध योजनांची निवड यांची सांगड घालून आपण आपली आर्थिक उद्दिष्टे आणि ध्येये कशी साध्य करता येतील हे या लेखमालेद्वारे समजावण्याचा छोटासा प्रयत्न केला गेला.

खरे पाहता ही लेखमाला म्हणजे वाचकांशी साधलेला संवादच होता, ज्यामुळे आर्थिक साक्षरता जागृतीच्या कामातील खूप छोटासा असा खारीचा वाटा उचलता आला. यापुढेही या संवादातून जागृतीचे काम करायला नक्कीच आवडेल. त्यामुळे संपर्क-भेट घडतच राहील, अशी आशा करून इथेच थांबतो.

(लेखक गेली २७ वर्षे बँकिंग आणि आर्थिक सेवा क्षेत्रात कार्यरत असून, सध्या रिलायन्स म्युच्युअल फंडात गुंतवणूकदार सेवा आणि ऑपरेशन्स विभागाचे प्रमुख आहेत.)

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

First Published on December 24, 2018 12:34 am

Web Title: investments in india